मनात काय याचे निरीक्षण म्हणजे अध्यात्म : साधुवाणी भाग २
- Jyoti Ghanshyam
- Jun 27, 2025
- 7 min read
दुसऱ्या दिवशी मला जाग आली, तेव्हा बाबाजी उठून नदीवर आंघोळीला गेले होते. मी आधी गिरीशला फोन लावला. तो बसमध्ये बसला होता. त्याला यायला किमान दीड तास लागणार होता. मी हातात झाडू घेऊन केर काढू लागलो.
मला केर काढायला आवडतो. घरातला केर मीच काढतो. बेडखालून, कपाटाखालून झाडू फिरवून घर लख्ख करतो. काही लोक मला कंजूसही म्हणतात, कारण मी केर काढायला कोणी सेवेकरी ठेवलेला नाही. पण केर काढताना मला खूप शांत वाटतं. शिवाय, आपलंच घर स्वच्छ करायला लाज कसली? सगळा आश्रम झाडून काढल्यावर मला खूप बरं वाटायला लागलं. आश्रम म्हणजे एक मोठी हॉलसारखी पडवी. एक बाजू पूर्णपणे उघडी, पण जाळीने बंदिस्त. पांढरा चुना फासलेल्या भिंती. भिंतींवर जुनी कॅलेंडर्स. खुंटीला अनेक पिशव्या लटकवलेल्या होत्या. घर वाटावा असा आश्रम, पण आजच्यासारखं घर नाही बरं का! आजपासून तीस वर्षांपूर्वी जशी घरं असायची, तसा. हॉलमध्ये सोफा नाही, तर कॉट. खुंट्या, कोनाडे आणि त्यात ठेवलेल्या काहीशा अव्यवस्थित वस्तू. ‘कधीतरी लागेल’ म्हणून कोंबून ठेवलेलं सामान. घराची, घरातील सामानाची लाज न वाटता, रचून ठेवलेल्या वस्तू... इथे माणसं राहतात, साधी माणसं, तुमच्या-आमच्यासारखी खरीखुरी माणसं. ही काही पॉश, खोटी-खोटी दुनिया नव्हती.
इथे साधं राहण्याची लाज वाटत नाही आणि कुणाला इम्प्रेस करायची गरजही नाही. जे चाललं आहे, ते चांगलंच चाललं आहे.
बाबाजींच्या बेडसमोर एक छोटे स्टूल होते. त्यावर त्यांचा छोटा चांदीचा पेला आणि स्टीलची मोठी वाटी होती, जी ते बशीसारखी वापरायचे.
शिवाय वातावरणात मला आवडणारी शांतता होती. अधूनमधून पक्षांचे आवाज येत होते. एकटा असताना कानात येणारा ‘सुई...’ असा आवाज. शांततेत मन आपोआप सजग होतं. सगळं कसं गात्र न् गात्र शांत करणारं. मी केर सुपलीत भरत होतो.
‘घर असो वा मन, अस्वच्छ आपणच करतो! मग साफही आपणच करायचं,’ खांद्यावर पंचा ठेवून आलेले बाबाजी मला म्हणाले. कुपोषित वाटावा असा त्यांचा देह, पण भलताच काटक. सुरुवातीला मला वाटायचं की हे फक्त गांजावरच जगतात की काय! पण मग त्यांचा सहवास लाभल्यावर ते दोन वेळं व्यवस्थित जेवतात, हे समजलं.
केर टाकायला मी बाहेर गेलो, तर समोर नदीत एक प्राचीन मंदिर उभं असलेलं मला दिसलं. ‘समोरचं हे मंदिर! हे इथे कुठून आलं?’ मी म्हणालो.
‘मंदिर तर तिथेच आहे, हजारो वर्षांपासून.’
‘मी इतक्या वेळा आलो, पण मला कधीच कसं दिसलं नाही? प्राचीन मंदिरं तर माझ्या आवडीचा विषय.’
‘अशा अनेक गोष्टी मनाच्या तळाशी जाऊन रुतलेल्या असतात. दुःखे, अपूर्ण स्वप्ने... डोळ्यांतलं पाणी आटलं की कधीतरी त्या अशा वर येतात. मग आपण त्यांना तटस्थपणे बघू शकतो.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे, पुढे वर धरण बांधलं आहे. त्यामुळे आता पाणी कमी झालं आणि त्यात बुडालेलं हे मंदिर परत वर आलं.’
‘मला तर पळत जावंसं वाटत आहे त्या मंदिरात.’
‘जा की मग.’
‘गिरीश येईल दीड तासात. त्याला आणायला गावापर्यंत जावं लागेल. हा रस्ता त्याच्या एकदम लक्षात नाही येणार. नंतर जातो,’ मी म्हणालो.
‘कधीतरी विश्वास ठेवायला शीक. येईल तो. तू त्याला पत्ता सांगितला आहेस. ही एकच पायवाट आहे. चुकायचा विषयच नाही.’
‘तरीही बाबाजी, माझी जबाबदारी आहे. मावशीने माझ्या भरवशावर त्याला पाठवलं आहे.’
‘ना कुणाची जबाबदारी, ना कुणाचा भरवसा. भरवसा फक्त त्याचा,’ बाबाजी म्हणाले.
मी गिरीशला फोन लावला. ‘येईन मी अण्णा. काही अडचण नाही,’ तो म्हणाला. तरीही त्याला मी परत-परत कसं यायचं, याबद्दलच्या सूचना दिल्या.
बाबा म्हणत होते ते बरोबर होतं. माझा अजूनही विश्वास, भरवसा कमी पडत होता. हा अविश्वास होता, की स्वतःवरचा फाजील विश्वास होता? सगळं काही माझ्या नियंत्रणात आहे, हा भाव होता का? नियंत्रणात नसलेल्या गोष्टीही स्वतःच्या नियंत्रणात आणायचा अट्टहास होता का?
माझ्या मनातले विचार ओळखून बाबाजी म्हणाले, ‘समज, तू त्याला आणायला गेलास; पण वाटेतच त्याच्या बसचं काही झालं, तर मग कोणाची जबाबदारी?’
‘बाबाजी, असं काय बोलताय! मला भीती वाटतेय.’
‘काळजी करू नकोस. तसं काही होणार नाही,’ बाबाजी म्हणाले, तसं मला जरा हायसं वाटलं.
https://shop.chaprak.com/product/shri-chhatrapati-shivaji-maharaj-charitra/#google_vignette
बाबाजींनी मला धुनीत टाकायला थोडी वाळलेली लाकडं आणायला सांगितली. मी आश्रमाच्या बाहेर आलो. गर्द जंगल, त्यात पडलेला पाचोळा. त्यावर पाय दिला की चूर-चूर आवाज करत चुरगळणारी पानं. खाली पडलेल्या दोन-चार वाळक्या फांद्या उचलल्या आणि धूम ठोकली. जंगलातील मंदिरात, आश्रमात छान वाटतं, पण प्रत्यक्ष जंगलात मात्र भावना थोड्या संमिश्र असतात. सुरुवातीच्या शांतीची आणि अपूर्वाईची जागा हळूच, नकळत भीती घेते. सुरुवातीला बाबाजींचीही भीती वाटायची, पण सहवास लाभल्यावर ती नाहीशी झाली. या साधू लोकांचा अवतारच असा असतो की कुणालाही भीती वाटावी. माणसं साधू बनतात साधना करण्यासाठी. सर्वसामान्य माणसं त्यांच्याभोवती गराडा घालतात, प्रापंचिक समस्यांतून मुक्ती मिळावी म्हणून. मग या सगळ्यांनी गर्दी केली, तर साधू साधना कधी करणार? म्हणूनच मग हा असा अवतार. लोकांनी पाहून लांबूनच नमस्कार करावा, पण जवळ जाण्याची भीती वाटावी. यामुळे साधूंच्या साधनेत कोणताही व्यत्यय येत नाही.
हातातल्या फांद्या बाबाजींसमोर टाकल्या, तेव्हा ‘खूळ’कन आवाज आला. लाकूड आतून पोकळ असावं. त्यातील एक फांदी घेऊन धुनीत सरकवत बाबाजी म्हणाले, ‘काही नाही वेद-बिद! ही समोरची धुनी आहे ना, हेच काय ते सत्य.’
‘म्हणजे काय, मला समजलं नाही,’ असं म्हणावंसं वाटत होतं, पण मी गप्प बसलो. एकदम समजलं नाही तरी हळूहळू आत झिरपतं, हे एव्हाना मला समजलं होतं. पाण्याच्या प्रपाताखाली दगड जरी शांत बसला, तरी त्याच्यातही काहीतरी शिरतंच. पाणी पडत असलेल्या ठिकाणी खोलगट भाग तयार होतो. शांत बसणं महत्त्वाचं.
‘हे झाड, ही आग, ही राख... सगळं एकच! हेच वेदांत,’ बाबाजी म्हणाले, ‘झाड, त्याचा ओंडका. ओंडका, त्याची राख. राख, त्याचं परत झाड. सारं काही एकच. बस्स, दुसरं काही नाही,’ बाबाजी म्हणाले.
त्यांनी लाकूड आणखी आत सरकवलं, तसं ते ‘भस्स’कन पेटलं. आतापर्यंत मंद असलेल्या धुनीत एकदम मोठा जाळ झाला.
‘अजून आला नाही हा पोरगा. फोनही लागत नाहीये याचा. उगाच ये म्हटलं याला,’ मी म्हणालो.
बाबाजी मस्त चिलीम पीत, भिंतीला पाठ टेकून बसले होते. मी परत फोन लावला. या वेळी फोन लागला.
‘कुठे आहेस तू?’ मी विचारलं.
‘येतोय अण्णा, वाटेत आहे.’
‘मी येतो तुला घ्यायला.’
‘नको अण्णा. इथे एक सद्गृहस्थ भेटले. त्यांना आश्रम माहीत आहे. ते रस्ता दाखवतो म्हणाले.’
‘नक्की का? कोणता आश्रम सांगितलास तू?’
‘गणेश महाराजांचाच आश्रम.’
‘अरे, येईल तो. इथे दूरदूरपर्यंत दुसरा कोणी गणेश महाराज नाही,’ महाराज म्हणाले.
गणेश महाराजांचं काळं, रापलेलं, कृश शरीर पाहताना वाटावं, ‘किती गांजलेला म्हातारा आहे!’ पण त्यांना बोलताना आणि त्याहून जास्त चालताना पाहिलं की एखाद्या आयएएस ऑफिसरचा रुबाब जाणवायचा. बाहेर जाताना पांढरी धोती, पांढरं उत्तरीय, डोळ्यांवर गॉगल, खांद्यावर स्लिंग बॅग आणि काळ्या कपाळावर वैष्णव पद्धतीने लावलेला चंदनाचा नाम... प्रचंड आत्मविश्वास आणि बेफिकिरी यांचा मिलाफ.

‘जेवायला काय करायचं?’ मी विचारलं. ‘येईल हाथी,’ महाराज म्हणाले. हाथी त्यांचा आदिवासी सेवक होता. इथे फारसे उद्योगधंदे नाहीत, शाळा नाहीत. अनेक आश्रम हाथीसारख्या आदिवासी मुलांना ठेवून घेऊन जवळच्या शाळांमधून शिकवतातही. ही मुलं शिकतातही. मुळात त्यांची भाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी, तरीही ती शिकतात. पण दहावी झाल्यावर पुढे काय करायचं, हा प्रश्न असतोच. ‘याचं या महिन्यात कुंभमेळ्यात संस्कार करायचे आहेत,’ बाबाजी म्हणाले. ‘हल्ली मुलं मिळतातच कुठे? पण कोणीतरी उत्तराधिकारी तर नेमायला हवा ना.’ पूर्वीच्या काळी सगळ्याच घरांत मुलं जास्त असायची. अशावेळी परिवारातला एक मुलगा आश्रमाला दिला जायचा. ही मुलं बालवयातच साधू बनायची. मागे एकदा मी बाबाजींना विचारलं होतं की, ‘तुम्ही लहानपणीच साधू बनलात का?’ तेव्हा ते मला म्हणाले होते की, ‘साधू लहानपणी बनलं, तरच बनता येतं. एकदा का बाहेरच्या जगाची हवा लागली की मन विचलित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. मग साधू बनणं अशक्य असतं.’ पण आता प्रत्येक घरात एक-दोनच मुलं. मग कोण आपलं एकुलतं एक मूल धर्मासाठी, साधू बनण्यासाठी आश्रमांना देणार? मग गादीसाठी असा कुणीतरी उत्तराधिकारी शोधावा लागतो. हाथी सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांचा युवक होता. कष्टाळू, प्रामाणिक! पण त्याचा धार्मिक गोष्टींशी कसलाही संबंध नव्हता. तरीही, या कुंभमेळ्यात त्याला संन्यास धर्माची दीक्षा दिली जाणार होती. समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडलं. ते घेण्यासाठी देव आणि दानव यांचं युद्ध झालं. त्या गोंधळात अमृतकुंभातील चार थेंब पृथ्वीवर पडले. हे चार थेंब ज्या ठिकाणी पडले, ती ठिकाणं म्हणजे प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक. या चारही ठिकाणी प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. ‘महाराज, तिथे जी दीक्षा दिली जाते, ती कशी असते? म्हणजे सामूहिक कार्यक्रम होतो की कसा?’ मी विचारले. ‘संन्यासदीक्षेचा विधी सामूहिकच होतो. डोईवरचे केस भादरले जातात. संसारी वस्त्रं त्यागली जातात. स्वतःचं जिवंतपणी पिंडदान केलं जातं. हे सगळे विधी सामूहिक केले जातात. गुरुमंत्र मात्र ‘प्रायव्हेट’ दिला जातो,’ बाबाजी म्हणाले. बाबाजी संभाषणात असा एखादा इंग्रजी शब्द वापरायचे, तेव्हा मला हसू यायचं. ‘मलाही यायचं आहे कुंभमेळ्याला. मागच्या वेळी अलाहाबादच्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी रेल्वेचं रिझर्वेशनसुद्धा केलं होतं, पण जानेवारीत वडील अचानक वारले आणि जाता आलं नाही. आता या वेळी जायची फार इच्छा आहे,’ मी म्हणालो. ‘काय करणार आहेस तू कुंभमेळ्यात जाऊन?’ बाबाजी पटकन म्हणाले. ‘कुंभमेळ्यात फक्त साधू-संन्याशांचं काम.’ ‘महान साधू-महात्म्यांचं दर्शन होतं,’ मी म्हणालो. ‘त्यानं काय होणार?’ बाबाजी म्हणाले. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मग बाबाजी म्हणाले, ‘दर्शन म्हणजे काय? नुसतं एखाद्या साधू-संताला पाहून कुणाच्या प्रापंचिक अडचणी सुटतात का? आणि सुटल्या तरी नवीन अडचणी निर्माण होत नाहीत का? दर्शन घ्यायचं असतं स्वतःचं, स्वतःच्या मनोवृत्तीचं. मनात काय काय चाललं आहे, याचं निरीक्षण करणं म्हणजेच खरं अध्यात्म. म्हणूनच संस्कृतमध्ये तत्त्वज्ञानाला ‘दर्शन’ हा शब्द आहे.’ गिरीश दारात आला आणि आमचं बोलणं तिथेच थांबलं. ‘काय रे! बराच वेळ लागला तुला यायला...’ मी त्याला म्हणालो. ‘अण्णा, वाटेत एक साधू महाराज भेटले. त्यांच्याशी बोलत बसलो, त्यामुळे थोडा वेळ लागला,’ गिरीश म्हणाला. ‘कोण साधू महाराज?’ ‘मी नाव नाही विचारलं त्यांचं.’ ‘इथे तर वाटेत दुसरा कोणताही आश्रम किंवा मंदिर नाही,’ मी म्हणालो. तसे बाबाजी म्हणाले, ‘असेल कुणीतरी. नर्मदा खंडात साधू-संतांची काय कमी?’ ‘हे बघ अण्णा, त्यांनी मला प्रसाद म्हणून हा रुद्राक्ष दिला,’ गिरीश म्हणाला. ‘आंघोळ करून घे. दुरून आला आहेस,’ बाबाजी म्हणाले. मी उठून गिरीशला आतली मोरी दाखवली. तो आंघोळीला गेला. ‘धोती आणली आहेस का?’ मी त्याला विचारलं. ‘हो. तू फोनवर सांगितल्याप्रमाणे आणली आहे,’ तो म्हणाला. सुरुवातीला मलाही हा नियम माहीत नव्हता. असंच मी एका आश्रमात गेलो होतो. बरीच मंडळी होती त्या आश्रमात. स्वयंपाकी एकच, वीस-बावीस वर्षांचा मुलगा. तो एकटा चाळीस माणसांना रांधणार म्हटल्यावर मी लगेच त्याच्यामागे स्वयंपाकघरात गेलो. ‘हे कपडे घालून आत यायला परवानगी नाही,’ तो मला म्हणाला. त्याचा रोख माझ्या पँटकडे होता. तेव्हा मला समजलं की आश्रमाचा हा नियम असतो. धोतीशिवाय कोणत्याही आश्रमाच्या स्वयंपाकघरात प्रवेश नसतो. मग मात्र मी दोन धोतऱ्या विकत घेतल्या. विकत घेतल्या तरी नेसता कुठे येत होत्या? मग नेसायला शिकून त्यात वावरण्याचा चांगला सराव केला. ‘त्यात काय असतं? लुंगीसारखी गुंडाळायची. काष्टा थोडीच असतो?’ मला एक आश्रमवासी म्हणाला होता. ‘तू म्हणतोयस खरं, पण माझ्यासारख्या शहरी माणसाला याची सवय नसते. घरात आम्ही ट्रॅक पँट्स वापरतो,’ मी म्हणालो. मग मलाही धोतीची सवय झाली. मी आधी घेतलेली धोती डबल होती, पण मग आश्रमातील तरुण मुलांना बघून मी हाफ धोती घेतली. ती छान सुती पण फ्रेश रंगांची होती. जांभळा, अबोली, फिकट हिरवा, करडा, निळा अशा छान प्लेन रंगांत धोतऱ्या येतात. आपल्या महाराष्ट्रात त्या मिळत नाहीत, पण मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात सहज मिळतात. काशीच्या रेशमी काठाच्या धोतऱ्या हा एक आणखी वेगळाच प्रकार आहे. ‘बाबाजी, गिरीशला त्या बाबांनी प्रसाद म्हणून रुद्राक्ष दिला,’ मी म्हणालो. ‘दिला असेल.’ ‘म्हणजे, हे साधू असे रत्न, रुद्राक्ष वगैरे देतात, त्याने प्रापंचिक अडचणींचा काही निपटारा वगैरे होतो का?’ मी विचारलं. ‘देणारे देत असतील. आम्ही तर असं काही देत नाही.’ ‘मग का दिला असेल त्या बाबांनी गिरीशला?’ ‘त्याने मागितला असेल. मागतात म्हणून देतात.’ ‘नाही. त्याने नाही मागितला. मी विचारलं त्याला,’ मी म्हणालो. ‘मग देणाऱ्याला त्याच्याकडून काहीतरी हवं असेल, म्हणून दिला असेल. उगाच कुणी काही देत नाही,’ बाबाजी चिलीम पेटवत म्हणाले. इतक्यात आश्रमात आणखी दोन लोक आले. बाबाजींच्या जवळ प्लास्टिकच्या खुर्च्या घेऊन ते बसले. त्यांपैकी एकजण गावातील मंदिराचा पुजारी होता, तर दुसरा भिक्षुकी करणारा ब्राह्मण. पुजाऱ्याने धोतराचं एक टोक ग्लासमधल्या पाण्याने ओलं केलं. बाबाजींनी त्याच्या हातात चिलीम दिली. त्याने एक कश ओढला आणि मग तोंड उघडलं. त्याच्या नाका-तोंडातून धूर निघाला. त्याने चिलीम माझ्याकडे देऊ केली. ‘नाही. मी ओढत नाही,’ असं मी म्हणालो. मग त्याने भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणाकडे ती दिली. त्या तिघांच्या वर्तुळात ती चिलीम फिरत राहिली. बाबाजींच्या आश्रमातच मागे एकदा मला गांजाची झाडं पाहायला मिळाली होती. मी गेलो तेव्हा बाबाजी पालेभाजी निवडावी तसा गांजा निवडत बसले होते. त्यांनी आश्रमाच्या मागच्या बाजूला गांजाचं पीक घेतलं होतं, असं ते म्हणाले. ‘विकायला नाही, आपल्या वैयक्तिक वापरासाठी,’ ते म्हणाले. पूर्ण खोलीभर गांजाची हिरवी पानं पसरलेली होती. बाबाजींनी तो निवडला. मग हाथीने तो वाळवून त्याचे गोळे बनवून ठेवले. एखाद्या गृहिणीने वर्षभराची मिरची निवडून, वाळवून ठेवावी, तसंच. त्यानंतर मात्र मला बाबाजी तसं काही करताना दिसले नाहीत. नाही म्हणायला, कुंडीत तुळस लावावी, तसं एकच रोप एका तेलाच्या डब्यात लावून खिडकीत ठेवलं होतं. ‘काय सांगू तुला! चार वेळा पोलीस हात जोडून विनंती करून गेला मला. ‘ही रोपं लावू नका, मी अडचणीत येईन,’ असं तो म्हणत होता. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, पण तो इतक्या वेळा गयावया करून गेला की त्याला त्रास नको म्हणून मी परत नाही उगवला गांजा.’ क्रमशः- महेश सोवनी9511773618प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' फेब्रुवारी २०२५ https://chaprak.com/e-magazines/
.jpg)







Comments