top of page

अनपेक्षिततेत अपेक्षितता

  • Jun 22
  • 4 min read

जगाचा इतिहास जसा कल्पक शोध लावून मानवी जीवन सुसह्य करणाऱ्यांनी भरला आहे त्यापेक्षा जास्त जगाचा इतिहास मानवी मूर्खपणामुळे झालेल्या युद्धांनी आणि मानवी संहाराने भरलेला आहे. आताचे इराण-इझ्राएल-अमेरिका आणि इतर आखाती देश यात झालेले आणि विराम घेतला असला तरी तो किती काळ टिकेल आणि पुढेही अजून किती काळ हे युद्ध चालू राहील हे खुद्द ट्रम्प, नेतान्याहू किंवा मोजतबा खामेनेईलाही माहीत नसलेले युद्ध किती काळ अजून पुढे चालेल, युक्रेन-रशिया युद्धाचे शेवटी काय होणार हे पुतीन किवा झेलेन्स्की सांगू शकतील असेही नाही पण सर्व जगाच्या नाड्या आवळल्या गेलेल्या आहेत हे तर उघड आहे. सारीच राष्ट्रे या ना त्या प्रकारे ओढग्रस्तीला आली आहेत हे एक वास्तव आहे.


म्हणजे ही युद्धे थांबू शकत नाहीत असे नाही पण सध्या जे जागतिक नेते आहेत तेच मुळात युद्धखोर आणि दंडेलशाही करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने ते काही न काही कारण देत एक दिवस युद्ध थांबल्याची घोषणा करतात आणि ही घोषणा विरते न विरते तोच युद्ध पुन्हा सुरु झालेले असते. जगाने उसंतीचा घेतलेला श्वास पुन्हा अनियमित होतो. या युद्धखोरीच्या नादात आपण पृथ्वीवासीयांच्या भविष्याशी आणि जीविताशी खेळतो आहोत याची त्यांना जाणीव होत नाही पण आर्थिक सत्ता टिकवण्यासाठी, स्वत:ची व्यक्तिगत मत्ता वाढवण्यासाठी हे खेळ केले जातात हे आपल्याला या युद्धामुळे समजले असेल.


यामुळे खरे मानवी प्रश्न चर्चेच्या भोवऱ्यातून बाहेर पडले आहेत. मानवी जीवन अत्याधुनिक ए.आय. आणि रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानाने झाकोळले गेले आणि बव्हंशी मानवी हातांना शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाचे कामच उरले नाही तर एकुणातील व्यवस्था कशी ढासळेल यावर या दशकात सुरु झालेली चर्चा बऱ्यापैकी मागे पडलेली आहे. किंबहुना आजची युद्धेच हे तंत्रज्ञान वापरून खेळली जात असल्याने या भस्मासुराला पायबंद कसा घालावा याचा विचार कोण करणार? या तंत्रज्ञानासोबतच जगावे लागेल असे आता तत्त्वज्ञही सांगू लागलेले आहेत. भविष्यात आज आपण कल्पना करूही शकत नसलेली नवीन कामे निर्माण होतील आणि एकुणातील मानवी व्यवस्था आधी थोडी अव्यवस्थित होऊन नव्या व्यवस्थेशी जुळवून घेत एका वेगळ्या व्यवस्थेत जगू लागतील अशी कोठे तरी क्षीण का होईना आशा असली तरी नवीन जग केवळ तंत्रज्ञानाने बदलत नसून ते मानवी नैतिक मूल्यांचा घास घेत त्याला समूळ बदलवत आहे हे आपल्या लक्षात येईल. किंबहुना नवीन मूल्येच अशा झपाट्याने बदलत आहेत की आजवर माहीत असलेल्या पण सार्वजनिकरित्या उद्गारही न करता येईल अशा गोष्टी सर्वांना अगदी सहज वाटत आहेत. कोणाला आश्चर्य वाटत नाही आणि वाटावे असे कारणही नाही.


उलट मानवी प्रवृत्ती म्हणजे लालसा, लोभ, मक्तेदारीची भावना इ. दुर्गुणांचा सर्वत्र विस्फोट होत असताना आपल्याला दिसेल. भारतात म्हणावे तर राजरोसपणे मक्तेदारीकडे जात छोटे-मध्यम उद्योग संपवण्याची वाटचाल वेगाने सुरु आहे. मी ‌‘भविष्य नावाचा इतिहासात‌’ या माझ्या पुस्तकात जी भविष्यातील जागतिक मक्तेदारीच्या दिशेने जाणाऱ्या जगाची अवस्था वर्णन केली होती ती आताच प्रत्यक्षात येताना दिसत आहे. त्यात जगभरची सरकारे अतिश्रीमंतांच्या व शक्तिशाली समूहांच्या कच्छपी लागली असल्याने सारीच भू-सामाजिक स्थितीही वेगाने बदलू लागलेली आहे. राजकीय व्यवस्थेचे काय होते आहे हे आपण जगभरात पाहू शकतो.


मानवी समाजाच्या जीवनातील अनिश्चितता, अनिश्चिततेचे तत्त्व जसे सूक्ष्मयामिकी शास्त्राला कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा या तत्त्वाने आदिम कालापासून मानवी जीवनाला जास्त ग्रासून टाकले असले तरी तेव्हाचा वेग फार संथ होता. इतका की काही बदलते आहे याची जाणीव व्हायलाही अनेक पिढ्या जाव्या लागायच्या.


आज अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन प्रती-क्षणी झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परिणाम घडवले ती स्थितीच अनिश्चित आणि प्रतिक्षणी बदलणारी असते. त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. अनपेक्षिततेत अपेक्षितता आणायचा प्रयत्न असतो आणि कोणती तरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून डावाला लावले जाते ते मानवी जीवन आणि सध्याच्या युद्धातून तेच प्रकर्षाने जाणवते आहे.


जगाची झालेली आर्थिक नाकेबंदी, युद्धात झालेला विध्वंस ही भांडवलदारांसाठी मोठी संधीच असते कारण ते त्यातून पुन्हा निर्माणकार्ये/दुरुस्त्या यात पैसेच कमावणार असतात. लोकांना रोजगार काही ना काही प्रमाणात मिळणारच असल्याने त्यांनाही ही एक संधी बनून जाते पण ही संधी ज्याचा विनाश झाला आहे त्यालाच मिळते असे नाही. हे विषम वाटप असते. युद्धात सहभागी राष्ट्रे नंतर त्यांच्यात लाभांचे वाटप करतात तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे ते त्यातून सावरण्यासाठी प्रती-दहशतवादाचाही वापर करू शकतात. येत्या काही वर्षात न्युयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जसा हल्ला झाला तसाच हल्ला पुन्हा केला जाऊ शकणार नाही असे नाही. जगात आमचीच दादागिरी चालेल असा अनैतिक दावा कोणतेही राष्ट्र करू शकत नाही पण सध्याच्या जगातील युद्धात पुतीन, नेतान्याहू आणि ट्रम्प यांची दादागिरी नव्हती असे नाही. याचा अर्थ अयातोल्ला खामेनेई किंवा झेलेन्स्की शहाजोग होते असाही होत नाही. हमासही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. प्रत्येकाकडे आपापला तर्क आणि कारण आहे. व्यूहनीतीही आहे परंतु या काही लोकांच्या अहंकारासाठी जेव्हा जगच वेठीला धरले जात असेल तर आम्ही तंत्रज्ञानाने कितीही प्रगत झालो असलो तरी आमची मानवी बुद्धी मात्र सडत चालली आहे असे म्हणावे लागेल.


उद्याचे जागतिक परिप्रेक्ष आणि एकुणातील राजकीय यंत्रणा आपल्या भूमिका कशा आणि कशासाठी बदलतील हेच कळेनासे झाले आहे. ट्रम्पबाबत म्हणतात की या गृहस्थाला आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे हे तरी समजते की नाही हे त्यालाच ठाऊक. सर्वच नेत्यांची ही  अवस्था आहे आणि त्यात जागतिक मानवी समूदायाची फरफट होत आहे. हे कोठे तरी जगालाच थांबवावे लागेल.


 ‌‘सारे काही फायद्यासाठी‌’ ही आपली जी जागतिक प्रवृत्ती बनली आहे. तीच मुळात विघातक आहे. भौतिक फायदा की बौद्धिक/आत्मिक फायदा यात आपल्याला निवड करत एक संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते जर केले नाही तर मनुष्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणजे मनुष्य असेल पण मनुष्यपण हरवलेला. तसे होऊ नये म्हणून जागृत होण्याची गरज आहे.


-संजय सोनवणी

साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६




Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page