top of page

वाचनीय, ज्ञानवर्धक आनंदझरा

  • Mar 8
  • 3 min read

सुखाचा सदरा, आनंदाचे झाड या कविकल्पना नाहीत तर प्रयत्नाने प्रत्यक्षात उतरणारे ते स्वप्न आहे!  शिरीष चिटणीस हे नावाजलेले, वैविध्यपूर्ण लेखन करणारे लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांना लेखनात, वाचनात खूप आनंद मिळतो. मिळालेला आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता ‌‘आनंदझरा‌’ हा अक्षररुपी ठेवा ‌‘चपराक प्रकाशन‌’च्या माध्यमातून पुस्तकरुपाने आणला आहे.


डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रस्तावनेत म्हणतात, “आनंदझरा हे अर्थपूर्ण शीर्षक मनाची व आत्म्याची तहान भागवणारे आहे. एक दुर्मीळ दिलासा या शब्दांत दिसून येतो. वाचकांच्या अस्वस्थ मनाला शांत करतो; आश्वासक दिलासा देणारे हे लेखन आनंदाचा पान्हा पाझरत ठेवते...”


प्रकाशक घनश्याम पाटील यांची पाठराखण लेखक चिटणीस यांची मनोवृत्ती प्रकट करते. पाटील खूप आत्मियतेने लिहितात, “अनुभवलेल्या माणसांतील चांगले गुण हेरणे, त्यांना प्रोत्साहन देणे, प्रसंगी आवश्यक त्या सहकार्याचा हात देणे ही शिरीष चिटणीस यांची सहजवृत्ती आहे. या पुस्तकातील पानापानातून ती दृश्य स्वरुपात वाचकांसमोर येते.”


या पुस्तकातून जाणवते ते म्हणजे चिटणीस यांचे अफाट वाचन! केवळ भरपूर वाचन आहे असे नव्हे तर त्यावर चिंतन व मनन करून ते स्वतःची अनुभूती शब्दांत मांडतात. त्यांच्या लेखनात नेहरू येतात, देशबंधू दास आणि महात्मा गांधी सहजपणे डोकावतात. लेखकाच्या लेखणीला सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याची धार आहे. चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा अभिमान आहे. तद्वत पुरुषार्थ गाजविणाऱ्यांचा इतिहास याबद्दल ममत्व आहे.


नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या आनंदाने चिंब झालेले चिटणीस भाषा जपूया, वृद्धिंगत करूया! या लेखात भाषेचा लेखाजोखा मांडताना कोकणी भाषेचे पहिले ज्ञानपीठ मिळविणारे रवींद्र केळेकर यांचे ‌‘रायटर हा प्रथम फायटर असला पाहिजे‌’, हे वाक्य सहजपणे पेरताना आजही या वृत्तीची नितांत गरज आहे हे नकळत सांगून जातात. लेखक इथेच थांबत नाहीत तर कवी शंकर भांडारी यांनी दामोदर मावजो यांना भाषेचे महत्त्व पटवून देताना उच्चारलेले वाक्यही लिहितात, ‌‘कोकणी भाषा जिवंत उरली तरच तुम्ही लिहिणार आणि लोक तुम्ही लिहिलेले वाचणार!‌’ कोणतीही भाषा जिवंत ठेवण्यासाठी साहित्यिकांनीच पुढाकार घ्यायला हवा हेच लेखक इथे आग्रहाने सांगतात. ऊर्जादायी आणि प्रेरक शमीमा या गायिकेने मसापच्या मंचावर येऊन पती मझहर सिद्दीकी आणि संच यांच्यासह माझे माहेर पंढरी, बोलावा विठ्ठल या धार्मिक रचनांसह खुसरो बाजी प्रेम की... हे काश्मीरी गीत, तसेच रेशमाच्या रेघांनी... ही लावणी गाऊन धम्माल उडवून दिली. शमीमा अख्तर या गायिकेचा मनस्पर्शी प्रवास चिटणीस यांनी अत्यंत तळमळीने मांडला आहे.   अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक लिहिलेल्या ‌‘सिद्धहस्त अण्णा भाऊ‌’ या लेखात अण्णांच्या एकूण साहित्याचा खूप छान आढावा लेखकाने घेतला आहे. याच लेखात लेखक साहित्य क्षेत्रात असलेल्या उच्चनीचतेबद्दल परखडपणे व्यक्त होतात. यावरून त्यांचे समतादायी विचार स्पष्टपणे जाणवतात. सध्या सामाजिक माध्यमांवर असे खूप छान व्हाट्सअप समूह आहेत की, जे नवनवीन चांगले प्रयोग करीत असतात. असाच एक अत्यंत चांगला नि केवळ वाचन-लेखनाची सातत्याने जोपासना करणारा समूह म्हणजे ‌‘आम्ही पुस्तकप्रेमी!‌’ पुस्तकांवर अर्थात वाचन-लेखनावर प्रेम करणाऱ्यांचा हा समूह आहे. लेखक चिटणीस यांनी बौद्धिक वारसांचे काय? या लेखात पुस्तकप्रेमी समूहाच्या संमेलनाचा उल्लेख करताना उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या भाषणातील एक वाक्य अधोरेखित केले आहे, ‌‘नवश्रीमंत, शिक्षित वर्गाची शोकांतिका ही आहे की त्यांच्या किंमती स्थावर- जंगमास वारस आहे पण बौद्धिक संपदा नि समाजबांधिल वृत्ती पोरकी झाली झाली आहे.‌’ इथे जो स्थावर-जंगम मालमत्तेचा उल्लेख आला आहे त्याला अनुसरून चिटणीस यांनी लेखात महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. लेख वाचताना प्रश्नांची एक शृंखला वाचकांसमोर उभी राहते.  गीते प्रेरणादायी,


स्फूर्तिदायक, चैतन्यमयी, देशप्रेमी, भक्तिमय, क्रांतिकारी इत्यादी अनेक प्रकारची असतात. शिरीष चिटणीस यांनी देशविदेशातील गीतांचा उहापोह ‌‘हुकूमशाहीला वेसण घालणारी गीते‌’ या लेखात केला आहे. कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी ‌‘सत्याला सामोरे जाण्याचे बळ‌’ या लेखात त्यांच्या एकूण लेखनाचा आस्वादात्मक परिचय करून दिला आहे. लोकमंगल ग्रुप सातारा येथील संस्था राबवित असलेले अनेकानेक उपक्रम, साहित्यविषयक कार्यक्रम यांची माहिती लेखकाने प्रसंगानुरूप त्या-त्या लेखाच्या अनुषंगाने लिहिली आहे. आपण माणसं आरंभशूर असतो. एखादा प्रण, संकल्प मोठ्या उत्साहात करतो परंतु तो पूर्णत्वास जात नाही. लेखकाने धैर्या विनोद कुलकर्णी या बारा वर्षाच्या मुलीने केलेला एक धाडसी पण तितकाच अवघड संकल्प कसा पूर्ण केला याचे रोमहर्षक वर्णन धाडसी धैर्या या लेखात केले आहे तसेच प्रदीप देवरे या तरुणाच्या जिद्दीची, चिकाटीची कथा वर्णन केली आहे. शिरीष चिटणीस यांच्या ‌‘आनंदझरा‌’ यात जो वाचक विहार करील तो नक्कीच आनंदी होईल हे निश्चित. पुस्तक वाचनीय, ज्ञानवर्धक आहे.

आनंदझरा | Anandzara
₹300.00₹225.00
Buy Now

आनंदझरा : स्तंभलेखन

लेखक : शिरीष चिटणीस

प्रकाशक : चपराक प्रकाशन

पाने : 150

मूल्य : 300/-


-नागेश शेवाळकर, 9423139071  


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page