top of page

पुरषोत्तम मास

  • Jun 8
  • 7 min read

हिंदू पंचाग हे चांद्र-सौर गणनेवर आधारित अत्यंत सूक्ष्म आणि शास्त्रीय पद्धतीने तयार झालेले कालमापन आहे.या पंचांगात वेळेची जुळवाजुळव राखण्यासाठी आणि ऋतूचक्र स्थिर ठेवण्यासाठी दर काही वर्षांनी एक विशेष व्यवस्था केली जाते, यालाच अधिक मास असे म्हटले जाते.हा महिना दर दोन वर्षे, आठ महिने ते तीन वर्षांच्या अंतराने येतो आणि तो नियमित बारा महिन्यांव्यतिरिक्त असलेला तेरावा महिना मानला जातो.


अधिक मास का येतो? अधिक मासाचे मूळ कारण  हे खगोल शास्त्राशी संबंधित आहे.

सौर वर्ष साधारणपणे ३६५ दिवस ६ तासांचे असते.

चांद्र वर्ष साधारणपणे ३५४ दिवसांचे असते.या दोन्ही वर्षांमध्ये सुमारे ११ दिवसांचा  फरक निर्माण होतो. हा फरक जमा होत जातो आणि सुमारे तीन वर्षात तो जवळपास ३३ दिवसांचा होतो.

हा फरक भरून काढण्यासाठी आणि चांद्र व सौर पंचांगातील समतोल राखण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, यालाच अधिक मास म्हणतात. अर्थात हिंदू पंचांगाप्रमाणे जरी हा तेरावा महिना म्हणून ओळखला जात असला तरी जागतिक स्तरावर मात्र १२ महिनेच कायम राहतात.वर्षाचे ३६५ च दिवस  राहतात म्हणून ह्याला जरी तेरावा महिना म्हणून संबोधले तरी प्रत्यक्षात काहीच फरक पडत नाही.फक्त आपण हिंदू लोक त्याला तेरावा महिना म्हणतो. 

आता ह्या अधिक मासाची खरी व्याख्या समजून घेऊ यात. कोणी त्याला अधिक मास म्हणतात. कोणी धोंड्याचा महिना म्हणतात, कोणी पुरषोत्तम मास म्हणतात. ह्या मुळे एका अधिक महिन्याची भर पडली म्हणून कोणी त्याला दुष्काळात तेरावा महिना म्हणून देखील म्हणतात.

खर पाहता,हा महिना आल्याने जगात कोणत्याच प्रकारची उलथापालथ होत नसते.ऋतूचक्र आपल्या नियमाने चालते, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा नित्यनेमाने येतो- जातो.पिक देखील पृथ्वीच्या नियमाप्रमाणे उगवतात. पाऊस देखील आपली भूमिका चोख बजावतो. फरक फक्त मानण्याचा असतो.

तसे पाहता, गणिताच्या नियमाप्रमाणे अधिक, अधिक, अधिक होत असते.म्हणजेच अधिक मासाला वर्ज्य मानण्याचे काहीएक कारण नाही.पण आपल्याकडे ह्या मासात लग्न ठरविणे, मुंज करणे किंवा धार्मिक कार्यक्रम करणे किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरु करणे,मोठी आर्थिक गुंतवणूक करणे  हे निशिद्ध मानले जाते. एवढेच नव्हे तर साधी लग्नाची  बोलणी करणे,बैठक घेणे देखील केले जात नाही तेंव्हा मनात विचार येतो कि, इकडे ह्या महिन्याला पुरषोत्तम मास म्हणायचे, अधिक मास म्हणायचे, जावयाला घरी बोलावून त्याचा सन्मान करायचा, त्याला चांदी- सोन्याच्या भेटवस्तू द्यायच्या, पुरणपोळ्या खाऊ घालायच्या आणि ह्या महिन्याला निशिद्ध मानायचे! मग जावयाचा सन्मान करणे हे का निशिद्ध काम आहे का?तसेच पुरणाच्या पोळ्या किंवा नागपंचमीला जसे दिंडे करतात तसाच हा पदार्थ करत असता तर त्याला धोंडे का म्हणतात? त्यालाही समर्पक उत्तर आमच्याकडे नसावे.पण आपल्या गणित शास्त्राप्रमाणे जर अधिक अधिक अधिक होत असेल तर हा महिना सर्वच बाबतीत अधिक म्हणजेच वृद्धी करणारा असावा, असे का समजण्यात येत नाही? तसा सकारात्मक दृष्टिकोन का जोपासाला जात नाही? समजा अधिक मासात जर एखाद्याचा विवाह झाला तर त्याचे वैवाहिक जीवन अधिक सुखी आनंदी होऊ शकते.एखाद्याचे लग्न त्या महिन्यात ठरविले तर त्या जोडप्यांचा संसार अधिक यशस्वी ठरू शकतो. एखाद्याने ह्या महिन्यात जर व्यवसाय सुरु केला तर त्याला अधिकचे यश मिळेल, त्याची भरभराट होईल, असे मानायला काय हरकत आहे?

तसेच या महिन्यात गृहप्रवेश केला तर ते घर अधिक फलदायी ठरू शकते.एखादे वाहन घेतले तर त्याचा अपघात घडण्याची शक्यता कमी असू शकते, आपला जीव सुरक्षित राहतो किंवा एखादे मांगलिक कार्य आपल्याला शुभ फळे देऊन जाऊ शकते. केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा तर प्रश्न आहे. तो जर ठेवला तर सारे जगच सुंदर वाटू लागते, मनास आत्मशांती मिळते. 

खगोल शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता ह्या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही.धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याचा एक देवता स्वामी असतो मात्र अधिक मास हा अतिरिक्त असल्याने त्याला कोणताही अधीपती मान्य नव्हता.म्हणून तो दुःखी झाला अशी पौराणिक कथा सांगितली जाते. आता आपल्याकडे प्रत्येक गोष्टींचे विवेचन कथेद्वारे केले जाते.आता कोणीही अधीपती नसल्याने हा महिना विष्णुकडे गेला आणि विष्णुने त्याला पुरषोत्तम मास म्हणून नाव दिले. आता प्रश्न असा उद्भवतो कि, आपल्याला कोणी अधीपती नाही ह्याचे ह्या महिन्याला दुःख का व्हावे?आपण स्वतंत्र असणे, आपल्यावर कोणाचेही अधीपत्य नसणे ही तर भाग्याचीच गोष्ट असते ना?मग ह्या मासाने का जावे विष्णुकडे? का मान्य करावे विष्णूचे अधीपत्य? नेहमी कोणाच्या ना कोणाच्या अधीपत्याखाली राहणे हेच योग्य आहे का? राखले आपले स्वतंत्र अस्तित्व! त्यात वाईट काय आहे? जपला आपला स्वतंत्र बाणा तर काय हरकत आहे?त्यात कसली आलीय असुरक्षितता? कोणाच्या ना कोणाच्या कुबड्या घेऊन जगण्यातच जगण्याचे सार्थक आहे का?पण आपल्याकडे प्रश्न, प्रश्नातून  निर्माण होणारे उपप्रश्न!ह्यातून अनेक अविश्वसनीय अश्या कथा निर्माण होत जातात. कधी त्या संयुक्तिक असतात तर कधी त्या विश्वासास पात्र देखील नसतात पण आपली भोळी जनता त्यालाच कवटाळून बसून अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसते. हे दुर्दैव!

 महाराष्ट्रात अधिक मासाला एक विशेष महत्व आहे, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे.त्यावेळी जावयाचा मान- सन्मान केला जातो,त्याला विविध पदार्थ, विशेषतः ३३ अनारसे किंवा ३३ वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.ह्या भेटवस्तूंना वाण असे म्हणतात.लोकमान्यतेनुसार जावई हा विष्णूचे प्रतिक मानला जातो. अधिक मास हा विष्णूचा प्रिय असल्याने जावयाचा विशेष आदर केला जातो.काही हरकत नाही. उलट ही तर गौरवाची गोष्ट आहे. जावयाला विष्णूचे स्थान दिले तर आपली मुलगी जी विष्णूची पत्नी आहे, ती तर साक्षात लक्ष्मीच ठरते.ह्यापेक्षा मुलीचा दुसरा गौरव कोणताही नसावा पण त्याचं मुलींना जर सासरचे आणि खुद्द नवराच त्रास देत असेल, तिचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करत असेल किंवा तिची हत्या करत असेल तर? द्यायचा त्याला विष्णूच्या अवताराचा मान? आपल्याकडे ब्रह्मा सृष्टीचा निर्माता! विष्णू पालनकर्ता आणि शंकर संहारकर्ता! असे संबोधले जाते. मग ह्या पालनकर्त्या नवऱ्याच्या किंवा जावयाच्या रूपातील विष्णुने त्या लक्ष्मीचे पालन करणे अपेक्षित नसते का?मग का ते तो तसे करत नाही? त्याला नकोय का विष्णूचे स्थान? मोठेपण? पण हे सर्व संकेत पुस्तकात, पोथ्यात लिहिण्यासाठीच आहेत, प्रत्यक्षात कृतीत आणण्यास नसावेत, असे दररोज ज्या घटना घडतात, त्याकडे पाहून वाटते. असो.सर्वच गोष्टी नकारात्मक घेऊन चालत नाही.असा उहापोह करत राहिलो तर समाजात आणि विचारांमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती दिसून येतील यात शंका नाही. 

तूर्त अधिक महिन्याविषयी अनेक मान्यता आहेत. ज्याचा त्यावर विश्वास असतो, ते त्या मान्यता, परंपरा पाळतात.ह्या महिन्यात अधिक मास म्हणून सुद्धा मांगलीक कार्यें टाळतात.जावयाला घरी बोलावून त्याचा मान-सन्मान करून पुण्य पदरात पाडून घेतात. उपास- तापास, व्रत- वैकल्य, दान- धर्म, पूजा- अर्चा करून आत्मिक शांतीचा अनुभव घेतात. ह्या मासात  इतर मांगलीक कार्यें वर्ज्य असल्याने थोडीशी उसंत, अतिरिक्त वेळ( प्रत्यक्षात तो अतिरिक्त वेळ नसला तरी) मिळत आहे असे मानून नातेवाईकांच्या भेटींगाठी ह्यासाठी राखून ठेवतात.अध्यात्मिकरित्या स्वतःला सुधारण्याची संधी देतात.'थांबणे' किंवा थोडासा पॉज घेणे  ही देखील जीवनासाठी आवश्यक अशी बाब आहे. प्रगतीचाच एक भाग आहे. भौतिक यशापेक्षा अध्यात्मिक शांती देखिल गरजेची असते.दान, सेवा हे जीवनाचे खरे मूल्य आहे.अधिक मास हा हिंदू  पंचांगा तील केवळ एक अतिरिक्त कालखंड  नसून तो अध्यात्मिक पुनर्जन्माचा काळ आहे. खगोलशास्त्रीय समतोल साधणारा सामाजिक आणि सांस्कृतिक भान देणारा असा महिना आहे.एक  मांगलिक कार्याचे सोडून द्या पण आपल्याकडे बारा महिने व्रत- वैकल्य करणाऱ्या सणांच्या यादीत आणखी एका श्रावणासारख्या पवित्र महिन्याची भर पडते आणि त्या ही महिन्यात धार्मिक कृतीवर फोकस करत, त्याला देवाधिकांशी जोडत हा मास साजरा केला जातो.ह्यावरून भारत हा उत्सवाचा देश आहे,याची सत्यता पटते. मग तो तेरावा धोड्यांचा महिना का असेना,आपला बहुजन समाज  सदा सर्वदा फक्त आणि फक्त देवाचे स्मरण करणे, विविध कर्मकांडे करणे, पोथ्या पुराणे वाचणे, ह्यातच मग्न असतो.आता धोंड्याच्या किंवा पुरषोत्तम मासाचेच पहा ना!आम्हांला जरी अतिरिक्त महिना मिळाला तरी आम्ही आमची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक , वैज्ञानिक प्रगती करून घेण्यात हा अतिरिक्त वेळ व्यतीत करत बसत नाहीत. पूर्वापर जे काही धर्म पंडितानी सांगितले त्यांचेच अंधानुकरण करत आहोत. आता ह्या महिन्यात असे करा, तसे करा हे काही त्या भगवान विष्णूंनी आम्हांला सांगितलेले नाही किंवा. आधीक मास काही असे माझे सोहळे साजिरे करा असे सांगायला येत नाही. ही केवळ मानवी डोक्याची उत्पत्ति आहे.त्यात कितपत सत्य आणि तथ्य आहे?मला माहित नाही पण बहुजणांना देवाधर्मात गुंतवून, त्यांना दान धर्माचे महत्व पटवून,आपल्या आर्थिक झोळ्या भरण्याचे कार्य मात्र आपल्याकडे पुरातन काळापासून सातत्याने सुरु आहे आणि आपली भोळी जनता त्यावर अंधविश्वास ठेवून त्यातच सार्थकता शोधत आहे. त्यावेळी त्यांना हा प्रश्न पडत नाही कि, जे त्यांना हे कर्मकांड करायला सांगतात, त्यांना नाही का कमवायचे असते पुण्यकर्म? त्यांना नाही का करून घ्यायचा असतो अध्यात्मिक विकास? तो फक्त बहुजणांनीच करून घ्यायचा असतो? त्यांच्यासाठी नसतो का अधिक मास? पुरुषोत्तम मास? त्यांना नाही वाटत का आपणही त्याचा लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध करावे? का ह्या धार्मिक कृती, परंपरा फक्त बहुजनांनीच पाळायच्या? त्यांना नाही भीती वाटत नरकात जायची?आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  अधिक अधिक अधिक हा गणिताचा नियम येथे का लागू केला जात नाही? ह्या नियमाचा अंगीकार  करून तसे का वागले जात नाही?अजून किती दिवस अश्या बाजार- बुनग्यांवर विश्वास करून तुम्ही धार्मिक अंधकारात बुडून जाणार आहात? हा अधिकचा महिना जागतिक पातळीवर अधिक किंवा अतिरिक्त महिना असतच नाही, हे माहीत असताना देखील का आम्ही त्याला अधिक महत्व देतो? अन द्यायचेच असेल अधिक महत्व तर ह्या महिन्यात काही अर्जंट असलेली कामे का स्थगित ठेवली जातात?

ह्या निमित्ताने जरा वेगळा विचार मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.आम्ही दोन महिन्यांपूर्वी बुक केलेली गाडी नेमकी अधिक महिन्यात आली. त्यावेळी मनात कसलाही किंतु न आणता मी ती घरी आणली. म्हटले अधिक मासात घेतलेली गाडी अधिक शुभ आणि फलदायी ठरेलं.अजून अश्या दोन- तीन गाड्या आपण घेऊ शकू.असाच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला तर काय हरकत आहे?प्रत्येक दिवस चांगलाच असतो. जर तो चांगला किंवा वाईट असता तर त्याचा समावेश पंचांगात का गेला असता? आपल्याकडे अमावस्येला निशिद्ध मानले जाते. मग दिवाळीचे लक्ष्मीपूजन आपण का अमावस्येला करतो? बऱ्याच धार्मिक ठिकाणी अमावस्येला का उत्सव साजरे केले जातात?अमावस्येचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र जर वाईट असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज ह्याच दिवशी का लढाईला जात असत आणि विजयी होत असत? ह्याचाच अर्थ कोणताही दिवस आणि कोणतीही रात्र चांगलीच असते.फक्त आपला दृष्टिकोन गढूळलेला असतो. त्यावर मात करून आपण जरा वैज्ञानिक दृष्टिकोन निदान ह्या एकविसाव्या शतकात तरी ठेवायला हवा आणि त्यावेळी हे देखील आपण पहायला हवे कि, आपल्याला हे बोधामृत पाजणारे महाभाग तसे वागतात का?का साध्या, भोळ्या भाविकांना गण्डवण्याचा हा त्यांचा धंदा आहे?इकडे देव सर्वव्यापी आहे असे म्हणायचे आणि त्यांची देवळे ठिकठिकाणी उभारायची.तेथे दानपेट्या ठेवायच्या आणि त्या दान पेट्यांना त्यातील चीजवस्तू, पैसे चोरली जाऊ नयेत म्हणून कुलूपे लावायची!देव खरंच त्या देवळात वास करत असेल तर तो त्याला वाहिलेल्या त्या धनाची रक्षा करू शकत नाही का? इकडे करोनाच्या काळात सर्वांनी देवाला साकडे घातले. पण काहीजण वाचले, काहीजण दगावले. आता जे वाचले तो देवाने केलेला चमत्कार होता का? आणि जे वाचले नाहीत तो देवाचा कोप होता का? तर असे काहीच नसते. ह्या आपल्या धारणा असतात.संकटाच्या वेळी देव आपला धावा ऐकेल आणि आपल्याला वाचवेल असा आपल्याला विश्वास श्रद्धेपोटी आलेला असतो पण जेथे मानवी प्रयत्न कमी पडतात तेथे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.कारण रोग बळावलेला असतो. असाध्य झालेला असतो. त्यावेळी त्या डॉक्टरला दोष देण्यात काही अर्थ आहे नाही. काही वेळा आश्चर्यजनकरित्या एखादा माणूस वाचतो,त्याला चमत्कार म्हणायचा का? नाही. त्यावेळी डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि रुग्णाने उपचारांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद ह्यामुळे ते शक्य झालेले असते.ह्यावर देखील विचार झाला पाहिजे. सर्वकाही दैवावर टाकून देता येत नाही. 

आता कोणी अधिक मास साजरा करूच नये, आपल्या जावयाला आणि लेकीला मान देऊच नये, असा माझा उद्देश नाही पण ह्या काळात जे काही कामे स्थगित करण्यात येतात, त्याच्यावर विचार करावा. आपल्याकडे ही पद्धत आहे पण आपल्या देशात सगळीकडे ह्या मान्यता नाहीत. जगभरात ह्या काळात सर्वच कामे स्थगित केली जातातच असे नाही, मग आपण तरी ह्या महिन्याला अधिकचे महत्व का द्यायचे?अन द्यायचेच असेल तर अधिक, अधिक, अधिक असे गणित मांडून अधिकाची भर आपल्या जीवनात का नाही पाडायची? मला तर वाटते, हा अधिक मास आमच्या जीवनाची बेरीज करून आमच्या जीवनात अधिकचे माप टाकण्यासाठीच येत असावा. आता काहीजण म्हणतील, पण जर आपले रीती- रिवाज,परंपरा पाळाल्या तर काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. पण हा वेगळा विचार करायला पण काय हरकत आहे? नाही का?


- चंद्रलेखा बेलसरे

साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २०२६

घरपालवा | Gharpalva
₹300.00₹225.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page