संपादकीय : लोकशाहीचे वास्तव
- 1 day ago
- 4 min read
नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक! एका मुलाखतीत विलासराव देशमुख यांना ‘सर्वेात्तम प्रशासक’ म्हटल्याने त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काही मतभेद झाले आणि त्यांनी शिवसेना सोडली. ‘बाळासाहेबांनी मला हाकलून दिलं’ म्हणून ते सगळ्यांच्या समोर रडले. शिवसेनेत मुख्यमंत्री राहिलेल्या या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बारा वर्षे तिथे संसार केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘इथं माझी किंमत नाही.’ दोन्ही विचारधारा अनुभवल्यानंतर त्यांनी काय करावं? स्वतःचाच पक्ष काढला. त्याचं नाव काय ठेवंल? ‘महाराष्ट्र स्वाभिमान!’ अपेक्षेप्रमाणे तो सहा महिन्यात बंद पडला. मग त्यांनी भाजपशी जवळीक केली. ‘पक्षांतरबंदी’ या विषयावर बोलताना एका आमदारानं त्यांना उपहासानं सांगितलं, “राणे साहेब, तुम्ही तीन लग्न केलीत!” त्यावर क्षणाचाही विलंब न करता राणे म्हणाले, “हो! पण माझ्या तिन्ही बायका चांगल्या निघाल्या. त्यांच्याकडं मला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि खासदारकी मिळाली.”
म्हणून त्यांना ‘बंडखोरांचे बादहशा’ म्हटलं जाऊ लागलं.
आपल्या पक्षातून कोणी दुसऱ्या पक्षात गेला तर तो गद्दार आणि दुसऱ्या पक्षातून कोणी आपल्याकडे आला तर ते त्याचं हृदयपरिवर्तन, असे म्हणायचे दिवस आले. कपडे बदलावेत तसे नेते राजकीय पक्ष बदलू लागले. विचारधारा, निष्ठा हे सगळं मातीमोल ठरलं. उरला तो फक्त स्वार्थ. “सरकार कुणाचेही असू द्या, मी मंत्रीमंडळात असतोच,” असं सांगणाऱ्या रामदास आठवल्यांचं कुणाला वाईट वाटत नाही. त्यांनी केलेली तडजोड आणि प्रामाणिकपणे दिलेली कबुली हाही कौतुकाचा विषय झाला.
1999 साली ‘विदेशीबाई पंतप्रधानपदी नको,’ म्हणून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बंड केलं. पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ‘अमर, अकबर, ॲन्थोनी’ म्हणत माध्यमांनी त्यांची दखल घेतली. ज्या सोनिया गांधी यांना ‘विदेशी’ म्हणत पवारांनी बंड पुकारलं, त्याच काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर बनत त्यांनी केंद्रीय कृषी मंत्रपद स्वीकारलं. दिवस इतके बदलले की पुढे ते सोनिया गांधी यांचे जवळपास सल्लागारच झाले. कोणत्याही बंडातून स्वार्थ साधता येतो, सत्तेचा वाटेकरी होता येतं हे आजवर अनेकदा, अनेकांनी कृतितून दाखवून दिलं आहे.
एका नेत्याला विचारलं, “तुम्ही रातोरात पक्ष कसा बदलला?”
ते म्हणाले, “आम्ही एका लग्नाला गेलो होतो. तिथं आमची चर्चा झाली. आमच्या खूप गप्पा रंगल्या. त्यातून आमचे विचार जुळले आणि आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला.”
“मग ते लग्न टिकलं की मोडलं?” या प्रश्नावर ते म्हणाले, “पक्षांचं लग्न जुळलं. सत्तेचा वाटा मिळाला. आम्ही दोघेही खूश आहोत.”
रामायणातली एक कथा सांगितली जाते. राम-रावण युद्धाची! देवी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवायचं, म्हणून रामानं सेना तयार केली. अनेक पराक्रमी वानर त्यांच्या सोबत होते. युद्ध पुकारलं गेलं. प्रत्यक्षात ते सुरू झालं. सर्व देवदेवता स्वर्गातून हे घनघोर युद्ध बघत होत्या. त्यांच्या हातात फुलांच्या टोपल्या होत्या. त्यातून कुणावर पुष्पवृष्टी करावं हे मात्र त्यांना ठरवता येत नव्हतं. जर रामावर फुले टाकली आणि रावण जिंकला तर? किंवा रावणावर फुले उधळली आणि प्रभू श्रीराम विजयी ठरले तर...? 84 दिवस हे युद्ध सुरू होते आणि प्रभू श्रीराम जिंकणार याचा अंदाज देव-देवतांना आला. मग त्यांनी रामावर पुष्पवृष्टी करत त्यांचे गुण गायला सुरूवात केली. 85व्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि हे युद्ध संपले. म्हणजे देव-देवतासुद्धा कुणाची ‘जिंकण्याची शक्यता’ आहे हे पाहून कुणाला साथ द्यायची याचा निर्णय घेत असतील तर मग आजच्या नेत्यांच्या बदलत्या भूमिकांचे आश्चर्य वाटायला नको. जिथे स्वार्थ साधता येईल तिथे ते जाणारच! मग कुणी आईबाबाची शपथ घेत असेल नाही तर साईबाबाची! त्यांना फक्त सत्ता, पद, प्रतिष्ठा इतकेच दिसणार. जिथं मलिदा अधिक तिथं साहेबांचं बस्तान. मतदारांना काय वाटेल, ज्यांनी त्यांचे विचार, पक्ष, भूमिका बघून मतदार दिले ते काय म्हणतील याच्याशी त्यांना घेणं-देणं नसतं.
शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठित खंजीर खुपसला. काँग्रेसला फाट्यावर मारत राष्ट्रवादीची स्थापना केली. छगन भुजबळ शिवसेनेचे नगरसेवक झाले, आमदार झाले. ते सेनेतून बाहेर पडले. नारायण राणे फुटले. ‘नारायण आमचाच’ असं ‘सामना’चं मुख्य शीर्षक करत ज्या बाळासाहेबांनी राणेंवर विश्वास दाखवला ते राणे काँग्रेसमध्ये गेले. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेची स्थापना केली. ज्या विचारधारेच्या विरूद्ध बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांना बरोबर घेत, त्यांच्याच मदतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला भगदाड पाडले. त्यातून ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत ‘गुरूची विद्या गुरूला’ हे दाखवून देत स्वर्गीय अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राने बघितला. ‘औट घटकेचा राजा’ काय असतो ते दिसून आले. ‘जो घायल है ओ घातक है’ हे पुन्हा एकदा दिसून आले आणि दादांनी भाजपसोबत संसार थाटला.
मागे राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, ‘भाजपला देशात एकही प्रादेशिक पक्ष शिल्लक ठेवायचा नाही.’ त्या दृष्टिने भाजपने देशभर ज्या तडजोडी केल्या, ज्या पद्धतीने सत्ता हस्तगत केली, प्रादेशिक पक्षांची धूळधाण उडवली ते पाहता राज यांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून येते. या सगळ्याला पर्याय काय? विरोधी पक्ष सक्षम नसणं, विकाऊ माणसांची फौज दिमतीला असणं, विचारधारा, ध्येय, मूल्य संपुष्टात येणं यातून दुसरं काय घडणार? शरद पवार नेहमी म्हणतात की, ‘आम्ही राजकारणी आहोत, संत नाही. मग संतासारख्या विरक्तीच्या भावनांची अपेक्षा आमच्याकडून का ठेवता?’ पवारांनी त्यांच्या अनेक कारनाम्यांच्या बचावासाठी हा जो प्रतिप्रश्न सामान्य माणसाला केला होता त्याच्या मुळाशी गेल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजपणे मिळतील.
महाराष्ट्रात सगळं काही सुरळीत सुरू असतानाच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी स्फोट घडवला आणि शिवसेनेचे सहा खासदार फोडले. ‘सत्तेत नसल्याने आमची कामे होत नाहीत, आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही’ असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून आपण हा निर्णघ नाईलाजाने घेतल्याचे ते सांगतात. रावणाची लंका सोन्याची आणि रामाची अयोध्या मातीची! म्हणजे लंकेचा विकास जोरात झाला होता आणि रामराज्य गरीब राहिले, असे त्यांना सूचवायचे असेल. मग रावणाला साथ देणे, त्याच्या पाठिशी उभे राहणे हे त्यांना त्यांचे कर्तव्यच वाटणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ हे खासदार जिथून फुटलेत तिथं रामराज्य आहे, असा मुळीच नाही. सध्याच्या काळात राम आणि रावण सारखेच झालेत आणि दोघांचेही राज्य मातीमोल आहे, एवढेच खरे!
1998-99 साली शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणाले होते, ‘आपण जन्माने परदेशी असल्याने विरोधकांना मुद्दा मिळेल. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारू नये.’
त्या पत्रानंतर सोनिया गांधी यांनी सभेत सांगितलं, “जर माझ्यामुळे पक्ष फुटत असेल तर मी राजीनामा देते!”
त्यावर एकदम शांतता पसरली आणि अचानक घोषणा सुरू झाल्या, ‘सोनिया गांधी जिंदाबाद!’
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी मथळा केला, ‘सानियांच्या अश्रुंनी पवारांना एकटं पाडलं.’
आजही हेच सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला नको असेल, तर माझा शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देतो. आपल्या कोणत्याही सामान्य शिवसैनिकाला या पदावर बसवा.” लगेच सैनिकांनी रडारड केली. उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या. एका कवीनं सांगितलं, “कांबळे कण्हतो पण रडत नाही.”
याचा अर्थ काय? काळ कोणताही असू द्या. राज्य कुणाचेही असू द्या. विरोधक कुणीही असू द्या. राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं तर तो स्वार्थ! तो स्वार्थ साधण्यासाठी ही राजकीय जमात काहीही करू शकते आणि आपण फक्त त्यांच्या सुरस, रम्य कथांची चर्चा करत राहतो. लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसाच्या हाती इतकेच आहे.
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६
.jpg)



Comments