top of page

महाराष्ट्र कन्या 'अहिल्याबाई'

  • May 31, 2025
  • 3 min read

देवी सती अहिल्या भारतभूला ललामभूत जी।राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजी ।।— संतकवी श्री दासगणु महाराज

संत श्री दासगणू महाराज यांनी गौरविलेल्या, आणि ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे, असा जो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणारी महाराष्ट्र कन्या म्हणजे अहिल्याबाई होळकर!

माणकोजी शिंदे हे चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील पोलीस पाटील होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला बाई. ३१ मे १७२५ या शुभदिनी सुशीला बाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. या कन्येचे नाव ठेवले गेले — अहिल्या!

तो काळ स्त्रीशिक्षणाबाबत अत्यंत उदासीनतेचा होता. मुलींच्या शिक्षणाकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. पण माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईला लिहायला-वाचायला शिकवले.

अहिल्येच्या बाबतीत एकदा एक चमत्कारिक घटना घडली. छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्यातील माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना चौंडी येथे थांबले होते. तेव्हा एका देवळात त्यांच्या नजरेस आठ वर्षांची एक चुणचुणीत मुलगी पडली. ती मुलगी मल्हाररावांना खूप आवडली. त्यांनी तिच्या वडिलांकडे आपला मुलगा खंडेराव यासाठी तिचा विवाह करण्याची मागणी केली. आणि जेमतेम आठ वर्षांची असलेली अहिल्याबाई मल्हारराव होळकरांच्या घरात सून म्हणून आली.

https://shop.chaprak.com/product/charitra-smaran/

खंडेराव होळकर हे पराक्रमी असले, तरी बेफिकीर व बेधडक स्वभावाचे होते. परंतु समंजस अहिल्याबाईंनी त्यांना समजूतदारपणे सांभाळले. अहिल्याबाईंनी कधीही पतीची तक्रार केली नाही. मल्हाररावांनी दिलेली कामे त्या दक्षतेने पार पाडू लागल्या. त्यांची कुशाग्र बुद्धी आणि तन्मयतेने काम करण्याची वृत्ती पाहून मल्हाररावांचा सूनबाईवर मोठा विश्वास बसला. राज्यकारभारातील अत्यंत महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवर सोपवून निश्चिंत राहत.

अहिल्याबाई आणि खंडेराव यांना दोन अपत्ये झाली – मालेराव (मुलगा) आणि मुक्ताबाई (मुलगी). अहिल्याबाई वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एक दुर्दैवी घटना घडली. खंडेराव होळकर कुंभेरी येथे १७५४ साली शत्रूशी लढताना मृत्यूमुखी पडले. होळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या वेळच्या प्रथेनुसार अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सासरे मल्हारराव म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य आता तुम्ही सांभाळायचे आहे.” सासऱ्यांचा सल्ला मान्य करून अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. काही वर्षांतच मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्याबाईंनी माळवा प्रांताचा कारभार हाती घेतला.

स्वभावाने शूर व धाडसी असलेल्या अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत, रणांगणात शत्रूचा निःपात करीत. कुशलतेने राज्य चालवताना त्यांनी सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सलोखा, स्त्री-पुरुष समानता, हुंडा प्रथा नष्ट करणे, दत्तक वारसाहक्क, गरीबांप्रती तळमळ, असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबवले.

गुराढोरांसाठी डोण्या बांधणे, पशुपक्ष्यांसाठी औषधोपचाराची व्यवस्था, सर्पदंशावर तातडीचा उपचार करण्यासाठी हकीम-वैद्य नेमणे — हे कार्य त्यांनी विशेषत्वाने केले. स्त्रियांना स्नानासाठी व कपडे बदलण्यासाठी न्हाणीघरांची सोय केली. शासन करताना मानव, प्राणी, वृक्षवेली, सर्व सजीवांचा विचार केला. त्यांनी मुंग्यांसाठी साखर, जलचरांसाठी कणकेच्या गोळ्या द्याव्यात अशी व्यवस्था केली होती.

दानधर्म हे त्यांचे वैशिष्ट्य. सणासुदीला गरिबांना अन्नदान, कपडे वाटप, थंडीच्या दिवसांत घोंगडे देणे यांसारखी उपयुक्त कामे त्यांनी केली.

https://shop.chaprak.com/product/dedipyaman-shalaka/

जनतेच्या मनात त्यांनी “लोकमाता, राजमाता, वीरांगना, पुण्यश्लोक, देवी, मातोश्री” अशा आदरणीय उपाधी मिळवल्या. त्यांच्या न्यायदानाचे नाव दूरवर पसरले होते. त्यांनी घेतलेले निर्णय दोन्ही बाजूंना समाधान देणारे असत. उत्कृष्ट रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती.

प्रजेच्या हितासाठी स्वतःच्याच नव्हे, तर कुटुंबाच्याही आशा-आकांक्षांचा त्याग करावा लागतो, याचे उदाहरण म्हणजे अहिल्याबाई!

मुलगी मुक्ताबाई हिच्या लग्नासाठी त्यांनी एक आगळावेगळं स्वयंवर ठरवलं. राज्यातील कोणीही व्यक्ती चोर-दरोडेखोरांचा नायनाट करील, अशा पराक्रमी व्यक्तीसोबत मुक्ताबाईचा विवाह केला जाईल. त्याचा धर्म, जात विचारात घेतला जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले. एका तरुणाने हे दिव्य पार पाडले. त्याचे नाव होते – यशवंतराव फणसे! जाहीर केल्याप्रमाणे मुक्ताबाई व यशवंतराव यांचा विवाह संपन्न झाला.

अहिल्याबाईंच्या ग्रंथसंग्रहात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी हस्तलिखित ग्रंथ होत्या. विद्वानांना त्यांच्या गुणानुसार मानसन्मान दिला जात असे. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा त्यांनी सत्कार केला.

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, डेन्मार्कची राणी यांच्याशी केली. लॉरेन्स म्हणतात, “ज्या दिवशी जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य त्यामध्ये निश्चित नोंदले जाईल.” हा मोठाच सन्मान होय.

त्यांच्या जीवनात अनेक दुःखद घटना घडल्या — दोन भाऊ मृत्यू पावले, नातू नाथ्याबा तारुण्यातच गेला, जावई यशवंतराव फणसे अकाली मरण पावले आणि मुक्ताबाई सती गेली. असे अनेक आघात पचवतानाही ही कर्तव्यदक्ष सम्राज्ञी १३ ऑगस्ट १७९५ रोजी हे जग सोडून गेली.

विनम्र अभिवादन!

— नागेश शेवाळकर, पुणे(९४२३१३९०७१)

Recent Posts

See All
मुलाखतींचे पर्व निर्माण करणारे सुधीर गाडगीळ

सुधीर गाडगीळ - एक नाव जे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात निवेदनासाठी आणि प्रभावी मुलाखतींसाठी कोरले गेले आहे. या खास मुलाखतीमध्ये, घनश्याम पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलूंना स्

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page