पाऊस अन् प्रेम
दोन्ही शब्द आशयगर्भ आणि खूप मोठा आयाम असलेले. कितीतरी संदर्भ, कितीतरी प्रकार. दोन्हींचा अनुभव घेतला तरच अनुभूती. फक्त पाऊस दिसतो/दाखवता येतो. पाऊस अस्सल असतो, प्रेमही अस्सल असतं तरीही प्रेम मात्र ओळखावं लागतं. अन्यथा फसगत होऊ शकते.

वयानुसार प्रेमाचा संदर्भ बदलतो. आपल्यावर कोण जीव लावतं हे लहान बाळांना चटकन समजतं. त्यांच्याकडूनही प्रेमाची परतफेड लगेच सुरुही होते. काही व्यक्तिंना काही काळात प्रेम वेडं करून सोडतं. प्रेम आणि पाऊस दोन्हीवर उतारा नसतो, भरपाई नसते, विकत घेता येत नाही. पाणी विकत घेता येईल पण पाऊस नाही. दोन्हींचंही सामर्थ्य केवढं? दोन्हींचाही उगम अन् शेवट नक्की सांगता येत नाही. प्रेम कधी ना कधी अनंतात विलीन होतं आणि पावसाने आणलेलं पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्रात समर्पण करतं.
पाणी वाहतं असेल तरच ते स्वच्छ आणि निर्मळ राहतं, जे जास्त उपयुक्त असतं. अन्यथा डबकं झालं की त्याची क्वालिटी बदलते. नको त्या गोष्टींचा जन्म सुरु होतो आणि ते मग नकोसं होऊन जातं. थोडं फार निरूपयोगी. पाणी सगळ्यांना रोज लागतं, गरज सगळ्यांनाच असते. माणसं, प्राणी, झाडं, शेतं वगैरे! पण पाऊस ठरावीक काळच येतो. पावसाच्या पाण्याचं नियोजन करावं लागतं. ठिकठिकाणी बंधारे किंवा धरणं बांधावी लागतात. यासाठी ज्ञान आणि कौशल्य लागतं. तरच ते पाणी पुढच्या येणाऱ्या पावसापर्यंत टिकवून वापरता येतं.
प्रेम रोज मिळू शकतं तरी तिथं ज्ञान अन् कौशल्य यांचा संबंध येतो का हो? कधी विचार केलाय?
प्रेमात समजून घ्यायचं असतं. ज्या व्यक्तिवर प्रेम असतं त्या व्यक्तिच्या गरजाही ओळखाव्या लागतात. त्या अनुषंगाने प्रेम असावं लागतं. अन्यथा प्रेमाच्या जागी जाच उगम पावतो. जबरदस्तीत प्रेम कधीच फुलत नसतं. पावसानंतरच्या वाहणाऱ्या पाण्याला कुठेही कसाही अडथळा आला/ आणला तरी पाणी आपला मार्ग स्वतः शोधते. प्रेमात पण थोडं फार साम्य आहेच. मनासारखं जिथं घडत नाही तिथं प्रेम दिशा बदलू शकतं.
समाजाशिवाय माणूस जगू शकत नाही. प्रेम मिळायला जरी सुरूवात घरातून होत असली तरी नंतर घराबाहेरील व्यक्तिंच्या माध्यमातून वेगळं प्रेम मिळत जातं. वेगवेगळ्या नात्यांचे वेगवेगळे संदर्भ. म्हणून मिळणाऱ्या/ देणाऱ्या प्रेमाचे पदरही वेगळे. फक्त आईवडील किंवा बहीण भाऊ यांचं प्रेम असतं तर त्यावर समाधान झालं असतं? काका काकू, मामा मामी, मावशी काका, आज्जी आजोबा प्रत्येकाच्या प्रेमाचा आवाका वेगळा.
घराबाहेरील मिळणाऱ्या प्रेमात सर्वश्रेष्ठ मैत्रीप्रेम. जेंडरचा काही संबंध नसतो. नि:स्वार्थी प्रेम फक्त मैत्रीतून मिळू शकतं.
माणूस किती नशीबवान नाही? असंख्य प्रकारचं प्रेम, जगताना आयुष्य कसं उत्सव होऊन जातं. ही नाती सुद्धा जपावी लागतात, जोपासावी लागतात. उगीच कोण कुणावर प्रेम करेल? प्रेमाचं सातत्य असतं तसं जपण्याचं सातत्यही अपेक्षित असतं.
पावसाचं पर्यायानं त्यातून मिळणाऱ्या पाण्याचं सुद्धा थोडं असंच असतं. पाण्याचे वेगवेगळे स्रोत असतात. विहीर किंवा बोरिंग म्हणजे जमिनीतून मिळणारं पाणी पण तिथं ते येतं कुठून, साठल्याशिवाय? मूळ स्रोत पावसाचा तर असतो. पाऊस जिथं कमी पडतो तिथं जमिनीखालील पाणीही कमी होतंच ना? नदी, सरोवर, तळी यातील पाणी सुद्धा जपावं लागतं. प्रेमातील आणि पाण्यातील शुचिता ही महत्त्वाचीच.
पाऊस जेव्हा सुरूवातीला पडतो तेव्हा छोटे छोटे तुषार अंगावर झेलायला सगळ्यांना आवडतात पण जेव्हा तो आक्रमकतेने कोसळतो तेव्हा तो आप्त वाटत नाही. चार हात लांब ठेवला जातो. प्रेमातही नको तिथं नको तेव्हा आक्रमकता आली की त्यातली गोडी निघून जाते. पावसात भिजायला सगळ्यांना आवडतंच. प्रेमात नहायला सगळ्यांना नाही आवडत. दिलखुलास मन हळव्या हृदयाला मिळालं की वेगळ्या प्रेमाची अनुभूती मिळते.
पाऊस म्हटलं की कोरडा दुष्काळ किंवा ओला दुष्काळ आठवल्याशिवाय राहात नाहीत. दोन्हीचे परिणाम दीर्घकालीन असतात. तशा नैसर्गिक आपत्तीला सामोरं जायला समाज किंवा शासन मदत करत असतं. एकलकोंडी असा शिक्का मारणं सोपं असलं तरी त्याची कारणं प्रेमात सापडू शकतात. प्रेम अजिबात न मिळालेली व्यक्ती कोरडी, शुष्क बनत जाते. काही वेळा प्रेमात विश्वासघात होऊन प्रेमाविषयी प्रेमच राहात नाही. हा झाला प्रेमाचा कोरडा आविष्कार. बेफाट वाऱ्याच्या साथीने आलेला, ढग फुटीतून आलेला आणि थांबायचं नाव न घेतलेला अति पाऊस हा संहारकच असतो. खूप काही उद्ध्वस्त करून टाकतो. प्रेम असतं का हो संहारक? असतं ना, म्हणून तर एकतर्फी प्रेमात नकार पचवायची ताकद नसते. त्यातूनच खून करण्यापर्यंत पराकोटीचे निर्णय घेतले जातात. अशा प्रलंयकारी प्रेमात इतरांची फारशी मदत होत नाही कारण त्या व्यक्तिंची इतरांकडून मदत घेण्याची मानसिकता नसते. तो झंजावात स्वतःलाच निस्तरावा लागतो.
पावसाचा आवाज येतो. थेंबांची टपटप, सरिंचा, गारांचा, संथ वाहणाऱ्या पाण्याचा, खळखळत वाहणाऱ्या पाण्याचा धबधब्याचा वगैरे. प्रेमाचेही आवाज येत असतात, ऐकणाऱ्याचं कौशल्य असेल तर सर्व प्रकारचे येतात. मृदू, लाघवी, ओथंबलेलं, राकट, तापट, रांगडं, धसमुसळं, हट्टी, चिडखोर, उद्विग्न, आक्रस्ताळी वगैरे.
पाण्याला एक विशिष्ट वेग असतो. तसाच प्रेमालाही असतो. ज्याच्या त्याच्या पेसने जावं लागतं. नाही तर दमछाक ठरलेली. वेग पकडता येण्याचं कौशल्य असेल तर निराशा टाळता येऊ शकते.
प्रेमाचं व्यसन लागू शकतं, आहारी जाणं वाढू शकतं, नादी लावणं/ लागणं सर्वांना माहीत असतं. प्रेमाची व्यक्ती आयुष्यातून निघून गेली की एखाद्या व्यक्तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. काही जण सावरतात, काही प्रयत्न करतात पण ती पोकळी कधीच भरून निघत नसते. पावसाचं मात्र असं काही नसतं. तो येतो कधी शांत तर कधी झंजावातासारखा. दरवर्षी, ठरावीक महिन्यांनी, न चुकता, मातृप्रेमासारखं, कर्त्यापुरुषासारखं जबाबदारी ओळखून येत राहतो.
अवखळ किंवा व्रात्य मुलांचा आईबाप राग राग करतात का? तसंच कितीही प्रलयंकारी पाऊस आला तरी त्याचा राग राग करू नये. तो बिचारा मुद्दाम थोडाच असं करेल? हवा, वातावरण, प्रदूषण, निसर्गातील तोही एक कठपुतळी...!
- डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, पुणे
9422010682
प्रसिद्धी - मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०२६
.jpg)



Comments