मसाला पान - टाळूवरच लोणी गिळलय कोणी...?
(या लघुनाट्यांशामधील सर्व पात्रे व घटना काल्पनिक असून, ती कोणाच्या व्यक्तिमत्त्वाशी वा घटनांशी जुळून आल्यास तो निखळ योगायोग समजावा. - लेखक)
(फाकडोजी महाराज, सेवक व प्रधानजी वेषांतर करून एका गावात प्रजेची मते ऐकण्यासाठी आले आहेत. भुरभूर पाऊस सुरू असल्याने तिघांनीही रेनकोट घातले आहेत. डोक्यावर छत्र्याही धरल्या आहेत. वेळ सायंकाळची. पत्र्याच्या शेडचा आडोसा असलेल्या एका दुकानाजवळ ते थांबतात.)
दुकानदार - रामराम पाव्हणं! बोला, काय पाहिजे? अन एवढ्या पाऊसपाण्यात इकडं कुठं? कुठले पाहुणे म्हणायचे? दिंडीत वाट चुकलात की काय?
सेवक (छत्री बंद करत) - काही नाही हो. जरा उशीरच झाला घरून निघायला अन वाटही चुकलो वाटतं! वाटेगावच आहे ना हे?
दुकानदार - व्हयं, व्हयं. वाटेगावच आहे की हे! कुणाकडं आलात आपण?
(तिघेही गोंधळतात. प्रधानजी स्वतःला सावरत बोलतात.)
प्रधानजी - इथं नाही भेटायचं हो कुणाला, पुढच्या गावी जायचंय भाटगावला. (विषय बदलत) ते फुटाणे देता का जरा पावशेर?
दुकानदार - कोणते देऊ, खारे की बिगर मिठाचे?
(प्रधानजी महाराजांकडे पाहतात. महाराज खाऱ्या फुटाण्याच्या बरणीकडे बोट दाखवितात.)
प्रधानजी - द्या ते खारेच द्या. आणि जरा चहा वगैरे इथं मिळेल का कुठं?
(दुकानदार कागदात फुटाणे बांधून देतो. ते सेवक घाईघाईने घेतो.)
दुकानदार - अहो पाव्हणं, चहा मीच बनवून देतो की! इथंच या दुकानाच्या मागच्या खोलीत चहा बनवतो आणि आणून देतो की. चहाचा बी धंदा आहे की आपला.
सेवक - अरे व्वा! म्हणजे 'टू-इन-वन'! याला म्हणतात उद्योजकता!
दुकानदार - 'टू-इन-वन' नाही, 'थ्री-इन-वन' म्हणा पाहुणे. पान स्टॉल पण हाय आपलं. हे बघा, फ्रीजमध्ये सकाळी घरून येतानाच तीसेक पानं लावून आणतो. आमची मिसेस हे पान लावायचं काम लयी भारी करती बघा. कलकत्ता म्हणू नका की बनारस, एकदम बेस्ट!
(फ्रीज उघडून दाखवितो.)
महाराज - पुणा मसाला पान आहे का?
दुकानदार - मग, आहे की एकदम गुलकंद मिठा!
महाराज (उत्साहाने) - व्वाह! मस्तच. झालं तर मग आमचं काम सोळा आणे...!
(दुकानदार आत जातो.)
प्रधानजी - महाराज, काय हे...? अहो, इथलं पान?
महाराज - प्रधानजी शांत राहा. महाराज नका म्हणू हो, संशय येईल की या दुकानदाराला! आणि समोर बघा की, त्या खिडकीतून कोणीतरी पाहतंय आपल्याला. सावध राहा जरा!
प्रधानजी (कानाला हात लावत) - क्षमा असावी, पण तुमचा उत्साह पाहून राहवलं नाही हो! आणि आलं तोंडात.
सेवक (गालात हसत) - घ्या आता हे खारे फुटाणे. प्रधानजी, घ्या की तुम्हीही!
प्रधानजी - प्रधानजी नाही रे, दादाभाऊ म्हण.
सेवक (स्वतःवरच नाराज होत) - स्वारी हं!
(तिघेही फुटाणे खाऊ लागतात. तेवढ्यात दोन तरुण दुकानासमोर येतात.)
दोघे तरुण - रमाआण्णा, दोन 'बटण' द्या हो...!
(सेवकाकडे निरखून पाहत एक तरुण जवळ येतो.)
एक तरुण - कोण हो तुम्ही? या गावात तर कधी दिसला नाहीत?
सेवक (चाचरत) - मी... मी सखा बापू उंबरे, कन्हेरवाडीचा.
दुसरा तरुण - आणि हे दोघं?
सेवक (प्रधानजींकडे पाहत) - हे आमचे दादाभाऊ नाईक आणि (महाराजांकडे बोट दाखवत) हे माझे काका संभाजी उंबरे. आम्ही सारे कन्हेरवाडीचेच. पुढं जरा भाटगावला जायचंय आम्हाला, तिथं आज दिंडीचा मुक्काम हाय...!
प्रधानजी - आणि आम्ही हायवेने जाण्याऐवजी मधल्या रस्त्याने निघालो, तर रस्ताच चुकलो बघा.
एक तरुण - बरं! पण आण्णा कुठं गेलेत?
सेवक - ते मधी गेलेत, चहा बनताहेत.
तरुण - रमाण्णा, ओ रमाण्णा! या की जरा बाहेर. दोन 'बटण' द्या.
(आतल्या खोलीतून आवाज येतो.)
दुकानदार - आलो रे आलो नंद्या! थांब जरा, चहा गाळतोय.
दुसरा तरुण - या लवकर! हा रमाण्णा म्हणजे लयीच उद्योगी माणूस...! सगळे उद्योग एकटाच करतोय.
(दुकानदार चहाची किटली आणि चार ग्लास घेऊन बाहेर येतो. काउंटरवर ते ठेवत...)
दुकानदार - बोल रे, काय हवं ते? आणि नंदूशेठ, आज हा मधू तुझ्याबरोबर कसा? काल तर इंटरव्यूला जाणार होता ना बँकेत?
मधू - अहो, लई मोक्कार पाऊस झाला तिकडं. दरडी कोसळल्यात, रस्ते खचलेत, रस्त्यावर कंबरेएवढं पाणी; कसं जाणार मग? केलं कॅन्सल...!
नंदू - आण्णा, ते जाऊ द्या. आधी दोन 'बटण' द्या बरं, गारव्यानं पार अंग धरलंय हो!
(दुकानदार ड्रॉवरमधून दोन सिगारेट व आगपेटी काढून देतो.)
दुकानदार - हे घे! अन जा तिकडे आडोशाला. इथं नका धूर उधळू... निघा! तीस रुपये दे!
(एक तरुण मागच्या खिशातून तीस रुपये काढून देतो, तर दुसरा सिगारेट व काडीपेटी उचलतो. दोघेही समोरच्या पडक्या घराच्या आडोशाला जातात.)
दुकानदार (ग्लासात चहा ओतत) - माफ करा माऊली! पण ही पोरं ना...! हं घ्या चहा, अगदी मस्त बनवलाय हं. कसा झाला ते सांगा. अजून काही सेवा...?
महाराज (चहाचा ग्लास हातात घेत) - नको काही. बसा जरा आमच्यासोबत आणि तुम्हीही घ्या की चहा!
(दुकानदार चहा घेत स्टूलवर बसतो.)
प्रधानजी (दुकानदाराकडे पाहत) - हे सिगारेटला 'बटण' काय म्हणतात हो?
दुकानदार (चहाचा घोट घेत) - ते काय हाय पाव्हणं, अहो आता सिगारेटला एक छोटं बारकं बटण येतं. ते दाबलं की, मेन्थॉलचा नाहीतर फळांचा सुगंध येतो म्हणे धुराला. आणि ओढताना त्रास नाही होत म्हणे, म्हणून ही बटणची सिगारेट. साधी जरा कडक असते ना, म्हणून पोरं आता ही ओढतात. शहरातून शिकून आलेल्या पोरांचं पाहून गावातील पोरंही 'बटण'च मागतात हल्ली.
महाराज (चहाचा ग्लास खाली ठेवत) - असं आहे तर हे! आजपर्यंत हे काही ऐकलं नव्हतं बुवा!
सेवक - ऐकावं ते नवलच! काय घडलं आणि कसं कसं बिघडलं, काहीच नाही सांगता येत हल्ली...!
दुकानदार - चालायचंच हो पाहुणे...! काळच असा आहे हा. या पोरांच्या हाताला काम नाही, शेतात काम करायची इच्छा नाही, आईबापांचे एकुलते एक...! बोललं तर अपमान वाटणार, चिडचिड करणार. सोडताही येत नाही अन धरताही येत नाही. आता आमचंच बघा ना, आमचा पक्या...
महाराज - कोण पक्या? आणि काय झालं त्याचं?
दुकानदार - आमचा मुलगा हो! चांगला डिप्लोमा झालाय, पण कंत्राटी नोकरीला नाही म्हणतो. आता कुठं परमनंट नोकऱ्या राहिल्यात का...? पण नाही, म्हणे खाईन तर तुपाशी...! परवा सांगायला गेलो आम्ही दोघं त्याला की, बाबा दुकानात बैस, शिकून घे, चांगला धंदा हाय. पण म्हणतो कसा, धंद्यात राम नाही राहिला, चिल्लर कुठं गोळा करत बसू मी?
महाराज (उत्सुकतेने) - मग?
दुकानदार - मग काय, गेला निघून परवापासून कुठंतरी. आता आमची ही जिवाला खात बसलीय. बेकार त्रांगडं हाय हो! आजकालची पोरं स्वप्नं लयीच मोठमोठी पाहतात, पण मेहनत छटाकभर करत नाहीत. बरं, साधं बोललं तरी अपमान, स्वाभिमानाला ठेच वगैरे! साराच वैताग!
सेवक - हो की, जरा काही झालं की अपमान. कधी माझा अपमान, कधी माझ्या गावचा अपमान, तर कधी महाराष्ट्राचा अपमान? कोणी म्हणतं देशाचा अपमान!
दुकानदार - अहो, पण मग चुका पण लक्षात आणून द्यायच्या नाहीत का?
महाराज (प्रधानजींच्या कानात) - लक्षात ठेवा हे काय म्हणताहेत ते, नाहीतर लिहून घ्या. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा!
प्रधानजी - होय जी! ठेवतो ध्यानात सारं.
सेवक (महाराजांकडे पाहत) - चलायचं का आता पुढं?
प्रधानजी - निघूयात आता. जनतेचे आणखी काही प्रश्न जाणून घेऊयात.
महाराज (दुकानदाराकडे पाहत) - चला, येतो आम्ही. आमचं एक मसाला पान द्या तेवढं आणि तुमचं बिल सांगा, किती झाले ते.
दुकानदार (फ्रीजमधून पान काढत) - तुमचे बघा फुटाण्याचे पंचवीस, चहाचे तीस अन पानाचे पंधरा. असे एकूण सत्तर रुपये झाले बघा पाव्हणं!
(महाराज प्रधानजींकडे पाहतात.)
प्रधानजी (दुकानदाराला पैसे देत) - हे घ्या शेठ! येतो आम्ही...!
(मघाचे ते दोघे तरुण परत येतात व काडीपेटी दुकानदाराला देऊन परतू लागतात.)
महाराज (तरुणांकडे पाहत) - का रे चाललात? थांबा की, जरा बोलायचंय तुमच्याशी.
एक तरुण (उर्मटपणे) - काय बोलणार काका? आणि तुम्ही काय आमचं दुःख हलकं करणार?
महाराज - तसं नाही, पण म्हटलं जाणून घ्यावं युवकांचं म्हणणं! त्यांच्या काही अडचणी वगैरे...?
दुसरा तरुण - बेकारांचं दुखणं काय सांगावं काका? जिथं तिथं पैसा लागतो हल्ली, आणायचा कुठून पैसा? कुठंही नोकरीचा अर्ज भरायचा म्हटला की पैसे लागतात. शासकीय नोकऱ्यांसाठीही प्रवेश शुल्क, आवेदन शुल्क किंवा परीक्षा फी भरावी लागते; तीही पाचशे रुपयांच्या पुढेच!
सेवक - म्हणजे आता जे आधीच नोकरी नसलेले, त्यांनी फी काय भरणार? खाजगी कंपन्यांचं ठीक आहे, पण सरकारही पैसे घेऊन नाडतंय बिचाऱ्यांना, असं आहे हे!
दुसरा तरुण - अहो काका, कंत्राटी नोकऱ्यांसाठीही आवेदन शुल्क आकारतात. आता एक उदाहरण देतो बघा, तलाठी भरतीचे आवेदन शुल्क असते पाचशे रुपये. लाखो तरुण अपेक्षेने उधार-उसनवारी करून अर्ज भरणार. करा हिशेब, पाचशे गुणिले एक लाख किती झाले?
प्रधानजी - पाच कोटी! बापरे!
पहिला तरुण - म्हणजे सरकार पाच कोटी कमावणार? आणि एखादा उमेदवार कोर्टात गेला की लटकली भरती वर्ष-दोन वर्षे! मग पुन्हा नवी जाहिरात, नवे शुल्क अन् नवी पायपीट...!
महाराज - हे धक्कादायकच आहे सारं...! म्हणजे नोकरभरती हा एक धंदाच झालाय. (प्रधानजींकडे रागाने पाहत) काय चाललंय हे?
सेवक - हे म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणंच की...? सारंच 'मिसिंग' मॅनेजमेंट आहे हे!
दुकानदार - मिसिंग नाही, सारंच फिक्सिंग!
महाराज (संतापत) - चला, निघूया आता!
प्रधानजी - अहो, असं काय करता? कुठे निघालात एवढ्या तावातावाने?
महाराज (चिडतच) - टाळूवरचं लोणी खाल्लंय कोणी? हे शोधायला...! चला!
(महाराज तरातरा चालू लागतात. त्यांच्या मागे प्रधानजी व सेवक स्वतःवरच चिडल्यासारखे करत, पाय आपटत धावतात.)
दोघे तरुण (आश्चर्यचकित होत) - का हो निघालात? आणि तिकडे कुठे? अहो, दिंडी इकडं भाटगावला...! समोरचा रस्ता नाही, हा पाठीमागचा रस्ता धरा...!
(दुकानदार चकित होत पाठमोऱ्या पाहुण्यांकडे पाहतो.)
(पडदा पडतो.)
{ वेलची - एकाची जळते दाढी अन दुसरा त्यावर पेटवी विडी. }
- जनार्दन देवरे, मनमाड. (९०११६९४८८५)
(साप्ताहिक चपराक, १३ ते १९ जुलै २०२६)
.jpg)



Comments