top of page

मसाला पान - जैसी देणावळ तैसी धुणावळ

  • 17 hours ago
  • 4 min read

( नोंद - या लघुनाट्यांशातील सर्व पात्रे काल्पनिक असून ती कुणाच्या वर्तनाशी वा व्यक्तिमत्त्वाशी जुळून आल्यास तो निवळ योगायोग समजावा.)


----------------------


(सायंकाळची वेळ.सेवक बाल्कनीत मजेत गाणे म्हणत फिरत आहे.)


 सेवक - पड रे पाण्या, पड रे पाण्या... कर पाणी पाणी!


 (याच चालीवर दुसरे गाणे गात.)


येरे पावसा येरे पावसा

देतो तुला पैसा

पैसा झाला खोटा आणि

आला पाऊस मोठा...!

होऽ होऽ आला पाऊस मोठा...!!

(फाकडोजी महाराज पान चघळतच राणी साहेबांसोबत बाल्कनीत प्रवेशतात. सेवकाचे गाणे व विचित्र हालचाली पाहून राणीसाहेब आनंदाने टाळ्या वाजवत हसायला लागतात.)


 महाराज - वा! व्वा! येईल  हो पाऊस! तुझ्या या चित्रविचित्र हालचाली आणि पहाडी आवाज ऐकून नक्की येईल पाऊस. ढगांना घाम फुटलाय बघ तुझे आर्जव ऐकून. होय की नाही राणीसरकार?


(राणीसाहेब मिस्किलपणे हसतात. सेवक जरा चाचपडतो व वाकत मुजरा करीत.)


सेवक - जय हो! विजय हो महाराज! राणीसाहेब आपलाही विजय हो! मी आपलं सहज जरा सायंकाळी मन रमावं म्हणून...!


 महाराज (हसतच) - सहज जरा एन्जॉय असंच ना? करा करा एन्जॉय करा...! आणि कालपासून पाऊस सुरुही झालाय की!


(सेवक वरमतो.) सेवक - पण मनाजोगता नाही बरसत ना अजून. नुसतेच अधूनमधून फव्वारे अन्‌‍ उन्हाचे गाणे गा रे...! असं चाललंय म्हणून.


राणीसाहेब - अरे पण तू मूळ गाण्याची पार वाट लावतोयेस की... एकातून दुसरं आणि दुसऱ्याला पहिल्याची चाल! गंमत आहे नाही.


महाराज - आमचा सेवक म्हणजे अजब रसायन आहे. तो कवी असल्याने असे वेगवेगळे प्रयोग करणारच ना! आता पाऊस-संमेलने वगैरे सुरू होतील म्हणून सराव चालू असेल कदाचित त्याचा पण बरं का रे सेवका, आता सर्वत्र पावसाची दमदार एन्ट्री झालीये. खांदेशात तर रेकॉर्डतोड पाऊस झालाय. मान्सूनने सारा महाराष्ट्र व्यापलाय हं! त्यामुळे आता चिंता नको...!


राणीसाहेब - ते ठाऊक आहे हो पण गायकीही? विशेष आहे नाही?


महाराज - त्यात काय विशेष? हल्ली नव्वद टक्के कवी गाऊनच कविता सादर करतात पण त्यात आशय कमी अन्‌‍ आविर्भाव जास्त! अनेक संमेलनात आम्ही अनुभवलय ते! त्यात पुन्हा कवी असण्यापेक्षा कवी दिसण्याचे प्रयत्नच जास्त...! (महाराज स्वतःवरच खूश होत हसतात.)


 राणीसाहेब - यात पुन्हा मराठी भाषेची काय लागायची ती वाटही लागतेच म्हणे! मराठी भाषेला अभिजात वगैरे दर्जा मिळाल्यापासून तर कवी मंडळी जास्तच बहरायला लागलेत असं ऐकलंय.


काल आमची एक कवयित्री सखी बोलली आम्हाला, की मराठी साहित्याला विशेषतः कवींना फार चांगले दिवस आलेत म्हणे! काही तर पूर्ण वेळ कविता-रत असतात. कविताच त्यांचा श्वास अन्‌‍ कवितेला चेकची आस असं आहे म्हणे!


सेवक - पण कवितेने काय घर चालतं का मॅडम? सॉरी राणीसरकार!


राणीसाहेब - असू दे, असू दे! मॅडम ही आता मराठी शब्दच मानला जातो हं! काल त्या अध्यक्षमहोदयांनी... म्हणजे नॉर्वेकरांनी नाही का मराठीची पार वाट लावलीये सभागृहात!


महाराज - नको राणीसरकार, तो विषय नको आता. पार बेअब्रू झालीय हो! पण आज त्यांनी फॉन्ट बारीक असल्याचा खुलासा करून दिलगिरीही व्यक्त केलीय ना आणि...


राणीसरकार - हो की! खरंच हो! पण हे सार ना अगदी ‌‘मला नाही आबरू अन्‌‍ मी कुणाला घाबरू....!‌’ असं नाही का हो वाटत? आणि अलीकडे राजकारण्यांची भाषा म्हणजे - दात घशात घालीन, टपकाविल, बुकलून काढणे, उताणे पाडणे, ठोकून काढीन, छाताडावर बसणे, तंगडे तोडणे, काय आणि काय...? ऐकताना मतदार पार घेरी यायला लागलीय अलीकडे! हे वाक्प्रचार, क्रियापदे भविष्यात घरोघरी वापरली जाऊ लागली तर?


(सेवक मोठ्याने हसतो आणि म्हणतो)


सेवक - आता दिल्लीतही आपले नेते अशीच भाषा वापरताहेत महाराज.


राणीसरकार - हो ना! आम्ही तर ऐकलंय की, एका शिवराळ वक्तव्य करणाऱ्या मराठी नेत्याला दिल्लीतील पत्रकाराने विचारले की, तुम्ही शिवराळ भाषा / गालीगलोच का वापरता? तर उत्तर काय, म्हणे, हमारी मराठी ऐसीच है! (कपाळावर हात मारून घेत.) मराठीची प्रतिमाच डागाळली जातेय यामुळे. मराठीचा बेताल वापर रोखायला हवा. नाही तर काही खरं नाही! भविष्यात मराठीची आणखी कोणकोणती रूपं पाहायला मिळतील याचा विचार करूनच!


 सेवक - हे सारं आमच्यासारख्या मतदारांचंच कर्म. भोगतोय आता. ते म्हणतात ना, जैसी देणावळ तैसी धुणावळ!


महाराज - अरे एवढं नका टार्गेट करू एखाद्याला. आपलीच माणसं, सांभाळून घ्यायचं.


(काही तरी आठवल्यासारखं करीत) आणि हो, आज त्या चॅनेलवाल्या मॅडम येणार होत्या सायंकाळी सात वाजता. प्रधानजी त्यांना घेऊन येणार होते. काय झालं त्याचं?


सेवक - हे नाही बुवा मला माहीत महाराज...!  कुणी नाही कळवलं आम्हास.


राणीसरकार - का येताहेत ते चॅनेलवाले? काही खास कारण..? (कपाळावर आठ्या आणित) आणि प्रधानजींनी आम्हालाही खबर लागू दिली नाही!


महाराज - अहो राणीसरकार आम्ही सांगणारच होतो बघा पण दुपारी तुम्हाला पण वामकुक्षी जरा लांबली अन्‌‍ राहिलंच सारं...!


राणीसरकार - सात तर वाजत आले आहेत पण आम्ही येईपर्यंत जरा टाईमपास करा. चहा-बिस्किटं द्या त्यांना! येतोच आम्ही तयार होऊन.


(राणीसरकार मानेला झटका देत आत जातात.)


 महाराज - म्हणजे मेकअप करून असंच ना!


 (महाराज मोठ्याने हसतात.)


 सेवक - पण महाराज, एक विचारू का?


महाराज - नको! जा आता आणि त्या चॅनेलवाल्या मॅडमला घेऊन ये आत.


सेवक - होय महाराज! जय हो! विजय हो!!


 (सेवक मुजरा करीतच बाहेर जातो. महाराज कसल्या तरी विचारात गढून जातात. तेवढ्यात प्रधानजी बाल्कनीत प्रवेशतात.)


प्रधानजी - महाराज, जय हो! विजय हो..!


महाराज - प्रधानजी, का हो आलेत का ते चॅनेलवाले?


प्रधानजी - त्यांचं रद्द झालंय आजचं महाराज. तेच तर सांगायला आलोय मी. काही तरी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर चर्चासत्र चालू होणार आहे आता मुंबईत सायंकाळी. म्हणून अर्जंट तिकडेच जावं लागतंय म्हणे !


महाराज - म्हणजे व्यापार महत्त्वाचा! ठीक आहे. असो.


(राणीसरकार नटून थटून येतात.)


 राणीसरकार - आलेत का ते चॅनलवाले? साडेसात झालेत आता. आम्हाला उद्याच्या वटसावित्री पौर्णिमेची तयारी करायचीये अजून... छे! सारी तयारी वाया गेली!


प्रधानजी - तसं नव्हे राणीसरकार! आपण तरी काय करणार? चॅनेलवाल्यांना मालक सांगेल तिकडे पळावं लागतं शिवाय टीआरपीमुळे सारेच हतबल!


महाराज - सत्तेची गुर्मी अन्‌‍ खोक्यांची गर्मी पाहून त्यांना विषय चालवावे लागतात. सारीच आश्वासने किंवा दिलेला शब्द पाळणं परिस्थितीमुळे अवघड होऊन बसतं कधीकधी! आम्हालाही दिल्लीश्वरांच्या आदेशापुढे झुकावंच लागतं. बघताय ना आपण...!


राणीसरकार - होय गं बाई! खरंच आहे तुमचं. सारे वेळ पाहून वेळ मारून नेतात हेच खरं! चला, आता भोजनाची वेळ झालीय!


महाराज - हो हो! चला पुढे तुम्ही पण खरं सांगू का राणीसरकार आज सायंकाळपासून आपल्यासोबत जी सर्वंकष वगैरे चर्चा झाली ना ती खरोखरच उपयुक्त आणि लक्षणीय भविष्यवेधी वाटतेय आम्हाला!


राणीसरकार - कौतुक पुरे आता! आणि हो तुमचं बोलणं आता जरा जास्तच अभिजात वगैरे वाटू लागलंय हं! (हसतच महालातील मुदपाकखान्याकडे जातात.)


प्रधानजी - व्वा महाराज, छान जमतंय हो तुम्हाला कुटुंबाचा योग्य बॅलन्स राखणं.


महाराज - बॅलन्स नाही हो, संतुलन म्हणा. या आता! आणि जाताना जर सेवक भेटला तर सांगा त्याला आता घरी जायला.


प्रधानजी - आज्ञा महाराज! जय हो! विजय हो! पण तुमचं ते मसाला पान?


 महाराज - आज राणीसाहेबांच्या हातचं कळीदार मसाला पान खाऊ आम्ही. या आता आणि पुन्हा ते चॅनेलवाले वगैरे इकडे फिरकता कामा नये. आमचा टीआरपी जोखतात होय! मला काय ते चमकवणार होय? उद्या या दरबारात लवकर!


प्रधानजी - पण उद्या वटसावित्री पूजन...! सुट्टी वगैरे?


महाराज - उगाच फालतू विनोद नको. तुम्ही काय बाभळीला फेऱ्या मारणार आहात? या आता.


(दोघेही हसतात.)


प्रधानजी - जय हो! विजय हो!!


(प्रधानजी व महाराज एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालू लागतात.)


( पडदा पडतो.)



* वेलची - राजकारण्यांची आश्वासने म्हणजे निवडणुकीच्या पावसाळ्याआधीचे ढग.



 - जनार्दन देवरे,मनमाड.

        (9011694885)



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page