top of page

जा, झुरळांनो जा रे जा...! मसाला पान

  • 2 days ago
  • 4 min read

(फाकडोजी महाराज लगबगीने सिंहासनाजवळ येतात. ते खूपच अस्वस्थ दिसताहेत. मधूनच पाठमोरे होत हातावर हात आपटताहेत, सेवक आवडाजी हळूच त्यांच्या मागे येऊन उभा राहिला आहे पण महाराजांचे त्याकडे लक्ष नाही.)


महाराज - “सेवका, अरे कुठं आहेस...? इथं आमची पार वाट लागायची वेळ आलीय आणि हे भटकताहेत खुशाल, गावभर? सगळीकडे झुरळांनी अगदी उच्छाद मांडलाय आणि...?” (महाराज मागे वळतात तर सेवक हजर. दचकून) “अरे काय? तू इथेच! साधा होकार नाही माझ्या हाकेला?”


सेवक - “महाराज! जय हो! विजय हो! आज आपण कसल्या तरी गंभीर विचारात मग्न दिसत आहात. शिवाय झुरळांबद्दल आपली चिडचीड ऐकली अस्पष्टशी, मंग म्हणलं नको डिस्टर्ब करायला! म्हणून गप उभा राहिलो. क्षमा असावी. काय आदेश?”


महाराज - “सेवका, तातडीने सर्व मंत्र्यांना आणि प्रधानजींना बोलावून घे. लगेच कॉल कर. आम्ही वाट पाहतोय म्हणावं!”


(घाईघाईने प्रधानजी व तीन मंत्री प्रवेशतात व एकाचवेळी म्हणतात - )


प्रधानजी व अन्य तिघे - “महाराज, जय हो! विजय हो..!”


 प्रधानजी - “पेट्रोल व डिझेलच्या संकाटामुळे आज थोडा उशीरच झाला आम्हाला! पण आम्ही सारे एकाच गाडीने येऊन आपल्या आदेशाची अंमलबजावणी केलीय. येता-येता काही पेट्रोलपंपांनाही भेट दिली, सूचना वगैरे केल्यात आणि तडक इकडे निघालो.”


महाराज - “बरं बरं! ते जाऊ द्या आता. ते कॉक्रोच का झुरळ जनता पार्टीच नेमकं काय मॅटर आहे?”


प्रधानजी - “हे तुमच्या पर्यंतही पोहोचलं महाराज?”


महाराज - “म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचायला नको होतं का?”


एक मंत्री - “महाराज, क्षमा! यावर प्रधानजीच नेमका प्रकाश टाकतील.”


महाराज - “काय प्रकाश टाकतील? साधं सरळ बोलत जा हो मंत्री!”


प्रधानजी - “होय महाराज! आदेश असावा.”


महाराज - “आदेश काय? हे झुरळ जनता पार्टीचं काय प्रकरण आहे? लयीच फालोअर्स का काय समर्थक वगैरे म्हणतात ते वाढलेत त्यांचे? गुप्तचरांकडून काही माहिती?”


प्रधानजी - “ते व्हयं महाराज! म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचंच ना?”


महाराज - “हो, तेच ते! काय ग्यॉटमॅट आहे ते?”


एक मंत्री - “आम्ही काढलीय त्याबाबत माहिती!”


महाराज - “तुम्ही नका बोलू काही. माझा सवाल प्रधानजींना आहे! त्यांनाच उत्तर देऊ द्या की...?”


प्रधानजी - (मंत्र्याकडील कागद हिसकावून घेत) - “सांगतो महाराज. ते सारं व्हर्च्युअल आहे!”


महाराज (कपाळावर आठ्या आणत) - “म्हणजे?”


प्रधानजी - “म्हणजे काल्पनिक आहे ते सारं. त्यातले सारेच काही खरे नसते. त्यांचे समर्थकही काही खरे नसतात. बनावट ओळख वापरून झालेले फालोअर्सच निम्म्याहून अधिक असतात म्हणे. तेही जगभरातील. आता जग केवढं अन्‌‍? आपला प्रांत केवढा? त्यामुळे चिंता नसावी. आपल्या भरभक्कम सत्तेला कसलाही धोका नाही.”


महाराज - “उदाहरणार्थ?”


प्रधानजी - “आता बघा, ममतादीदींचे फॉलोअर्स किती? अन्‌‍? मिळालेली मतं किती ? तेच स्टॅलिन अन्‌‍ रागांचं. फॉलोअर्स अप नावाच्या दिल्लीकरांचेही कोट्यावधी होते पण झालं काय?”


(मध्येच हस्तक्षेप करीत)


एक मंत्री - “अनेक पत्रकारांचे, त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलचे फॉलोअर्स वगैरे लाखाच्या घरात आहेत पण मतदानात मात्र उलटंच घडतंय ना? लोक किंवा मतदार किंवा फॉलोअर्स ऐनवेळी काय निर्णय घेतील हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही महाराज!”


महाराज - “आता ब्रह्मदेवाचा वगैरे यात काय संबंध? नको तिथं देव आणायचा!”


मंत्री - “तशी पद्धतच आहे अलीकडे. प्रत्येक गोष्ट देवाशी जोडायची म्हणजे काम बिनबोभाट पार पाडता येतं.”


महाराज - “पुरे! पुरे! उगाच आम्हास भक्तीमार्गे पुढे जावयाचे विवेचन नको! एकच सांगा, या झुजपाचे दोन कोटीच्या वर फॉलोअर्स झालेच कसे? आणि दुसरा प्रश्न या झुरळपंथियांमुळे विरोधी पक्षांचा फायदा वगैरे?”


प्रधानजी - “आता सारे विरोधी वगैरे झुरळ पार्टीचंच समर्थन करत आहेत. त्यांना ही नामी संधी वाटतेय झुरळांमार्फत सरकार उलथवून टाकण्याची. झुजपाच्या माध्यमातून ते त्यांचा अजेन्डा राबवू पाहताहेत. जेन-झी काय म्हणतात त्यावरच साऱ्यांच्या आशा केंद्रित झाल्यात. त्या भरवशावरच चाललंय सारं हल्ली!”


महाराज - “अहो मग, यांच्या ब्रॅण्डचं काय?”


एक मंत्री - “म्हणजे समजलो नाही महाराज आम्ही?”


महाराज - “घ्या आता, यांना ब्रॅण्डच माहीत नाही.” (कपाळावर हात मारून घेत), “जसं बारामतीचा पवार ब्रॅण्ड, मुंबईकर ठाकरे ब्रॅण्ड, दिल्लीतला आप किंवा रागां ब्रॅण्ड! समजलं?”


प्रधानजी - “अच्छा! ते व्हयं? ते सारेच बहुधा झुरळ ब्रॅण्डचे ग्रॅण्ड अम्बेसिडर होतील बहुधा.”


महाराज - पण मग या पक्षाच्या अस्तित्त्वाचं काय?”


सेवक - “क्षमा असावी महाराज! पण मध्येच बोलण्यावाचून उपाय दिसेना म्हणून इनंती!”


महाराज - “बोल, सेवका बोल! तुझं मत म्हणजे सर्वसामान्य माणसाचं मत.”


सेवक - “खरं सांगू का महाराज, ही झुरळक्रांती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. झुजपा काही आंदोलन वगैरे करण्याची शक्यता नाही. त्याचा म्होरक्या अमेरिकेत अन्‌‍ वांत्या इकडे! ज्या पत्रकार वगैरेंना बातम्या शोधता येत नाहीत, त्या नीट मांडता येत नाहीत, त्यांच्यासाठी हा फक्त मसाला आहे. तिसऱ्याच्या हातून चौथ्याची पोळी पळवत पहिल्याची भूक भागवायचा!”


महाराज - “अरे व्वा! तुझा चांगलाच अभ्यास आहे की सेवका! आनंद वाटला.”


प्रधानजी (पुटपुटल्या सारखं) - “कायम सोशियल मिडीयावर तर पडून राहतो हा! मग एवढं अगाध ज्ञान असणारच...!”


 महाराज - “काय म्हणालात प्रधानजी ? मोठ्याने बोला.”


प्रधानजी - “काही नाही महाराज ! हे सार व्हर्च्युअल ज्ञान आहे. कृतीत आणि वृतीत ते कधी येण्याची / बिंबण्याची शक्यता शून्यच.”


महाराज - “म्हणजे तुम्ही सारे याबाबत सकारात्मक आहात ना! मग झाले! पण कसं आहे याआधीही अण्णांदोलन करून दिल्लीस जेरीस आणलं होतं अन्‌‍ सरकार उलथवलं होतं म्हणून जरा!”


एक मंत्री - “होय महाराज होय! आम्ही सारे सकारात्मकच! चिंता नसावी. आपण निर्धास्त राहा! आणि ती झुरळं वेगळी होती. आपणच त्यांना आतून रसद पुरवली होती की? आठवतंय ना?”


महाराज - “अरे हो की! ती देशी झुरळं होती, ही जरा विलायती दिसताहेत म्हणून पोटात गोळा आला होता! पण आता जरा बरं वाटायला लागलं हो!”


प्रधानजी - “सेवका! अरे बघतोस काय? दे ते तबकातील मसाला पान महाराजांना! वेळ झालीय आता दरबार आवरण्याची.”


सेवक (हात जोडत) - “जाता-जाता एक गाणं म्हणावसं वाटतं.”


महाराज - “म्हण की, त्यामुळे जरा ताणही हलका होईल आमचा. आण ते पान इकडं. पान चघळता चघळना ऐकतो आम्ही गाणं. अवश्य गा!”


सेवक (जरा खाकरतो आणि गातो.) -


जा, झुरळांनो जा रे जा


परतूनी आपल्या देशाला


तिकडे जाऊन मौज करा रे


नका पोखरू आम्हाला !


महाराज - “व्वाह! व्वा! छानच. सारे म्हणा बरं आता हे गाणं...!”


सारे दरबारी (टाळ्या वाजवत गातात) -


जा, झूरळांनो जा, रे जा


मज्जा करा रे मजा करा..!


(पडदा पडतो.)

------------------------------

वेलची -


आम्ही करू ते चारी धाम; दुसरे करतील ते रिकामे काम!


जनार्दन देवरे,मनमाड (9011694885)

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २९०२६


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र | Shree Chhatrapati Shivaji Maharaj Charitra
₹500.00₹375.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page