top of page

अपमान पचवल्याशिवाय मोठेपण नाही!

  • Jun 22
  • 3 min read

समाजात आपण लौकिक अर्थाने मोठे झालेली, यशस्वी झालेली अनेक माणसे पाहतो. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे वैभव आणि समाजात असणारा त्यांचा  मान-सन्मान पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटतो परंतु या यशस्वी माणसांचे जीवनचरित्र जर आपण जवळून पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, अगदी तळापासून यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जाण्यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागलेला असतो. मेहनत, जिद्द आणि चिकाटी तर या जगात प्रत्येक जण आपापल्या पातळीवर करतच असतो; परंतु यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत आणि ध्येयापर्यंत तेच लोक पोहोचू शकतात, ज्यांच्यामध्ये सहन करण्याची कमालीची क्षमता असते. अपमान पचविण्याची अफाट शक्ती असते.


मानवी स्वभावाचे आणि संघर्षाचे अचूक वर्णन जगद्गुरू संत तुकाराम महाराज करतात.


“जया अंगी मोठेपण।

 तया यातना कठीण॥”


अर्थात ज्याला आयुष्यात मोठे व्हायचे असते त्याला तितक्याच कठीण यातना, वेदना, विखारी टीका आणि संकटांचे डोंगर पार करावे लागतात.


आपल्या महाराष्ट्राची संतपरंपरा आणि इतिहास ही केवळ विचारांची नाही तर ती सहनशीलता आणि धैर्याची सर्वात मोठी शाळा आहे. जर आपण इतिहासात डोकावून पाहिले तर एक मोठे सत्य समोर येते. जेव्हा जेव्हा संतांनी किंवा महापुरुषांनी समाजाच्या कल्याणासाठी पाऊल उचलले तेव्हा त्यांना समाजाने प्रचंड छळले.


संत एकनाथ महाराजांचे उदाहरण घ्या; पैठणच्या गोदावरी नदीवर स्नानाला जात असताना एका इसमाने  त्यांच्या अंगावर तब्बल 108 वेळा थुंकण्याचा नीचपणा केला परंतु एकनाथ महाराजांनी राग न धरता, प्रत्येक वेळी शांतपणे पुन्हा नदीत जाऊन स्नान केले. त्यांच्या या अथांग सहनशीलतेपुढे शेवटी तो थुंकणारा माणूस थकला. त्याचे नावही आज कोणाला माहीत नाही; पण आपल्या शांत आणि सहनशील स्वभावामुळे संत एकनाथ महाराज इतिहासात अमर झाले.


ज्ञानोबा माउलींचा विचार करा; ज्या वयात खेळायचे-बागडायचे, त्या वयात या समाजाने त्यांच्यावर आणि त्यांच्या भावंडांवर अमानुष बहिष्कार टाकला. त्यांना संन्याशाची पोरे म्हणून हिणवले.  माउलींनी तो सर्व अपमान शांतपणे पचवला. त्यांच्या याच सहनशीलतेतून ज्ञानेश्वरीसारखा अजरामर ग्रंथ जन्माला आला. हाच इतिहास आपल्याला आधुनिक काळात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने पाहायला मिळतो. जेव्हा त्या मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडत तेव्हा सनातनी आणि विकृत प्रवृत्तीची माणसे त्यांच्यावर शेण, दगड-धोंडे फेकत, अर्वाच्य भाषेत त्यांचा अपमान करत. सावित्रीबाईंनी तो अपमान, ते दगड-धोंडे अंगावर झेलले. आपले शिक्षणाचे पवित्र कार्य सोडले नाही. आज इतिहासात डोकावले तर त्यांच्यावर शेण आणि दगड फेकणारे ते निंदक काळाच्या पडद्याआड गेले, त्यांचा मागमूसही उरला नाही परंतु त्या अपमानाला सहन करून क्रांतिची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले आज कोट्यवधी मुलींच्या आयुष्यात प्रकाशाचे माध्यम बनून इतिहासाच्या पानात अजरामर झाल्या आहेत. हिऱ्याला जितके पैलू पाडले जातात, तितकाच तो अधिक चमकतो. सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीच्या भट्टीत तावून-सुलाखून निघावेच लागते; माणसाच्या मोठेपणाचेही अगदी तसेच आहे.


आपण जर आपल्या सभोवतालच्या समाजाचा विचार केला तर समाज नेहमी माणसाला हिणवण्यात, त्याचे पाय खेचण्यात धन्यता मानत असतो. म्हणूनच की काय, खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर पोहोचलेली माणसे फार कमी असतात. जो माणूस हा अपमान पचवू शकत नाही, सभोवतालच्या लोकांच्या छोट्या-छोट्या आरोपांनी आणि टोमण्यांनी घायाळ होतो आणि हे माझ्याच बाबतीत का घडते? असे रडत बसून आयुष्य जगतो तो माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. तो सदैव सर्वसामान्यच राहतो. हाच एक मुख्य फरक सर्वसामान्य माणूस आणि यशस्वी माणूस यांच्यामध्ये असतो. निसर्गाचा एक नियम आहे, समाज नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगड मारतो. वांझोट्या, वाळलेल्या झाडावर कोणी कधी दगड फेकत नाही. म्हणजेच जर तुमच्यावर टीका होत असेल तर समजून जा की तुमच्यात काही तरी कर्तृत्व आहे, तुम्ही काहीतरी ठोस करू पाहत आहात. असे समजून आपल्या मार्गावर चालत राहावे. तुम्ही जेव्हा यशाची शिडी चढू लागाल, त्यावेळी तुमच्यावर विविध आरोप होणार, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला नावे ठेवणार, मानसिकदृष्ट्या खचवण्याचा आणि नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करणार. हे सर्व तुम्ही मनात न घेता कसे पचवता, किती संयम दाखवता आणि पुढे जात राहता, यावरच तुमच्या यशाची रेषा अवलंबून राहते. जगाच्या इतिहासात असा एकही महापुरुष किंवा जननेता झाला नाही, ज्याला तीव्र विरोध झाला नाही किंवा ज्याने अपमान सहन केला नाही. अनेकदा तर समाजाने त्यांना सर्वस्व सोडून देण्याच्या उंबरठ्यावर आणून उभे केले होते.


राजकारणी लोकांवर किती असुरी अघोरी टीका होते. जे ती संयमाने सहन करतात तेच येथे टिकतात. जे अपमानाचे घोट प्राशन करतात तेच पुढे जाताना दिसतात. जे टीकेने आणि पराभवाने विचलित होतात त्यांचे राजकारण संपते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, जगाचा इतिहास हा ज्यांचा लिहिला जातो जे अपमानाचे घोट, कमालीची सहनशीलता आणि विजिगीषु वृत्ती यामुळेच सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. निंदक आणि त्रास देणारे नेहमी काळाच्या ओघात नष्ट होतात पण सहनशीलता बाळगणारे इतिहास घडवतात. अंतःकरणात ठसलेल्या, कोरलेल्या वेदनेशिवाय आणि अपमानाच्या जखमांशिवाय यशाची उंच शिडी कधीच चढता येत नाही. म्हणूनच आयुष्यात पुढे जाताना येणारी टीका, टोमणे आणि अपमानास्पद परिस्थितीला घाबरून न जाता, धैर्याने सामोरे जा कारण आज जे तुम्हाला मागे ओढत आहेत, उद्या तुमच्या यशाचे शिखर पाहून तेच तुमच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवतील. चला तर मग, टीका, टिप्पणी आणि निंदानालस्तीला यशाचे इंधन तर अपमानालाच आपल्या यशाचा मार्ग बनवूया...


- अशोक शेटे, संगमनेर

9921169286



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page