top of page

तिचा चेहरा जळाला की आपल्या समाजाचा चेहरा उघडा पडला?

  • 1 day ago
  • 3 min read

नकार सहन न करणाऱ्या पिढीचं भयावह रूप


अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात एका निष्पाप लहान मुलीवर ॲसिड फेकलं जातं. ही बातमी आपण वाचतो, क्षणभर मन  सुन्न होते, मनात संताप उसळतो आणि काही वेळाने पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात गुंतून जातो! पण त्या मुलीचं आयुष्य तिथेच थांबतं का? तिच्या चेहऱ्यावरच नाही तर तिच्या संपूर्ण अस्तित्वावर आयुष्यभरासाठी जखमा उमटतात. गेल्या दशकभरात अशा शेकडो घटना घडलेल्या आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. कधी एकतर्फी प्रेम तर कधी वैयक्तिक भांडणे तर कधी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक हेवेदावे. काल घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजाचा नाटकी बुरखा फाटला गेला आहे.

प्रश्न इतकाच नाही की हा गुन्हा कोणी केला? प्रश्न आहे, हा गुन्हा घडूच कसा दिला?

आज आपण ज्या समाजात जगतो, तिथे प्रगतीचे मोठ-मोठे दावे केले जातात. तंत्रज्ञान, शिक्षण, विकास याबाबत आपण अभिमानाने बोलतो पण दुसऱ्या बाजूला एका लहान मुलीवर ॲसिड फेकलं जातं आणि आपली सगळी प्रगती एका क्षणात उघडी पडते कारण खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती ही रस्ते, इमारती किंवा मोबाईल नेटवर्कने मोजली जात नाही. ती मोजली जाते माणुसकीने, संवेदनांनी आणि स्त्रीच्या सुरक्षिततेने.


आजच्या तरुणांच्या मनात एवढी क्रूरता का साचते आहे? नकार मिळणं, अपयश येणं ही आयुष्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ती स्वीकारण्याची ताकद आपण आपल्या मुलांना दिली आहे का? की आपण त्यांना नकळत शिकवलं, ‌‘तू हरू नकोस, तुला हवं ते मिळालंच पाहिजे!‌’

जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा राग निर्माण होतो आणि त्या रागाचं रूपांतर हिंसेत होतं. प्रेमाच्या नावाखाली चालणारी ही विकृती अधिक भयानक आहे. ‌‘प्रेम‌’ हा शब्द जिथे आदर, समजूतदारपणा आणि स्वातंत्र्य यांच्याशी जोडला जायला हवा, तिथे तो मालकीहक्क आणि अहंकाराशी जोडला जातो. ‌‘ती माझी नाही, तर कोणाचीच नाही‌’ ही मानसिकता फक्त एका व्यक्तिची नसते, ती समाजाच्या विचारांमधूनच जन्म घेते.

चित्रपट, वेब सिरीज आणि सोशल मीडियानेही या मानसिकतेला खतपाणी घातलं आहे. पाठलाग, जबरदस्ती, आक्रमक वर्तन यांना ‌‘रोमँटिक‌’ दाखवलं जातं. तरुण मनं हे पाहतात, आत्मसात करतात आणि मग वास्तवात त्याची पुनरावृत्ती करतात. आपण मनोरंजनाच्या नावाखाली काय पेरतो आहोत, याचा विचार करण्याची वेळ आता निघून गेली आहे. ती संपली आहे पण या सगळ्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे भीतीचा अभाव. कायद्याची भीती उरलेली नाही. ॲसिडसारखं घातक द्रव्य अजूनही सहज मिळतं. नियम आहेत पण अंमलबजावणी शिथिल आहे. गुन्हा घडतो, निषेध होतो, मोर्चे निघतात, आश्वासनं दिली जातात आणि मग सगळं शांत होतं.


न्याय मिळतो पण उशिरा. कधी कधी खूप उशिरा! आणि तोपर्यंत पीडितेचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं.


महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही अशा घटना वारंवार घडतात. ही केवळ लाजिरवाणी गोष्ट नाही तर ती आपल्या व्यवस्थेच्या अपयशाची जाहीर कबुली आहे. दोष फक्त त्या एका आरोपीचा नाही. दोष त्या कुटुंबाचाही आहे, जिथे मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं. दोष त्या शिक्षण व्यवस्थेचाही आहे, जिथे गुणांना महत्त्व दिलं जातं पण मूल्यांना नाही. दोष त्या समाजाचाही आहे, जो चुकीकडे पाहूनही गप्प बसतो आणि दोष त्या राजकीय इच्छाशक्तिचाही आहे, जी प्रत्येक घटनेनंतर फक्त निवेदनं देऊन थांबते.


आपण वारंवार विचारतो, ‌‘अशा घटना थांबतील कशा?‌’ पण खरा प्रश्न आहे, आपण त्या थांबवण्यासाठी खरंच काय करत आहोत?

घराघरात संवाद हवा. मुलांना ‌‘नकार स्वीकारणं‌’ शिकवलं पाहिजे. शाळांमध्ये मूल्यशिक्षणाला पुन्हा केंद्रस्थानी आणलं पाहिजे. माध्यमांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायद्याची अंमलबजावणी कठोर आणि त्वरित झाली पाहिजे. ॲसिड विक्रीवर पूर्ण नियंत्रण आणि अशा गुन्ह्यांसाठी जलद न्यायप्रक्रिया ही केवळ मागणी नाही, ती अत्यावश्यकता आहे.

राजर्षी व इतर नाटके | Rajarshee wa Itar Natake
₹350.00₹262.50
Buy Now

पण या सगळ्यापलीकडे एक प्रश्न अजूनही उभा आहे. आपण माणूस म्हणून अपयशी ठरत आहोत का? आज अहिल्यानगरमध्ये ज्या मुलीवर ॲसिड फेकलं गेलं, ती केवळ एक व्यक्ती नाही. ती आपल्या समाजाच्या जखमेचं जिवंत प्रतीक आहे. तिच्या चेहऱ्यावर उमटलेले व्रण हे आपल्या संवेदनांच्या मृत्युची साक्ष देत आहेत. जर आपण आजही बदललो नाही तर उद्या ही जखम आणखी खोल होणार आहे. आणि कदाचित त्यावेळी प्रश्न विचारायलाही आपण उरणार नाही.

आता तरी जागं व्हायचं का की अजून एका निरागस चेहऱ्याची वाट पाहायची?


- प्रा. सचिन माथेफोड

थेऊर, जि. पुणे

8975329797

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २३ ते २९ मे २०२६



Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page