गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे : आरती प्रभू | Aarti Prabhu
- Apr 20
- 4 min read
आरती प्रभू / चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे नाव मराठी साहित्यात आणि मराठी वाचकाला अनोळखी नाही. प्रतिभासंपन्न कवी, कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार म्हणून लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. खानोलकरांचा जन्म ८ मार्च १९३० आणि मृत्यू २६ एप्रिल १९७६ला झाला. त्यांच्या पुण्यतिथि निमित्त...

"रात्र काळी घागर काळी" ही चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांची कादंबरी म्हणजे भोवरा निर्माण झालेल्या पाण्यात फसलेल्या स्त्रीची जी मनोवस्था होत असेल असे आयुष्य जगणाऱ्या लक्ष्मीची कथा !
'कसे कसे हसायाचे, हसायाचे आहे मला' , 'ती येते आणिक जाते' , 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे'
असे अंतर्यामीची वेदना प्रकट करणारे काव्य लिहिणारे आरती प्रभू यांचा २६ एप्रिल रोजी स्मरणदिन आहे त्यानिमित्त...
काव्य, कथा, कादंबरी, चित्रपट पटकथा असं सगळ्या प्रकारचं लेखन केलेल्या आरती प्रभूंचं जीवन अतिशय एकांतवासी, एककल्ली, उदास होतं. प्रतिभेचा जीवंत झरा बुद्धीतून अखंड वाहत होता. महादेवाच्या जटेतून वाहणाऱ्या गंगाजळी सारखा ! उच्चतम साहित्याची अखंड निर्मिती त्यांच्याकडून झाली. त्यांना जाऊन पन्नास वर्षे झाली. आजही त्यांच्या लिखाणातील गुढता सहज उलगडत नाही....
'रात्र काळी घागर काळी'
'लक्ष्मी' या कादंबरीची नायिका! स्वर्गीय सौंदर्याचं लेणं लाभलेली लावण्यवती , परंतु या सौंदर्याबरोबरच शापित दुर्दैव घेऊन जगणारी ही स्त्री. शरीर जगवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 'गरजा' म्हणजे 'अन्न-वस्त्र-निवारा' या जशा आवश्यक असतात तसं माणसाचं मन जिवंत राहण्यासाठी जोडीदाराचं प्रेम ही अत्यंत महत्वाची गरज आहे. प्रेमाचे अनंत प्रकार आहेत. पण मुख्य म्हणजे दैहीक आणि ऐहिक, मानसिक आणि हृदयीक ! प्रेम ही भूक आहे. जशी अन्नाची भूक भागविल्या शिवाय शरीर जगू शकत नाही तशी प्रेमाची भूक भागविल्या शिवाय मन जगू शकत नाही. मन मेले तर शरीर मरते.
"टूटा हुआ मन अगर बिखर जाए,
तो रूह भी कफन ओढ़ लेती है,
ज़िंदा तो रहती है सांसें,
पर हस्ती मौत से पहले ही
दम तोड़ देती है।"
प्रेमात आधी मनोमिलन होतं आणि मग देह मिलन.
प्रेमासोबत येणारी समागमाची ओढ ही नैसर्गिकतःच येते. दोन मने जुळल्यावर जेंव्हा समागम होतो त्यावेळी दोन आत्मे एकरूप-एकाकार झाल्याचा भास होतो. जोपर्यंत ही अनुभूती मिळत नाही तोपर्यंत माणूस सैरभैर असतो, बावरा होतो आणि शेवटी अतृप्तच राहतो ही या कादंबरीची मध्यवर्ती संकल्पना (थीम) आहे.
कादंबरी १९६३ मध्ये प्रकाशित झालेली आहे, मुळ लिहिलेली आहे "झाडे नग्न झाली" या नावाने १९६१ मध्ये रहस्यरंजन या दिवाळी अंकासाठी लघू कादंबरी स्वरूपात. सालाचा उल्लेख यासाठी की त्या काळात एकमेकांना आवडणारया स्त्री-पुरूषांनी एकत्र येऊन राहण्यासाठी "लिव्ह इन रिलेशनशीप" हा विवाह बाह्य कायदेशीर उपचार/ पर्याय उपलब्ध नव्हता. आज असला तरी राजरोसपणे असे करू धजावणारी जोडपीही अपवादानेच आढळतात.
१९६३ मध्ये प्रकाशीत झालेल्या या कादंबरीतून व्यक्त झालेले जीवनाचे तत्व आजही लागू पडते. मनुष्य योनीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रेमाची तृप्ती समागमाच्या मार्गातून मिळावी ही ओढ असणं हे नैसर्गिकच आहे. आजच्या घडीलाही ते त्रिकालाबाधित सत्य आहे. तेंव्हाचा काळ आणि आजचा काळ यांतल्या जीवनसरणीत खूप बदल झाला असला आणि आपल्या संस्कृतीत शरीरसुखासाठी विवाह ही संकल्पना दृढ झालेली असली तरी या कादंबरीत हेच दाखवलेय की जेव्हा संस्कृतीने घालून दिलेल्या विवाहबंधनात हे सुख मिळत नाही. तिचा नवरा ते सुख देण्यास असमर्थ आहे. स्वतः असमर्थ असताना सुद्धा तिच्या शिलावर संशय घेवून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. तेंव्हा अतिशय संस्कारक्षम घरात वाढलेली ती ही सगळी बंधनं झुगारून देऊन कशाचीही पर्वा न करता घराच्या चौकटीचा उंबरठा ओलांडून जाण्याचे धारिष्ट्य करते.
त्या काळात अशा विषयाची कादंबरी प्रकाशित करणं म्हणजे एक प्रकारचे धारिष्ट्यच होतं. व्यभिचाराचा एकही शब्द न उल्लेखता ह्यात लग्नबाह्य संबंध स्पष्टपणे दर्शवले आहेत. ईथे नायिकेला असलेली शरीरसुखाची आसक्ती जरी प्रथमदर्शनी दिसत असली तरी तिला खरी ओढ प्रेमाची आहे. याऊलट तिच्याभोवती गुरफटलेली पात्रेही शरीरसुखासाठी लोलुपलेली आहेत आणि अतृप्तही!
असे का व्हावे? तिचा पती हा अगदीच भित्रा, कपाळ करंटा नपुंसक निघाला आणि तिच्या संस्कारक्षम मनाचे बांध हळूहळू तुटू लागले. ती इतकी लावण्यवती की तिच्याकडे तो साधे बघूही शकत नाही. ईतकी अलौकिक सौंदर्यवती पवित्र असूच शकत नाही ह्या संशयी विचारभुंग्यानेच तो पोखरून गेला आणि त्याच्यातल्या दुबळेपणाने त्यास आणखी क्रुर आणि बिभत्स बनवले.
ज्या कारणासाठी विवाह केला त्या स्पर्शसुखाची साधी झुळुकही तिला मिळू नये ही नियतीची खेळी आणि तिथूनच या नायिकेच्या न फुलताच कळीच्या कोमेजण्याची सुरुवात होते.
खरंतर तिच्या या दुर्दैवाच्या शंकेची पाल तिच्या मनात तिच्या विवाहापूर्वीच चुकचुकलेली असते. हे सुरूवातीलाच रूपकात्मकतेने दर्शविले आहे. ज्यावेळी विवाह ठरल्याचे वृत्त समजताच "अंबेचे दर्शन घेऊन ये" ही तिच्या बाबांची आज्ञा पूर्ण करण्यासाठी ती निघते आणि अनपेक्षित असं भयभीत करणारे जे काही अनुभवते त्या प्रसंगातूनच तिच्या दुर्दैवाचा प्रारंभ दर्शवलाय. तो कमालीचा अस्वस्थ करणारा तर आहेच परंतु अनाकलनीयही आहे. तिथेच तिला आयुष्यात पुढे येणाऱ्या भरतीचा अंदाज येत नाही व ती दृढ विश्वासाने पाण्यात उतरते परंतु भरती येते आणि ती अशी तिच्या गळ्यापर्यंतच येते, ती धड न तीला घेवून जाते न तीला जिवंत ठेवते, तीला अधमेली करून जाते एकुण सगळेच रुपकात्मक आहे.
कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू...
अंबेचे दर्शन घ्यायला जाताना नदी पार करताना तिला तिथे भास होतात. मातीची घागर पाण्यावरून उपडी वाहताना दिसते, रात्र अचानक काळी होते, पायाखालून रेशमी केसांसारखं काहीतरी पाहिल्याचा भास होतो . हे सगळं विचित्र आणि चमत्कारिक असतं. तिचा विवाह ठरल्यानंतर प्रयत्न करूनही विवाहवार्तेने न तिच्या मनात सुंदर विचार येतात ना ती तिच्या होणाऱ्या पतीच्या देहाची कल्पना साकारू शकते. असे का होते याचे तिला आश्चर्यही वाटते. उलट तिला नकोनकोसे भास होतात.
खरया आयुष्यातही अशी अनुभूती अनेकदा येत असते. भविष्यात येणार्या संकटाची चाहूल आपल्याला कुठल्याही रूपकात्मक अनुभवातून मिळत असते. पण कोरं मन हे इतकं सकारात्मक असतं की कुठलाही नकारात्मकतेचा लवलेशही नकळतच विरून जातो.
कादंबरीतली भाषा म्हणजे मराठी भाषेच्या उच्चतम दर्जेचे उत्तम उदाहरण. आजच्या काळात अशी भाषा वाचायला मिळणं दुर्मिळच.
मला भावलेली काही उदाहरणे इथे देते.... "शेलाट्या अंगाचा गोविंदा, सांध्यार होडी, साखर स्वप्नातील डोळे..., चंद्रकोरीहून शीतल अशी प्रभा....डोम कावळ्याच्या शीरेसारखं... रात्र पुरासारखी चढत गेली... व मननीमग्न व्हावं ...जाईचं कण्हणं काळोखा सारखं पसरलं...आकृतीन आकाशी वस्त्र फेडलं... डोळ्याची बुबुळ आतून ताणल्यासारखी होती... अशा अनेक उपमा- अलंकार यात आपल्याला वाचायला मिळतात. आता अशी वर्णने हल्लीच्या पिढीला कितपत भावतील याबाबत शंकाच आहे! (आजची युवा पिढी अशा भाषाप्रगल्भ मराठी वाङमयाची मागणी करतील का हाही प्रश्न आहेच! )
खणखणीत रुद्र म्हणणारा, देहाने भरीव असणारा, वज्रदेही, रुंदपाठीचा, कुरूळ्या केसांच्या भरदार छातीचा सुस्वरूप, गौरकांतीचा, गहिरे डोळे असणारा पुरुष (दिगंबर- नायिकेचा पती) केवळ शरीरने देखणा आहे पण मनाने विद्रूप! मनाने देखणा नसलेला पुरुष एका स्त्रीचे आयुष्य कसे छीन्न विच्छीन्न करतो याचे उदाहरण म्हणजे ही कादंबरी.....
काही मनं इतकी करंटी असतात की स्वतःच्या भाग्यात लाभलेलं लखलखीत लावण्यही ते पचवू शकत नाहीत.
या कादंबरीची (पतीकडून झीडकारलेली) नायिका स्वतःला सत्शील ठेवण्याचा विफल प्रयत्न विवाहानंतर सुरुवातीच्या काळात करते. परंतु देहाच्या आसक्तीपुढे तिच्यात रुजलेले संस्कार गळून पडतात आणि ती त्या भेकड रूक्ष मालवलेल्या मनाच्या पतीसमोर अनेक प्रकारे वांछना करूनही तिच्या पदरी दुस्वास झीडकारणं हेच येतं तेंव्हा ती बिथरते आणि तिचं आयुष्य अवकाळी पसरलेल्या रात्रीसारखं निरंग होतं, तरी तिचा देह भूक शमलेल्या आभासी अवस्थेत राहू शकत नाही. तो सुंदर देह सुकला तरी त्याची आसक्ती कमी होत नाही आणि त्यापायी ती उंबरठा ओलांडते....
तिचे सौंदर्य म्हणजे जसं नीलकमळाचं सौंदर्य! ते आकर्षक असलं तरी त्याला कवेत घेऊ पाहणारा प्रत्येकजण केवळ दलदलीतच फसतो तसं काहीसं लक्ष्मी सोबत शेवटपर्यंत होतं.
लक्ष्मीचा भरतीतून वाचलेला देह फक्त एक नमस्कार मिळवून आणि सदूला जन्म देऊन नंतर कोरडाच राहतो...
लक्ष्मीमंगेश
(विजयालक्ष्मी मणेरीकर)
नाशिक
१६\०४\२६
Aarti Prabhu Information in Marathi.
.jpg)



Comments