ओशो - अस्तित्त्वाचे काय करायचे? | Osho Stories
- Aug 4
- 5 min read
मानवी जीवनाचा प्रवास नेमका कशासाठी आणि कसा व्हायला हवा? हा विचार अनेकदा मनात येतो. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी असेल, तर जीवन अधिक आनंदाने जगता येते. जीवनाचा अर्थ शोधता येतो; पण जीवनाचा प्रवास केवळ एक घटना आहे म्हणून त्याकडे पाहत राहिलो, तर निराशा आहे. आनंदाचे क्षण आहेत, प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी शिकवणारे आहे; मात्र त्या प्रत्येक वळणाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. जीवनात अर्थाचा शोध लागत जातो.
जीवन आणि नदी याचे नाते जवळचे आहे. नदी ज्याप्रमाणे वाहत जाते, त्याप्रमाणे जीवन देखील प्रवाहित असते. नदी वाहत जाते, तेव्हा ती अनेक गोष्टी आपल्याला सांगत जाते. नको असलेल्या गोष्टी बाजूला सारत जाते. ती आपल्याला या साऱ्या प्रवासातून जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने काही शिकवत असते. आता आपल्याला शिकायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीतून शिकता येते; मात्र त्यासाठीची विचारदृष्टी असायला हवी असते. ती नसेल, तर फक्त नदीचे पाणी वाहते आहे असेच आपल्याला वाटून जाते. ओशो मात्र या संदर्भात अत्यंत सुंदरतेने नदीचे वाहणे आणि माणसांचे जगणे या संदर्भात विवेचन करतात. ते समजावून घेतले, तर आपल्यालाही जगण्याचा अर्थ शोधणे सहज आणि सुलभ होत जाणार आहे.
ओशोंनी सांगितलेली गोष्ट आपल्याला बरेच काही सांगणारी आहे: “जीवन म्हणजे नदी आहे. ती सतत वाहती असते, कधीच थांबत नाही. खरं तर थांबते ती नदी कशी? जी कधीच थांबत नाही ती खरी नदी. पाणी आहे पण वाहत नाही, फक्त साचलेले आहे, त्याला डबके म्हणतात. ते पाणी साचलेले राहिल्याने त्याला एक प्रकारची दुर्गंधी येते. त्याचबरोबर हळूहळू त्या पाण्यामध्ये परिसरातील सजीवांना धोका देणारे कीटक तयार होतात. त्यातून अवतीभोवतीचा सारा परिसर धोकादायक बनतो. जीवनाचे देखील असेच आहे. जीवन जर प्रवाहित ठेवले नाही, तर जीवनाचे देखील डबके होते.
नदी जेव्हा वाहत जाते, तेव्हा तिचा शेवट समुद्रामध्ये होत असतो. तसेच मनुष्याच्या जीवनामध्ये सातत्याने नवनवीन विचारांचा शोध असतो, तत्त्वांचा बोध असतो, कर्माची वाट असते, कर्तव्याची जाणीव असते. या साऱ्या प्रवासात तो नव्याचा शोध घेत असतो. जीवनाच्या एका टप्प्यावर माणसाला सत्याचा शोध लागतो. सत्याच्या शोधाच्या वाटेचा प्रवास माणसाला परमात्म्याच्या दिशेने घेऊन जातो. माणसाला परमात्मा भेटला, की जीवनात दुसरे काय हवे असते? तो एका अर्थाने जीवनाचा अंतिम शोध असतो. माणूस सतत शोध घेत राहतो आणि शेवटी सत्यात, परमात्म्यात विलीन होतो.”
नदीचा प्रवास — नदीचा जन्म पर्वतांमध्ये होतो. सुरुवातीला ती लहानशी धार असते. ती खडकांमधून मार्ग काढते, अडथळे पार करते. कधी ती वेगवान असते, कधी शांत. ती गावांमधून, शहरांमधून, जंगलांमधून वाहते. नदीचा प्रवास म्हणजे मनुष्याचे जीवन आहे. बालपण म्हणजे पर्वतातील धार, तरुणपण म्हणजे वेगवान प्रवाह आणि वृद्धत्व म्हणजे शांत वाहणारी नदी. माणसाच्या जीवनाचे टप्पे देखील यासारखेच असतात. नदीचा उगम, मध्यावरील प्रवाह आणि अंतिम समुद्राला मिळणे हे जसे तिच्या वाटेला येते, तसे माणसाच्या आयुष्याला देखील जन्म, जगणे आणि मृत्यू या तिन्ही गोष्टींना आयुष्यात सामोरे जावे लागत असते. नदीच्या प्रवाहाला सरळ वाहता येत नाही. तिच्या प्रवाहामध्ये देखील अनेक अडथळे येत असतात.
अडथळे आणि संघर्ष नदीला सतत पार करावे लागतात. कधी तिला खडकावरून, कधी वाळू, वळणे अशा विविध स्वरूपात संघर्ष करत प्रवाहित राहावे लागते; पण ती थांबत नाही. ती अडथळ्यांना स्वीकारते, त्यांना पार करते. कधी ती वळसा घेते, कधी ती खडक फोडते. माणसाच्या आयुष्यात देखील त्याला या स्वरूपातच संघर्ष करत जगावे लागते. आज संघर्ष पार करायची हिम्मत नदीसारखी मनगटात राहावी लागते, त्यासोबत मस्तकातही असावी लागते. जीवनात अडथळे येतात; पण जो थांबत नाही, तोच शेवटी समुद्राला पोहोचतो.
नदी प्रवासात अनेकांना जीवन देते. शेतांना पाणी देते, गावांना पिण्याचे पाणी देते. माणसांना, प्राण्यांना, झाडांना जगवते. आपण जेव्हा जीवनाचा प्रवास करत असतो, तेव्हा केवळ स्वतःसाठी जगायचे नसते. आपल्या आयुष्यामध्ये हा प्रवास करताना आपण कोणाच्या कामी आलो आहोत? कोणाला मदत करतो आहोत? कोणासाठी मदतीचा हात दिला आहे? आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होत नाही ना? अशा अनेक गोष्टींचा विचार सातत्याने करण्याची गरज असते. नदी जसे फक्त देत जाते आणि इतरांच्या आयुष्याला बहर आणत जाते, नदीचे पाणी सर्वांनाच जगण्यासाठी शक्ती देत असते; त्याप्रमाणे माणसाचे आयुष्य देखील इतरांच्या आयुष्याला बहरवणे, फुलवणे यासाठी उपयोगी पडण्याची गरज असते. तो इतरांसाठीही किती जगतो, याला अधिक महत्त्व आहे. जो इतरांसाठी जगतो, त्याच्याच आयुष्याचे 'जीवन' बनते. अन्यथा जगणे तर सुरूच असते. माणसे जगतात ते का? तर फक्त मृत्यू येत नाही म्हणून! पण जेव्हा तुम्ही इतरांच्या मदतीला जाता, इतरांच्या कामी येता, तेव्हा तुमच्या आयुष्याचे, जगण्याचे जीवन घडत असते. ते तुम्हाला जीवनाच्या प्रवासाची दिशा दाखवत असतात. जगण्याचे 'जीवन' होण्याचा प्रवास हा खरा आयुष्य जगण्याचा अर्थ आहे. नदी त्या अर्थाने आपल्याला जीवनाचा अर्थ सांगत असते.
जशी नदी स्वतः वाहते पण इतरांना जीवन देते. ती स्वतःचे अस्तित्व सोडते, ती समुद्रात विलीन होते. आता ती नदी राहत नाही, ती समुद्र बनते. तसे माणसाच्या आयुष्याचे देखील होत असते. माणूस जेव्हा या दिशेचा प्रवास करू लागतो, तेव्हा त्याचे जगणे हे समृद्धपणाचा प्रवास ठरतो. एका अर्थाने त्याचे जगणे म्हणजे समर्पण असते. ही समर्पणाची वृत्ती त्याच्यातला ‘मी’पणा संपवते. अहंकाराचा लोप होतो आणि मग अशी माणसे देवरूप होऊन जातात. जसे संत म्हणाले होते: ‘देव पाहावया गेलो / देव होऊनिया ठेलो //’
त्याप्रमाणे माणसाचे जीवन व्हायला हवे. नदीचा समुद्र होणे आणि माणसाचा देव होणे, या दोन्ही गोष्टी आयुष्याच्या अंतिम साध्यतेच्या आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
ओशो म्हणतात: “मनुष्याचा प्रवासही असा आहे. शेवटी तो परमात्म्यात विलीन होतो. त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपते, पण तो अनंताचा भाग बनतो. माणूस जीवनात सातत्याने नवा शोध घेत असतो. तो अनुभव, ज्ञान, संघर्षातून प्रवास करत असतो. शेवटी तो सत्यात विलीन होतो. जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू नाही, तर परमात्म्यातील विलीनता आहे.”
वर्तमानामध्ये आपण जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आज आपल्याला जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी पैसा हवा आहे, संपत्ती हवी आहे, सत्ता हवी आहे. किंबहुना आपल्याला उपभोगवादी विचारांची प्रक्रिया म्हणजे जीवन असे वाटू लागले आहे. त्यामुळे जीवनाचा अर्थ हरवला जातो आहे, जीवनाचा शोध लागत नाही. जीवनामध्ये सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळत जाते, तेव्हा शेवटी लक्षात येते की भौतिक सुखाची उधळण म्हणजे जीवन नाही. आयुष्य आजवरच्या प्रवासात आपण व्यतीत केले; पण त्यातून जीवनाचा अर्थ शोधता आला नाही. त्यामुळे जेव्हा जीवनाचा अर्थ कळतो आणि हाती काही लागत नाही, तेव्हाच जीवन वाया गेले असेच म्हणावे लागेल. आपण सतत धावपळीत असतो — करिअर, पैसा, यश! पण शेवटी हे सर्व समुद्रात विलीन होणाऱ्या नदीसारखे आहे. खरे समाधान म्हणजे सत्याशी एकरूप होणे आहे. सत्याची वाट आपल्याला सापडेल का? त्या दिशेचा प्रवास घडेल काय? तसे घडणार नसेल, तर आपल्या जीवनाला अंतिमतः समुद्रावस्था प्राप्त होण्याची शक्यता नाही.
ओशो म्हणतात: “जीवनाचा प्रवास बाहेर नाही, तो आत आहे. नदी बाहेर वाहते, पण आत्मा आत वाहतो.”
जीवन सतत वाहत असते, थांबणे म्हणजे मृत्यू. अडथळे स्वीकारा, संघर्ष करा — हा प्रवासाचा भाग आहे. नदी इतरांना जीवन देते, तसेच आपणही इतरांना मदत करावी, विलीनता स्वीकारावी. शेवटी आपण परमात्म्यात विलीन होणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. आत्म्याचा प्रवास ओळखून आपला प्रवास सुरू ठेवायला हवा. बाह्य यशापेक्षा अंतर्गत शांतता महत्त्वाची आहे. ‘नदी आणि समुद्र’ ही कथा आपल्याला सांगते की जीवन म्हणजे सतत वाहणारा प्रवास आहे. अडथळे असूनही आपण पुढे जायचे आहे. इतरांना जीवन देत राहायचे आहे. शेवटी आपण सत्यात, परमात्म्यात विलीन व्हायचे आहे. नदी समुद्रात विलीन झाली की ती नदी राहत नाही, ती समुद्र बनते. तसेच आत्मा परमात्म्यात विलीन झाला की तो स्वतंत्र राहत नाही, तो अनंताचा भाग बनतो.
आपल्या आयुष्यामध्ये आपण अनंताचा भाग बनण्याशिवाय दुसरे काय आहे? ईश्वररूप होणे हे जर जीवनाचे ध्येय बनले असेल, तर त्या दिशेने आपण सातत्याने चालायला हवे. शेवटी त्यासाठी जीवनाला त्यागाच्या वाटेने प्रवास करावा लागेल. अहंकाराची वाट सोडून द्यावी लागेल. या वाटेचा प्रवास आपल्याला ईश्वररूप दाखवेल. त्यामुळे आपण कोणत्या दिशेचा प्रवास करायचा हे ठरवायला हवे. नदीचे अस्तित्व हे नेहमी छोटे असते आणि समुद्राचे अस्तित्व हे सर्वाधिक मोठे असते. आपल्या अस्तित्वाचे काय करायचे, हे आपले आपण ठरवायला हवे... इतकेच!
-संदीप वाकचौरे
9405404500
.jpg)


Comments