top of page

अंगुठाछाप

  • Apr 5
  • 3 min read

मुलांना नवे ते हवे असते हा नित्याचा अनुभव असल्याने त्यांना विचारलं,

"आज,काय शिकायचं?"

एकच गलका करत नव्या फर्माईश येऊ लागल्या.

"गणित"

"मराठी"

"इंग्रजी"

"टीव्ही पहायचा"

"काहीच नाही"

सारे पटापट ज्याला जे आवडेल ते दणादण तोंडातून येत कानावर आदळत होते, तेवढ्यात दुर्वा जोरात,

"शांत व्हा रे.आपल्या सरांचे कान दुखतील ना." 

सारा वर्ग शांत झाला. तिचे बोलणे पुन्हा सुरू झाले.

"चित्रकला घ्या सर."

मग वर्गात चित्रकलेचा तास सुरू झाला. फळ्यावर मी मोठ्या अक्षरांत लिहिलं,

 “आज काहीतरी वेगळं करूया!”

    मुलांच्या डोळ्यांत कुतूहल चमकत होतं.ती एकमेकांकडे बघू लागली.नेहमीसारखं नसेल हे त्यांना समजले होते.पेन्सिल, वही, रंगीत खडू घेऊन बसण्याऐवजी आज त्यांच्या चेहऱ्यावर “काय होणार?” असा प्रश्न होता. मी वॉटर कलर टेबलावर ठेवले.ते पाहताच...

 दुर्वा म्हणाली,

 “सर, हाताच्या अंगठ्याला रंग लावून कागदावर उमटवू या… मग त्याला डोळे, कान काढू!”

कल्पना भन्नाट होती. वर्गात क्षणभर शांतता पसरली आणि लगेच सगळे म्हणाले,

“हो हो… करूया!”

तिला म्हटलं,

"हे कुठे पाहिलं."

"यूट्यूब"

        तिलाच एखादे दुसरे चित्र काढण्यास सांगितले. तिने पटकन आपला अंगठा रंगात बुडवत पेनाची साथ घेत कागदावर पक्षी काढून दाखवला. वर्गात तिचे कौतुक केले. काही चित्र यूट्यूबवर मुलांना दाखवून स्मरणचित्र काढण्यावर भर दिला.

      पोरांनी आता स्वतःजवळच्या रंगांच्या डब्या उघडल्या. लाल, पिवळा, निळा, हिरवा असे रंग अंगठ्यावर लावून कागदावर उमटू लागले. सारा वर्ग रंगात न्हाऊन निघत होता.एका छोट्याशा ठिपक्यातून किती कल्पना उगम पावू शकतात, याचा प्रत्यय त्या दिवशी आला. कुणी अंगठ्याच्या ठशातून चिमणी तयार केली, कुणी उंदीर, कुणी फुलपाखरू… काहींनी तर अंगठ्यांच्या रांगा लावून अळी साकारली.

त्या छोट्याशा ‘अंगुठाछापा’तून सृजनाचा मोठा दरवाजा उघडला होता.

      हा उपक्रम केवळ चित्रकलेचा नव्हता; तो शिक्षणाचा जिवंत अनुभव होता.रंग हाताला लागले, कागद माखला, बोटं हलली… शरीराची हालचाल झाली. शारीरिक कृतीतून शिकणं ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. हात डोळा समन्वय, बोटांची पकड, रेषांचा ताळमेळ हे सगळं नकळत घडत होतं.

      रंगांच्या स्पर्शातून मुलांना संवेदना कळत होत्या. निळा रंग थंड वाटतो, लाल उठून दिसतो, हिरवा डोळ्यांना सुखावतो. रंगांच्या मानसशास्त्राची बीजं त्या खेळातच पेरली जात होती. मुले रंगमय झाली होती.

     कल्पनाशक्तीला तर पंख फुटले होते. एका ठशातून पक्षी उडत होता, दुसऱ्या ठशातून ससा धावत होता. कुणी अंगठ्याच्या दोन ठशांना जोडून आई मुलाचं चित्र काढलं. एका छोट्याशा बोटाच्या ठशात त्यांनी आपली दुनिया रंगवली.

      या प्रक्रियेत मुलं फक्त ‘चित्र काढत’ नव्हती; ती विचार करत, निर्माण करत, स्वतःचा ठसा उमटवत होती. पुस्तकातील चौकटीबाहेर जाऊन त्यांनी सृजनाचा आनंद अनुभवला.

      दुर्वाच्या एका साध्या कल्पनेने संपूर्ण वर्ग हलला. मुलांच्या डोक्यातून आलेली कल्पना शिक्षकाने स्वीकारली की वर्गात शिक्षणाचा उत्सवच साजरा होतो, हे पुन्हा जाणवलं.

“सर, माह्या उंदीर बघा!”

“माझं फुलपाखरू उडतंय!”

"ना रं,हायी कसं दिखं ना डाखीनसारखं!"

मुलांच्या आवाजात आत्मविश्वास होता. स्वतःच्या हाताने काहीतरी निर्माण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलला होता.

       आजही आपल्या समाजात ‘अंगठाछाप’ हा शब्द निरक्षरतेचं प्रतीक म्हणून वापरला जातो. सही करता येत नाही, नाव लिहिता येत नाही म्हणून माणूस केवळ अंगठ्याचा ठसा उमटवतो.आज निरक्षरता दूर करण्यासाठी उल्लास नावाचा केंद्र पुरस्कृत उपक्रम सुरू आहे.निरक्षरता ही एक वेदनादायक वस्तुस्थिती आहे. पण शिक्षणाची खरी ताकद हीच की, तोच अंगठा जो केवळ ओळखीचा ठसा देत होता, तोच एक दिवस पेन पकडतो, अक्षरं रेखाटतो आणि स्वतःची सही करतो. अंगठा म्हणजे अज्ञानाची खूण नाही; तो शक्यतेचा प्रारंभबिंदू आहे.

       त्या दिवशी वर्गात उमटलेले रंगीत ठसे नवा संदेश मनात पेरून गेले,ही मुलं उद्या केवळ अंगठ्याचा ठसा देणारी नाहीत; ती स्वतःचं नाव लिहिणारी, विचार मांडणारी, समाजात आपली सही करणारी पिढी आहे. शिक्षण म्हणजे अंगठ्याला सहीपर्यंत नेण्याचा प्रवास. त्या प्रवासाची सुरुवात कदाचित अशाच एखाद्या छोट्याशा ‘अंगुठाछापा’तून होत असते.अंगठ्याच्या ठशातून सुरू झालेला हा प्रवास अक्षर, विचार आणि आत्मविश्वासापर्यंत पोहोचतो.शाळा म्हणजे अंगठ्याला ‘अंगठाछाप’ न राहू देणारी संस्कारभूमीच हे शाश्वत सत्य.

       अंगठ्याचा ठसा म्हणजे केवळ ओळख नाही; तो सृजनाचा प्रारंभ आहे.त्या दिवशी प्रत्येक मुलाने कागदावर आपला ‘अंगुठाछाप’ उमटवला; पण खरं तर त्यांनी मनावर एक आठवण उमटवली.

 शिकणं म्हणजे आनंद, रंग आणि प्रत्यक्ष कृतीचा उत्सव!

जिथे प्रत्येक छोट्या ठशात मोठं शिक्षण दडलं आहे.

-भरत पाटील 

9665911657

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page