मसाला पान : व्यवस्थेला फोडी घाम; फक्त एक तुकाराम!
- 2 days ago
- 6 min read
या लघू नाट्यांकातील सर्व पात्रे काल्पनिक असून ती भोवतालच्या एखाद्या व्यक्तिमत्त्वाशी जुळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
(फाकडोजी महाराज प्रसन्न मुद्रेने सिंहासनावर बसले आहेत. समोर सर्व दरबारी आसनस्थ झाले आहेत. तेवढ्यात सेवक दरबारात प्रवेशतो.)
सेवक - महाराज, जय हो! विजय हो...! अभिनंदन! अभिनंदन महाराज! एक आनंदवार्ता आहे.
महाराज - काय? आज एकदम आनंदवार्ता?
(हे ऐकून दरबारातील सारेच मंत्री, प्रधानजी इ. आश्यर्याने सेवकाकडे पाहत.)
एक मंत्री - काय? आनंदवार्ता! व्वाह! जय हो! विजय हो! सांग लवकर! आणि तुला कसे कळले? डी.ए. वाढणार आहे की यंदा लवकर वेतनवाढ मिळणार आहे? की पेट्रोल स्वस्त झालंय?
महाराज - शांत राहा! शांतता पाळा. इन्क्रिमेन्ट, डी.ए.वाढ आणि पेट्रोल-डिझेलचे कमी होणारे भाव याशिवाय दुसरी काही आनंदवार्ताच नाही का हो तुमच्या लेखी?
(सारे दरबारी हिरमुसले होतात.)
एक उपसचिव (चाचरतच) - काय करणार महाराज, आम्हा चाकरांची तेवढीच अपेक्षा सरकारी कर्मचारी म्हणजे....!
महाराज - म्हणजे बिन्जे जाऊ द्या आता. शांत बसा. नुसते पगारवाढीचे फालतू विचार!
प्रधानजी (मंत्र्याकडे व उपसचिवांकडे तुच्छतेने पाहत) - नाही तर काय महाराज! लायकी नाय अन् आरशात पाहय...! असं आहे हे.
महाराज - सांग सेवका! काय झाले? दिल्लीश्वरांनी आमच्या अभिनंदनाचा ठराव पास केला की आपल्या प्रांतास प्रोत्साहनपर काही अधिकचे अनुदान प्रदान केले जाणार आहे.
सेवक - तसं काही नाही महाराज!
(सेवक तबकातून एक पान महाराजांना देत) आधी हे तुमचं मसाला पान घ्या अन् मग ऐका. (महाराज पान तोंडात टाकून प्रसन्न होत हसतात.) त्याच काय आहे महाराज की, प्रांतातील भेसळ यंत्रणा आता पार उद्ध्वस्त झालीय. अन्न व प्रशासन विभागाने सारे पार जाम केलेत हो.
दुधवाले, पनीरवाले, औषध विक्रेते एकदम ताळ्यावर आलेत. गुटखा तर गायबच झालाय शहरा-शहरातून. शिवाय पॅकेजिंग फूडवाले वगैरे तर पार भेदरूनच गेलेत म्हणे! पण यामुळे पब्लिक जाम खूश. किती वर्षांपासून आपण ते भेसळयुक्त अन्न आणि औषधे घेतोय याची जाणीवच त्या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी पब्लिकला करून दिली. अवघी शुद्धीकरण मोहीमच सुरु झालीय प्रांतात. त्यामुळे साऱ्यांनी पार डोक्यावर घेतलंय मुंढे साहेबांना आणि तुम्हालाही! लोक धन्यवाद देताहेत, अभिनंदन तुमचं, सोशियल मीडियावर तर फुल्ल हीच चर्चा चाललीये सध्या...!
प्रधानजी - म्हणजे? एकवीस वर्षात पंचवीस बदल्या करूनही हा गृहस्थ?
सेवक - एकदम ठाम! काम म्हणजे काम. प्रामाणिकपणा आणि जनतेच्या सेवेची तळमळ तिळभरही कमी झाली नाही. पार घाम फोडलाय सिस्टिमला.
एक उपमंत्री - नाही तर काय! असे बहादुर आणि नीडर अधिकारी हवेत सर्वच खात्यात. मग बघा सारे कसे सुतासारखे सरळ होतील.
महाराज - अहो, पण त्यांच्यासारखे प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी आहेत का हल्ली? हे असले तुकाराम विरळच!
प्रधानजी - विरळ नव्हे दुर्मीळच! म्हणून तर राज्यकारभार चालवताना आम्ही बदनामीचे धनी ठरतो...!
महाराज - यात अर्थात आपलाही दोष आहेच प्रधानजी. नेहमी आपली निवड चुकते, हितसंबंधांमुळे साऱ्याच गोष्टींना मुरड घालावी लागते. बरोबर ना? शिवाय अप्रत्यक्ष हस्तक्षेप आहेच की प्रधानजी?
प्रधानजी - तसं नव्हे महाराज पण पब्लिकलाही चांगले अधिकारी बोचतात. मग नाईलाज होतो महाराज.
सेवक - अन्? लोकप्रतिनिधी वगैरेना टोचतात! बरोबर ना?
प्रधानजी - सेवका, अरे असा मध्ये-मध्ये नको बोलूस. तुझं बोलणं म्हणजे टोमण्यावर टोमणे अन् अवघड जागेचे दुखणे!
महाराज - अहो बोलू द्या त्याला प्रधानजी. विश्वासू चाकर नव्हे तर गेल्या वीस वर्षांपासून आमचा मित्रच झालाय तो आता आणि सामान्य माणसाचा एक जाणकार प्रतिनिधी म्हणूनच आम्ही त्याच्याकडे पाहतो.
(प्रधानजी व इतर दरबारींचे चेहरे पडतात.)
आणि तुकारामांचं म्हणाल तर ते नडतातच व्यवस्थेला. 16 व्या शतकात संत तुकाराम बोल्होबा मोरे नडले आता हे तुकाराम मुंढे भिडताहेत...! व्यवस्था बदलू पाहणारी अशी माणसं आपलं एक युग निर्माण करतात अन् गाजवतातच. त्यांना पाण्यात पाहणारे खलनायक असणारच. त्याशिवाय त्यांचं नायकत्व कसं सिद्ध होणार?
एकमंत्री - हो ना महाराज, मला तर त्या नायक सिनेमातल्या अनिल कपूरचीच आठवण येते बघा.
सेवक - हे समंद ऐकून एक अभंगच आठवला बघा महाराज मला. संत तुकारामांचा. म्हणू का?
महाराज - अरे म्हण की! अभंग म्हणायला काय परवानगी लागते का काय कोणाची? बोल.
सेवक (गाण्याचा प्रयत्न करीत) - पापाचिये मुळे ।
झाले सत्याचे वाटोळे ।
दोष झाले बळीवंत ।
नाही ऐसी झाली नीत ॥
महाराज - व्वाह! किती छान सांगितलंय महाराजांनी. बघा प्रधानजी असा आहे अभ्यास आमच्या लाडक्या सेवकाचा.
प्रधानजी ( ऐकू येईल असं पण पुटपुटत) -
त्यात काय एवढं, सतत गुगलवर तर पडलेला असतो तो, नाही तर तुमच्या मागे-पुढे..., फिल्डवर जाऊन बघ म्हणावं एकदा!
महाराज - काही म्हणालात का प्रधानजी? आणि ते फिल्डचं काय? शेवटचं वाक्य जरा ऐकू आलंय हं आम्हाला!
(जरा गडबडतच) प्रधानजी - नाही! तसं काही नाही महाराज पण आज जरा फिल्ड विजिट्स करायच्या होत्या. म्हटलं तेव्हा जरा लवकर दरबार आटोपला तर...!
(तेवढ्यात दरबाराबाहेर कसल्या तरी गडबडीचा आवाज ऐकू येतो.)
महाराज - सेवका, काय हे? कसला गोंधळ चाललाय बाहेर बघ बरं!
एक मंत्री - आले वाटत ते! पण एवढ्या लवकर?
(मंत्र्याकडे पाहत) महाराज - कुणी येणार होतं का आज? तुम्हाला माहीत होतं म्हणजे! बोलला का नाहीत आपण? काय प्रकरण आहे हे?
मंत्री - काही नाही महाराज ते आपलं...!
(सेवक लगबगीने आत येत.)
सेवक - महाराज ते औषध कंपनीवाल्यांची एक संघटना आहे. तिचे प्रतिनिधी, काय ते सरचिटणीस का काय म्हणतात त्यांना आपली भेट घ्यायचीचे अर्जण्टमध्ये. सोबत आणखी पनीर निर्माता संघाचे कार्याध्यक्ष अन् पॅकेजिंग फुड इंडस्ट्रीचे एम.डी. वगैरेही आलेत. आधी महाराजांना कोण भेटणार यावरून गोंधळ चालला होता त्यांचा. परवानगी वगैरे नसल्याने द्वारपाल काही त्यांना आत सोडत नव्हते. तर ते म्हणत होते की दरबारी कामकाज मंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालंय. त्यांनीच वेळ दिलीय. काय करू? आपली परवानगी असेल तर बोलावू का एकेकाला?
(महाराज दरबारी कामकाज मंत्र्यांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहतात तर प्रधानजी व मंत्री मनगटावरील घड्याळाकडे बघत चेहऱ्यावर चिंता दर्शवित आहेत)
महाराज - एकेक नको. सारे एकाच वेळी बोलवा. म्हणजे वेळ जाणार नाही.
द. का. मंत्री - बरोबर आहे. शेवटी त्यांचं म्हणणंही ऐकायला हवंच कारण त्यांच्यामुळेच तर आपली सरकारी तिजोरी सदा बहरलेली असते. त्यांचे प्रश्रही आपण जाणून सोडवायला हवेतच. शेवटी प्रांताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्याकडील टॅक्सवरच तर जनकल्याण चालतंय महाराज.
उपसचिव - अगदी बरोबर बोलताहेत मंत्री महोदय! जय हो! विजय हो!!
(सेवक मंत्र्यांकडे पाहत हसतच बाहेर जातो.)
महाराज - आता आलंय हं सारं आमच्या लक्षात मंत्रीमहोदय, म्हणजे तुम्हीच इकडची अपॉइटमेंट दिलीय तर! वर साळसूदपणाचा आव! बघा, बघा प्रधानजी आपल्या मंत्र्यांचं डबल स्टॅण्डर्ड वागणं, दोन्हीकडून ढोलकी वाजवायची.
(द. का. मंत्री व अन्य मंत्री माना खाली घालतात. प्रधानजी गालात हसतात.)
प्रधानजी - खरं सांगू का महाराज?
महाराज - सांगा, सांगा ना!
(सेवक बाहेर आलेल्या मंडळीचं शिष्टमंडळ घेऊन दरबारात प्रवेशतो.)
सर्व शिष्टमंडळ प्रतिनिधी - महाराज जय हो! विजय हो! फार मोठं संकट आलंय हो, आम्ही व्यवसाय करायचा तरी कसा? पार कंबरडं मोडलंय हो...!
महाराज( काहीच माहीत नसल्याचा आव आणित) - काय झालं? कसलं संकट आलंय?
एक शि. मं. प्रतिनिधी - महाराज सारख्या धाडी पडताहेत हो दुकानांवर, माल जप्त काय केला जातोय. बंदोबस्त काय, चौकशा काय अन् पोलीस केसेस काय? सारंच कठीण होऊन बसलंय बघा.
दुसरा शि.मं. प्रतिनिधी - आमच्या मेडीकलवाल्यांचं तर फारच कठीण झालयं हो! सारं टाय-अपच गणितच फिस्कटलयं. करावे तरी काय?
तिसरा प्रतिनिधी (अगदी गहिवरून) - आम्हा दुधवाल्यांचं तर दुधचं फाटलंय पार! गुजरात, राजस्थानचा खवा येणंच बंद झालंय! दुधपावडरच्या तर गोण्याच जाळाव्या लागल्या महाराज घाटात नेऊन!
महाराज - ते गुटखा किंगचे डायरेक्टर आणि तो केसरमय विमलयुक्त हिरा वगैर नाही आले का?
एक प्रतिनिधी - नाही महाराज. त्यांची तर बोबडीच वळाली हो! त्यांनी ई-मेल पाठवलाय आपल्या मंत्रिमहोदयांना! ते जाम विवंचनेत आहेत. कोट्यवधींचा माल अण्डरग्राऊंड केलाय त्यांनी कसातरी!
महाराज - बरं, बरं! ठीक आहे. थांबा! आलोच आम्ही.
(महाराज सेवकास घेऊन बाजूला जातात आणि हळू आवाजात बोलतात. सारे त्या दोघांकडे टक लावून पाहतात.)
एक शि.मं.प्रतिनिधी (प्रधानजींकडे पाहत) - म्हणजे महाराज सेवकाशी चर्चा करतात अन् हे दरबारी मंत्री मग...?
प्रधानजी - गप बसा हो! आम्ही सेवकाला फुल्लि ब्रिफिंग केलंय. तुमचं हित तेच आमच हित!
प्रतिनिधी - त्यात काय बरे नवनीत?
एक मंत्री - गप बसा आता. महाराज सर्वांना न्याय देतील याची खातरी बाळगा!
(महाराज व सेवक परततात. महाराज सिंहासनावर बसत.)
महाराज - तुमचं काय म्हणणं आहे हे आलंय आमच्या लक्षात. तुमचं गणित आणि आम्ही जपायचं समाजहित लक्षात घेऊन मला असे वाटते की, (प्रधानजी व मंत्र्यांकडे पाहत) लिहून घ्या सारं प्रधानजी..!
प्रधानजी - आज्ञा महाराज! (कागद-पेन सावरत)
महाराज - एकूण काय तर जनभावना आणि व्यापारी वर्गाचं हित याचा विचार करून आम्ही...!
(उपस्थितांची उत्सुकता ताणली जाते, ते महाराजांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागतात.)
आता अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पुढील महिन्यात एक समिती गठीत करू कारण या महिन्यात जरा पाऊसपाण्याचीही बोंब आहे. योजना आखाव्या लागतील, पथके पाहणीसाठी नियुक्त करावे लागतील. अल् निनो घोंघावतंय. दिल्लीकरांची भेट घ्यावी लागेल आणि हो, एक महत्त्वाचं ऑपरेशनही मार्गी लावायचं. समजलं..!
एक प्रतिनिधी (मध्येच बोलू लागतो) - ते ऑपरेशन टायगर का काय म्हणतात तेच ना?
महाराज - खामोश! गप्प बसा नाही तर...!
प्रतिनिधी( काकूळतीला येत) - क्षमा असावी महाराज ! मध्येच बोललो..! पण आमच नका हो ऑपरेशन वगैरे ...!
महाराज- तर पुढील महिन्यात ही सेवानिवृत न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत झाल्यावर सदर समिती अन्नपुरवठा, औषध निर्माण व विक्री व्यवस्थापन याचा अभ्यास करून सात महिन्यानंतर आपला अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत आमच्यापुढे ठेवेल. मग आम्ही योग्य तो अंतिम निर्णय घेऊ. या समितीच्या तीनेक उपसमित्या असाव्यात.म्हणजे सर्वांगीण अभ्यास करून अहवाल आमच्यापुढे येईल. या समितीच्या सर्व नऊ सदस्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असेल. या समितीत एक यांचा प्रतिनिधीही घ्या. आजच्या या निर्णयावर लगेच कार्यवाही व्हावी...!
एक मंत्री (शेजारच्या मंत्र्याच्या कानात हळूच पुटपुटतात) - मला वाटतं तोपर्यंत सगळी साफसफाई तुकारामांचे हस्ते होऊन जाईल असं धोरण दिसतयं बरं?
दुसरा मंत्री - नाहीतरी तुकाराम एका ठिकाणी एवढे थोडंच थांबतात. सहा महिन्यांपेक्षा जास्त एकाच ठिकाणी थांबायला ते थोडेच रिकामे आहेत. नाही...! (एकमेकांस टाळी देतात.)
एक शि.मं. प्रतिनिधी - पण महाराज... तोपर्यंत पार दैना होईल की व्यवसायाची! कृपया...!
महाराज (सिंहासनावरून उठत) - बस! आता या विषयावर चर्चा नको! आमचा निर्णय झालाय! या तुम्ही आता!
(सेवक गालात हसतो. सारे कपाळावर हात मारून घेत बाहेर पडतात. दरबारीही दप्त्तर आवरत बाहेर जायची तयारी करतात.)
सेवक - याला म्हणतात लबाडाला लबाडा घरी जेवायचं आमंत्रण! व्वाह!
(पडदा पडतो.)
-----------*-------------------
वेलची - विचारिली वाट । उसंत सीतळ । बुद्धीपुढे बळ । तृणतुल्य ॥ - संत तुकाराम.
जनार्दन देवरे,मनमाड.
(9011694885)
साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६
.jpg)


Comments