खडूने रेखाटलेलं आयुष्य
- Apr 27
- 2 min read
शाळेचे दिवस म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर, निरागस आणि गोड आठवणींनी भरलेला काळ. त्या दिवसात फक्त अभ्यासाची पाने नव्हती तर प्रत्येक क्षणात जीवनाची नवी शिकवण दडलेली होती. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, शालेय सहली, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या अनुभवांनी आयुष्याला रंगतदार छटा दिल्या. शाळा म्हणजे केवळ पुस्तकांचं ओझं नव्हतं तर अनुभवांची खणखणीत शिदोरी होती.
त्या आठवणींमध्ये एक क्षण असा आहे, जो माझ्या मनात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. फळ्यावर सुविचार लिहिण्याची संधी. माझं स्वच्छ, सरळ आणि सुंदर हस्ताक्षर पाहून शिक्षकांनी मला ती जबाबदारी दिली होती. रोज सकाळी शाळा सुरू होण्याआधी मी फळ्यासमोर उभा राहायचो. खडूचा पहिला स्पर्श जसा फळ्यावर उमटायचा, तसं मनात एक वेगळंच विश्व फुलायचं.
‘विद्या हीच खरी संपत्ती आहे, कष्टाशिवाय फळ नाही, सत्कर्म हेच जीवनाचं सौंदर्य आहे’ असे सुविचार जेव्हा माझ्या अक्षरांतून फळ्यावर उमटायचे तेव्हा त्या पांढऱ्या ओळी मला एखाद्या रांगोळीसारख्या भासत. प्रत्येक अक्षराला तोलामोलाची सुंदरता द्यायची इच्छा असायची. फळा सजला की मनही सजून जायचं.
सकाळी मित्रमंडळी वर्गात येताच त्यांच्या नजरा फळ्याकडे वळायच्या. कधी एखादा मित्र किंवा शिक्षक माझ्याकडे बघून म्हणत, “वा! किती सुंदर लिहिलंयस!” त्या क्षणी मनात जी गोड भावना निर्माण व्हायची, ती शब्दांत सांगणं कठीण आहे. ही कौतुकाची थाप मला रोज नव्यानं उभारी द्यायची.
कधी शिक्षक एखादा प्रेरणादायी विचार सांगायचे तर कधी मी पुस्तकात वाचलेलं सुंदर वाक्य निवडून फळ्यावर लिहायचो. माझ्यासाठी ते फक्त अक्षर उमटवणं नव्हतं तर प्रत्येक शब्द मनापासून जगणं होतं. हळूहळू उमगायला लागलं की सुविचार म्हणजे केवळ शब्दांची माळ नाही तर जीवनाचे खरे धडे आहेत.
त्या छोट्याशा जबाबदारीने मला खूप काही दिलं. शिस्त, जबाबदारी, सौंदर्यदृष्टी, विचारांना आकार देण्याची ताकद. खडूचा गंध, फळ्यावर उमटणाऱ्या रेषा आणि त्या अक्षरांचा अभिमान हे सगळं आजही मनात जिवंत आहे. शाळेतील त्या सुविचारांनी मला अक्षरकलेचा आनंद तर दिलाच पण जीवन जगण्याचा खरा अर्थही शिकवला.
शाळेच्या निरागस दिवसांतलं ते सुवर्णपर्ण आजही मनात उलगडतं. काळाच्या प्रवाहात ती रम्य सकाळ दूर गेली असली तरी त्या आठवणींचा सुगंध अजूनही हृदयात दरवळतो. फळ्यावरची अक्षरे जरी पुसली गेली असली तरी त्यातील मौल्यवान विचारांची बीजे मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजली आहेत. जीवनाच्या प्रत्येक नव्या वाटेवर पाऊल ठेवताना, तीच आठवण मला एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते. खडूचा ठसा क्षणिक होता पण त्या विचारांचा ठसा आयुष्यभर टिकून राहिला.
एखाद्या गोष्टीला सुंदरतेने, निष्ठेने आणि प्रेमाने केलं तर ती छोटीशी कृती देखील आयुष्याला अर्थ देऊ शकते, हे मला त्या सुविचारांनी शिकवलं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मनापासून जाणवतं - त्या छोट्याशा संधीने फक्त शाळेचा फळा सजवला नाही तर माझं आयुष्य घडवलं.
- मंगेश दौंडकर
9890619354
साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६
.jpg)



Comments