top of page

सारथी

  • 2 days ago
  • 4 min read

कप्तान, संचालक, वाहनचालक (ड्रायव्हर) वगैरे खरं म्हणजे समान अर्थाचे शब्द का समजू नयेत? कदाचित शब्द वेगळे असतील पण त्यांचे अर्थ एकच असतात. ‌‘सारथ्य करतो तो सारथी.‌’ शब्दांचे शोध नक्की कुणी आणि कधी लावले माहिती नाही पण त्यांना दाद दिली पाहिजे. किती विचार करून शब्दांची निर्मिती केली असेल?


जिथं टीम वर्क असतं तिथंच कॅप्टन असतो. सुसूत्रता आणणे, एखाद्या व्यक्तिमध्ये ज्या विषयात नैपुण्य आहे त्यात त्याला काम करायला भाग पाडणे, त्यातील क्रयशक्तिचा पुरेपूर वापर करून घेणे आणि इप्सित साध्य करणे, अशा प्रकारची जबाबदारी ज्या व्यक्तिवर असते ती प्रमुख म्हणजेच कप्तान असते. काही ठिकाणी टीम वर्क नसतं तरीही इतरांची जबाबदारी त्या व्यक्तिवर असते. उदा. ड्रायव्हर. मग तो रिक्षा, बस, रेल्वे, विमानाचा असो अथवा एखाद्या कंपनीचा, मशिनरीचा, एखाद्या प्रोजेक्टचा असो. बऱ्याचशा खेळात कॅप्टन असतोच. इतरांच्या (बघ्यांच्या) दृष्टिकोनातून त्याला किती महत्त्व असतं हा भाग वेगळा पण वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याचं महत्त्व अधोरेखित असतंच. साधं बघा ना, क्रिकेट खेळताना सिक्सर मारली, कॅच घेतला, कुणी आऊट झालं तर किती नावं ठेवली जातात? ‌‘एवढं खेळायला कळत नाही?‌’, वगैरे ताशेरे मारले जातात. कृती करताना किंवा निर्णय घेताना वाटतं तितकं सोपं काहीच नसतं आणि दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. कोणतंही वाहन चालवत असताना समोरील वस्तुस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, अडचणी या सर्वांचा विचार करून ड्रायव्हर वाहन ताब्यात ठेवत असतो. काही सेकंदांमध्ये त्याला योग्य त्या वेळी, योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयावर वाहनात असलेल्या सर्व प्रवाशांच्या जीवाची काळजी आणि जबाबदारी त्याच्यावर असते. व्यसन, प्रेमभंग, वैयक्तिक अडचणी, बिघडलेले मानसिक संतुलन, स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी, कौटुंबिक अडचणी, सामाजिक अथवा आर्थिक अडचणी, नैसर्गिक आपत्ती वगैरे बऱ्याच गोष्टींचा परिणाम हा निर्णय घेणाऱ्यावर होत असतो आणि म्हणूनच शारीरिक आणि मानसिक फिटनेस असं आपण ज्याला म्हणतो तो प्रत्येक व्यक्तिपाशी कोणत्याही कामासाठी असणं अत्यंत आवश्यक असतं.


हे झालं सामाजिक बाबतीत. कुटुंब हे नेहमी चार भिंतीच्या आत असतं. प्रत्येक कुटुंबात कुणीतरी कुटुंबप्रमुख असतो. कुटुंबप्रमुख हाही सारथीच. जुन्या काळी अर्थार्जन फक्त पुरुष करायचे, कुटुंबप्रमुख पुरुष असायचे पण आता काळ बदलला. स्त्री शिकली, समृद्ध झाली, पुरुषाच्या बरोबरीने कमावू लागली. स्त्री-पुरुष हा भेद, स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून आदर / मान देण्याची मानसिकता जिथं असते तिथं तरी नष्ट होत चालला आहे. प्रमाण कितीही कमी असलं तरी ही वस्तुस्थिती आहे हे मान्य करावंच लागेल. एकत्र कुटुंब असेल तर घरातील इतर सदस्यांना, कुटुंब प्रमुखांनी घेतलेले निर्णय प्रत्येकवेळी योग्य वाटतीलच असं नसतं. प्रेम, आपुलकी, वात्सल्य (बॉण्डिंग) हे सगळ्याच नात्यात महत्त्वाचं असतं. जिथं ही त्रिसूत्री टिकून असते तिथं कुटुंब कितीही मोठं असलं तरी ते एकसंघ असतं, राहतं, टिकतं. इतरांच्या दृष्टीने हेवा वाटावा इतकं समाजिक मान मिळवून राहतं. कुटुंब प्रमुख जेव्हा इतरांच्या बाबतीत निर्णय घेत असतात तेव्हा भविष्याचा विचार करून, चांगलंच घडावं या उद्देशाने घेत असतात. त्या क्षणी ते त्या व्यक्तिला पटले नाहीत, आवडले नाहीत तरी संयम दाखवून ते स्वीकारले जातात. कालांनतराने ते निर्णय किती अचूक आणि योग्य होते याची जशी जाणीव होईल तशी कुटुंब प्रमुखांवरील भक्ती, माया, आदर, प्रेम वाढत जाताना दिसतं. जिथं हा संयम कमी पडतो तिथं मतभेद होऊन मिळकतीच्या आणि काही वेळा कुटुंबातील व्यक्तिंच्या पण वाटण्या केल्या जातात आणि काही विद्ध झालेले जीव, जुनं किती छान होतं असं म्हणत पूर्वायुष्याच्या आठवणीवर समाधान मानत राहतात. ज्यांचा कल स्वतंत्र, छोट्या कुटुंबाकडे झुकणारा असतो ते त्याचा लाभ उठवून आपापले स्वतंत्र आयुष्य जगायला मोकळे होऊन जातात.


ज्या घरामध्ये पती-पत्नी दोघेही संवेदनशील असतात, एकमेकांचं महत्त्व जाणून असतात तिथं सगळे महत्त्वाचे निर्णय हे एकमेकांशी चर्चा करून, विचारपूर्वक, संगनमतानेच घेतले जातात. त्यांच्यात नेहमी उत्तम संवाद होत असतो. ही वेळ येण्यासाठी त्या दोघांनी एकमेकांना आधी जोखलेले असते. अनुभव घेतलेले असतात. काही काळ निघून गेलेला असतो ज्या काळात घडलेल्या घटना, प्रसंग वगैरेतून काही बोध घेऊन झालेला असतो. ती एक प्रोसेस असते. एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो. जेव्हा विश्वास डळमळीत होत जातो तसं निर्णय एककल्ली पद्धतीने घेतले जाऊ शकतात. सहनशक्ती संपत आली की वाद उद्भवू शकतात. वाद वाढले की काही ठिकाणी भांडणे विकोपाला जाऊ शकतात. त्यातून घटस्फोट होऊ शकतात. काही जण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही करत असतात. कुटुंब टिकवण्यासाठी, “तू तुझे निर्णय घे, मी माझे घेत जाईन”, असं फर्मान काढलं जातं. पती-पत्नी म्हणून जगताना आयुष्यातील आनंद कधीच निघून गेलेला असतो पण केवळ तडजोड म्हणून एका घरात एकत्र राहिलं जातं. जगाच्या दृष्टिकोनातून बाह्यत: एक समाधानी कुटुंब असा पोकळ शिक्का मिळवून त्या वृथा आनंदात आपापला अहंकार सांभाळत, रेल्वेच्या ट्रॅकसारखे समांतर आयुष्य जगणं सुरु असतं.


अपेक्षाविरहित नातं पती-पत्नीमध्ये कधीच नसतं आणि ते असूही नये. कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट यामध्ये या विषयावर बरीच चर्चा होत आली आहे, आणखीही होत राहील. अवाजवी अपेक्षा नसाव्यात हे खरं आहे पण वाजवी आणि अवाजवी अपेक्षा यामध्ये फार पुसट रेषा असतात. दोघांमधे अंतर फार कमी असतं. म्हटलं तर सापेक्ष. त्या समजून घेण्याची प्रगल्भता दोघांमधे असणं आवश्यक असतं. एकमेकांविषयी असणारा आदर, प्रेम, काळजी, भावी आयुष्यात येणारे कटू प्रसंग /तब्येतीच्या अडचणी यांचा विचार, एकमेकांना आवश्यक तितकं जपणं, कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव, असे असंख्य विचार एकमेकांच्या मनात असतात. जिथं वैचारिक समानता नसते तिथं गैरसमजाला सुरुवात होऊ शकते. मग एका पार्टनरने प्रेमाने सुचवलेले उपाय दुसऱ्या पार्टनरला जाचक वाटू शकतात. संयम असेल तर त्यातून नातं तावून सुलाखून टिकून राहतं आणि नसेल तर नात्यातील गोडवा कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. आपलं आणि आपल्या जोडीदाराचं आयुष्य छान, सुखी आणि आनंदाचं जावं असं सगळ्यांनाच वाटत असतं पण त्यासाठी प्रयत्न दोघांनीही एकाच वेळी करायचे असतात. म्हणजे प्रवास सुरु केल्यानंतर शेवटचा थांबा आधीच माहीत असतो. तरीही तिथं पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी मानसिक ताकत, मनाची परिपक्वता, संयम, एकमेकांना कराव्या लागणाऱ्या सूचना, त्यांचं पालन, विश्वास, समजूतदारपणा, काय घ्यायचं-किती घ्यायचं, का घ्यायचं-कसं घ्यायचं, किती टाकायचं, किती टाळायचं-कसं टाळायचं, कसं बोलायचं आणि कुठं शांत राहायचं, अशी सगळी तारेवरची कसरत सारथ्याला करावी लागते. काही वर्षानंतर फळं मिळायला सुरवात होते. इतरांना वाटतं की कित्ती छान! पण जे त्यातून गेलेले असतात त्यांनाच माहिती असतं की इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आधी बरंच काही करावं लागतं, कधी एकट्याला, कधी दोघांना तर कधी संपूर्ण कुटुंबाला...!


- डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, बावधन

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page