top of page

राम का ना बदनाम ना करो

  • Jul 9
  • 6 min read

मंडळी ‌‘राजकारण‌’ ह्या विषयावर मला फारसे कधी लिहावेसे वाटलेच नाही. त्याचे कारण त्यावर का लिहावे आणि कशासाठी लिहावे, असा एक प्रांजळ प्रश्न माझ्या मनाला सतत पडतो आणि मग मी थोडासा निराश होतो. ‌‘राजकारण गेलं चुलीत‌’, अशी एक प्रचलित म्हण जी मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे ती आठवते परंतु अजूनपर्यंत मला ती ‌‘चूल‌’ काही केल्या सापडलीच नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जे काही ‌‘राजकारण‌’ असते ते काही केल्या मला अजून तरी समजले नाही अथवा माझीच काय पण सर्वसामान्य माणसांची ते समजण्याची कुवतच नसावी बहुधा!


1971 मध्ये देवानंद यांनी ‌‘हरे राम हरे कृष्ण‌’ हा चित्रपट काढला होता.  त्यात त्यांनी पाश्चात्य हिप्पी संस्कृतीच्या विळख्यात अडकलेल्या त्यावेळेसच्या तरुण पिढीचे अत्यंत विदारक चित्र समाजासमोर ठेवले होते. राम आणि कृष्ण ह्या आपल्या धार्मिक अस्मितेशी आणि भारतीय संस्कृतीशी पाश्चिमात्य देशात आणि त्याच्याच धरतीवर भारतातही कसा चरसी, गंजाडी, निरुद्योगी आणि विकृत लोकांचा सुळसुळाट झाला होता, हे दाखवून त्या विकृत प्रवृत्तीपासून त्याकाळच्या तरुणाईला त्यामागचे एक षडयंत्र दाखवून समाजप्रबोधन करण्याचा खूप चांगला प्रयोग ह्या चित्रपटाद्वारे करण्यात आला होता.


पूर्वी असे समाजप्रबोधन करणारे चित्रपट बनत असत. आजकाल समाजप्रबोधनाच्या नावाखाली समाजविघातक आणि धार्मिक तेढ वाढवणारे चित्रपट जास्त प्रमाणात निर्माण केले जातात आणि त्याच्यात काही विशिष्ट प्रवृत्तींचे, वर्गांचे आणि धर्मांचे प्रचारक राजकारण अतिशय सोयीस्करपणे साधण्याचा प्रयत्न केला जातो हेही निर्विवाद सत्य आहे.  


ह्याच चित्रपटातील आनंद बक्षी यांनी लिहिलेले आणि आरडीने संगीतबद्ध केलेले व किशोर कुमार यांनी गायलेले एक गीत, सध्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीशी, 56 वर्षांनंतरही साम्य दर्शवणारे चित्र पाहून, जो कोणी खरा ‌‘भारत‌’प्रेमी असेल त्याची मान आपसूकच शरमेने खाली गेल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र शंभर टक्के सत्य आहे. (प्रातिनिधिक स्वरूपात हे गीत खाली देत आहे.)


देखो ओ दीवानो, तुम ये काम ना करो


राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो


राम को समझो, कृष्ण को जानो, नींद से जागो ओ मस्तानो


जीत लो मन को पढ़ कर गीता


मन ही हारा तो क्या जीता, तो क्या जीता


हरे कृष्णा हरे राम!


जीवन को नशे का तुम गुलाम ना करो


राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो


राम ने हसकर सब सुख त्यागे, तुम सब दुख से डर के भागे


कृष्ण ने कर्म की रीत सिखाई


तुमने फ़र्ज़ से आँख चुराई, ओ राम दुहाई


हरे कृष्णा हरे राम


जीवन नाम है काम का, आराम ना करो


देखो ओ दीवानो, तुम ये काम ना करो


राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो


अतिशय दु:खी अंतःकरणातून सांगावे लागते आहे की, त्या काळातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे हे गीत आणि त्यामधील परिस्थितीचे केलेले वर्णन आजही इतके चपखलपणे बसले आहे की, आपण अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर पडलो नाही आणि पडायचा प्रयत्नही करत नाही आहोत.  इंग्रजांनी 150 वर्षे आपल्यावर राज्य केले हा इतिहास इतका ताजा आहे की, आपण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 75 वर्षे होऊन गेली तरी आपल्या गुलामी मानसिकतेवर मात करू शकलेलो नाही. दुर्दैवाने आज कुठलाच राजकीय पक्ष अथवा संघटना सर्वसामान्य जनतेला ह्या मानसिकतेमधून बाहेर पडू नये अशीच व्यवस्था करताना दिसत आहे.


गेली काही वर्षे देशात अत्यंत अराजकतेचे वातावरण आहे. सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ, सदाचारी, देशभक्त, भ्रष्टाचारापासून चार हात दूर, संघटनात्मक शिस्त असलेला असा एक वेगळा पक्ष आणि त्याचे नेतृत्व, आपल्या राज्यघटनेच्या द्वारे निवडून देऊन आपण आपल्या समृद्ध आणि प्रगतशील विश्वगुरु भारताचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाला गेल्या काही वर्षात सुरुंग लागून आपण कधी अधोगतीकडे वाटचाल करायला लागलो हे समजायला थोडा उशीरच झाला आहे असेच म्हणावेसे वाटते. त्याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे अतिशय नियोजनपद्धतीने व निलाजरेपणे, भारतीय नागरिकाच्या हृदयी वसलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दान पेटींवर घातला गेलेला डल्ला हे होय! आपल्याच देशाच्या अस्मितेवर, आपल्याच लोकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी घातलेला हा घाव कधीही भरून न येणारा असाच आहे असे अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते.


सत्ताधारी पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये कितीही चांगली कामे केली असतील अथवा करत असतील (जो त्यांचा गैरसमज आहे) तरी सर्वसामान्य माणसांच्या भावनिक आणि श्रद्धेय अस्मितेवर घातलेल्या ह्या धाडीला, जनता कधीही माफ करणार नाही हेही तितकेच खरे आहे.


माझ्या ह्या भावना मी अतिशय पोटतिडकीने व्यक्त करतो आहे. राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाचा विषय होता. अर्थात त्याचेही राजकारण करून त्याच्या जिवावर सत्ता काबिज झाल्यावर त्याच राममंदिराचा भ्रष्टाचाराने असाही अनादर करून आपण काय साध्य केले?  हे ज्यांनी केले त्यांनाच ठाऊक!  हेच का ते ‌‘रामराज्य‌’? असा प्रश्न मनास पडल्याशिवाय राहत नाही. मी कुठल्याही राजकीय अभिनिवेषापोटी लिहित नसून, ह्या एका घटनेने माझ्या मनाला झालेल्या वेदना व्यक्त करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न करतो आहे.  


देश प्रेम आणि देशाप्रतीची निष्ठा आता इतकी स्वस्त झाली आहे की, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून आपण आपल्या देशाची, जगातील एक प्रगतशील व सुसंस्कृत राष्ट्राची प्रतिमा डागाळण्याचे काम मात्र दुप्पट वेगाने करतो आहोत, असे खेदाने म्हणावे लागते आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा नुसता जयघोष करून, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी ज्या विकृत पद्धतीने साजऱ्या करतो, त्यावरूनच आपल्याला शिवरायांच्या स्वराज्याची आणि शंभुराजांच्या बलिदानाचे मूल्यमापन अजूनही करताच आलेले नाही हे उमगते. त्यासाठी लागणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक बुद्धिचा आणि इच्छाशक्तिचा अभाव हेच एकमेव कारण असू शकते.


शिवरायांच्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावला जात नव्हता. त्या देशात आज राजरोसपणे शेतकरी, सर्वसामान्य जनता, तसेच मंदिरांच्या दानपेट्याही लुटल्या जात आहेत, ही शोकांतिका आहे.


शिवरायांच्या काळात शत्रूच्या आया बहिणींचीही अब्रू शाबूत राहत होती.  तिच्या केसालाही धक्का लागू दिला जात नव्हता आणि असा गुन्हा घडलाच तर त्याचा चौरंगा करून त्याला आयुष्यभर खितपत ठेवले जात होते. असा दरारा आज कुठे पाहायला मिळतच नाही. राजरोसपणे चिमरुड्या मुलींवर अत्याचार होत आहेत. भोंदुगिरीचा तर नुसता सुळसुळाट झाला आहे. गुन्हेगारीला राजाश्रय मिळतो आहे. अंमली पदार्थांची दिवसाढवळ्या तस्करी होते आणि आणि त्यात आपली तरुण पिढी नष्ट होत चालली आहे.  रोजगार निर्मिती ठप्प आहे आणि अर्थकारण तर बेभरवशाचे झाले आहे.


ह्या सगळ्यामुळे राजकीय अस्थिरता तर इतक्या प्रकर्षाने जाणवत आहे की, आपले राज्यकर्ते सध्याच्या काळात तासभरही सुखाने झोपू शकत असतील की नाही ह्याबाबत माझ्या मनात तरी शंका आहे.


सत्तेच्या हव्यासापाई कायदे आणि नीतीमूल्ये तर पायदळी तुडवून, कधीच वेशीला टांगून ठेवली गेली आहेत. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात आहे हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्यात आपली समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रे त्यांची जी काही सामाजिक, नैतिक जबाबदारी आहे, ती विसरून ते ही सत्ताधारांच्या तालावर नाचून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.  


‌‘भ्रष्टाचार हाच आता शिष्टाचार झाला आहे‌’ ः सर्व सरकारी यंत्रणांचा आपल्या सोयीने वापर करून निवडणुका घेतल्या जातात, त्याचे निकालही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने वळवले जातात. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा इतकेच काय तर तळागाळातील सार्वजनिक तसेच धर्मादाय संस्थांच्या बाबतीतही तोच प्रकार सध्या अगदी राजरोसपणे पाहायला मिळतो आहे आणि त्याचा पायंडा पडत चालला आहे, हे एक सामान्य नागरिक म्हणून मनाला अजिबात पटत नाही तसेच रुचतही नाही. वयोपरत्वे, हे सर्व निमूटपणे सहन करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही, ह्याचे शल्य मात्र सतत बोचत राहते आहे.


सर्व व्यवस्था जर का अशी भ्रष्ट झाली असेल तर आपल्या देशाचे नजीकच्या काळातील भवितव्य किती अंधःकारमय आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.


शेतकरी बिचारा ह्या सगळ्यात कधी ‌‘अस्मानी‌’ तर कधी ‌‘सुलतानी‌’च्या जात्यात भरडला जातो आहे. त्याला तर कोणी वालीच उरला नाही अशी अवस्था आहे. त्याच्या हातात ‌‘आत्महत्या‌’ एवढे एकच साधन उपलब्ध आहे. त्याचा तो नित्यनेमाणे वापर करतो आणि आपला संसाराचा विस्कोट करून त्यांना ह्या राजकीय यंत्रणेच्या स्वाधीन करून स्वत:ची मात्र सुटका करून घेतो आहे.


हा व्यथित बळीराजा जेव्हा अन्नधान्य पिकवायचे थांबवेल तेव्हाच आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाची आणि त्याच्या कष्टाची जाणीव होईल. शेतकऱ्याला रामराज्याची थोडीशीही आशा उरलेली नाही. बळीराजा श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेच्या उपदेशाप्रमाणे, कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता, मोहाचा त्याग करून आणि सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून समतेने जगतो आहे आणि तोच त्याच्या जीवनाचा ध्यास आहे, म्हणूनच का होईना आज आपण खाऊन पिऊन मस्तीत जगतो आहोत, असे मला वाटते.


काही निवडक लोकांच्या हाती ह्या दोन-तीन दशकात इतका पैसा आला आहे की, त्यांच्यातल्या अहंकारी आणि गर्विष्ठ वृत्तीने ते संपूर्ण देशालाच वेठीस धरत आहेत. त्यात जे कोणी त्यांना मदत करत आहेत त्यांना सुद्धा त्यांचा अंत किती जवळ आला आहे, ह्याची जाणीवच होत नाहीय, हीच एक धोक्याची घंटा आहे.


एक म्हण आहे ना, ‌‘कर भला, तो हो भला, बुरे का, अंत बुरा‌’ तसेच ‌‘अती तिथे माती‌’ हेही त्रिकालबाधित सत्य आहे जे आज नाही तर येणारा काळच ठरवेल. प्रभू श्रीरामाचा त्याग आणि श्रीकृष्णाची कर्म नीती यांच्या आध्यात्मिक संस्कारावर तर आजवर आपला देश जगावर अधिराज्य करतो आहे आणि स्वत:चे सांस्कृतिक वेगळेपण ठळकपणे मिरवत आहे परंतु आज राजकीय स्वार्थापोटी सध्या जो काही खेळखंडोबा चालला आहे आणि निर्लज्जपणाचा कळस चालला आहे तो आपल्याला नजीकच्या भविष्यात पुनः एकदा गुलामगिरीच्या वाटेने घेऊन जातो आहे की काय असे मला तरी अगदी प्रकर्षाने वाटते आहे. ह्या सगळ्याचा दोष द्यायचा तरी कोणाला? राजकारणाला, समाजकारणाला, भ्रष्टाचाराला, व्यवस्थेला, परिस्थितीला, निसर्गाला, पृथ्वीला, ईश्वराला, नैतिकतेला, धर्मनिष्ठेला, माणसाला, राज्यघटनेला, स्वातंत्र्याला की आपल्याच कर्माला?


शवेटी फक्त एकच म्हणावेसे वाटते, कृपया आमच्या धार्मिक अस्मितेचा तुमच्या राजकीय स्वार्थापायी बळी देऊ नका. अन्यथा ‌‘जसे करावे, तसे भरावे लागते‌’, हे विसरून जाऊ नका.


सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भारताचा एक प्रामाणिक नागरिक म्हणून माझी ही त्यातल्या त्यात सौम्य शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटली म्हणून हा लेखप्रपंच. ‌‘शहाण्याला शब्दाचा मार.‌’


जय श्रीराम!


- रवींद्र कामठे

94212 18528



अनोख्या रेशीमगाठी | Anokhya Reshimgathi
₹300.00₹225.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page