ते १०० तरुण कुठे आहेत?
या महिन्यात स्वातंत्र्यदिन! स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलंय. प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी. असे असूनही आपण खरंच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न मात्र पडतोच पडतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, समर्पण, शौर्याची कल्पना नसलेल्या अनेकांना 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं. असं वाटलेल्यापैकी अनेकांना कळलं की हे सुद्धा मृगजळच आहे. एकीकडे महासत्तेच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे जगणं कठीण झालंय. जात, धर्म अशा अस्मिता टोकदार झाल्यात. माणूस माणसाकडे माणूस म्हणून बघतच नाही. मरण भलतंच स्वस्त झालंय आणि जगणं महाग.

सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. तो पिंजरा वातानुकुलित असतो. पोपट मालकाने दिलेला खाऊ आनंदाने खायचा. खुशीत गाणी म्हणायचा. लोकांची करमणूक करायचा. त्याला बाहेरचं जग मात्र कळतच नाही. त्याने कधी मुक्तपणे उडण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. कधी पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला तरी त्याला बाहेर स्वैर उडणं माहीत नसतं. पडण्याच्या भीतीमुळे त्याची उंच भरारी घेण्याची हिंमत संपुष्टात आलेली असते. सगळं ऐतं मिळाल्याने त्याला पोटापाण्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतात हेच माहीत नसतं. आपली नोकरी, समाज, जात, धर्म असे अनेक पिंजरे आजूबाजूला आहेत. त्यात आपल्याला बांधून ठेवलं गेलंय. असे पिंजरे तोडून जे स्वतःचा मार्ग निवडतात, ते खरे स्वतंत्र! समाज काय म्हणेल, माझं पुढे काय होईल? याचा विचार न करता आपल्याला मनापासून जे वाटतं ते करण्याची वृत्ती म्हणजे स्वातंत्र्य! असं स्वातंत्र्य उपभोगणारे किती जण आहेत?
अर्थात या स्वातंत्र्यातही नैतिकतेची काही मूल्ये असायलाच हवीत. आपली स्वप्नं, आपल्या महत्त्वाकांक्षा इतरांच्या सुखाच्या आड येऊ नयेत. मला वाटतं म्हणून मी व्यसन करेन, अनैतिक मार्गाचा अवलंब करेन, भ्रष्ट मार्गाने वाटचाल करेल असं कुणाला वाटत असेल तर ते स्वातंत्र्य नाही. सर्व सुख-सुविधा उपलब्ध असूनही तिकडे दुर्लक्ष करत आपले मार्ग निर्माण करण्यात खरा पुरूषार्थ असतो. स्वतः आनंदी राहण्याबरोबरच इतरांना आनंद देत जो प्रगतीच्या दिशेने झेपावतो ती खरी स्वतंत्र मार्गाने मिळवलेली यशस्वीतेची वाट असते.
15 ऑगस्ट 1947 नंतर काय घडलं? आपल्याला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं. त्यात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण कुणीही गुलाम नाही, ही जाणीव त्यात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? आपले निर्णय आपल्याला घेता येतात का? आपण खरंच कुणाचे गुलाम नाही ना? आपल्याला मनासारखं बोलता, वागता येतं का? आपल्याला ‘स्वातंत्र्य’ आणि ‘मनमानी’ यातला फरक तरी कळलाय का? देशापुढे नेमक्या कोणत्या समस्या आहेत? त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल? याबाबत आपण काही चिंतन केलंय का? या राष्ट्राचे नागरिक म्हणून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात तिकडे तरी आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो का? ‘मी आणि माझे’ यापुढच्या विश्वाची जाणीव आपणास आहे का? एकीकडे काही तरूण देशाच्या वैभवात, कीर्तीत भर घालत असताना दुसरीकडे अनेक जण भरकटलेले का आहेत? मी कोण आहे? हे आपल्याला स्वतःला ठरवता येतं का?
स्वामी विवेकानंद म्हणायचे, “मला तेजस्वी, निःस्वार्थ, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रभक्त असलेले फक्त शंभर युवक द्या, मी संपूर्ण राष्ट्राचे परिवर्तन घडवून दाखवेन. उठा आणि जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका,” असा संदेश त्यांनी दिला. निदान भारतीय स्वातंत्र्यानंतर तरी असे शंभर युवक आपण घडवू शकलो आहोत का? मग राष्ट्र म्हणून टिंग्या हाकण्यात काय अर्थ? ब्रिटिश सत्तेच्या गुलामीच्या बेड्या झिडकारून देताना अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचा विसर आपल्याला पडला. इंग्रजांच्या राजवटीतून बाहेर येणे इतकाच स्वातंत्र्याचा अर्थ नाही. स्वातंत्र्य म्हणजे एक संधी असते. ती एकदा दार ठोठावते आणि ते उघडले नाही तर पुढे निघून जाते. दुर्दैवाचं तसं नसतं. जोपर्यंत आपण दरवाजा उघडत नाही तोपर्यंत ते दार वाजवत राहतं.
एखादा चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे स्वातंत्र्याचे सौंदर्य आहे. एखाद्या हमालाचा, कामगाराचा, शेतमजूराचा मुलगा प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, पिढ्यानपिढ्या डोक्यावरून मैला वाहणारा एखादा डॉक्टर होऊ शकतो, एखादा रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, बूट पॉलिश करणारा मोठ्यात मोठा उद्योजक होऊ शकतो. हे आणि असं बरंच काही स्वातंत्र्याचं फलित आहे. मनासारखं काम करता येणं, त्यासाठी सर्वस्व पणाला लावून मेहनत घेणं, जिद्द आणि चिकाटी ठेवून यशाला गवसणी घालणं यात स्वातंत्र्याची बीजं आहेत. गाणं गावसं वाटलं तर गाता येणं, खेळावंसं वाटलं तर खेळणं, नाचावंसं वाटलं तर नाचणं, बोलावंसं वाटलं तर बोलणं, एकंदरीत काय मनासारखं जगता येणं, मनासारखे निर्णय घेता येणं यात स्वातंत्र्याचं प्रतिबिंब आहे. कुटुंबीयांच्या अपेक्षा, समाजाचं दडपण, सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतलेले निर्णय यातून स्वातंत्र्य उपभोगता येत नाही!
15 ऑगस्ट 1947 नंतर आपण मालकी हक्काच्या घरात आलोय. हा देश आपल्या सर्वांचा आहे. आपण राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू शकतो. आपल्यावर काही अन्याय झाला तर न्याय मागू शकतो. आपल्या अधिकारासाठी मोठ्यात मोठ्या शक्तिशी कायदेशीर मार्गाने लढू शकतो. आपल्याला कोणत्या विद्याशाखेत शिक्षण घ्यायचं?, भविष्यात काय योगदान द्यायचं? हे आपण ठरवू शकतो. आपण कोणते कपडे घालायचे? कोणती भाषा शिकायची? कोणत्या भाषेत वाचन, लेखन करायचं? याचे निर्णय आपल्याला घेता येतात. आपल्याला आपला जोडीदार निवडण्याचं आणि काही कारणांनी जमलंच नाही तर जोडीदारापासून विभक्त होण्याचंही स्वातंत्र्य आहे. गुलामीची साखळी नसतानाही स्वतःला शिस्त लावणं आणि मनासारखं जगणं हे ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेत अभिप्रेत आहे. कायदेशीर मार्गाने प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करण्याची, त्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आहे.
नुकतीच आपल्याकडे एक घटना घडली. नीटचे पेपर फुटले. त्या विरूद्ध देशातल्या काही तरूणांनी आंदोलन उभारलं. ते इतकं टोकाला गेलं की देशाचे शिक्षणमंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रधानांचं योगदान काय? तर ते मोदी सरकारमधील पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले शिक्षणमंत्री होते. ते ज्या खात्याचे मंत्री होते त्याचं नाव पूर्वी ‘मानव संसाधन विकास मंत्रालय’ असं होतं. स्मृति इराणी, आपल्या पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाला निशंक हे मानव संशोधन विकास मंत्री होते. नंतर या मंत्रालयाचं नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ करण्यात आलं. पहिल्या तिघांना आपली पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करता आली नव्हती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुढे आलेल्या धर्मेन्द्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं कार्य केलं असेल तर त्यांनी नवं शैक्षणिक धोरण आणलं. या धोरणाचे शिल्पकार ठरलेले, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले धर्मेन्द्र प्रधान यांना विद्यार्थी आंदोलनामुळेच राजीनामा द्यावा लागला हा योगायोग दुर्दैवी म्हणावा लागेल. ‘एका मराठी पोरानं दिल्ली झुकवली’ असं अनेक जण मोठ्या तोऱ्यात सांगत असले तरी ‘सहा मराठी माणसांनीच हा पेपर फुटीचा घोटाळा केला होता,’ हेही लक्षात घ्यायला हवं.
या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसवाले, डावे, पुरोगामी पुढे सरसावले. विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीसाठी जे आंदोलन होते ते सरकारविरोधी झाले. पंतप्रधानांना त्याची दखल घ्यावी लागली. नैतिकता स्वीकारत प्रधान यांनी राजीनामा दिला. शिक्षण मंत्री पदावर असताना राजीनामा द्यावा लागणारे प्रधान हे देशाचे दुसरे मंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात तेव्हाचे शिक्षण मंत्री मोहम्मद करीम छागला यांना राजीनामा द्यावा लागला होता. इंदिरा गांधी यांच्याशी वैयक्तिक आणि राजकीय मतभेद झाल्याने तो राजीनामा द्यावा लागला होता. देशात आजवर दहा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. त्यात लालबहादूर शास्त्री आणि नितीशकुमार यांनी रेल्वे अपघातामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. धर्मेन्द्र प्रधान यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. उर्वरित सात मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे एकेकाळी ओडिशात पेपर फुटीवरूनच आंदोलन करत पुढे आलेल्या प्रधान यांना ‘न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा’ भोगत राजीनामा द्यावा लागला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
या आंदोलनात तरूणाईचा सहभाग विलक्षण होता; मात्र त्यातील अनेकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्य, शिवराळ भाषा पाहता आपण कोणत्या दिशेने जात आहोत याची चिंता वाटते. राजकीय विरोध जरूर असावा मात्र तो करताना तारतम्य सुटले की काय होते हे या आंदोलनातून दिसून येते. केतकी चितळे नावाच्या एका अभिनेत्रीने फेसबुकवर शरद पवार यांच्या विरूद्धची एक कविता शेअर केली होती. कोविडच्या त्या काळात केवळ एक कविता शेअर केली म्हणून आजारी असलेल्या केतकीला पोलिसांनी उचलले आणि तब्बल चाळीस दिवस डांबून ठेवले. त्याउलट पंतप्रधानांच्या दिवंगत आईचा अश्लिल शब्दात उद्धार करणारे महाभाग आज मोकाट बाहेर फिरत आहेत, ही मोदी सरकारच्या सहिष्णू भूमिकेची आणि खऱ्या अर्थी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किमया म्हणावी लागेल. स्वातंत्र्याचा असा अतिरेक घडला तर भविष्यातली वाटचाल आणखी कठीण होत जाईल.
तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांनी 2020 साली भारत महासत्ता होणार असे भाकित केले होते. आता 2026 संपत आल्यावरही आपण अनेक क्षेत्रात धडपडतच आहोत. हे सर्व महापुरूषांचे अपयशच म्हणावे लागेल. ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात,’ हे आचार्य विनोबाजींचे वाक्य आज आपण सगळेच कृतितून सिद्ध करत आहोत. प्रत्येक महापुरूषांच्या नावे जी दुकाने मांडलीत ती माणसा-माणसात भेद निर्माण करणारी आहेत. आपली भक्ती कुणावर असावी हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे पण माझा नेता, माझा आदर्श हाच सर्वेात्तम आहे आणि इतर सर्व फूटकळ आहेत, असा आव आणणं हा स्वातंत्र्याप्रती केलेला द्रोह आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावाने तर महाराष्ट्रात गेली कित्येक दशके राजकारण सुरू आहे. महाराजांचे नाव घेत अनेक राजकीय पक्षांनी त्यांची पोळी भाजून घेतली. लोकांची दिशाभूल केली. सत्तेचा वाटाही मिळवला मात्र शिवरायांच्या विचारांची तत्त्वे ते अंगिकारू किंवा रूजवू शकले नाहीत. आजूबाजूला घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटना, भ्रष्टाचार हे कशाचे द्योतक म्हणावे? एक तरी महापुरूष आपल्याला नीट कळला आहे का? मग कसले आणि कुणाचे स्वातंत्र्य?
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर अनेक कार्यक्रम होतील. मोठमोठ्या आवाजात देशभक्तीपर गाणी लावली जातील. शालेय साहित्य वाटप केले जाईल. फळे-खाऊ वाटप होईल पण मूलभूत स्वातंत्र्याचे काय? आपण माणूस म्हणून वाटचाल करणार आहोत का? स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेले देशप्रेमाने ओथंबलेले युवक निर्माण होण्यासाठी आम्हाला आणखी किती काळ वाट पाहावी लागणार? या प्रश्नाच्या उत्तरातच देशाच्या भविष्यातील वाटचालीचा आरसा दिसणार आहे.
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
मासिक साहित्य चपराक ऑगस्ट २०२६
.jpg)



Comments