top of page

ज्ञानसाधकाची संकल्पपूर्ती

ही गोष्ट आहे सप्टेंबर 2015 ची! महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाने होरपळत होता. विदर्भ, मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढलेल्या होत्या. माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. चार्‍याअभावी उपासमारीनं जनावरं मरत होती. मिरजेहून लातूरला पाण्याची रेल्वे नेण्यापर्यंत दिवस आले होते. अशा सगळ्या भीषण परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते पुढे आले आणि त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना करून शक्य त्यांना, शक्य तितकी मदत करण्याचा विडा उचलला. त्यांच्या या नेक कामाला प्रोत्साहन म्हणून अनेक जण आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत होते. आपल्या घासातला घास काढून त्यांच्याकडे मदतनिधी देत होते. या सगळ्या परिस्थितीत ग्रामीण पत्रकारांची अवस्थाही फार काही वेगळी नव्हती. एखाद्या पत्रकाराला ‘हजार रूपयांचे सुटे आहेत का?’ असे विचारले तर त्याच्याकडे सुटे पैसे तर नसायचेच पण आपल्याकडे हजार रूपये आहेत असे समोरच्या सुटे मागणार्‍याला वाटतेय म्हणजे आपला हा सन्मानच आहे, अशी त्याची भावना असायची. अशा सगळ्या परिस्थितीत अकोले-संगमनेर भागातील काही कर्तव्यतत्पर वार्ताहर एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्याकडील अर्ध्या भाकरीतली चतकोर भाकरी नाम फाउंडेशनकडे सुपूर्द करण्याचा निर्धार केला. राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे, श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने, वसंत बंदावने, रियाज सय्यद, प्रकाश टाकळकर, प्रकाश आरोटे, शेखर पानसरे, विजय भिडे, नीलिमा घाडगे, नितीन ओझा, संदीप वाकचौरे अशा भिन्न विचारधारेचे पत्रकार आपापले मतभेद विसरून एकत्र आले आणि त्यांनी प्रत्येकी हजार रूपये गोळा केले. किमान अकरा हजार रूपये नाम फाउंडेशनला द्यायचे असे त्यांनी ठरवले होते. यानिमित्ताने या पत्रकारांनी ‘दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता’ या विषयावर माझे व्याख्यान ठेवले होते. दुष्काळाविषयी तळमळीने लिहिणारे, प्रशासकीय यंत्रणा आणि राज्यकर्त्यांसमोर परिस्थितीचे वास्तव मांडणारे पत्रकार दुष्काळग्रस्तासाठी खारीचा वाटा उचलणार होते. किमान अकरा हजार रूपये द्यायचे असा त्यांचा निर्धार असताना 21 हजार रूपये जमा झाले. ‘चपराक प्रकाशन’तर्फे खारीचा वाटा म्हणून मी त्यात पाच हजार रूपये घातले. पेटीटचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांच्याकडून पाच हजार आणि आधार फाउंडेशनकडून पाच हजार आले आणि हा आकडा 36 हजारपर्यंत गेला. ते पाहून आणखी काही जण उत्स्फुर्तपणे मदतीसाठी पुढे आले आणि हा मदतनिधी वाढत गेला. कार्यक्रम झाला आणि संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात आम्ही जेवणासाठी एकत्र जमलो. पुण्याहून कार्यक्रमासाठी संपादक, प्रकाशक आलाय म्हणून या पत्रकारांनी संगमनेरातील सुप्रसिद्ध असलेली खास चिकन बिर्याणी मागवली होती. ते पाहून माझा पारा एकदम चढला. त्यांचे आतिथ्य महत्त्वाचे होतेच पण दुष्काळासाठी मदतनिधी गोळा करण्याच्या कार्यक्रमात, दुष्काळ याच विषयावर माझे व्याख्यान आणि नंतर जेवणासाठी बिर्याणी ही माझ्यासाठी विसंगती होती. मी माझी नाराजी स्पष्टपणे नोंदवत बिर्याणी खाण्यास नकार दिला. ‘एखादा नेता दुष्काळ दौर्‍यावर असेल आणि त्याच्या समोर मिनरल वॉटरची बाटली जरी दिसली तरी आपण त्याच्यावर तुटून पडत बातमी करतो! मग हे आपल्याला शोभेल का?’ असे म्हणत मी आणि माझे सहकारी परत निघालो. त्यावेळी राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे अशा ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला थांबवले. पिठलं भाकरीची व्यवस्था केली. दोन-दोन घास खाऊन आम्ही परत निघालो. त्यावेळी एक भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे पत्रकार पुढे आले. माझ्या भूमिकेबद्दल अभिनंदन करून ते गळ्यात पडले. ‘तुमचं भाषण जितकं जोरदार आणि प्रभावी झालं तितकंच हे आचरण मला भावलं’ म्हणून त्यांनी कौतुक केलं. त्यांचं नाव संदीप वाकचौरे! ते प्राथमिक शाळेत शिक्षक असून ‘सार्वमत’ या दैनिकाचे पत्रकार आहेत असं कळलं. तेव्हापासून त्यांचं लेखन माझ्या निदर्शनास आलं आणि मी थक्कच झालो. शिक्षणविषयक भूमिका, मते मांडताना ते अजिबात कचरत नाहीत. अंगभूत असलेल्या चांगुलपणामुळं त्यांचं लेखन तितकंच निकोप असतं. सुदृढ समाजाच्या उद्देशानं ते लेखनकार्यात व्यग्र असतात. शिक्षण याच विषयावर जवळपास रोज एक लेख लिहिणं ही किमया सामान्य नव्हती. माझं वास्तव्य पुण्यात असलं तरी मी नाशिकचा आशिक! नाशिकला माझं सातत्यानं जाणं-येणं असतं. मग संगमनेरला जाता-येता संदीप वाकचौरे यांच्याकडे ‘मैत्रीचा टॅक्स’ न भरता जाणं अशक्य झालं. या सगळ्यात आम्ही इतके जवळ आलो की त्यांच्याशी कौटुंबिक स्नेह निर्माण झाला. महाराष्ट्रात अशी खूप अपवादात्मक घरे आहेत की मी कधीही त्यांच्याकडे हक्काने जातो, जेवण करतो, मैफिली रंगवत मुक्काम करतो. तिथं गेल्यावर माझे व्यावसायिक ताण-तणावही भुर्रकन पळून जातात. थोरल्या भावानं धाकट्याचं कौतुक करत त्याचे सगळे लाड पुरवावेत अशी माझी बडदास्त वाकचौरे कुटुंबियांकडून राखली जाते. संगमनेरहून परतताना सगळ्या तणावापासून मन पूर्ण रिकामं झालेलं असतं आणि गाडीची डिकी तिथल्या सेंद्रीय भाज्यांनी भरलेली असते. अर्चनाताई म्हणजे साक्षात सुगरण! त्यात माझी आवड-निवड जपत त्या इतक्या आग्रहाने पाहुणचार करतात की विचारताच सोय नाही. खूप कमी भाग्यवंतांना अशी मायेची माणसं मिळतात. ‘वाईचे उमेश सणस, सातारचे रवींद्र खंदारे, नाशिकचा ज्ञानोबा भोयने, संगमनेरचे संदीप वाकचौरे अशा हृदयस्थांची घरं हेच तुझं आजोळ,’ असं मी ‘यशदा’ला या नकळत्या वयातही सांगत असतो. आचार्य विनोबा भावे यांचं शिक्षणविषयक लेखन मी वाचलंय. त्यांच्या विचारांचा माझ्या मनावर मोठा पगडा आहे. त्यामुळे आजची शिक्षण व्यवस्था एकदम तकलादू वाटते. अशा परिस्थितीत संदीप वाकचौरे यांच्यासारख्या ज्ञानसाधकानं मला भुरळ घातली. विनोबांचाच विचार आजच्या काळात धाडसानं पुढं नेणारे शिक्षणतज्ज्ञ असं त्यांचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांचं वृत्तपत्रीय लेखन मी वाचत होतो. ते काळाच्या ओघात मागं पडेल याचं शल्य बोचत होतं. मग एक दिवस संगमनेर गाठलं आणि त्यांना सांगितलं, ‘चपराकसाठी तुम्ही नियमितपणे लिहायचंय!’ त्यांना वाटलं संपादक या नात्यानं मी एखादा स्तंभ लिहावा असं मी त्यांना सूचवतोय. मी त्यांना सांगितलं, ‘दरमहा एक लेख नाही तर दरमहा शिक्षणविषयक एक पुस्तक तुम्हाला लिहायचंय!’ माझं बोलणं ऐकून आधी त्यांना ती गंमत वाटली. त्यांच्या लेखनाचा आवाका, अभ्यासू वृत्ती, चिकाटी या गुणांमुळं हे शिवधनुष्य ते पेलणार याची मला पूर्ण खातरी होती. शिक्षणासारखा महत्त्वपूर्ण असलेला ‘एक विषय, एक लेखक आणि एकच प्रकाशक’ अशी संकल्पना घेऊन आम्ही या प्रकल्पाचं नियोजन केलं. वर्षभरात बारा पुस्तकं करायची असं आम्ही ठरवलं. गुजराती शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका यांचा शिक्षणविचार मराठीत सांगणारं 'शिक्षणाचे दिवास्वप्न' हे पुस्तक प्रकाशित केलं आणि हा झंजावात सुरू झाला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत शिक्षणविषक कोणता विचार दिला हे मांडणारं ‘शिक्षणाचे पसायदान’ हे पुस्तक आलं आणि अल्पावधित त्याच्या तीन आवृत्त्या झाल्या. जे. कृष्णमूर्ती यांच्यासारख्या किचकट मानल्या जाणार्‍या तत्त्वज्ञाचे शिक्षणविषयक विचार त्यांनी ‘शोध शिक्षणाचा’ या पुस्तकाद्वारे मराठीत आणले. वाल्मिक चौधरी यांच्यासारख्या उद्योजकानं त्यांच्या भाच्याच्या लग्नात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून उपस्थितांना देण्यासाठी या पुस्तकाच्या एक हजार प्रती घेतल्या. प्रारंभी ‘शिक्षणविषयक इतकी पुस्तके कोण वाचणार?’ असं विचारणार्‍या शंकासुरांनी बघितलं की एकाच मांडवात एक आख्खी आवृत्ती संपली. विनोबांचा शिक्षणविषयक विचार सांगणारं ‘विनोबांची शिक्षणछाया’, ‘पाटी पेन्सिल’, ‘एैसपैस शिक्षण’, ‘परिवर्तनाची वाट’, ‘शिक्षणावर बोलू काही’, ‘शिक्षणाचिये द्वारी’, ‘शिक्षणाचे प्रश्नोपनिषद’ अशा पुस्तकांचा धडाकाच त्यांनी लावला. अनेक शिक्षणसंचालकांनी, शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांनी, शिक्षणतज्ज्ञांनी, संपादकांनी इतकेच काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या पुस्तकांची पाठराखण केली, यथोचित प्रस्तावना लिहिल्या.

अमळनेरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. दिल्लीच्या साहित्य संमेलनातही त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा योग आला. वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी या उपक्रमाची दखल घेतली. आकाशवाणीसारख्या माध्यमानं त्यांची मुलाखत घेऊन प्रशंसा केली. कोविडच्या काळातलं शिक्षण, बदलती शैक्षणिक धोरणे, सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी कोणते शिक्षण विचार अंमलात आणावेत या सगळ्याचं सखोल चिंतन त्यांनी त्यांच्या लेखणीद्वारे मांडलं आहे. या मालिकेतलं बारावं पुस्तक पूर्ण होत आलेलं असतानाच एका शासकीय संस्थेच्या राज्यातील शिक्षकांनी वाचण्यासाठीच्या यादीत त्यांची चार पुस्तके आली. मग त्या पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या. आमचा परिचय होण्यापूर्वी तिथल्या एका स्थानिक प्रकाशकानं त्यांचं ‘सृजनाची वाट’ हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याची आवृत्ती संपली होती आणि ‘चपराक’ने केलेल्या त्यांच्या इतर पुस्तकांमुळे या पुस्तकालाही मागणी येत होती. नागपूरच्या लक्ष्मी पुस्तकालयने दोनशे प्रती, नांदेडच्या अभंग पुस्तकालयाने सत्तर प्रती, संभाजीनगरचे साकेत प्रकाशन, पुण्यातील डायमंड, कोल्हापूरचे अक्षर दालन यांच्याकडून या पुस्तकांच्या प्रतींची मागणी आली. मी संदीप वाकचौरे यांना याबाबत कल्पना दिली आणि प्रकाशकांशी बोलण्याबाबत सूचवले. त्यांच्याकडे या पुस्तकाची एकही प्रत शिल्लक नव्हती आणि आता नवीन आवृत्ती काढणे त्यांना शक्य नव्हते. शुक्रवारी संध्याकाळी त्या प्रकाशकांनी हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्याची असमर्थता दर्शविली आणि त्यांच्याकडून तसे पत्र आल्यावर आम्ही या पुस्तकाचे काम सुरू केले. शनिवार आणि रविवार या दोनच दिवसात या पुस्तकाचे डीटीपी, मुखपृष्ट, शुद्धलेखन तपासणे, मांडणी आणि अक्षरशः आयएसबीएन सुद्धा घेऊन छपाई पूर्ण केली आणि तिसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी या पुस्तकाच्या ऑर्डर आम्ही पूर्ण केल्या. ग्रंथ प्रकाशन आणि वितरण यात काम करणारा कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही, अशी किमया आम्ही घडवली. अचानकपणे हे पुस्तक पुढे आल्याने आधी ठरलेले ‘शिक्षणरंग’ हे बारावे पुस्तक तेराव्या क्रमांकावर गेले. मग बारा पुस्तकांची मालिका पूर्ण करून आम्ही हे तेरावे पुस्तक हाती घेतले. त्याचवेळी आमची भाषेवर चर्चा सुरू होती आणि मी त्यांना शिक्षणशास्त्रावर लिहिण्याची गळ घातली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याचे नियोजन सुरू केले आणि आता त्यांचे ‘शिक्षणरंग’ हे सलग तेरावे आणि 'भाषा आणि शिक्षण’ हे चौदावे शिक्षणविषयक पुस्तक ‘चपराक’ तर्फे समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. संदीप वाकचौरे यांनी अथक जिद्दीतून, अत्यंत परिश्रमपूर्वक आणि शिक्षणावरील निष्ठेने हा प्रकल्प पूर्ण केल्याने इतक्या कमी काळात एकाच प्रकाशनाकडून शिक्षणविषयक इतकी पुस्तके प्रकाशित होणारे ते पहिले भारतीय लेखक ठरले आहेत. या प्रकल्पाचा हा समारोप असला तरी हीच खरी त्यांची सुरूवात आहे. एखादा संशोधक विद्यावाचस्पती होण्यासाठी दिवस-रात्र एक करतो. त्या विषयातील संशोधन पूर्ण झाल्यावर त्याच्या नावामागे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागते. अनेकांना त्यांची ही ‘पीएचडी’ म्हणजे कठोर परिश्रमाचा शेवट वाटत असला तरी संशोधक म्हणून त्याची ती खरी सुरूवात असते. संदीप वाकचौरे यांनीही या पुस्तकांच्या निमित्ताने स्वतःला सिद्ध केले असले तरी इथून पुढे त्यांची खरी कसोटी असणार आहे. अनेक विषयांचा सखोल अभ्यास आणि ज्ञानसाधनेची वृत्ती यामुळे ते मराठी साहित्यविश्वाच्या प्रांतात भरीव योगदान देतील याबाबत माझ्या मनात कसलीच शंका नाही. आज त्यांचा जन्मदिन! त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतानाच भविष्यात त्यांच्याकडून अशीच आणखी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती घडो आणि सरस्वती मातेच्या दरबारातील त्यांचे स्थान अढळ राहो, याच शुभेच्छा देतो. - घनश्याम पाटील7057292092

संदीप वाकचौरे यांची पुस्तके घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध

https://shop.chaprak.com/product-category/shaikshanik/

Recent Posts

See All
महाराष्ट्र कन्या 'अहिल्याबाई'

देवी सती अहिल्या भारतभूला ललामभूत जी। राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजी ।। — संतकवी श्री दासगणु महाराज संत श्री दासगणू महाराज यांनी गौरविलेल्या, आणि ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे, असा ज

 
 
 
मुलाखतींचे पर्व निर्माण करणारे सुधीर गाडगीळ

सुधीर गाडगीळ - एक नाव जे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात निवेदनासाठी आणि प्रभावी मुलाखतींसाठी कोरले गेले आहे. या खास मुलाखतीमध्ये, घनश्याम पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलूंना स्

 
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ती' उडी | The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar

"काय, ओळखलंत का मला? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जरी कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढवणं आणि चार काटक

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page