top of page

कोकणातील बोली आणि म्हणी

कोकणला जसा सांस्कृतिक कलाप्रकार आणि परंपरांचा मोठा वारसा आहे तसाच वारसा बोलीभाषेच्या बाबतीतही लाभला आहे. इथल्या प्रत्येक बोलीभाषेला स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. कोकणात गाव बदलले की बोलीभाषा बदलते. पूर्वीच्या काळापासून बोलीभाषेत म्हटली जाणारी गाणी, वानकरण्या, ग्रामीण गीते, लग्न समारंभाप्रसंगी गायली जाणारी गीते या सर्वांना स्वतःची असणारी ओळख आजच्या बदलत्या काळातही कायम आहे मात्र येथून पुढे या भाषेतील ठेव्याचे लिखित स्वरूपात जतन करणे काळाची गरज बनली आहे. कोकणचा विचार करता कोळी लोकाची आगरी भाषा, मुस्लिम समाजाची कोकणी भाषा याबरोबरच बाणकोटी, सिंधुदुर्गमधील मालवणी या प्रत्येक बोलीभाषेला स्वतःची वेगळी ओळख आहे.  त्या त्या भागात असणारे सांस्कृतिक प्रकार या बोलीभाषेच्या माध्यमातूनच आजवर सर्वांसमोर सादर केले गेले आहेत. यामुळे हा सांस्कृतिक ठेवा स्वतःची विशिष्ट उंची गाठण्यात यशस्वी ठरला आहे. कोकणातील माणसं स्वभावाने इरसाल समजली जातात. मोजक्या शब्दात समोरच्याला एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी कोकणवासी म्हणींचा आधार घेतात. कोकणात या म्हणींचा पूर्वापार वापर केला जात आहे. म्हणीबरोबरच कोकणात काही शिव्यांचा वापर देखील अगदी सररास होताना दिसतो मात्र या शिव्यांच्या मागे देखील कोकणवासियांचे प्रेमच दडलेले असते. म्हणी आणि शिव्यांचा वापर असलेली कोकणवासी यांची खास बोली हे खरोखरच भुरळ पाडणारी आहे.   म्हणींचा वापर सररास सर्वत्र होताना दिसतो मात्र दैनंदिन संवादात जेथे बोली भाषेचाच अधिक वापर केला जातो तेथे म्हणी आणि शिव्यांचा वापर हा ठरलेलाच असतो. किमान शब्दात कमाल अर्थबोध करायचा असेल, तर म्हणींचा वापर हा करावाच लागतो. ज्यांनी कोणी या म्हणी तयार केल्या असतील त्यांनी यावर किती सखोल विचार केला असेल, हे यातून स्पष्ट होते. बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो तसाच तो लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. ‘वाघ पडला बावीत, त्याला केल्डं गां.. दावी’ अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. ‘बाव’ म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं. वाघ विहिरीत पडला, की माकड सुद्धा त्याला वाकुल्या दाखवतं, असा त्याचा समर्पक अर्थ आहे. आपण अगदी रोजच्या व्यवहारात, समाजात हीच विदारक स्थिती पाहत असतो. ‘ज्यासाठी लुगडं, ते सगळं उघडं’ अशी पण एक म्हण आहे. म्हणजे जो उद्देश आहे, तो साध्य न होता बाकीच फापटपसारा मांडला जाणे. ‘दिवस गेला रेटारेटीत नि चांदण्यात कापूस काती’ ही म्हणही अनेकदा अगदी सहजपणे वापरली जाते. म्हणजे संपूर्ण दिवस कामाविना वाया गेला आणि कापूस कातायला रात्रीचा मुहूर्त लागला. अर्थात जेव्हा हातात वेळ असतो तेव्हा काम करायचं नाही आणि मग धावपळ करायची.  

Custom alt text

  गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यापैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदुंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोंकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. म्हणजे सोपी, ठोस, पारंपरिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती ‘म्हण’ होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार-विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. ‘अगं अगं म्हशी मला कोठे नेशी’ म्हणजे स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. ‘पी हळद हो गोरी’ उतावळेपणा दाखविणे, ‘आपला हात जगन्नाथ’ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही, ‘अति तेथे माती’ - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो, ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ - दोनपैकी एक पर्याय निवडणे, ‘आयत्या बिळात नागोबा’ - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे, ‘चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे’ - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच, ‘उंटावरचा शहाणा’ - मूर्ख सल्ला देणारा, ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसर्‍याचे दोष काढतो, ‘आपल्याच पोळीवर तूप ओढणे’ - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे, ‘आंधळे दळते कुत्रं पीठ खाते’ -एकानं काम करावं आणि दुसर्‍यानं त्याचा फायदा घ्यावा, ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे, ‘आधी पोटोबा मग विठोबा’ - आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा, ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते, ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे, ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही, ‘दुष्काळात तेरावा महिना’ - संकटात अधिक भर, ‘असतील शिते तर जमतील भुते’ - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात, नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो, ‘आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्ट’- स्वत:चे चांगले आणि दुसर्‍याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे, ‘आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला’ - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे, ‘रात्र थोडी सोंगे फार’ - काम भरपूर, वेळ कमी, ‘अचाट खाणे मसणात जाणे’ - खाण्यापिण्यात अतिरक झाल्यास परिणाम वाईट होतो, ‘आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना’ - दोन्ही बाजूंनी अडचण, ‘आलीया भोगाशी असावे सादर’ - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे, ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ - क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे, ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा, ‘कामापुरता मामा’ - काम साधण्यापुरते गोड बोलणे, ‘आपलेच दात आपलेच ओठ’ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे, ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे, ‘आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली’ - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती, ‘अळी मिळी गुप चिळी’ - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे, ‘इकडे आड तिकडे विहीर’ - दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे, ‘उठता लाथ बसता बुक्की’ - प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.

‘उडत्या पाखरची पिसे मोजणे’ - अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे, ‘उधारीचे पोते सव्वाहात रिते’ - उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो, ‘उंदराला मांजर साक्ष’ - वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ - विचार न करता बोलणे, ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ - प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकराचा उतावळेपणा दाखविणे, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ - थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो, ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’ - कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये, ‘एक ना घड भारभर चिंध्या’ - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था, ‘एका माळेचे मणी’ - सगळीच माणसे सारख्या स्वभावाची, ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ - दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ - लोकाचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे, ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ - आळस, हलगर्जीपणा करणे, ‘एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत’ - दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत, दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही, ‘घोडा मैदान जवळ असणे’ - परीक्षा लवकरच होणे, ‘कर नाही त्याला डर कशाला’ - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे, ‘कामापुरता मामा-ताकापुरती आजी’ - आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ - नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे, ‘कानामगून आली आणि तिखट झाली’ - मागून येऊन वरचढ होणे, ‘नाव मोठे लक्षण खोटे’ - कीर्ती मोठी पण कृती छोटी, ‘करावे तसे भरावे’ - जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले-वाईट फळ भोगावे लागते, ‘हपापाचा माल गपापा’ - लोकाचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते, ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ - आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो, ‘कुडी तशी पुडी’ - देहाप्रमाणे आहार असतो, ‘कधी तुपाशी तर कधी उपाशी’ - संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते, ‘कावळा बसायला अन फांदी तुटायला’ - परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे, ‘कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ - कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही, ‘सुक्याबरोबर ओले ही जळते’ - निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे, ‘कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही’ - निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही, ‘काखेत कळसा नि गावाला वळसा’ - हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ - क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते, ‘खाण तशी माती’ - आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे, ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ - परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा, ‘खाऊन माजावे टाकून माजू नये’ - पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ - वाईट कृत्य करणार्‍या माणसाचे शेवटी वाईटच होते, ‘गरजवंताला अक्कल नसते’ - गरजेमुळे अडलेल्या व्यक्तिला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते, ‘गर्वाचे घर खाली’ - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच, ‘गरज सरो नि वैद्य मरो’ - आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे, ‘गर्जेल तो पडेल काय’ - केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तिच्या हातून फारसे काही घडत नसते, ‘गाढवाला गुळाची चव काय’ - मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही, ‘गाव करी ते राव ना करी - श्रीमंत व्यक्ती स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात, ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो, ‘गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बरा होता’ - मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो, ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली’ - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दुसरा उपयोग करून घेणे, ‘गुरुची विद्या गुरूला फळली’ - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, ‘गुळाचा गणपती’ - गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे, ‘गोगलगाय नि पोटात पाय’ - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

asa jagava kadhitari

‘घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात’ - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात, ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे’ - स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍याने आपलेही काम लादणे, ‘घर पाहावे बांधून लग्न पाहावे करून’ - अनुभवाने माणूस शहाणा होतो, ‘घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते’ - आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात, ‘घरोघरी मातीच्याच चुली’ - सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे, ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ - पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकाना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत, ‘चिंती परा येई घरा’ - दुसर्‍याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वत:चेच वाईट होते, ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ - खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ - स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यायवर आळ घेणे, ‘चोराच्या मनात चांदणे’ - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात, ‘चोरावर मोर’ - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे, ‘जळत्या घराचा पोळता वासा’ - प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे, ‘पाण्यात राहुन माशांशी वैर करू नये’ - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये, ‘जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला’ - निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते, ‘जळतं घर भाड्याने कोण घेणार’ - नुकसान करणार्‍यास गोष्टीचा स्वीकार कोण करणार. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ - दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. ‘ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ - एकमेकांचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे, ‘ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट’ - जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत, ‘जशी देणावळ तशी धुणावळ’- मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे, ‘ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे’ - एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो, ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार, ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी’ - मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ - व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते, ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही’ - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही, ‘टिटवी देखील समुद्र आटविते’ - सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो, ‘डोळ्यात केर आणि कानात फुंकर’ - रोग एक आणि उपचार दुसराच, ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ - प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्ती होणे, ‘तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला’ - भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे, ‘तळे राखील तो पाणी चाखील’ - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडा फार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला’ - वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो, ‘ताकापुरते रामायण’ - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ - एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे, ‘तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले’ - फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे, ‘कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे’ - पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात, ‘देखल्या देवा दंडवत’ - वरकरणी, खोटे खोटे केलेले स्वागत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता बहुतांशी तालुक्यात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. या समाजात बोलली जाणारी भाषा म्हणजेच संगमेश्वरी बोली. या भाषेत आदर, आपलेपणा याबरोबरच काहीसा तिरकसपणाही समोर येतो. असं असलं तरीही या भाषेतून माणसाला माणूस जोडला जातो. नवख्या माणसाला या बोलीभाषेतील सर्व उच्चार आणि त्याचे अर्थ कळले नाहीत तरी बोलण्याची ढब आणि चेहर्‍यावरील हावभाव यावरून अपेक्षित असणारा अर्थ सहज लक्षात येतो. संगमेश्वरी बोली ही अभिनयातूनच आपला आशय समोरच्या व्यक्तिला समजावून देण्यात यशस्वी होते. यामुळे या बोलीभाषेच्या माध्यमातून आता रंगभूमीदेखील गाजू लागली आहे. ज्या तुलनेत मालवणी भाषेमध्ये लेखन केले जाते तेवढ्याच तुलनेत संगमेश्वरी बोलीत लेखन होत नाही ही खरी खंत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गिरीश बोंद्रे यांनी संगमेश्वरी बोलीभाषेत मोठ्या प्रमाणावर लेखन करून याचा प्रसार प्रसिद्धी माध्यमं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून सातत्याने केला आहे. याबरोबरच आनंद बोंद्रे यांनी संगमेश्वरी बोली या नावाने विनोदी कार्यक्रम बसवून या भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मराठी पडद्यावर संगमेश्वरी बोलीचा प्रसार वैभव मांगले यांनी करून प्रेक्षकांना हसवण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. दर कोसामध्ये बदलणार्‍याया भाषेतून ‘नू’ हे आदरार्थी संबोधन वापरत आदर दाखविला जातो. यामध्ये कुणाची चौकशी करायची असल्यास त्याच्या नावासमोर नू लावण्याची प्रथा आहे. यासाठी दादानू, मामानू, काकानू असे शब्द वापरले जातात. या बोलीभाषेत सरळ उत्तर दिले जात नाही मात्र तिरकस उत्तर मिळाले तरी त्यामध्ये दुखावण्याचा हेतू नसतो. या बोलीभाषेत ळ ऐवजी ल, ण ऐवजी न वापरण्याची प्रथा आहेच शिवाय प्रत्येक शब्दागणीक ‘झो’ आणि ‘लय’ असेही शब्द वापरले जातात. संगमेश्वर तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तालुक्याचे विभाजन गावे आणि वाड्यांमध्ये झाले आहे. कुणबी समाजाची संख्या येथे लक्षणीय असल्याने भात कापणी, झोडणीसह, गवत कापणीच्या काळात कुणबी महिलांकडून संगमेश्वरी बोलीभाषेतील ग्रामीण गीते ऐकायला मिळतात. शिवाय धार्मिक प्रसंगी मांडाची गाणी, टिपरीची गाणी, फुगडीसाठी वेगळी गाणी गाण्याचीही प्रथा आढळते. याशिवाय या भाषेतला कुकारा प्रसिद्ध आहे. होळीच्या काळात घातल्या जाणार्‍या फाका आणि पालखीप्रसंगी देवासमोर घातले जाणारे गार्‍हाणे हे संगमेश्वरी बोलीतले खास वेगळे प्रकार म्हणून ओळखले जातात. सांस्कृतिक ठेवा हा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे आपोआप हस्तांतरित केला जाणारा प्रकार आहे. प्रत्येक भागाची सांस्कृतिक ठेव्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते. जर असं वेगळेपण त्यामध्ये समाविष्ट केल नाही तर सर्वत्र सारखेपणा येऊन बोली भाषेनुसार सांस्कृतिक ठेव्याची स्वतंत्र ओळख राखणं अवघड होऊन जाईल. सांस्कृतिक ठेव्याचं सादरीकरण करण्याचे प्रसंगही ठरलेले आहेत. पारावरील वा गावची सार्वजनिक पूजा, शिमगोत्सव, गणेशोत्सव, लग्न समारंभ, व्रतबंध अशा शुभ प्रसंगी रात्रीच्या वेळी परंपरागत नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा कोकणात आजही पूर्वी एवढ्याच उत्साहाने सुरू आहे. रात्रौ 10 वाजता सुरू होणारे हे सांस्कृतिक ठेव्याचे नृत्य प्रकार उत्तररात्री रंगत रंगत पहाटेपर्यंत तेवढ्याच उत्साहाने सादर करण्याची ताकद कोकणी बोलीभाषेत व ते सादर करणार्‍या कलाकारांत आजही पाहायला मिळते. कोकणी बोली भाषेतील सांस्कृतिक ठेव्याचं महत्त्व तीन भागात विभागलं गेलं आहे. वाद्य, शब्द व गायकी आणि पेहराव. प्रत्येक गावात सांस्कृतिक ठेवा सादर करणारं किमान एक तरी मंडळ आहे. गावात जर अधिक वाड्या असतील तर या मंडळांची संख्याही अधिक असते. रायगड जिल्ह्यातील खालूचा बाजा, कोळीनृत्य, जाखडी तर रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे व जाखडी आणि सिंधुदुर्गमधील दशावतार हे कोकणचं खरं सांस्कृतिक वैभव, या सांस्कृतिक प्रकाराला यातील नामवंत कलाकारांनी अभिनंदनीय बदल करीत साता समुद्रापार पोहोचवलं आहे. हे सर्व नृत्य प्रकार पौराणिक विषयांवरच आधारित आहेत. ज्यावेळी त्यांच सादरीकरण सुरू झालं त्यावेळी यामागील उद्देश मनोरंजन आणि प्रबोधन असाच होता. आपल्या समाजबांधवांजवळ सहजपणे संवाद साधायचा असेल वा प्रबोधनात्मक संदर्भ त्यांना सोप्या भाषेत समजणे गरजेचे असेल तर बोली भाषेतच हा संवाद होणे महत्त्वाचे असल्याने प्रांतवार त्या त्या भागाच्या बोलीभाषेनुसार सांस्कृतिक ठेव्यातील शब्द रचना तयार झाल्यास सध्याच्या मनोरंजनाच्या विविध पद्धती आणि प्रकारांमध्येही नमनखेळे व जाखडी नृत्यांचं नाव निघताच डोळ्यासमोर कोकण शिवाय अन्य भाग येत नाही, हेच त्या सांस्कृतिक ठेव्याचं आगळं वेगळं आणि अबाधित असलेलं महत्त्व मानलं जातं. दुर्दैव एवढंच की, या परंपरागत चालत आलेल्या शब्दरचना पाठांतरातून वा कानावर पडून एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित झाल्या, त्याचं लेखन करून जतन वा संग्रह होऊ शकलेला नाही. पूर्वी आणि आता सादर होणार्‍या नमन खेळे व जाखडी नृत्य प्रकारात बदलल्या पिढीतील विचारानुसार फरक झाला आहे. हा बदल जरी स्वागतार्ह नसला तरी तो अपेक्षित असाच म्हटला पाहिजे. आनंद या गोष्टीचा मानायला हवा की, हे प्रकार आधुनिक पिढीने आजही सुरू ठेवले आहेत. कोकणातील लोकप्रिय कलाप्रकार नमनात मृदुंगावर पहिली थाप पडली की कार्यक्रमाची सुरूवात होते. पहिल्यांदा सुरू होते ते पयलं नमन... हो पयलं नमन.. याचा अर्थ पहिलं वंदन असा आहे. बोली भाषेतील हे बोल समजण्यास कठीण असले तरी ते ऐकण्यास कर्णमधूर वाटतात. नमन खेळ्यांना सुरवात झाल्यावर ग्रामदेवतेसह गावातील सर्व देवांना वंदन केले जाते. या वंदनेनंतर बोली भाषेतील शब्द रचना झांजांच्या साथीने व मृदुंगांच्या ठेक्यावर गायल्या जातात. यालाच वानकरण्या असं म्हटलं जातं. पारंपरिक दृष्य म्हणजेच सोंग दाखविण्यापूर्वी या वानकरण्या गायल्या जातात. नमन खेळ्यातील वानकरण्या हा या सांस्कृतिक ठेव्यातील खरा गाभा आहे. कोकणच्या बोलीभाषेतील दुसरा लोकप्रिय नृत्य प्रकार म्हणजे जाखडी नृत्य. यामध्ये शक्ती आणि तुरा असे दोन प्रकार आहेत. या दोघामध्ये सवाल जबाबाचे झगडेही लावले जातात. एकाकडे जबरदस्त शब्दरचना तर दुसर्‍याकडे रंगबाजी अशी परंपरागत वैशिष्ट्ये मानली गेली आहेत. जाखडीमध्ये ढोलकी वाजपाला मोठं महत्त्व आहे. बोली भाषेतील या रचना मात्र सहजपणे समजू शकतील अशा असतात. या रचनांची चाल कोकणी बोली भाषेतील हेल ओढण्याच्या पद्धतीवर अवलंबून असली तरीही ती समजणे अवघड जात नाही. गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी शक्ती तुर्‍याचे जाखडी नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून या सांस्कृतिक ठेव्याच्या नृत्य प्रकाराची परंपरा आजही जपली जात आहे. दशावतार म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच नाव पुढं येतं. दहा अवतारांचं सादरीकरण म्हणजे दशावतार! पौराणिक प्रसंगावर आधारित हा सांस्कृतिक ठेवा सादर करण्याची पूर्वी 35 ते 40 मंडळ सिंधुदुर्गात होती. त्यातील 4 ते 5 मंडळ तर खूपच लोकप्रिय होती. मालवणी बोली भाषेवर आधारित दशावतरातील कलाकार प्रसंगानुरूप त्या भूमिकेत एकरूप होऊन अभिनय करायचे, त्यामुळे पौराणिक प्रसंगातील हुबेहूब पात्रं डोळ्यासमोर उभी ठाकल्याचा भास पाहणार्‍यांना होत असे. दशावतार असो, जाखडी नृत्य असो वा नमन खेळे कोकणच्या बोली भाषेतील हा सांस्कृतिक ठेवा म्हणजे कोकणच्या परंपरेची खरी ओळख मानली जाते. बोली भाषेची खरी ओळख त्या भागातील सांस्कृतिक ठेव्यावरून होते. ही बोली भाषेची खरी ताकद असं म्हटलं पाहिजे. - जे. डी. पराडकर ज्येष्ठ पत्रकार, कोकण प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' फेब्रुवारी २०२२

Recent Posts

See All
चातुर्मास....परंपरेचा सुरेख भक्तीमय संगम | Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition

आपला भारत देश कृषीप्रधान आणि सुजलाम सुफलाम आहे. विविधतेने नटलेला, संत-महंतांची ही भूमी भक्तीमय गाथा सांगणारी, अखंड प्रेमाची, अभूतपूर्व क्रांतीची आणि थोर विचारांची आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्य

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page