वारीया चांदण्या... अन् राघववेळ
- Apr 5
- 2 min read
ग्रेसचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा कवितासंग्रह हातातून बाजूला ठेवून दिला. संध्याकाळ खरंच उदास असते का? हे अनुभवण्यास माझ्या घराच्या टेरेसवर आले, तो काय आश्चर्य! संध्याकाळ बिलकुल उदास नव्हती.
थोडी थोडी मंद हवेची झुळूक स्पर्श करत मनास रोमांचित करु लागली. आकाशात एकटक बघत बघत चांदण्यांची सैर करु लागले. निरभ्र आकाश, मंद वारा, आमच्या बंगल्यातील नारळाच्या झावळ्यांनाही वारीयाच्या गार स्पर्शात झुलवून घेण्याचा मोह आवरेना... तीन मजली बंगल्याच्या टेरेसच्याही कितीतरी वरपर्यंत पोहोचलेल्या नारळाच्या हिरव्यागार झावळ्याही सुखावून वाऱ्याशी मंद मंद धूंद धूंद मंजुळ हितगुज करत होत्या. भरगच्च नारळांनी लगडलेल्या गर्भारणीसारख्या हिरव्याकंच झाडास वाऱ्याच्या रुपात जणू सखाच भेटला!
वारीयाची मंद झुळूक अंगाशी अल्हाद येते
तव स्मृतींच्या दुलईत मी आकसुन पहुडते
किती झोंबतो सर्वांगी हवेहवेसे वाटते
सलगीची गोड लहर वाऱ्यास कशी बरे येते?
उन्हाळ्यात सगळंच रुक्ष, रखरखीत नसतं, सायंकाळचे असे काही क्षण चोरायचे असतात. हातात हात घेऊन सोबत बसायला कोणी नसलं तरी वाऱ्यास सखा मानून थोडं गायचं असतं... चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सख्या रे आवर ही सावर ही चांदरात, चांदरात...
हे लिहिताना सुरेश भट खरंच का कधी प्रत्यक्षात चांदण्यात बसले असतील? अन् संगीतकार हृदयनाथांस खरंच का कधी त्यांच्या प्रियेने मनातले सांगितले असेल? सांग कशी तुजविनाच पार करु पुनवपूर, तुज वारा छळवादी अन हे तारे फितूर, श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात! प्रिया जवळ नसताना मालकंसातील श्वास अनुभवणं अन् त्याच क्षणी पारिजातकाचा तरल सुगंधी स्पर्श जगणं हे तीच करु जाणे... कोण? अभिसारिका! एवढी हिंमत प्रत्यक्ष प्रियकरात सुद्धा नसते.
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे... लिहिणारे सुरेश भटांच्या अंतरंगात एखादी अभिसारिकाच निर्वासित असावी. किती जणांस हे स्वर्गीय अप्सरेचं मलमली तारुण्य पहाटेस एकाकाराची अनुभूती देतं? मिलन स्वर्गीय केवळ प्रेमातच भासते अन्यथा नुसता समागम हव्यासाचा.
सायंकाळ आता गडद गडद होत चालली होती तसतशी आकाशातील चांदण गोंदण अधिक प्रकाशत चालली होती. अहाहा किती त्या चांदण्या चंद्राभोवती दाटल्यात! प्रत्येकीच्या वाट्यास कितीसा तो येणार?
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
श्वास गालाला छळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला...
चंद्राची अवस्था अगदी श्यामरंगी श्यामलासारखी झाली होती. चांदण्यारुपी गोपिकांनी सगळीकडून घेरून त्याच्यावर चुंबणांचा वर्षाव करु लागल्या होत्या. आकाशात सायंकाळच्या या प्रसन्न प्रहरी उगवण्याआधी मावळूनच जातो की काय अशी चंद्राची अवस्था झाली होती. चंद्र कितीही लोभस असला, चांदण्या त्यावर कितीही भाळल्या तरी चंद्रासही वरवरची आसक्तता आता नकोय... कोणी एकच सखी हवीय जी सोबत उगवेल, सोबत मावळेल, सोबत उजळेल अन् सोबत अनंतात विलीन होईल... का नको चंद्राने अशी स्वर्गीय कल्पना करावयास?
त्या आकाशभर चांदण्यांच्या गराड्यातही चंद्राची नजर तिच्यावर स्थिरावते अन् ती शहारते... पण तो संधी सोडत नाही. तो सांगितल्यावीन राहत नाही... तोच मी होतो गडे गं, तोच मी जो तुला आता कळाया लागला...
दिवसभर उन्हाची रणरण. डोळे अक्षरशः जळून गेले म्हणून ह्या गारव्यात अंग लपेटून घेतेय... गारवा वाढत चाललाय... शिरशीरी भरत चाललीय...
शेवटी पुन्हा ग्रेस स्मरतात. नभाला धरबंध नाही, तळहातावरील वळीव स्पर्शाचा. उशालगतच्या गंधगार रात्रीत गुरफटलेले क्षितिज दूर ढकललेस आणि बुडून गेलास... तुझ्याच आघाताने का टळून जात नाही सुरंगी गात्रांना कुरतडणाऱ्या राघववेळेचा प्रहर?
- विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश), नाशिक
9822683799
प्रसिद्धी - 'साप्ताहिक चपराक' ६ ते १२ एप्रिल २०२६
.jpg)


Comments