top of page

ओशोंच्या गोष्टी : प्रेमाच्या गावा जावे...

  • 1 day ago
  • 5 min read

प्रेम ही माणसाच्या जीवनातील सर्वोच्च भावना आहे. प्रेमाचे नाते असेल तर त्या नात्यातील वीण अधिक घट्ट होत जाते. मुळात नात्यातील मालकी हक्क वजा केला की नाते प्रेमाने फुलून येते. प्रेमासाठी अंतर्मनात ओलावा असावा लागतो. प्रेम ही भावना माणसांच्या अंतरिक शुद्धतेची भावना असते. अलीकडे मात्र प्रेमाच्या अर्थाला विकृतीशी जोडले जात आहे. प्रेमाचा अर्थ समर्पण आहे. माणसं दोन असली तरी हृदय एकच असते, ही भावना आज हरवली आहे. प्रेम म्हणजे स्वतःला शोधणे आहे. प्रेम करता येणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले होते की, प्रेम म्हणजे ईश्वर आहे. आज माणूस प्रेमात पडला की, म्हटले जाते की, माणूस प्रेमात फसला आहे. जे एकमेकाला फसवते ते प्रमे कसे? प्रेमात बहरणे, फुलणे असते. तेथे फसणे आणि फसवण्याचा विचार कसा असेल? मात्र त्यासाठी माणसं नितळ मनाची असावी लागतात.


त्याशिवाय प्रेमाच अर्थ कळणार कसा? परमेश्वर आणि भक्त यांच्या नात्यातही एक प्रकारचे प्रेममय नाते असते. प्रेम म्हणजे विश्वास असतो. प्रेम म्हणजे विवेक आहे. प्रेम म्हणजे आकर्षण नाही तर जीवन उन्नतीचा प्रवाह आहे. आज प्रेमाला फक्त आकर्षणाचे स्वरूप आले आहे. अर्थ चुकला की, दिशाही चुकते... आणि मग एखादा शब्द, व्यक्ती कशी बदनाम होते हे आपण आपल्या अवतीभोवती आपण पाहत आहोत. तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा समर्पणाशिवाय दुसरे काहीच नसते. समर्पणाचा भाव असेल तर देण्यासारखे जितके असते तितके सारे दिले जाते. मग हाती काहीच राखून ठेवणे घडत नाही.


एकदा ओशो निवांतपणे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या अवतीभोवती काही तरूणही बसले होते. ओशो जे काही सांगते होते, ते सर्व विचार उपस्थितीत असलेले सर्व तरूण अत्यंत शांतपणे ऐकत होते. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता. कोणाच्या तरी चेहऱ्यावरून त्याच्या मनात प्रश्न काहूर होते हे लक्षात येत होते. ओशो हेही पाहात होते, तेव्हा त्यांनी उपस्थित असलेल्या तरूणांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. अखेर वयाने आणि मनाने तरून असलेल्या एकाने ओशोंना प्रश्न विचारला की, “प्रेम म्हणजे काय? मला प्रेमाची नेहमीच भीती वाटते, प्रेमात मी हरवून जाईन, माझे अस्तित्व संपेल.”


त्यांचा हा प्रश्न ऐकून घेतल्यावर ओशो शांतपणे हसले आणि म्हणाले “मित्रा, प्रेम म्हणजे हरवणे नाही तर स्वतःला शोधणे आहे. आपण कोण आहोत, इतरांचा शोध घेण्याऐवजी स्वतःचा शोध घेणे म्हणजे प्रेम आहे. खरं तर तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा तुम्ही डुंबत असता. डुंबणे जेव्हा घडते तेव्हा तुम्ही कोरडे राहू शकणार नाही. प्रेमात असाल तर जगण्याची उमेद उंचावत असते. त्यामुळे प्रेमाची भीती असण्याची शक्यता नाही. भीती जेथे असते तेथे प्रेम नाही. प्रेमात फसवणुकीची शक्यता अजिबात नाही. फसवले गेला असाल तर तेथे प्रेम नव्हते हे लक्षात घ्यायला हवे. जेथे फसवणूक नाही, तेथे भीती असत नाही. भीती हा शब्द एका अर्थाने प्रेम भावनेच्या विरोधातील आहे. प्रेमात माणसं निडर बनतात. त्यामुळे भीतीची वाट तुमच्या मनात असेल तर तुम्ही खऱ्या प्रेमाच्या वाटेवर नाही आहात असे समजावे. प्रेम आणि भीती सोबत असण्याची शक्यता अजिबात नाही.


खऱ्या  प्रेमात अहंकार वितळतो आणि खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख उलगडते. आपली प्रतिष्ठा, श्रीमंती, जात-धर्मभेद सारे काही विसरले जाते. आपल्याला ज्या गोष्टींचा अहंकार असतो, मग तो सौंदर्याचा, श्रीमंतीचा, सत्तेचा, ज्ञानाचा अगदी कसलाही असला तरी तो गळून पडतो. मुळात अहंकारमुक्त भावना म्हणजे प्रेम असते. आपले जीवन जेव्हा अहंकारमुक्त असते तेव्हाच आपल्याला सत्याच्या शोधाच्या दिशेने प्रवास घडत असतो.


ओशो पुढे म्हणाले की, प्रेमाची भावना म्हणजे मालकी हक्क नाही. आज माणसं जेव्हा एकमेकावर प्रेम करतात तेव्हा एकमेकाचे मालक असल्याच्या भावनेचे दर्शन होते. आपण मालक आहोत अशी भावना निर्माण झाली, की कोणी तरी नोकर बनते. कोणी तर निम्न आणि कोणी तरी श्रेष्ठ ही भावना दृढ बनत जाते. अशावेळी प्रेमाचे नाते फुलण्याची शक्यता नाही. ते फुलण्यासाठी अंहकारमुक्तीची गरज असते. तुमच्या नात्यात तो समानतेचा विचार नसेल तर प्रेमाची वाट निर्माण होऊ शकणार नाही. प्रेमाच्या नात्यात जर कोणाला बांधून ठेवणे घडत असेल तर ते प्रेम नाही; ते कैद करणे आहे. प्रेम म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणे, त्याला त्याच्या स्वभावानुसार जगू देणे आहे. माणसं प्रेम करतात तेव्हा स्वांतत्र्य गमावणे घडते. स्वातंत्र्य हरवल्याला जे उरते ते प्रेम नाही.


लग्न झाल्यावर माणसं प्रेम करतात असं म्हणतात पण त्यात नाते आहे आणि या नात्यात बंधन आहे. पत्नीला पतीचे मनासारखे ऐकावे लागते किंवा पतीला पत्नाचे ऐकावे लागते. ऐकणे यात बंधन असते. प्रेम असलेही पण बंधन आले की, खऱ्या प्रेमाचा भाव संपतो आणि फक्त नात्याचा भाव उरतो. बंधनाचा भाव हा मालकीचाच असतो. त्यामुळे जेथे मालकी दिसते तेथे स्वातंत्र्याचा विचार हरवलेला असतो. प्रेम जेव्हा असते तेव्हा दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाहीस, तर त्याला जसा आहे तसा स्वीकारतोस हा भाव महत्त्वाचा आहे. प्रेम असलेली व्यक्ती ही गुणांचा भाव असते पण माणूस म्हटले की, शंभर टक्के गुणांचा पुतळा असत नाही तर गुण-अवगुणांचा सरमिसळ असते. त्यामुळे खरोखर प्रेम असेल तर आहे तसे स्वीकारता येणे महत्त्वाचे असते. भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपनी यांच्यात किती तरी अंतर होते पण अंतर होते ते भौतिक. मनाच्या  प्रेमात कोणतेच अंतर नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रेमात कोणताच अडथळा आला नाही. प्रेमाचा भाव सत्य असेल तर कोणतेच अंतर पडत नाही. प्रेमात स्वीकृतीचा भाव शंभर टक्के असतो. आपण ज्याला स्वीकारले आहे, त्याचे गुण-दोष काढणे अथवा उणीवांचा शोध घेतला जात नाही मात्र हे जेथे घडते तेथे मालकत्वाचा भाव असतो. मालकत्वाच्या विचारांचा पराभव, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि समर्पणाचा भाव म्हणजे प्रेम असते.


गुण अवगुणांसह स्वीकार म्हणजे खरी करुणा. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. प्रेमात दुसऱ्याला बंधनात ठेवण्याचा भाव नसतो. खरी भावना म्हणजे स्वीकार असते. जशी व्यक्ती आहे तशीच स्वीकारणे घडत जाते. प्रेमात अहंकाराचा नाश झालेला असतो. जेथे तुमच्या मनात अहंकाराचा वारा स्पर्श करतो तेव्हा तो भाव म्हणत असतो की, “हा माझा आहे.” पण प्रेमाचा भाव असेल तर तो भाव म्हणतो, “हा स्वतःचा आहे आणि मी त्याला मुक्तपणे स्वीकारले आहे.”असं स्वीकारता येणे कितीतरी महत्त्वाचे असते. आज हा भाव हरवलेला दिसतो आहे. म्हणजे प्रेमाच्या वाटेने जाणारी माणसं निराश होत आहेत. आत्महत्येसारख्या पाऊलवाटेचा प्रवास करत आहेत. ज्याला मालक होण्याची इच्छा आहे त्याला प्रेमाच्या प्रवासात सुख, आनंद कधीच मिळणार नाही हे वास्तव आहे. प्रेम म्हणजे देत राहणे... त्या देण्यात पैसा, संपत्ती, धन, दौलत नाही तर फक्त समर्पण आहे.


प्रेम म्हणजे स्वतःला ओळखणे आहे. जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्याला स्वतःची खरी ओळख होण्यास सुरूवात झालेली असते. माणूस प्रेमात असेल तर अधिक संवेदनशील असतो. अधिक करुणामय होत असतो. ओशो म्हणतात:  “प्रेम हे सर्वात मोठे ध्यान आहे. प्रेमात असलेल्या माणसाला पुन्हा स्वतंत्रपणे ध्यान करण्याची गरज उरत नाही. जेथे प्रेम आहे तेथे एकाग्रतेची वाट असते. दुसरे काहीच स्मरत नाही. प्रेम म्हणजे एकाग्रता आहे. ही एकाग्रता लाभली की आपोआप ध्यानाचा प्रवास घडत जातो. प्रेमात जेव्हा अहंकार असत नाही तेव्हा साक्षीभाव आणि स्वीकृतीचा भाव असतो. प्रेम म्हणजे दुसऱ्याला बांधून ठेवणे नव्हे तर त्याला मुक्त करणे. प्रेमात आपण हरवत नाही तर स्वतःला अधिक खोलवर शोधत जात असतो. आयुष्यातील एका परमोच्च आनंदाचा तो भाव असतो. प्रेम हे जीवनाचे सर्वात मोठे ध्यान आहे कारण त्यात अहंकार नाही, फक्त स्वीकार आहे. हा विचार वर्तमानातही अधिक महत्त्वाचा आहे. नातेसंबंधांमध्ये मालकी हक्क, अपेक्षा आणि नियंत्रण यामुळे तणाव निर्माण होतो आहे. प्रेमाला जर स्वातंत्र्य दिले तर नातेसंबंध अधिक सुंदर आणि टिकाऊ होतात. त्यामुळे केव्हा तरी खऱ्या प्रेमाचा अर्थ शोधत जाऊन आपण प्रेमाची वाट चालू लागलो तर जीवन आनंदाने फुलून आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माणसांची ओढ नाही, संवादाची भूक नाही, प्रतीक्षा नाही तर फक्त आकर्षण असेल, तर आपली वाट चुकलेली आहे असे समजावे. शेवटी आपण कोणत्या वाटेने जायचे आहे हे स्वतःच ठरवायला हवे.


- संदीप वाकचौरे

साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६


Selling fast
शोध शिक्षणाचा | Shodh Shikshanacha
₹250.00₹187.50

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page