top of page

बेरोजगार तरुणांचे नैराश्य

  • Mar 23
  • 3 min read

राहुलच्या खोलीत आजही सकाळ उगवली होती पण त्याच्या आयुष्यातील रात्र अजूनही संपलेली नव्हती. खिडकीतून आत येणारा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता पण त्याच्या डोळ्यात काहीच हालचाल नव्हती. छताकडे एकटक पाहत तो पडून होता. मोबाईलचा अलार्म बऱ्याच वेळापूर्वी वाजून गेला होता. उठण्याचे कारण उरले नव्हते. ऑफिसला जायचे नव्हते, कॉलेजला जायचे नव्हते आणि कुठेच जायचे नव्हते. चार वर्षांपूर्वी तो हाच राहुल नव्हता. इंजिनिअरिंगचा निकाल लागल्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती. आईने गोड शिरा केला होता. वडील शेजाऱ्यांना सांगत होते, “माझा मुलगा इंजिनिअर झाला.” त्या दिवशी घरात एक वेगळाच उत्साह होता.


राहुललाही वाटत होतं. आता आयुष्याची गाडी वेगाने धावणार! पण ती गाडी स्टेशनवरच थांबली. पहिली मुलाखत त्याने खूप आत्मविश्वासाने दिली होती. नवा शर्ट, नीट इस्त्री केलेली पँट, हातात फाईल आणि चेहऱ्यावर आशा! पण निकाल लागला  We regret to inform you  पहिल्यांदा त्याने ते सहज घेतले. चालायचंच!  तो स्वतःलाच म्हणाला. दुसरी, तिसरी, चौथी मुलाखत हळूहळू नकारांची सवय झाली पण प्रत्येक नकाराने आतून काहीतरी तुटत होतं. सुरुवातीला मित्र फोन करत होते. “काय रे, काही लागलं का?”


“नाही रे, अजून प्रयत्न चालू आहेत.”


नंतर फोन कमी झाले. मग बंद झाले. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मित्रांचे फोटो येत होते. कोणाला नोकरी लागली, कोणाचा ऑनसाईट कॉल आला, कोणाची बढती झाली. राहुल फक्त बघत राहायचा. त्याला आठवत होतं ह्याच लोकांसोबत तो रात्री उशिरापर्यंत बसून भविष्यासंबंधी बोलायचा. आपण सगळे मोठे होणार! पण आता तो एकटाच लहान होत चालला होता. आई रोज विचारायची, “आज काही अर्ज केला का?” तो मान हलवायचा. कधी कधी खोटं बोलायचा. “हो केला!”


खरं म्हणजे त्याच्यात अर्ज करण्याचीही ताकद उरली नव्हती. एक दिवस वडिलांनी शांतपणे विचारलं, “तू काही दुसरं काम बघ ना! काही तरी तरी कर.” त्या वाक्यात काळजी होती पण राहुलला अपमान वाटला. त्याला वाटलं मी इतका कमी आहे का? त्या रात्री तो बराच वेळ छताकडे पाहत पडून होता. नैराश्य हळूहळू त्याच्या आयुष्यात शिरलं. सुरुवातीला ते एक विचार होतं, कदाचित मी पुरेसा चांगला नाही. नंतर ते एक भावना बनलं, मी काहीच नाही. मग ती त्याची ओळख झाली. तो मित्रांच्या भेटी टाळू लागला. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं. घरातल्या संभाषणातही तो कमी बोलू लागला. त्याच्या खोलीत एक वेगळंच शांत वातावरण तयार झालं होतं! जणू काही आवाजालाही आत येण्याची भीती वाटत होती. त्याच्या आईला जाणवत होतं. ती कधी त्याच्या आवडीचा चहा करून आणायची. कधी विचारायची, “तुला काही त्रास होतोय का?” तो फक्त म्हणायचा, “नाही!” पण त्रास होत होता.


रोज सकाळी उठताना त्याला स्वतःशीच लढावं लागत होतं. ‌‘आज उठावं का?‌’ कधी कधी त्याला वाटायचं जर सगळं थांबलं तर? जर ह्या विचारांचा आवाज बंद झाला तर? पण मग आईचा चेहरा आठवायचा. ती दारातून डोकावून बघत असे तो ठीक आहे का ते पाहण्यासाठी. एक दिवस दुपारी त्याचा जुना मित्र समीर अचानक घरी आला. राहुलला त्याला भेटायची इच्छा नव्हती पण आईने हाक मारली. समीर समोर बसला. काही वेळ दोघेही शांत होते. मग समीर म्हणाला, “मला माहीत आहे. तू काय अनुभवतोयस.” राहुलने वर पाहिलं. समीर हसत नव्हता. तोही गंभीर होता. “माझ्याबरोबरही असंच झालं होतं,” तो म्हणाला. “दोन वर्ष काहीच लागलं नाही. मला वाटायचं मी संपलो.” राहुल काही बोलला नाही. समीर पुढे म्हणाला, “पण मग मला समजलं बेरोजगारी म्हणजे अपयश नाही. ती एक अवस्था आहे.”


त्या दिवशी राहुलने बराच वेळानंतर कोणाशी मन मोकळं केलं. त्याने पहिल्यांदा कबूल केलं मला भीती वाटते. कशाची? की आयुष्य असंच राहील. समीर शांतपणे म्हणाला, “नाही राहणार!” तो उठताना म्हणाला “उद्या बाहेर जाऊया. काही कामासाठी नाही. फक्त चालायला.”


दुसऱ्या दिवशी राहुल गेला. रस्त्यावरची माणसं, गाड्या, आवाज सगळं काही त्याला खूप दिवसांनी जाणवलं. जग चालू होतं. फक्त तोच थांबला होता. त्या दिवसापासून काही मोठा बदल झाला नाही. त्याला लगेच नोकरी लागली नाही; पण एक छोटा बदल झाला. तो पुन्हा अर्ज करू लागला. आईशी थोडं बोलू लागला. कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. नैराश्य पूर्णपणे गेलं नव्हतं. ते अजूनही त्याच्या सावलीसारखं सोबत होतं पण आता त्याला माहीत होतं तो एकटा नाही! आणि कदाचित ही रात्र कायमची नाही! कारण कुठेतरी, हळूहळू त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा सकाळ उगवत होती.


- मयूर बागुल, 9096210669

साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page