महाराष्ट्रातील संत : भागवतधर्मी की विद्रोही?
- Jyoti Ghanshyam
- Jun 9, 2025
- 14 min read
महाराष्ट्रातील संतांना विद्रोही ठरविण्याचा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न चालू आहे. संत हे ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, अशी मांडणी केली जाते. या मांडणीत खरोखर तथ्य आहे काय? ब्राह्मणी हिंदू धर्माचे स्वरूप काय आहे? संत विद्रोही आहेत काय? ते विद्रोही असतील तर त्यांच्या विद्रोहाचे स्वरूप काय आहे? संतांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या पंगतीला बसविले जाते. ते खरोखर संयुक्त आहे आहे का?
आता पहिली गोष्ट, येथे ‘ब्राह्मणी हिंदू धर्म’ असा उल्लेख का केला त्याचा परामर्श घेऊ. हिंदू धर्माचे नाव खरेतर धर्मग्रंथानुसार हिंदू धर्म असे नाही. या धर्माला वैदिक धर्म, हिंदू धर्म, ब्राह्मणी धर्म, सनातन धर्म, आर्यधर्म, वर्णाश्रमधर्म, भागवतधर्म अशी अनेक नावे आहेत. यापैकी काही नावे या धर्माच्या ठरावीक भागालाच व्याप्त करतात. हिंदू धर्म हे मोघम सर्वसमावेशक नाव आहे. हिंदू हे नाव परकीयांनी दिलेले आहे यात वाद नाही. पारशी लोकांनी येथील लोकांना हिंदू म्हटले होते, धर्माला नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. मुस्लिमांनी हिंदू हे नाव प्रखरपणे प्रचलित केले. मुसलमानांच्याही मते भारतातील सर्वच काफिर हिंदू होत. मग ते हिंदू असो, जैन असो, बौद्ध असो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू शब्दाचा अर्थ हीनवाचक दिलेला आहे.
एकंदरित पाहता हिंदू हे या धर्माचे नाव नाही. त्यापेक्षा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेले ‘आर्यधर्म’ हे नाव जास्त संयुक्तिक आहे. ‘कृण्वंतो विश्वमार्यम’ ही आर्यांची घोषणाच होती. धर्मग्रंथांमध्ये किंवा संतसाहित्यात कुठेही हिंदू हा शब्द नाही. (अपवाद - तुकारामांच्या गाथेत हिंदू धेड चमार असा उल्लेख आहे.) संत साहित्यात यास स्पष्टपणे भागवत धर्म असे म्हटलेले आहे. राजू परूळेकर यांच्या मते, यजुर्वेदात या धर्मास ब्राह्मण धर्म म्हटलेले आहे. वैदिक धर्म हे नाव या धर्मास आणखी जास्त संयुक्तिक वाटते. सर्व शास्त्रे, पुराणे, उपनिशदे, रामायण, महाभारत हे सर्व वेदांना अनुसरतात अशी कायम मांडणी केली जाते. त्यामुळे वैदिक धर्म नाव बरेचसे बरोबर आहे. सनातन धर्म वगैरे या धर्माचे नाव नाही, हे अलीकडे दिलेले एक विशेषण आहे.
इतके असूनही मी ‘ब्राह्मणी हिंदू धर्म’ असा उल्लेख करत आहे कारण ‘हिंदू धर्म’ हा शब्द आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर द़ृढ झाला आहे. या हिंदू धर्माची दोन रूपे स्पष्टपणे दिसतात. एक ब्राह्मणी हिंदू धर्म आणि दुसरा अब्राह्मणी हिंदू धर्म. संजय सोनवणी हे ब्राह्मणी हिंदू धर्माला वैदिक धर्म म्हणतात आणि अब्राह्मणी हिंदू धर्माला हिंदू धर्म असे म्हणतात.
हिंदू धर्माच्या या दोन रूपांमध्ये भेद आहेच, हे कोणीही नाकारणार नाही. ब्राह्मणी हिंदू धर्मात वेद, पुराणे यातील देवता म्हणजे इंद्र, अग्नि, वरूण, वायू, विष्णू, शिव, विष्णुचे राम-कृष्णादिक अवतार, गणेश, सरस्वती वगैरे देवतांची उपासना केली जाते तर अब्राह्मणी हिंदू धर्मामध्ये खंडोबा, म्हसोबा, भैरोबा, जानाई, जोखाई, मरीआई वगैरे देवतांची उपासना केली जाते.
आता ब्राह्मणी हिंदू धर्म का म्हणायचे? याचे कारण वेद पुराणे उपनिषदे वगैरे सर्व ब्राह्मणांनीच रचले आहेत. ते ब्राह्मण समुदायाकडून पिढ्या न पिढ्या संरक्षित होत आलेलं आहे. संस्कृत ही प्राय: ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. व्यास, वाल्मिकी वगैरे शूद्र होते, असल्या युक्तिवादात काही अर्थ नसतो. मुळात तेही ब्राह्मण आहेत हे सिद्ध करता येते. म्हणून हा ब्राह्मणी हिंदू धर्मच आहे! ब्राह्मणी परंपरेतीलच हे ग्रंथ आहेत. उगीच मखलाशा करण्यात काही अर्थ नाही.
संत या ब्राह्मणी परंपरेचे पाईक होते. सुरूवातीला संतांनी अब्राह्मणी हिंदू धर्माची परंपरा कशी नाकारली होती याविषयी तुकाराम महाराजांचा एक अभंग सविस्तर पाहू.
नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥1॥बळिया माझा पंढरीराव । जो ह्या देवांचाही देव ॥2॥रंडी चंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ॥3॥बहिरव खंडेराव । रोटी सुटीसाठीं देव ॥4॥गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥5॥मुंजा म्हैसासुरें । हे तों कोण लेखी पोरें ॥6॥वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळे ॥7॥तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥8॥
यात गणपती सोडला तर सर्व अब्राह्मणी देव आहेत. त्यांची संत तुकाराम महाराजांनी निर्भत्सना केली आहे. त्या देवांना नाकारले. अब्राह्मणी परंपरेला संत स्पष्टपणे नाकारतात. गणपतीच्या बाबत जरी तुकाराम महाराजांनी येथे विरोधात्मक भूमिका घेतलेली दिसत असेली तरी अन्यत्र संत तुकाराम महाराजांनी गणेशाला मान्यता दिलेली आहे. उदा. शिव शक्ती आणि सूर्य गणपती । एकचि म्हणती विष्णुस ही ॥ अन्य संतांनीही गणेशाला वंदन करून त्याची स्तुती केली आहे पण गणेश वगळता वरील अभंगातील इतर देवांची संतांनी अन्यत्र कोठे स्तुती केल्याचे अजिबात दिसत नाही. तरीही अब्राह्मणी परंपरेचे विचारवंत, जे या देवांना मानतात ते तुकाराम महाराजांनाही प्रमाण मानतात ही वैचारिक विसंगती आहे.
ब्राह्मणी परंपरेतही दोन मुख्य परंपरा दिसतात. एक वैदिक पंरपरा आणि दुसरी पौराणिक परंपरा. या पौराणिक परंपरेला काही लोक अवैदिक परंपरा म्हणतात पण या पौराणिक परंपरेचे सर्व ग्रंथ म्हणजे, अठरा पुराणे, अठरा उपपुराणे, रामायण, महाभारत ही सर्व ब्राह्मणी रचना आहे, याबाबत मला तिळमात्र शंका नाही. आता आणखी एक गोष्ट, पौराणिक परंपरा ही बर्याच अंशी वैदिक परंपरेपेक्षा वेगळी आहे. काही बाबतीत विरोधीही आहे पण ही देखील ब्राह्मणी परंपराच आहे.
पौराणिक परंपरेतही पुन्हा सांप्रदायिक भेद आहेत. शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण ही शैव पुराणे आहेत तर श्रीमद्भागवत पुराण, विष्णुपुराण, पद्मपुराण वगैरे वैष्णव पुराणे आहेत. रामायण, महाभारत यांनाही वैष्णव महाकाव्ये म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. बाकी काही शाक्त, काही गाणपत्य संप्रदायाची पुराणे आहेत.

या सर्वांमध्ये संत हे वैष्णव संप्रदायाचे पाईक होते. वारकरी स्वत:ला वैष्णव म्हणवून घेतो. याचा अर्थ ही ब्राह्मणी वैष्णव परंपरा आहे. श्रीमद्भागवत ग्रंथात यालाच भागवत धर्म असे म्हणतात. भागवत धर्मामध्ये सर्व वैष्णव पुराणे, रामायण, महाभारत हे ग्रंथ प्रमाण मानले जातात. तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात, ‘‘तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पाहावे पुराणी विचारोनी ॥’’ यात पुराणी विचारोनी पाहणे म्हणजे वैष्णव पुराणात पाहणे असा याचा अर्थ होतो. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायात गीता आणि श्रीमद्भागवत पुराण हे दोन ग्रंथ पूर्णपणे प्रमाण मानले जातात. तुकाराम महाराज म्हणतात,
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥
विष्णू ही एक वेदातील दुय्यम देवता आहे. या देवतेला वैष्णव पुराणांनी मुख्य देवता मानून त्यांची उपासना सुरू केली. विष्णुने दहा अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, बौद्ध (विठ्ठल) आणि कल्की. विष्णू वैकुंठात राहतो. तेथे क्षीरसागरी शयन करतो, लक्ष्मी त्यांची सेवा करत असते. त्यानंतर पृथ्वीवर दैत्य वगैरे माजतात. त्यावेळी भगवान विष्णू वेगवेगळे अवतार घेतो आणि त्या दैत्यांचा नायनाट करतो, भक्तांचे रक्षण करतो, असा हा एक सर्वसाधारण साचा आहे.
विष्णुने अवतार घेतले हे सर्व संतांना मान्य आहे. संत नामदेव महाराजांनी प्रत्येक अवतारांवर अभंग लिहिले आहेत. सर्व दहा अवतारांचे एकत्रित वर्णन करणारे अभंगही खूप आहेत. खालील रचना त्या द़ृष्टीने चिंतनीय आहे.
प्रथम अवतारी । स्तवन करिताचिं पै विधीं ।करूणासागर गुणनिधी । शंखासुर वधोनीं ॥1द्वितीयें संकटी । इंद्रासी, कुर्मरूप होसीं ।सिंधू मंथुनिया श्रमलासीं । सौख्य समस्ता देसीं ॥2॥त्रितीये वराह हिरण्याक्षी । धरूनी त्याची कुक्षी ।पळता धरियेला उनलक्षी । फोडुनी त्याचीं वक्षी ॥3॥चतुर्थ नरसिंह । विशाळ अग्निचा कल्लोळ ।निवटूनी असूर तेजाळ । काढी आंत्रमाळ ॥4ं।पंचम वामन सुंदर । क्षिराब्धीचा वर ।जेणें भुलविला दिनकर । हरिला दानासूर ॥5॥पष्ठम भार्गव अभिदानी । पिता जमदग्नी ।पृथ्वी निक्षत्री त्रिबाणी । दिधली विप्रा दानी ॥6॥
या प्रमाणे पुढे श्रीराम, श्री कृष्ण, बौद्ध, कल्की या अवतारांचे वर्णन आहे. संतांना हे सर्व अवतार मान्य आहेत. भगवान विष्णुंनी हे सर्व अवतार घेतले यावर संतांची द़ृढ श्रद्धा आहे. विशेष म्हणजे हे पुरोगामी आणि बहुजनवादी लोक ज्या वामन आणि परशुरामाचा प्रचंड द्वेष करतात, काही दिवसांपूर्वी तर दिवाळी पाडव्याला /बलिप्रतिपदेला वामनदहन हा कार्यक्रमही आयोजित केला जात असे, या वामनाना संत विष्णुचा अवतार मानून पूजनीय मानतात. मग हे संत कोणत्या अर्थाने ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्माच्या विरोधात आहेत?
आता ज्या अभंगांच्या जिवावर संत हे ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विरोधात आहेत ते अभंग, ते तत्त्वज्ञान आणि ती भूमिका नेमकी काय आहे याचा फार गांभीर्याने सखोल अभ्यास केला पाहिजे.
तत्पूर्वी एक गोष्ट, बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवढे प्रखरपणे ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विरोधात होते हे नीट लक्षात घेतले पाहिजे. महात्मा फुल्यांचा ‘गुलामगिरी’ हा एकच ग्रंथ संपूर्ण ब्राह्मणी हिंदू धर्म नाकारतो. त्यांनी या ग्रंथात आणि ‘शेतकर्यांचा आसूड’ या ग्रंथात विष्णुच्या अवतारांवर कडाडून आणि जहरी टीका केली आहे. त्यांनी मुळातच हे सर्व नाकारले आहे. त्यांनी विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाविषयी काय लिहिले आहे ते एकदा वाचा म्हणजे कळेल की, महात्मा फुले आणि संत परंपरा यात केवढा विरोध आहे! ज्या विठ्ठलाला संत जीव की प्राण मानतात, तुकाराम महाराज म्हणतात,
नाही घडविला, नाही बैसविला । आला पुंडलिका भेटावया ॥तुका म्हणे देव घडविला म्हणती । तया मुखाप्रति किडे पडो ॥विठ्ठल मूर्तीविषयी संत तुकाराम महाराज हे म्हणतात. याच्या विरोधात महात्मा फुले म्हणतात,सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल । पंढरी सकळ वेडी केली ॥विठ्ठलाची मूर्ती ध्यान मनी धरी । गाता ताल धरी नाच्यापरी ॥निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो । पकव्यास घालितो स्त्रियासंगे ॥सुखरूप होशी उपदेश करी । वेडा वारकरी जोती म्हणे ॥
ही विठ्ठलाची आणि वारकरी संप्रदायाची टिंगल आहे. महात्मा फुले सर्व बाजूंनी आणि सर्व अर्थाने ब्राह्मणी हिंदू धर्म नाकारतात तर संतमंडळी या ब्राह्मणी हिंदू धर्माचा प्रचंड गौरव करून त्याचा पुरस्कार करतात. संत आणि महात्मा फुले एका पंगतीत कसे बसू शकतात ते कळत नाही.
भगवान बुद्धांची भूमिका तर अतिशय निसंदिग्ध आहे. बौद्ध नास्तिक दर्शन आहे. ब्राह्मणी हिंदू धर्म, त्यातून निघालेला भागवत धर्म आणि त्यावर आधारलेला वारकरी संप्रदाय हे सर्व आस्तिक आहेत. नुसते आस्तिक नाहीत, देवाच्या सगुण (त्याच्या विविध अवतारांसह) आणि निर्गुण दोन्ही रूपांचा कडवा पुरस्कार करतात. संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे अभंग पाहता ते देवासाठी किती वेडे झाले होते हे लक्षात येते. असे असता बुद्ध आणि संतांचा मार्ग एक कसा असेल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर विचारायलाच नको. त्यांनी ब्राह्मणी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म घेतला. त्यावेळी त्यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा घेतल्या आहेत, त्यावरून त्यांनी हिंदू धर्म कसा मुळापासून त्यागला आहे हे लक्षात येते. ज्या देवाला संत अनंत अवतारांच्या राशी । तो हा उभा विटेवरी म्हणतात त्याच देवाने अवतार घेतले हे मी मानत नाही, अशी एक प्रतिज्ञा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: घेतात आणि अनुयायांना घ्यावयास सांगतात. बुद्ध, फुले आणि डॉ. आंबेडकर हे खरे विद्रोही आहेत. तसे संत विद्रोही ठरतात काय?
संतांनी पुराणे सत्य मानली. संतांनी देवाचे अवतार सत्य मानले. नुसते मानले नाहीत, त्यांचे नामस्मरण करणे हे जीवनाचे ध्येय मानले. संतांनी ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र दिला. यात राम म्हणजे प्रभू रामचंद्र - विष्णुचा सातवा अवतार. कृष्ण म्हणजे आठवा अवतार आणि हरी म्हणजे भगवान विष्णू. हे सर्व अगदी निसंदिग्ध आहे. हे नामस्मरण म्हणजे संतांनी जीव की प्राण मानले आणि फुले, आंबेडकर यांनी नेमके तेच कठोरपणे नाकारले आहे.
तरीही संतांना विद्रोही का मानतात? तर त्याचे कारण तुकाराम महाराजांचे काही अभंग. ते कोणते हे मासलेवाईक काही अभंग घेऊन पाहूया.
तुकाराम महाराज ब्राह्मणांवर आणि पर्यायाने ब्राह्मणी धर्मावर तुटून पडत होते. हे सांगण्यासाठी पुढील अभंग वारंवार उच्चारला जातो. अभक्त ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥वैष्णव चांभार धन्य त्यांची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ऐसा हा निवाडा झालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥तुका म्हणे आगी लागो थोरपणा । द़ृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥ आता या अभंगाचे विश्लेषण करू. तुकाराम महाराज सरसकट सर्व ब्राह्मणांना शिव्या देत नाहीत तर जो ब्राह्मण भक्ती करत नाही त्यावर तुटून पडतात आणि यात काय चुकीचे आहे? ब्राह्मणांनाही यात चुकीचे वाटण्याचे काही कारण नाही. सर्वांनीच भक्ती केली पाहिजे ही संतांची भूमिका आहे आणि ब्राह्मणांनी तर ती केलीच पाहिजे कारण त्यांचाच आदर्श घेऊन त्या काळात लोक वर्तन करत होते. आजही काही प्रमाणात त्यांचा आदर्श घेतला जातो. तो आदर्श असणारा, वर्णात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ब्राह्मणच जर भक्ती करत नसेल तर ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे संत अशा ब्राह्मणांना झोडपून काढणार हे अगदी ब्राह्मणी हिंदू धर्माशी आणि विषेशत: भागवत धर्माशी अगदी सुसंगत आहे. एखादा चर्मकार उदा. संत रोहिदासांसारखा स्वत: वैष्णव असेल तर अभक्त ब्राह्मणापेक्षा तो श्रेष्ठच मानला पाहिजे. अगदी ब्राह्मणांनाही यात वावगे वाटण्यासारखे काय आहे? या अभंगाचे तिसरे चरण अतिशय महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हा निर्णय मी केलेला नाही. पुराणामध्येच हा निवाडा झाला आहे. म्हणजे अभक्त ब्राह्मणापेक्षा भक्त असणारा अंत्यज श्रेष्ठ हे खुद्द ब्राह्मणांनी लिहिलेली पुराणेच सांगतात! घ्या आता! म्हणजे खुद्द ब्राह्मणांनीच आपल्या पुराणामध्ये लिहून ठेवले आहे की, अभक्त ब्राह्मणापेक्षा भक्त असणारा अंत्यज श्रेष्ठ आहे. श्रीमद्भागवत पुराणात अशी अनेक उदाहरणे आढळतात. अजामीळ ब्राह्मण होता पण त्याला पापी म्हणण्यास श्रीमद्भागवत कचरले नाही. धुंधुकारी हा ब्राह्मण होता पण तो महापापी होता हे सांगण्यास ब्राह्मणी पुराणांनी मागेपुढे पाहिले नाही. या उलट पिंगला ही वेश्या होती, कुब्जा दासी होती, गोप गोपिका शूद्र होत्या, विदूर क्षता (जवळपास शूद्र) होता, प्रल्हाद, बिभीषण दैत्य होते. हनुमान आणि गजेंद्र तर पशू होते तरीही त्यांचा गौरव करताना श्रीमद्भागवत पुराण थकत नाही. संत एकनाथांनी एकनाथी भागवतात (श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंदावरील भाष्य) अशा भक्तांचा अपरंपार गौरव केला आहे! आणि अहंकारी, कर्मठ, मूर्ख अशा ब्राह्मणांना अक्षरष: नागडे केले आहे! येथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. स्त्री शूद्र, अंत्यज पशूपक्ष्यांसहीत सर्वांना भक्तीचा अधिकार जर अगोदरच गीतेने आणि भागवत पुराणाने देऊन ठेवला असेल तर ते श्रेय ती पुराणे रचणार्या ब्राह्मणांचेच आहे! मग संंतांनी नवीन काय केले? संतांनी या संदर्भात नवीन काहीही केले नाही. फक्त हे सर्व संस्कृत भाषेत होते ते मराठीत आणले आणि सर्वसामान्य लोकांना माहीत केले! संत तुकाराम महाराज ब्राह्मण पंडितांवरही तुटून पडले पण कोणत्या पंडितांवर? जे वेदांची घोकंपट्टी करून पोकळ बढाया मारतात पण आतून ‘सर्व ब्रह्म एक आहे’ हे जाणत नाहीत. अशा पंडितांना तुकोबाराय मूर्ख म्हणतात. अभंग पाहा. पंडित म्हणता थोर सुख । परि तो पाहता अवघा मूर्ख ।काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥वेदी सांगितले ते न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥तुका देखे जीवी शिव । हा तेथीचा अनुभव ॥ येथे तुकोबाराय म्हणतात की, पंडित असूनही तो मूर्ख आहे. कारण वेदाने जे सांगितले आहे ते करत नाही आणि भलतेच करतो. वेदाने सांगितले आहे की, सर्व जीवांमध्ये शिव म्हणजे ब्रह्म आहे पण हे त्या पंडिताला कळत नाही. आता येथे काही लोक म्हणतील की तुकाराम महाराजांनी येथे समता सांगितली आहे. येथे समता सांगितली आहे पण ती जीवाशिवाची समता आहे. जातीगत समता नाही. उलट जातीगत असमानता ही ब्राह्मणांनी कठोरपणे पाळली पाहिजे. जे ब्राह्मण ही विषमता पाळत नाहीत आणि जातिगत समता आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुकाराम महाराजांनी कठोरपणे फटकारले आहे. खालील अभंग पाहा. खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राह्मण कलियुगीं ॥वेवसाव करी पर्वत मांगापासीं । ते पैं विटाळासी न मानिती ॥मांगिणीशीं नित्य करितसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥आशा माय रांड नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ।तुका म्हणे देह झाले पराधीन । पांडुरंगावीण गती नाही ॥ या अभंगाचा अर्थ सांगण्याची गरज वाटत नाही. तुकाराम महाराजांनी ब्राह्मणांना का ठोकून काढले आहे ते वाचकांनी पाहावे. असेच आणखी काही अभंग आहेत ज्यात ब्राह्मणांना कसे झोडपले आहे पाहा. विद्रोहीवाल्यांना हे अभंग दिसत नाहीत. सिलेक्टिव, निवडक अभंगांच्या आधारे ते निष्कर्श काढतात. ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचे वाटोळें ।सांडूनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोम दोम ।शिवों नये ती निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ।तुका म्हणे वृत्ति । सांडूनि गदा मागत जाती ॥ ब्राह्मणांवर केलेल्या टीकेचे स्वरूप हे असे आहे. यात चांगल्या, भक्त असणार्या ब्राह्मणांवर तुकाराम महाराजांनी कधीही टीका केली नाही. उलट त्यांचे किती उदार शब्दात कौतुक केले आहे ते खालील अभंग पाहा. पंडित वाचक जरी झाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥क्षीर तुपा साकरें झालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ज्याकारणें वेदश्रुति हीं पुराणें । तेंचि विठ्ठलनाणे तिष्ठे कथे ॥तुका म्हणे येर दगडाचीं पेवें । खळखळींचे अवघे मूळ तेथें ॥ या अभंगात तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात की, जो पंडित आणि वाचक असा ब्राह्मण असूनही कृष्णाची कथा भावाने ऐकतो तेथे जणू काही दूध, तूप आणि साखर यांची भेट झाली आहे. यावरून भक्ती करणार्या ब्राह्मणांविषयी तुकोबारायांच्या मनात केवढा आदर होता हेच दिसून येते. त्या काळात ब्राह्मण त्यांचा स्वधर्म सोडून भलत्याच गोष्टींच्या नादी लागले. याची सर्वच संतांना चीड होती. कर्मठ, अहंकारी, कर्मभ्रष्ट अशा ब्राह्मणांवर सर्वच संतांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांनी सौम्य भाषेत तर संत एकनाथांनी उग्र भाषेत अशा कर्मभ्रष्टांचा समाचार घेतला आहे. समर्थ रामदास स्वामी अशा ब्राह्मणांविषयी म्हणतात, ब्राह्मण धर्मापासून चेवले । दास झाले दासांचेकित्येक पिरास भजती । कित्येक दावल मलिकास जाती ।कित्येक तुरूक होती ॥ आपुले इच्छेने ॥अशी ब्राह्मणांची स्थिती खुद्द रामदास स्वामींनी वर्णन केली आहे! ब्राह्मणांवर टीका सर्वच संतांनी केली आहे पण तुकाराम महाराजांची भाषा जरा तीव्र आहे. म्हणून त्या काळातील ब्राह्मण त्यांच्यावर चिडले असतील हे स्वाभाविक आहे. त्यात ते स्वत: कुणबी म्हणजे शूद्र असल्याने त्यांचा छळ झाला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण त्यावरून ते महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे विद्रोही होते असे कसे म्हणता येईल? ते धर्मसुधारक होते, असे म्हणता येईल आणि धर्म सुधारकांनाही छळाला सामोरे जावे लागते. जाता जाता एक मुद्दा. रामदास स्वामींनी, असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती । जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य । असे म्हटले आहे हे खरे आहे. यावरून रामदास स्वामी जन्मजात जातीवरून मूर्ख ब्राह्मणालाही श्रेष्ठत्व देतात असे दिसते. यामुळे रामदास स्वामींवर टीका होते. त्यांच्यावर जातीवादाचा ठपका ठेवला जातो. रामदासांनी जरी तो ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ । असे म्हटल्याचे सांगितले जाते पण याचा संदर्भ देत नाहीत. माझ्या वाचनात हे कुठेही आलेले नाही. कृपया जाणकारांनी संदर्भ द्यावा. उलट तुकाराम महाराजांच्या गाथेत खालील अभंग आहे आणि तो सदानंद मोरे यांनीही प्रक्षिप्त मानला नाही. अभंग असा - दुधाळ गाढवी जरी झाली पाहें । पावेल तें काय धेनुसरी ।कागाचिया गळां पुष्पांचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ।मर्कटे अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाच्या लीळे वर्तूं नेणें ।जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकीं ॥ याचा अर्थ तुकाराम महाराज कर्मभ्रष्ट ब्राह्मणाला तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे, असे मानतात. आ. ह. साळुंखे आणि तत्सम सर्व विद्रोहीवाले हा अभंग प्रक्षिप्त मानतात पण सदानंद मोरे, दिलीप धोंडगे आणि संत तुकाराम महाराज संस्थान कमिटी या अभंगास प्रक्षिप्त मानत नाहीत. एकंदरित पाहता संत तुकाराम महाराजांच्या विचारसरणीशी हा अभंग विसंगत वाटतो. संतांना अध्यात्मात समता अपेक्षित आहे. भक्ती करण्याचा आणि मोक्ष मिळविण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो अधिकार गीता आणि श्रीमद्भागवत यांनाही अपेक्षित आहे. हे ग्रंथ मूळ ब्राह्मणी परंपरेतीलच आहेत. म्हणून ब्राह्मणांनाही लोकांचा हा अधिकार मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की लोकांनी व्यवहारात जाती मोडाव्यात. स्त्री-पुरूष समानता आणावी. संतांनी असे कुठेही म्हटलेले नाही की, आंतरजातीय विवाह करा, विधवांचा विवाह करा, जरठ कुमारी विवाह करू नका, क्षौर करू नका, सर्व एका पंगतीत जेवायला बसा! (संत एकनाथांनी अस्पृष्य लोकांना जेवू घातले मात्र त्यांनी तसा कुठे लिखित पुरस्कार केल्याचे दिसत नाही. कुणा विद्वानांना तसा संदर्भ आढळल्यास सांगावे.) उलट संतांनी म्हटले आहे, मार्गाधारे चालावे । विश्व हे मोहरे लावावे. आपापला वर्णाश्रम धर्म पाळावा. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी पतिव्रता आणि सतीचे विलक्षण कौतुक केले आणि आणि व्यभिचारिणी, विधवा यांचा कठोर निषेध केला आहे. संत एकनाथांनी एकनाथी भागवतात मुलींच्या लग्नाचे वय आठ वर्षे इतके सांगितले आहे आणि पुढचे जे सांगितले आहे ते माझ्याच्याने लिहवत नाही. संत भगवंत, त्याचे अवतार, स्वर्ग, नरक, वैकुंठ, कैलास, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, पाप, पुण्य, कर्मसिद्धांत, उपास - तापास, मूर्तीपूजा, मानसपूजा हे सर्व मानत होते. नुसते मानत नव्हते. जीवाप्राणाने त्यांचा पुरस्कार करत होते. या विषयी संतसाहित्यात शेकडो नव्हे हजारो अभंग आणि ओव्या आहेत. संत हे सर्व त्यांच्या मनाने करत नव्हते. गीता आणि भागवतात तेच आहे. ते फक्त मराठी भाषांतर करून लोकांच्या मनी मानसी भिडवत होते. त्याला स्वानुभवाचाही आधार देत होते. लोकांना भक्तीला लाऊन मुक्ती मिळवून देणे हे संतांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांचे शेकडो पानांचे साहित्य वाचून हाच निष्कर्श निघतो. संतांनी नवीन मार्ग स्थापन केला का? तर नाही. मूळचा गीता आणि भागवतातील भागवत धर्म त्यांनी वारकरी संप्रदायाच्या रूपाने पुढे आणला. विठ्ठल हे त्यांनी उपास्य दैवत ठरविले पण हा विठ्ठल म्हणजे गीता भागवतातील विष्णुपेक्षा वेगळा देव नाही हे नीट लक्षात घेतले पाहिजे. संतांनी विष्णू हाच राम, कृष्ण आणि विठ्ठल आहे अशी भूमिका घेतली. विठ्ठल म्हणजेच विष्णू - विषय संपला! त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणजे कुठला नवीन पंथ नव्हे. तो भागवत धर्म आहे. वैष्णव संप्रदाय आहे. संतांनी विठ्ठलालाच राम आणि कृष्ण मानले. राम आणि कृष्णाचे संतांनी अपरंपार गुण गायिले आहेत. आणखी एक मुद्दा. संत ज्ञानेश्वर महाराज वगळता इतर संतांना गौतम बुद्ध माहीत होते की नाही याची शंका आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र निसंदिग्धपणे बुद्धाचा उल्लेख केला आहे. एके हाती दंतु । जो स्वभावत: खंडितु । बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥ म्हणजे गणपतीने एका हातात जो दात घेतला आहे तो वार्तिकांच्या बौद्ध मताचे खंडण करण्याकरिता आहे. बाकी संतांनी विठ्ठलालाच बौद्ध म्हटले आहे. त्यांच्या साहित्यात या प्रमाणे निसंदिग्धपणे बुद्धाचा उल्लेख येत नाही. गौतम बुद्ध, तथागत बुद्ध असा उल्लेख संतसाहित्यात कोठेही नाही. तत्त्वज्ञानात्मक पातळीवरही संतांनी शंकराचार्यांचे अव्दैत तत्त्वज्ञान स्वीकारले आहे. तरीही ज्ञानेश्वरांनी स्वत:चा नवीन चिद्विलासवाद मांडला आहे असे जाणकार म्हणतात. वैष्णव संप्रदाय मूळचा व्दैती संप्रदाय आहे पण संतांनी सगुण आणि निर्गुण भक्तीचा संगम करून ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. संत वेदांती आहेत आणि वेदांत हाही ब्राह्मणी हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान आहे. संतांवर एक वेगळाच आरोप होतो त्याचे विवेचन करून हा लेख संपवू. खरेतर संत कितपत विद्रोही हा एका फार मोठ्या ग्रंथाचा विषय होईल. असो. तर हा आरोप असा की, पूर्वी समाज लोकदैवतांची उपासना करत होता. जसे खंडोबा, भैरोबा, मरीआई, तुळजाभवानी वगैरे. ब्राह्मणांचे ग्रंथ संस्कृतात असल्याने लोकांना फारसे माहीत नव्हते. संतांनी हे ग्रंथ आणि देव प्राकृतात आणून लोकांना ब्राह्मण धर्म माहीत केला. त्यामुळे संतांनी लोकांना ब्राह्मणी धर्माच्या प्रभावाखाली आणले, असा आरोप केला जातो. आजही अशिक्षित आणि खेड्यातील लोक, आदिवासी हे आपली पारंपरिक दैवते जपतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक जाती ब्राह्मणांकडून लग्नेही लावून घेत नव्हती. संतांमुळे लोकांना राम, कृष्ण, शिव, गणेश, विष्णू या देवता माहीत झाल्या. आजही गावोगावी राम, कृष्ण, विष्णू यांची मंदिरे खूप कमी आहेत. संतांनी लोकांमध्ये ब्राह्मणी हिंदू धर्माचा प्रसार केला यात देखील तथ्य आहे. संत साहित्यात शेकडो चमत्कार आहेत. खुद्द संतांनीच हे चमत्कार लिहून ठेवले आहेत. संत नामदेव महाराजांनी पहिल्यांदा आत्मचरित्र लिहिले. त्यांत त्यांनी दगडाच्या मूर्तीने प्रसाद खाल्ल्यापासून कोरड्या विहीरीतून पाणी काढण्यापर्यंत अनेक चमत्कार लिहिले आहेत. संत नामदेव महाराजांबरोबर सदैव विठ्ठल असे. नामदेवांबरोबर विठ्ठल जेवत होता, बोलत होता, फिरत होता, रडत होता, रूसतही होता. नामदेव जेव्हा तीर्थयात्रेवरून आले त्यावेळी विठ्ठलाने जातीने लक्ष घालून मावंदे केले. त्यात स्वत: विठ्ठल पंगतीत फिरून कमी जास्त पाहत होता. रूक्मिणी वाढत होती. ॠशी, मुनी, देव, संत जेवत होते. संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले, भिंत चालविली, पाठीवर मांडे भाजले, स्वत: समाधी घेतली. समाधींच्या वेळी कोण कोण उपस्थित होते याची यादीच नामदेव महाराजांनी दिलेली आहे. यात स्वत: विठ्ठल म्हणजे विष्णू आहे, रूक्मिणी म्हणजे लक्ष्मी आहे. गरूड, हनुमान, नारद, तुंबर, स्वर्गातील इंद्रादिक देव, गंधर्व, अप्सरा, किन्नर आहेत. स्वत: विठ्ठलाने आणि निवृत्तीने संत ज्ञानेश्वरांना समाधीच्या विवरात नेले. हे सर्व वर्णन नामदेव महाराजांनी करून ठेवले आहे. नामदेव महाराजांनी अन्य समकालीन संतांचीही चरित्रे लिहिली आहेत. त्यातही भरपूर चमत्कारांचे वर्णन आहे. संत तुकाराम महाराजांनी स्वत:च्या गाथेत वैकुंठातून विमान आल्याचे आणि स्वत: विमानात बसून वैकुंठाला गेल्याचे लिहून ठेवले आहे. या चमत्कारांचे करायचे काय? पुरोगाम्यांनी याचे उत्तर द्यावे. संत खोटे बोलत होते का? की हे सर्व अभंग प्रक्षिप्त आहेत? आपल्या विचारांना सोयीस्कर नसणारे सर्वच अभंग प्रक्षिप्त मानायाचे ठरले तर कुणीही कोणताही अभंग प्रक्षिप्त ठरवील. अशाने अनवस्था, गोंधळ निर्माण होईल. असे आपणास करता येईल काय? समारोपाकडे येताना आपण असा निष्कर्श काढू शकतो की, संतांना विद्रोही म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. सिलेक्टिव अभंग घेऊन निष्कर्श काढता येत नाही. संतांना त्या काळाच्या मर्यादा होत्या. प्रबोधनोत्तर काळातील नियम प्रबोधनपूर्व काळातील संतांना लावून आपण संतांवर अन्याय करत असतो. संतांच्या पे्ररणा वेगळ्या होत्या. जाता जाता त्यांनी काही समाजप्रबोधन केलेही पण ते आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यात खूप तोकडे दिसते. संतांनी कर्मकांडाला विरोध केला हे खरे पण त्याबरोबरच नामस्मरण, एकादशी, उपवास, पंढरीची तीर्थयात्रा या कर्मकांडांचा जोरदार पुरस्कारही केला. संत म्हणजे फुले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, कर्वे नव्हेत. संतांच्या प्रबोधनाची जात वेगळी आहे आणि या आधुनिक विचारवंतांच्या प्रबोधनाची जात वेगळी आहे. संतांना विद्रोही मानणार्या पुरोगामी लोकांनी संतांना सोयीपुरते स्वीकारू नये. स्वीकारायचेच असेल तर संपूर्णपणे स्वीकारावे किंवा संपूर्णपणे नाकारावे. त्यांना अपेक्षित नसलेले विचार त्यांच्यावर लादू नयेत. अर्थात हे लादलेले विचार लगेच उघडे पडतात. संतांना पुरोगामी आणि विद्रोही ठरवून यांना करायचे आहे काय? राजकारण करायचे आहे का? संतांना पाठिंबा देणारा मोठा समाज आहे म्हणून? अहो तो समाज चमत्कारांसहीत संतांना मानणारा आहे. या समाजाचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. पुरोगामी आहात? विद्रोहीच विचार अंगीकारायचे असतील तर पहाडासारखे महात्मा फुले उभे आहेत! आकाशासारखे डॉॅ. आंबेडकर आहेत. सूर्यासारखे गौतम बुद्ध आहेत. येथे पुरोगामी म्हणजे पुरोगामीच विचार आहेत. विद्रोह म्हणजे विद्रोहच आहे! संतांच्या निवडक अभंगांचा चुकीचा अर्थ लावून काय साध्य होणार आहे? संत हे ब्राह्मणी परंपरेतील आहेत आणि त्याच परंपरेची त्यांनी पालखी वाहिली आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे. - प्रा. डॉ. दादासाहेब मारकड 9921402714 प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' जून २०२५
.jpg)







Comments