top of page

शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण

  • Mar 8
  • 2 min read

पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. करपलेल्या शेतात उभा असलेला नामदेव आशेने आकाशाकडे डोळे लावून होता. कोरड्याठाक जमिनीला पडलेल्या भेगा पाहताना त्याला स्वतःच्या आयुष्यालाच तडे गेल्यासारखे वाटत होते. नामदेव हा दोन एकर जमिनीवर आपला उदरनिर्वाह चालवणारा एक साधा शेतकरी. गेल्या काही वर्षांपासून कर्ज एखाद्या सावलीसारखं त्याच्या पाठीशी उभं होतं. खते, बियाणे, कीटकनाशके अशा प्रत्येक गोष्टीसाठी त्याने कर्ज काढले होते पण दुर्दैवाने ना निसर्गाने साथ दिली, ना बाजाराने!


काही महिन्यांपूर्वी गावात नव्या कृषी कायद्यांची जोरदार चर्चा सुरू होती.  सुरुवातीला नामदेवलाही वाटले की आता मध्यस्थ कमी होतील आणि आपल्या घामाला चांगला दाम मिळेल! पण हळूहळू वास्तवाची जाणीव होऊ लागली. पूर्वी बाजार समितीत किमान


हमीभावाचा थोडा फार आधार तरी होता. आता मात्र व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करू लागले आणि दरही त्यांच्याच मर्जीने ठरू लागले. एकदा नामदेवने वाहतुकीचा खर्च वाचेल या आशेने आपला कांदा थेट एका व्यापाऱ्याला विकायचे ठरवले; पण त्या व्यापाऱ्याने जो दर सांगितला तो हमीभावापेक्षाही खूपच कमी होता. “नसेल परवडत तर दुसऱ्याला विक,” असे उर्मटपणे सांगून व्यापारी निघून जाऊ लागला. साठवलेला माल खराब होण्याच्या भीतीने नामदेवला निमूटपणे तोच कवडीमोल दर मान्य करावा लागला.


पूर्वी सहकारी संस्थांकडून मिळणारे थोडे फार संरक्षणही आता जुन्या, कालबाह्य नियमांमुळे कुचकामी ठरत होते. शेतीचे प्रश्न इतके गुंतागुंतीचे झाले होते की शेतीच सोडून द्यावी का? असा हतबल विचार त्याच्या मनात येऊ लागला. नामदेवच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. लागवडीचा खर्च दिवसागणिक वाढत होता पण उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नव्हती. बाजारात दर घसरले तरी नुकसान शेतकऱ्याचे आणि दर वाढले तरी नफा व्यापाऱ्यांच्या खिशात! एका रात्री कंदिलाच्या उजेडात बसून हिशोब करताना नामदेव सुन्न झाला. कर्जाचा आकडा आवाक्याबाहेर गेला होता.


“शेती माझी, जमीन माझी, राबराब राबतोही मीच... मग माझ्या मालाचा दर ठरवणारा तो व्यापारी कोण?” हा प्रश्न त्याच्या मेंदूला पोखरत होता.‌’एके दिवशी गावात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. हक्काच्या हमीभावासाठी आंदोलनात उतरण्याची चर्चा रंगली. नामदेव एका कोपऱ्यात शांतपणे सारे ऐकत होता. व्यवस्थेबद्दल त्याच्या


मनात प्रचंड राग खदखदत होता पण परिस्थितीची भीती त्याला मागे खेचत होती. मुलांच्या शाळेची फी, आजारी आईची औषधे आणि सावकाराचा रोजचा तगादा... या चक्रव्युहात अडकलेला नामदेव उघडपणे बंड करायला धजावत नव्हता. त्याच वेळी मुलाच्या शाळेतून फी भरण्याची नोटीस आली. घरात खायला पुरेसे धान्य नव्हते. अखेर पत्नीने गळ्यातील जुने दागिने गहाण ठेवण्याचा सल्ला दिला. ते ऐकून नामदेवच्या काळजात चर्रर्र झाले. रक्ताचे पाणी करूनही आपण कुटुंबाचे दोन वेळचे पोट भरू शकत नाही, ही जाणीव त्याला आतून खात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी तो पुन्हा शेतात पोहोचला. कोरड्या मातीवर हात ठेवत तो स्वतःशीच पुटपुटला, “मी हार मानणार नाही.” पण त्याच्या आवाजात एक खोल थकवा होता. निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणे एकवेळ सोपे पण बाजारातील अन्यायकारक व्यवस्थेशी लढणे महाकठीण आहे, हे त्याला कळून चुकले होते. या विषम लढाईत शेतकरी केवळ कर्जबाजारी होत होता. तरीही, कधीतरी न्याय उगवेल या भाबड्या आशेवर तो दरवर्षी मातीत बी पेरत होता. पण आता हळूहळू बदल दिसू लागला होता. शेतकऱ्याचा प्रश्न हा केवळ त्याचा एकट्याचा नसून तो संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे, ही जाणीव आता लोकांमध्ये रुजू लागली होती. शेतकऱ्याला योग्य दर मिळावा, शोषक अटी नष्ट व्हाव्यात आणि स्थानिक पातळीवर एक मजबूत, शेतकरीधार्जिणी व्यवस्था उभी राहावी, यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज निर्माण झाली होती. त्या दिवशी नामदेव पुन्हा एकदा शेतात उभा राहून आकाशाकडे पाहत होता. आकाशात ढग अजूनही नव्हते पण त्याच्या मनात मात्र आशेचे एक नवे आभाळ दाटून आले होते कारण त्याला उमगले होते की, शेतकऱ्याचे भविष्य केवळ पावसाच्या लहरीवर नाही तर आता समाजाच्या खंबीर साथीवरही अवलंबून आहे.


मयूर बागुल

राज्य पुरस्कार प्राप्त लेखक

9096210669

प्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' ९ते १५ मार्च २०२६


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page