शाळेतील पहिलं पाऊल : नवीन शैक्षणिक धोरण आणि मुलांचा शाळा प्रवेशोत्सव!
- 4 days ago
- 2 min read
“सर, हाऊ सहा वर्षाना होयी जायेल शे, शायमा टाकनं होतं.”
गुढीपाडवा, पट वाढवा गावातील चौकात राबवलेली मोहीम यशस्वी झाली होती. समोर असलेल्या पालकांकडून जन्म दाखला, आधारकार्ड पाहून घेत नोंदणी करून घेतली. त्यांना शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच त्यांनी थांबविले अन् ते बोलते झाले.
“अहो, आम्ही आपल्या शाळेचे सर्व उपक्रम पाहत असतो, माझी निवड योग्य आहे.”
हे ऐकून माझं मन भरून आलं. आम्ही नंतर आमच्या चर्चेत हा विषय घेतला तेव्हा सर्व सोबतींना समाधान वाटलं.
नवीन वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव जवळ आल्याने आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गावात दाखल पात्र मुलांसाठी शोध मोहीम राबवत होतो तेव्हा एका घरातून आवाज आला, “गुरू, माझ्या मुलीला शाळेत घ्याल का?” मुलीची आई डोक्यावर पदर सावरत बोलत होती.
मुलीचं वय बसेल असे वाटत होतं पण तिच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. त्यांना ते जमा करण्यास सांगितले तर तिची नोंद नव्हती. आधीच बरेच विद्यार्थी जन्म नोंद नसताना त्यांना दाखल करून घेतले होते पुन्हा हे नवं आव्हान समोर आले होते. आईचे समाधान करत पुढे निघालो तेव्हा त्या आईचे शब्द आणि चेहऱ्यावर आलेले भाव आनंद देऊन गेले. यात स्वप्न होतं, आशा होती, भविष्याचा उजेडही होता.
“मन्ही बहीन शायमा जावाले लागी जायी.”
वय वर्षे सहा पूर्ण झालेल्या बालकांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी शाळेची धडपड, मुलानं आत्मविश्वासपूर्वक शाळेत पहिलं पाऊल ठेवावं यासाठी आधीच तोंडओळख करत असलेले शिक्षक, पालकांनी घेतलेला पुढाकार, शाळा सातत्याने करत असलेलं प्रबोधन, शासकीय पातळीवर असलेले प्रयत्न, शिक्षणप्रेमी यांनी घेतलेला पुढाकार हे सारे मुलाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज उचललेले छोटेसे पाऊल आयुष्याची समृद्ध वाट निर्माण करणारं आहे.
शिक्षण हा मुलाचा मूलभूत हक्क आहे.त्याचा सर्वांगीण विकास होतो तो शाळेत म्हणूनच मुलांचं शाळेतील पहिलं पाऊल हे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे असते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि बाल मानसशास्त्रीयदृष्ट्या मुलांची समज, विचार, भाषा कौशल्ये, संवाद साधणे, शिकण्याची तयारी ही या वयातच परिपक्व झालेली असते. सहा वर्षे पूर्ण हा निर्णय बालकाचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासाचा विचार करूनच घेतलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये बालकेंद्रित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पहिलीत प्रवेश देणे हे याच धोरणाशी संबंधित आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभरात शिक्षण विभाग राबवित आहे. यात चिमुकल्या मुलांचे आनंदाने स्वागत करणे, शाळेची सजावट, रांगोळी, फुलांचे तोरण, बैलगाडी, ट्रॅक्टरवर मिरवणूक, ढोल ताशे, लेझीम, सेल्फी पाँइंट, नवीन पुस्तके, नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य, गोडधोड जेवण असे एक ना अनेक शैक्षणिक प्रवेशोत्सव सोहळा उपक्रम आपल्या सोयीने प्रत्येक शाळा राबवित असते.
हा फक्त नवीन मुलांचा प्रवेशोत्सव नसतो तर आधी दाखल झालेली मुले पुढील वर्गात जात असतात त्यांचाही हा आनंदसोहळा असतो. नव्याने शाळेत येणारा विद्यार्थी हा घरातील, समाजातील अनेक अनुभव सोबतीला घेऊन येणार असल्यानं त्याचं शाळेतील पहिलं पाऊल अनुभवांनी भरलेलं असणार आहे. त्याची शिक्षणाशी सांगड घालणे हे शिक्षक म्हणून आपले काम.
मुलांचे शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नसते तर त्यांच्या उज्ज्वल भविष्याची ती आशादायी भक्कम पायाभरणी असते. त्यासाठी शासनासोबत समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून मुलांच्या शिकण्याच्या आनंदासाठी, सर्वांगीण विकासासाठी मुलांसोबत पहिलं पाऊल मोठ्या आत्मविश्वासाने टाकावं म्हणजे त्यांच्या स्वप्नांना हक्काचे पंख भेटतील आणि त्यांच्या भविष्याची दिशा ठरेल. म्हणजे मूल सहजच म्हणेल, ‘मज आवडते मनापासूनी शाळा!’
- भरत पाटील
+91 9665911657
साप्ताहिक चपराक १५ ते २१ जून २०२६
.jpg)



Comments