top of page

संपादकीय - रामो विग्रहवान धर्मः

  • 21 hours ago
  • 4 min read

गुरूवर्य प्राचार्य डॉ. राम शेवाळकर सांगायचे, “रामाचा आदर्श ठेवायचा तो सत्यवचनासाठी; बायकोच्या त्यागासाठी नव्हे!” गेल्या काही वर्षात बायकोचा त्याग करणारेच रामनामाचा महिमा सांगत आहेत आणि राम मंदिराच्या उभारणीचे राजकारण करत आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे, अशी हिंदुस्थानातील समस्त नागरिकांची इच्छा होती. ती इच्छा फळालाही आली. कित्येक वर्षांपासूनचे देशवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले. राजकीय इच्छाशक्तिचा अभाव, स्वार्थ आणि धार्मिक राजकारण यामुळे अडकलेले काम पूर्णत्वास गेल्याने अनेकांच्या मनात सत्ताधारी पक्षाविषयी कमालीचा उमाळा दाटून आला होता. यात बहुतेकांनी जमेल तसा खारीचा वाटा उचलला. श्रीराम मंदिराच्या निर्माणात आपला एक रूपया तरी असावा, या श्रद्धेतून ज्याला जसे जमेल त्याने तसा हातभार लावला मात्र रामभक्तांच्या या भावनांचाही बाजार मांडून तिथे सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे.


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने राम मंदिरासाठी दिलेली रक्कम आणि चांदी याची अजून साधी पावतीही मिळाली नसल्याचे सांगितले. अजूनही त्याबाबत संबंधितांचा खुलासा आला नाही. अनेकांच्या बाबतीत हेच घडले आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने, नेटाने आणि प्रामाणिक भावनेतून दिलेला पैसा मंदिराच्या नावावर कोणी हडप केला हे सर्वश्रुत आहे. याबाबत झुंड इतकी की कोणी जाब विचारलाच तर त्यांना थेट राष्ट्रद्रोही ठरवण्यापर्यंत यांची मजल जात आहे.


उत्तर प्रदेशचे माजी आमदार पवन पांडे यांच्या आरोपानंतर मंदिर ट्रस्टच्या तक्रारीवरून एफआरआय दाखल करण्यात आला. विश्वासघात, फसवणूक, बनावटगिरी, कट रचणे अशी कलमे त्यात घालण्यात आली. दानपेटीतून रोख रक्कम गायब होणे, भाविकांनी अत्यंत श्रद्धेने दिलेले सोने-चांदी, हिरे बदलून तिथे खोटे दागिने ठेवणे असे काही आरोप त्यात आहेत. हा ‌‘भाविकांच्या श्रद्धेशी खेळ‌’ आणि ‌‘संघटित लूट‌’ असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे तर अनाठायी आरोप करून रामाला बदनाम करायचा प्रयत्न असल्याचे हिंदुत्त्ववाद्यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण आता एसआयटीकडे गेले असून, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. अयोध्या येथील राम मंदिरातील नैवेद्याच्या चोरीचा अहवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भागवतांकडे तो अहवाल पोहोचल्यानंतर काही मोठे निर्णय घेतले जातील, असे सांगण्यात येत आहे.


22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‌‘राम हे वाद नाहीत; तर समाधान आहेत.‌’ त्यानंतर जगभरातील कोट्यवधी रामभक्तांनी पैसा, सोने, चांदी, दागिने, अन्य मौल्यवान वस्तू मोठ्या विश्वासाने आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने अर्पण केल्या. देशात सर्वाधिक देणग्या मिळवणाऱ्या मंदिराच्या दृष्टिने अयोध्येच्या रामाचा प्रवास सुरू झाला! मात्र ‌‘राम वाद नाहीत‌’ असे सांगणाऱ्या पंतप्रधानांच्याच कारकिर्दीत आणि मंदिर उभारणीच्या केवळ अडीच वर्षात इथल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येणे आणि मंदिर प्रशासन वादात सापडणे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मंदिरात जाऊन तिथल्या दानपेटीत पैसे टाकणारा भाविक ना कोणती पावती मागतो, ना त्याने दिलेल्या पैशाचा सुयोग्य विनियोग व्हावा म्हणून कोणाशी करार करतो! त्याची श्रद्धा फक्त रामावर असते आणि त्यामुळे तो स्वेच्छेने दान करतो. त्याच्या या भावनांचा अव्हेर केला गेल्याने समस्त हिंदू समाज अस्वस्थ आहे. रामाच्या नावावरच राजकारण करणारे आणि त्या जोरावरच सत्तेत असणारे यांच्यासाठी तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून यातील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जावी, अशी सामान्यांची भावना आहे. कुणाकडून आर्थिक फसवणूक झाली तर ती भरून काढता येते पण अशी भावनिक फसवणूक झाली तर त्या जखमा दीर्घकाळ भळभळत राहतात.


“पिढ्या न पिढ्यांच्या संघर्षामुळे आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग व भक्तीमुळे बांधलेले हे भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. रामलला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीची चोरी ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाच्या आणि आरएसएससह रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत,” असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटले आहे. ‌‘देशातील सर्वात मोठी चोरी‌’ म्हणून विरोधकांकडून सतत आरोप होत असताना देखील एकाही महत्त्वाच्या नेत्याची, पदाधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली नाही. त्यामुळे संघाची भूमिकाही वरवरची आणि कुणाला तरी पाठिशी घालणारी दिसते.


देशातील सनातन श्रद्धेशी खेळणारे कोण आहेत, याचा तपास करण्याऐवजी ‌‘राम मंदिर उभारणी कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजवादी पक्षाला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही,‌’ असे सांगितले जात आहे. ज्या प्रभू श्रीरामांनी एका धोब्याच्या संशयावरून सीतामाईंची अग्निपरीक्षा घेतली त्याच रामाच्या मंदिरात गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप होत आहेत आणि हे तथाकथित रामभक्त ‌‘त्यांना बोलण्याचा अधिकार नाही‌’ असे निर्लज्जपणे सांगत आहेत.


गोविंददेव गिरी अर्थात पूर्वीचे आचार्य किशोर व्यास हे या राममंदिराचे कोषाध्यक्ष आहेत. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चमच्याने तीर्थ भरवतानाचे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ही जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यांचा कोषाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. या प्रकाराने अत्यंत दुःखी आणि लज्जीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, “ट्रस्टचे सर्व व्यवहार चेकने होतात. मी पुण्यात वास्तव्यास असतो. कथा-प्रवचनांसाठी देशभर फिरावे लागते. त्यामुळे महिन्या-दीड महिन्यांत एकदा अयोध्येला जाणे होते. रोज दानपेटीत येणारे पैसे आणि त्याची मोजणी याच्याशी माझा संबंध येत नाही. माझ्या प्रवासासाठी सुद्धा मी आजवर न्यासाकडून एक रूपयाही घेतला नाही.”


या देणगी गैरव्यवहार आणि दानचोरीच्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका ‌घेत 'राम रक्षा आंदोलन‌’ सुरू केले आहे. मंदिरातील दानपेटीतील पैशांची चोरी करून तो पैसा राजकीय पक्ष फोडण्यात आणि त्यांच्यात फूट पाडण्यात वापरला असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय. लालकृष्ण अडवाणी यांनी ‌‘आता हिंदू मार खाणार नाहीत,‌’ असे विधान केले होते. तोच धागा पकडत ‌‘आता हिंदू माफ करणार नाहीत,‌’ असे उद्धव यांनी बजावले आहे. राज्यभर हनुमान मंदिरात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यांच्या आंदोलनात त्यांना पुस्तक हातात धरूनही रामरक्षास्त्रोत म्हणता न आल्याचा आरोप केला जातोय. ‌‘उद्धव ठाकरे यांनी आधीच रामाचे नाव घेतले असते तर त्यांची अशी वाताहत झाली नसती. उशीरा का होईना पण त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी,‌’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारलाय. मुख्य विषयांपासून भरकटत विरोधकांवर काही तरी आरोप करायचे आणि यातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करायचे, असे सत्ताधाऱ्यांचे धोरण दिसत आहे.


प्रभू श्रीरामांना ‌‘मर्यादापुरूषोत्तम‌’ म्हटले जाते. याच ‌‘मर्यादां‌’चा सर्वांना विसर पडतोय. ‌‘रामो विग्रहवान धर्मः‌’ म्हणजेच ‌‘राम म्हणजेच मूर्तिमंत धर्म‌’, अशी शिकवण आपण विसरलो आणि धार्मिक राजकारणात अडकलो. वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्य मोठे मानणारे, बंधुप्रेम, एकपत्नीव्रत जपणारे, कसलाही भेदभाव न करणारे, सत्यवचनी, कुटुंबप्रेमी आणि त्यागाचे प्रतीक असणारे श्रीराम आपले सर्वांचे आदर्श आहेत. त्यांचे मंदिर झाल्याने किंवा न झाल्याने आपल्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. त्यांचा एखादा गुण जरी आपल्याला कळला तर मात्र फार मोठे परिवर्तन घडणार आहे.


इतिहासात युगपुरूष राजे दोनच! एक प्रभू श्रीराम आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आपले दुर्दैव हे की या दोघांच्याच नावाने इथले राजकारण होते. सामान्य माणसाला त्यावरून वेठीस धरले जाते. या दोघांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्यावरून नेहमी वाद कसे निर्माण होतील हेच आपल्या राजकारण्यांकडून बघितले जाते. मग ते विषय श्रद्धेचे, अस्मितेचे होतात. त्यावरून वादंग निर्माण होते. त्यांच्यावरून सत्ता येते. आंदोलने होतात. सत्तेवरून पायउतारही व्हावे लागते. श्रीराम आणि छत्रपती शिवाजी हे फक्त शब्द नाहीत तर समाजमनासाठीचे मंत्र आहेत. ही नावे उच्चारली तरी भारावून जाणारा मोठा वर्ग आहे. त्या सगळ्यांच्या भावनांचा बाजार मांडण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळी करतात. तो थांबला पाहिजे. सामान्य माणसानेही याला बळी पडू नये.


तुळशीदास म्हणतात,

“दैहिक दैविक भौतिक तापा ।

राम राज नहि काहुहि व्यापा ॥”


म्हणजे “रामराज्यात कोणालाही शारीरिक, दैवी, भौतिक त्रास नव्हता. तिथे न्याय, शांती समृद्धी होती.” खुद्द रामरायाच्याच नावाने राजकारण करणाऱ्यांना अद्दल घडावी आणि अशीच समृद्धी आपल्या वाट्याला यावी, इतकीच यानिमित्ताने प्रार्थना!


-घनश्याम पाटील

7057292092

साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६



2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Guest
19 minutes ago
Rated 5 out of 5 stars.

मनाला वेदना देणारे हे वास्तव भविष्यात काय वाढवून ठेवले आहे त्याची जाणीव नक्कीच करून देते.व

Like

nageshspande@gmail.com
11 hours ago
Rated 5 out of 5 stars.

कटू आहे पण वास्तव सत्य आहे. निःपक्षपणे चौकशी होऊन श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे.

Like
bottom of page