top of page

तिची अन्‌‍ त्याची हृदयस्पर्शी गोष्ट

  • 22 hours ago
  • 3 min read

कल्पना आणि वास्तव ही दोन टोके कधी एकत्र येत नाहीत; मात्र कल्पनेचा आधार घेऊन आजूबाजूचं वास्तव रेखाटलं की त्यात जिवंतपणा येतो. अनेक लेखकांनी हा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वीही ठरला आहे. संजना मगर या संवेदनशील कवयित्रीनं ‌‘अभी-अनू‌’ ही कादंबरी लिहिण्याचं धाडस केलं आणि ‌‘तिची अन्‌‍ त्याची‌’ गोष्ट मांडताना अनोख्या प्रेमाचं, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचं, नैतिक मूल्यांच्या जपणुकीचं दर्शन घडवलं. एक हळूवार प्रेमकथा उलगडून दाखवतानाच आजच्या पिढीकडं असलेलं आश्वासक सामाजिक भान हे या कलाकृतीचं सामर्थ्य आहे.


या कादंबरीतील अभी आणि अनू ही दोन्ही पात्रं उच्चशिक्षित आहेत. विदेशात एका मोठ्या कंपनीत कार्यरत असलेल्या अभीच्या आईवडिलांचं निधन होतं आणि त्यांच्यानंतर गावी कोणीच नसल्यानं तिथलं घर विकण्याच्या हेतूनं तो गावाकडं येतो. तिथं अनेक वर्षांनी त्याची बालमैत्रिण अनू भेटते. एव्हाना तिही प्राध्यापक झालेली असते. सावंतांसोबत जुळत असलेला घर विक्रीचा व्यवहार अभी मोडीत काढतो आणि देवराईच्या भल्याची, गाव वाचवण्याची एक मोहीम हाती घेतो. त्यावेळी त्याचे मित्र मंदार आणि मीरा, अजय आणि जुई हेही त्याच्या बाजूनं येतात. गावावर येणाऱ्या आरिष्ठाची कल्पना हे सर्व जण गावकऱ्यांना देतात आणि पिचले गेलेले, शोषणाला बळी पडलेले ग्रामस्थही त्यांच्यासोबत उभे राहतात.


भावभावनांची प्रभावी अभिव्यक्ती आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या अनेक शैलीदार, अर्थपूर्ण वाक्यांची पेरणी हे संजना यांच्या लेखणीचं विशेषत्व आहे. त्यात मनाची निखळता आहे, लालित्य आहे, सौंदर्य आहे आणि वाचकांच्या मनाचा तळ ढवळून काढण्याची, त्याला अंतर्मुख करण्याची शक्तीही आहे. वानगीदाखल काही वाक्ये पाहा -


काही जखमा भरून येत नाहीत पण त्यावरील मलम ज्याचे त्यालाच शोधावे लागते./ माणूस दूर असणाऱ्या गोष्टींना भुलतो आणि जवळच्या दिसणाऱ्या गोष्टींना नजरेआड करतो./ प्रेमात माणूस स्वभावाच्या विरूद्ध वागत असतो./ गोष्टी कानावर पडल्या म्हणजे त्याचा अर्थही ध्यानात येईल असे नसते./ व्यवहाराला भावना नसतात./ एखादी गोष्ट जी आपल्याला नकोय ती करताना किती यातना होतात, हे ज्याचे त्यालाच माहीत./ काळजाची सल काळजालाच कळते./ आपल्या माणसाच्या साध्याशा अस्तित्वाने सुद्धा मनावरचा ताण हलका होतो./ संघर्ष क्षणिक वेदना देतो पण तोच दीर्घकाळ टिकणारा संस्कार घडवतो./ म्हणणं आणि असणं यात फरक असतो... या आणि अशा कितीतरी वाक्यातून झरणारं सांस्कृतिक, वैचारिक संचित लेखिकेच्या प्रगल्भतेची साक्ष पटवून देतं.


अभी आणि अनूने बालपणी शाळेच्या चर्चासत्रात ‌‘अमेरिका आणि तेथे स्थायिक झालेले भारतीय‌’ या विषयावर भाष्य करत शाळेला पहिला क्रमांक मिळवून दिला होता. पुढे मोठेपणी अमेरिकेतील वास्तव्यानंतर अभी गावाकडे येतो आणि अनूच्या महाविद्यालयात जातो. तिथे जी स्पर्धा असते त्याचा विषय असतो, ‌‘परदेशात लग्न करून जाणारे भारतीय आणि त्यांची बदलत जाणारी जीवनपद्धती!‌’ संजना यांनी या कादंबरीत असे अनेक सुसंगत धागे गुंफत वाचकांना खिळवून ठेवले आहे.


एका व्यावसायिक कटाचा भाग बनत गावाचे अस्तित्व धोक्यात आलेले असते. अभी आणि अजय हे दोघेही त्याच कंपनीत नोकरी करत असतात. आपली कंपनी केवळ नफा कमवण्यासाठी गावचे अस्तित्त्व मिटवून टाकत आहे, हे लक्षात आल्यावर ही मंडळी बंड पुकारतात. त्यासाठी ते त्यांची नोकरीही पणाला लावतात. त्यांना शांत राहण्यासाठी दुप्पट पगाराचे आमिष दाखवले जाते. तरीही ते त्यांच्या भवितव्याचा विचार न करता सत्याचा कैवार घेत आपापल्या भूमिकांवर ठाम राहतात. कादंबरी नायकाचे आणि उपपात्रांचे त्यांच्या प्रेयस्यांवरील सात्विक प्रेम तर इथे दिसतेच पण ‌‘राष्ट्र प्रथम‌’ ही भावनाही खूप समर्थपणे मांडली आहे. प्रसंगी न्यायालयीन लढा लढून ते आपल्या गावचे अस्तित्त्व राखतात. त्यांच्या नशिबी संघर्ष अटळ असतो पण ते सर्व प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जात सर्व समस्यांची उत्तरे शोधतात. त्यांच्यापुढील प्रश्न आणि त्यावरील नेटाने काढलेला मार्ग हा शाश्वत आहे. आपल्या प्रेयस्यांवरील, वाडीवरील, गावावरील, निसर्गावरील प्रेम आणि सर्वांनीच त्यांना दिलेली साथ यामुळे ही सुखात्मिकता ठरते.


संजना मगर यांनी या पुस्तकाची लिहिलेली अर्पणपत्रिका हे या कादंबरीचे सार आहे. ‌‘घर मनामध्ये घेऊन जगणाऱ्या प्रत्येकास‌’ या एका वाक्यात त्यांनी हा सगळा पट उभा केला आहे. संजना यांची शैली चित्रदर्शी असल्याने यावर दमदार पटकथा लिहिता येऊ शकेल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा उत्तम चित्रपट साकारू शकेल. मातीशी नाळ जोडलेली असेल तर कोणत्याही कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळतोच. या कादंबरीत ते साधण्याबरोबरच आश्वासक तरुणाईचे दर्शन घडते. केवळ शब्दांचे अवडंबर न माजवता साधी, सोपी भाषा वापरल्याने हा संघर्ष प्रत्येकाला आपलाच वाटेल. हेच या कादंबरीचे यश म्हणावे लागेल. ‌‘प्रेमात जग जिंकण्याची विलक्षण ताकद असते,‌’ या वाक्याने समारोप होणाऱ्या या कादंबरीतील ‌‘कृपाछत्र‌’ आणि त्यामागील हेतू हेच आपल्या संस्कारांचे लखलखते बेट आहे. संजना मगर यांच्या भावी लेखनप्रवासास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!


लेखिका - संजना मगर

प्रकाशक - पुस्तकमित्र प्रकाशन

पाने - 152, मूल्य - 350

परिचय - घनश्याम पाटील



 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page