top of page

संपादकीय - मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा

  • 4 hours ago
  • 4 min read

दिल्लीतील जंतर मंतर हे ठिकाण गेल्या काही दशकांपासून भारतातील सर्वात मोठे आंदोलनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पूर्वी संसद भवन परिसरातील बोट क्लबमध्ये आंदोलने व्हायची; मात्र सुरक्षिततेच्या कारणावरून तिथे आंदोलनावर बंदी घालण्यात आली आणि जंतर मंतर हे ठिकाण सर्व प्रकारच्या आंदोलनासाठी महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या ठिकाणी आंदोलन केल्यास देशभरातील महत्त्वाची प्रसिद्धी माध्यमे त्याची दखल घेतात. अण्णा हजारे यांचे ‌‘इंडिया अगेन्स्ट करप्शन‌’, निर्भया बलात्कार प्रकरणानंतर झालेली निदर्शने, विविध घोटाळ्यांविरोधात झालेली आंदोलने, महिला कुस्तीपटूंचे आंदोलन, कृषी कायद्याविरूद्धची ‌‘किसान संसद‌’ अशा काही कार्यक्रमामुळे ते चर्चेत आले होते.


भारताच्या सर्वोच्च न्यायपीठाचे प्रमुख असलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिपण्णी केली होती. त्यात त्यांनी बोगस पदव्या घेणाऱ्यांसाठी ‌‘कॉकरोज‌’ हा शब्द वापरला होता. त्यावर प्रतिक्रिया म्हणून अभिजित दिपके नावाच्या एका तरूणाने समाजमाध्यमांवरून ‌‘कॉकरोज जनता पार्टी‌’ काढत असल्याचे जाहीर केले. सर्वेाच्च न्यायालयाचे प्रमुख काय सुचवू पाहत आहेत हे समजून न घेता हा सरकारविरोधी रोष समजून काही डावे, पुरोगामी, काँग्रेसवाले नेहमीप्रमाणे पुढे सरसावले आणि त्यांनी ‌‘आम्ही सारे झुरळ‌’ म्हणत या आंदोलनात हवा भरली. एकेकाळी ‌‘आम्ही सारे अण्णा‌’ म्हणणारे, ‌‘आम्ही सारे जरांगे‌’ म्हणणारे आणि ‌‘आम्ही सारे झुरळ‌’ म्हणणारे सगळेच तोंडावर आपटले. जंतर मंतरवर झुरळांची अलोट गर्दी होईल, असे स्वप्नरंजन करणाऱ्यांना पळता भुई थोडी झाली. ही झुरळे मारण्यासाठी शासनाला कोणताही स्प्रे मारावा लागला नाही तर उन्हानेच हे काम केले. काही माध्यमांनी फुगवलेला हा फुगा फटकन फुटला आणि हे आंदोलन पूर्णपणे फसले.


आजवर देशाची सर्वाधिक वाट कुणी लावली असेल तर ती काँग्रेसने! सर्व प्रकारच्या राष्ट्रविरोधी शक्तिंना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला. ठरावीक नेत्यांची मक्तेदारी निर्माण झाली. ‌‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे‌’ म्हणणारे यशवंतराव चव्हाण असोत की ‌‘भगवा दहशतवाद देशासाठी घातक‌’ म्हणणारे सुशीलकुमार शिंदे...! या सर्वांनी महाराष्ट्राचे खच्चीकरण केले. मराठी माणसाचे नीतीधैर्य कमी करण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला. किंबहुना देशभरात अशीच परिस्थिती निर्माण केली. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्त्व संपवत त्यांच्यावर अंकुश ठेवला. देशातील विविध राज्याच्या राज्यपालांच्या माध्यमातून त्यांना विरोध करणारी राज्ये संपवण्यात आली. या सगळ्या गोष्टींचा अतिरेक झाला आणि जबरदस्त परिवर्तन घडले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देश भगवा करून टाकला.


काँग्रेसच्या जुलूमशाहीला कंटाळलेल्या देशवासीयांना 2014 साली पुन्हा स्वातंत्र्य झाल्यासारखे वाटले. मोदींचा झंजावात अनेकांना उभारी देणारा होता. असे असताना लवकरच मोदी आणि शहा यांची कार्यपद्धती बदलत गेली आणि लोकांना आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखे वाटले. ज्या प्रवृत्तीच्या विरोधात टोकाचा संघर्ष केला ते सगळे रथी-महारथी भाजपमध्ये स्थिरावले. इतकेच नाही तर सर्व निष्ठावंतांना बाजूला सारून ते सत्तेचे वाटेकरी बनले. अशा सगळ्या परिस्थितीत एकाधिकारशाही वाढली आणि मग सत्ता मिळविण्यासाठी आणि ती सत्ता टिकवण्यासाठी जे काही करता येईल ते केले जाऊ लागले. यातून व्यक्तिपूजा इतकी वाढली की, अनेकांना नरेंद्र मोदी म्हणजे ‌‘भगवान विष्णुचा अवतार‌’ वाटू लागले. ‌‘आम्ही मोदींचे भक्त आहोत‌’ हे सांगणे अनेकांना प्रतिष्ठेचे वाटू लागले.


काही दशकांच्या सत्तेतून बाहेर पडलेले, दुखावलेले, अस्तित्त्व हरवत चाललेले काँग्रेसवाले आणि नव्याने सत्तेत येऊनही वाढलेला उन्माद दाखवणारे भाजपवाले यांच्यात संघर्ष सुरू झाला. काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडे प्रभावी नेतृत्वच नाही. ‌‘मोदी नकोत तर मग राहुल चालेल काय?‌’ असे विचारल्यानंतर अनेकांना त्यावर काहीच बोलता येईना! म्हणून मग काही स्वाभिमानाचे, अस्मितेचे विषय शोधून काढले जाऊ लागले. सरकारविरोधी जे काही असेल त्याला खतपाणी घातले जाऊ लागले. जेएनयूतील आंदोलन, मराठा-धनगर आंदोलने यातून जातीय अस्मिता टोकदार बनवल्या गेल्या. मनोज जरांगे यांच्यासारखा माणूस लाखो मराठा बांधवांना त्यांचा ‌‘नेता‌’ वाटू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श परंपरा जोपासणारा मराठा समाज जातीपातीच्या आधारावर दुभंगला गेला. आरक्षणासारखे विषय पुढे आणले गेले. आरक्षण नसल्याने आपल्यावर किती अन्याय-अत्याचार होतोय हे पद्धतशीर पेरण्यात आले. अनेक समाज एकमेकांच्या विरूद्ध उभे राहिले आणि सर्वत्र द्वेषाचे वातावरण निर्माण झाले.


अशा सगळ्या कट्टरतावादाच्या पार्श्वभूमिवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही जणांसाठी ‌‘झुरळ‌’ हे संबोधन वापरले आणि सरकारविरोधासाठी आणखी एक हत्यार मिळाले. अनेक पत्रकारांनी, राजकीय विश्लेषकांनी, विरोधी नेत्यांनी ‌‘आम्हीही झुरळ आहोत‌’ असे अभिमानाने सांगितले. ही झुरळे देशवासीयांनी कधीच झटकून टाकलीत. इतक्या उशिराने त्यांना ते झुरळ असल्याचा साक्षात्कार झालाय. आपली आदर्शाची, शौर्याची लखलखती परंपरा मागे पडून अशा झुरळांनीच देश नासवलाय. सरकारच्या चुकीच्या निर्णयावरून, त्यांच्या भूमिकांवरून टीका जरूर व्हायला हवी पण या झुरळांचा जीव केवढासा...? स्वार्थातून, द्वेषातून झालेली आणि होत असलेली टीका मोदी-शहांना आणखी भक्कम करतेय हे त्यांना कोण सांगणार? स्वतःची तुलना झुरळाबरोबर करणाऱ्यांचे चेहरे उघडे पडले आहेत. त्यांच्याकडून काही अफाट, अचाट साहसाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. या आंदोलनामुळे लोकशाहीतील ही झुरळे सामान्य माणसांसमोर आलीत. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे त्यांना वेगळे सांगायला नकोच.


विरोधासाठी विरोध इतकाच समान धागा असलेल्या काही राजकीय पक्षांनी आपापल्या तलवारी म्यॅन करून या आंदोलनात भाग घेतला. शिताफीने भाडोत्री कार्यकर्ते गोळा करण्यात आले. ‌‘निर्भय बनो‌’वाले त्यांच्या पाठिशी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. आपल्याकडे एखादे काम सुरू असताना जेसीबी मशिन माती बाजू सारत असेल तरी शे-दोनशे लोक ते बघायला पुढे येतात. त्यांचा त्या कामाशी काही संबंध असतो का? पण अनावश्यक गर्दी जमवणे हा या मातीतला गुण आहे. याचा अर्थ ते तुमच्यासोबत आहेत असा होत नाही. समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स असूनही निवडणुकीत डिपॉझिटही वाचवता आले नाही असे आपल्याकडे कमी आहेत का? किंवा प्रचारसभांसाठी लाखो लोकांनी गर्दी केली, नेत्यांच्या डायलॉगबाजीवर टाळ्या पिटल्या पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून दिला नाही अशा घटना कमी आहेत का? मग एनकेनप्रकारेन समाजमाध्यमांवर इतके फॉलोअर्स गोळा केल्याने आपण देशाचे नेते झालो असा कुणाचा तरी भ्रम का व्हावा? आणि त्यासाठी आपल्याकडच्या तथाकथित विचारवंतांनी अशांच्या पाठिशी का राहावे? आपले दुखावलेले स्वार्थ साधायचे, कोणत्याही प्रकारे पुन्हा आपली दुकानदारी सुरू झाली तर त्यासाठी होतील तितके प्रयत्न करायचे या हेतूने ही मंडळी झुरळाचा आव आणत आहेत. गंमत म्हणजे या ठिकाणी जमलेल्या अनेकांनी नेहमीप्रमाणे  सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यांना ‌‘आझादी‌’ हवीय. माणसांचा ‌‘झुरळ‌’ होण्याइतके स्वातंत्र्य ते उपभोगत आहेत. ‌‘आपण इथे का जमलोय?,‌’ ‌‘कॉकरोज पार्टी नेमकी काय आहे?‌’ हेही अनेकांना सांगता आले नाही. अशी मंडळी जर सरकारविरोधी लढाईत उतरली असतील तर हे सरकार निश्चितपणे चिरंतन राहील. ‌‘मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा‌’ इतका साधा नियम या लोकांना कळत नसेल तर ते प्रशासन, व्यवस्था आणि देशातील सामान्य माणसाच्याही वेळेचा अपव्यय करत आहेत. थोड्याशा रंजनाशिवाय यातून काहीच साध्य होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एका बलाढ्य शक्तिविरूद्ध झुरळांना मैदानात उतरावे लागणे ही फार मोठी विषमता आहे. असल्या सुमार कल्पनाविलासातून देशाचे आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्यांचेही काहीच भले होणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.


-घनश्याम पाटील

७०५७२९२०९२

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २०२६



1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Guest
3 hours ago
Rated 5 out of 5 stars.

तडाखेबंद

जोरदार लेख


रमेश वाघ

Edited
Like
bottom of page