जबाबदार पत्रकारिता मृत्युशय्येवर - घनश्याम पाटील
- Jyoti Ghanshyam
- Jun 7, 2025
- 5 min read
अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील एका वृत्तवाहिनीवरील चर्चा सध्या समाजमाध्यमांवर दाखवली जात आहे. यात ते एकमेकांचा ‘उद्धार’ करताना दिसतात. ‘अंगावरचे काढून कंबरेला गुंडाळणे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे; पण इथे यांच्या कंबरेवरही काही दिसत नसल्याने ते पूर्णपणे नागवे झालेले दिसतात. हे ‘नागवेपण’ फक्त मिटकरी-हाके यांच्यासारख्या नेत्यांचेच नाही, तर अशा बाष्फळ चर्चा दाखवणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही आहे. गेल्या काही काळात मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या कोणत्या स्तराला जाऊन वार्तांकन करतात, हे पाहता कोणालाही शब्दशः शिसारी येईल. त्यातही यांच्या ऑनलाइन आवृत्त्यांनी तर सगळ्याच मर्यादा सोडून जनतेच्या मनातून माध्यमपर्व संपवण्यात हातभार लावला आहे.
१८३२ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीत ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी ‘मनोरंजन करणे, चालत्या काळाचे वर्तमान कळवणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखवणे’ हा त्यांचा उद्देश असल्याचे ते सांगतात. माध्यमातून आजही मनोरंजन केले जाते, वर्तमानातील बातम्याही दिल्या जातात; मात्र ‘योग्यतेस येण्याचा मार्ग दाखवणे’ हा गुण संपुष्टात आल्याचे दिसते. एकेकाळी ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे’ हा माध्यमांचा हेतू होता. आपला देश स्वतंत्र झाला आणि वृत्तपत्रे उदयास आली. सामान्य माणसाच्या अडीअडचणी मांडण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम झाले. तेव्हाच्या काळातील पुण्यासारख्या छोट्या शहरातील भाजी मंडई हासुद्धा बातम्यांचा विषय होऊ शकतो, हे नानासाहेब परूळेकरांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून दाखवून दिले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा धुरिणांनी सुरू केलेला ‘केसरी’ ब्रिटिश सत्तेविरुद्ध आग ओकायचा. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. ‘आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा?’ असा प्रश्न निर्माण झाल्यावर आगरकरांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले. महात्मा गांधी यांनी ‘स्वदेश’ व ‘हरिजन’ सारखी वृत्तपत्रे सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उत्थानाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून बुद्धभूषण प्रेसची स्थापना केली आणि ‘बहिष्कृत भारत’चे संपादन सुरू केले. थोडक्यात काय, तर राजकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या बहुतांश नेत्यांच्या हाताशी त्यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी स्वतःची वृत्तपत्रे होती. त्यामुळे आजच्या काळात वृत्तपत्रे राजकारण्यांच्या हातात गेली, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. वृत्तपत्रांबरोबरच राजकारणाचा आणि राजकारण्यांचा दर्जा ढासळला आहे, असे म्हटले तर ते मात्र संयुक्तिक होईल.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ‘सकाळ’, ‘तरुण भारत’ सारखी अनेक वृत्तपत्रे पुढे आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हा मोठा समूह ‘नवभारत टाइम्स’ हे हिंदी दैनिकही चालवायचा. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी बरेच प्रयत्न करून त्यांच्या मालकांना म्हणजेच जैन बंधूंना मराठी दैनिक सुरू करण्याची गळ घातली. त्यातून ‘महाराष्ट्र टाइम्स’चा जन्म झाला. द्वा. भ. कर्णिक, माधवराव गडकरी, शंकर सारडा अशी ‘बाप’ माणसे त्यावेळी टाइम्समध्ये होती. ‘रविवारची पुरवणी’ ही संकल्पना शंकर सारडा यांचीच. त्यामुळे भरपूर साहित्य खजिना वृत्तपत्रांतून मिळू लागला. पुढे याचेच अनुकरण महाराष्ट्रातील इतर वृत्तपत्रांनी केले. गोविंदराव तळवलकर यांच्या नेतृत्वात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मोठी झेप घेतली.

महाराष्ट्रात प्रादेशिक आणि जिल्हा वृत्तपत्रांची संख्या लक्षवेधी वाढली आणि त्यांनी त्या-त्या प्रांतात मोठे योगदानही दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे मुखपत्र म्हणून आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ने लक्षवेधी कामगिरी पार पाडली. त्यांचा झंझावात भल्याभल्यांना हादरवून सोडायचा. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि माध्यमांसमोरील आव्हाने आणखी वाढत गेली. मुंबईत ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’, पुण्यातून ‘प्रभात’, नाशिकचा ‘गावकरी’, कोल्हापूरचा ‘पुढारी’, साताऱ्याचा ‘ऐक्य’ अशी अनेक वृत्तपत्रे पत्रकारितेचा धर्म पार पाडत होती.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता, स्वातंत्र्यानंतर १९९१ पर्यंतची खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आलेली पत्रकारिता आणि त्यानंतर २००२-२००३ पर्यंत दृकश्राव्य माध्यमांच्या वाढीपर्यंतची पत्रकारिता असे काही टप्पे करता येतील. २०१० नंतर मात्र ‘पत्रकारिता जिवंत आहे’, असे म्हणणे कुणासाठीही धाडसाचे ठरेल. राजकारण्यांच्या आणि व्यवस्थापनाच्या हातातील बाहुले बनलेली ही भासात्मक पत्रकारिता आता शिल्लक आहे. थोडक्यात, ती ‘ॲक्चुअल’ नाही तर ‘व्हर्च्युअल’ आहे. माध्यमातील अनेक वलयांकित संपादक, पत्रकारांना ‘आपण लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असल्यासारखे’ वाटते; मात्र ते सामान्यांच्या व्यथा-वेदना मांडणारे पत्रकार नसून माध्यमात काम करणारे ‘पगारी भासात्मक पत्रकार’ आहेत, हे सत्य त्यांना कोणीतरी ठामपणे सांगणे गरजेचे आहे.
शरद पवार हे देशातील किंवा फार तर महाराष्ट्रातील म्हणूया, एक वजनदार नेते आहेत. पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. त्यावेळी कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले? शरद पवार म्हणाले, “ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढलंय याची जर यादी दिली, तर त्यांना फिरणं मुश्किल होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग, या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला, लहान समाजातला, एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती. हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करायला लागले, कुटुंबावर हल्ले करायला लागले, तर त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही.”
या गंभीर विधानानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांनी त्यांना का विचारलं नाही की, “तुम्ही त्यांना ‘कशाकशातून’ आणि का बाहेर काढलं? त्यांचे ‘उद्योग’ जर तुम्हाला माहीत होते, तर एक जबाबदार राजकारणी म्हणून त्यांना तेव्हाच का थांबवलं नाही? गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करणारा, त्यांच्याच धनाढ्य कुटुंबातील नेता तुम्हाला कोणत्या अंगाने ‘लहान’ वाटतो? तुम्ही म्हणताय ‘लोकांची नाराजी होती’ हे माहीत असूनही त्यांना वेळोवेळी संधी दिली. मग ती का दिली? त्यांच्याकडून असा कितीसा मलिदा तुम्हाला किंवा तुमच्या पक्षाला मिळत होता? ते जर भ्रष्ट आहेत, हे तुम्हाला माहीत होतं आणि त्यामुळे योग्य त्या वेळी तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली असती, तर आज महाराष्ट्राने ही दहशत अनुभवलीच नसती! मग धनंजय मुंडे यांच्यासारख्या मस्तवाल नेत्याला पाठीशी घालणाऱ्या शरद पवार यांच्यावर संतोष देशमुख हत्येप्रकरणी सहआरोपी म्हणून गुन्हा का दाखल करू नये?” आहे का आज मराठीत अशी पत्रकारिता? केवळ पत्रकारितेचा वारसा सांगत सगळे लाभ पदरात पाडून घेणाऱ्या माध्यमकर्मींनी याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या दुबईतील घराविषयी एक बातमी आली. ‘हा पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दुबईतील राजमहाल’ असं शीर्षक देऊन तेथील जलतरण तलाव, उद्यान, व्यायामशाळा असं बरंच काही दाखवलं होतं. त्यावर सोनालीने प्रतिक्रिया दिली की, ‘हा राजमहाल मलाही माहीत नाही. आमचा दुबईत टू बीएचके फ्लॅट मात्र आहे आणि तोच आमच्यासाठी आमचा राजमहाल आहे.’ मारली की नाही थोबाडीत? याला म्हणतात चपराक! मग माध्यमांनी असे उद्योग का करावेत?
महाराष्ट्रामध्ये नुकतेच वैष्णवी हगवणे प्रकरण घडले. शशांक हगवणे आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांना वैष्णवीच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशावेळी वैष्णवीच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा त्यांच्या आई-वडिलांनी मागितला. कस्पटे यांच्या भावाने सांगितले की, ‘एका अज्ञात इसमाने त्यांना रस्त्यावर बोलावले आणि बाळ त्यांच्याकडे दिले.’ आपल्याकडील पालकत्वाच्या कायद्याचा विचार करता बाळाचे जैविक वडील जिवंत असतील, तर हा ताबा त्यांच्याकडे असणे अपेक्षित असते. जर पालकांवर काही गुन्हे सिद्ध झाल्याने ते तुरुंगवास भोगत असतील किंवा ते मनोरुग्ण असतील, तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अन्य नातेवाईकांकडे ताबा दिला जातो. या प्रकरणात हे घडले आहे का? किती पत्रकारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले? कस्पटे कुटुंबियांच्या रोज वेगवेगळ्या मुलाखती माध्यमांनी दाखवल्या. इतकेच नाही, तर भुकूम ग्रामस्थ, कस्पटेंचे नातेवाईक यांच्याही प्रतिक्रिया बघण्यात आल्या. उद्या न्यायालयात कस्पटेंचा जबाब घेतला जाईल, तेव्हा त्यांना भावनेच्या भरात बोललेले त्यांचेच हे बोलणे सप्रमाण सिद्ध करावे लागेल. वैष्णवीला खरेच न्याय मिळावा असे मनापासून वाटणाऱ्या एकाही पत्रकाराला टीआरपीच्या मागे न लागता तिच्या आईवडिलांना याबाबत सांगावेसे वाटले नाही का? ‘ही केस संपवण्याचे, डिस्ट्रॉय करण्याचे काम तुम्ही करत आहात, तुम्ही बोलला नाहीत किंवा कमीत कमी बोललात, तरच तुमच्या मुलीला न्याय मिळू शकेल,’ हे सत्य सांगणारा एकही पत्रकार मराठीत नसावा? अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेच्या हत्याकांडात अभय कुरुंदकरला नुकतीच जन्मठेप झाली. हे उदाहरण म्हणून कस्पटेंना सांगता आले असते; पण इतका विवेक आणि संयम असलेले पत्रकार आपल्याकडे शिल्लक आहेत का?
पूर्वी एखादा सामाजिक कार्यकर्ता गावात आल्यास लोक विचारायचे, ‘साहेब कोणत्या पक्षाचे?’ आता पत्रकार भेटले तर लोक त्यांना हा प्रश्न विचारतात, इतके आपले अधःपतन झाले आहे. खरेतर पत्रकार म्हणजे माध्यम! आपण त्याला इंग्रजीत ‘मीडिया’ म्हणतो. माध्यम फक्त दुवा साधण्याचे काम करतो. सामान्य माणसाच्या व्यथा-वेदना, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, प्रश्न संबंधितांकडे मांडण्याचे हे साधन होते; मात्र माध्यमे स्वतःला यंत्रणेपेक्षा, राजकारण्यांपेक्षा मोठी समजू लागली आणि त्यांची विश्वासार्हता संपली. आपण या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, या भावनेने न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलेल्या माध्यमकर्मींनी हे क्षेत्र बदनाम केले आहे.
शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना हरविंदर सिंग या तरुणाने जाहीर कार्यक्रमात त्यांना जोरदार थप्पड मारली होती. त्याने ते कृत्य एकदाच केले; मात्र माध्यमांनी तो प्रसंग इतक्यांदा दाखवला की, शरद पवारांनी संपूर्ण जगासमोर हजारदा मार खाल्ला असेल. तीच ती घटना पुन्हा पुन्हा दाखवून काय साध्य होत असावे? असे म्हणतात की, पत्रकारांच्या लेखणीत शाई कमी आणि घाई जास्त असते. त्यामुळे अनेकदा खातरजमा न करता चुकीच्या बातम्या निर्लज्जपणे दिल्या जातात. म्हणूनच मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांसाठी काही आचारसंहिता ठरवणे, त्याचे तंतोतंत पालन केले जाणे गरजेचे आहे. ते झाले नाही, तर भविष्यातील अराजकापासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही.
- घनश्याम पाटील
7057292092 प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' जून २०२५

.jpg)






Comments