top of page

भाषा वाचेल तर राष्ट्र वाचेल

  • Mar 5
  • 3 min read

भाषा वाचेल तर राष्ट्र वाचेल

जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रांतात विविध भाषा बोलणारी माणसे आपली भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्या भाषेशी माणसांचे भावनिक नाते जोडलेले असते. त्यामुळे भाषेच्या माध्यमातून माणसे, राष्ट्र आणि तेथील संस्कृतीचे जतन होत असते. भाषा जिवंत राहिली, तर संस्कृती टिकते. भाषा हे राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जेव्हा केव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा त्या प्रांतातील ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या मनातील स्वातंत्र्याची प्रेरणादेखील मरत असते. आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी, भाषेत नव्या युगाची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आणि भाषेच्या समृद्धतेची वाट चालण्यासाठी भाषेच्या उपासकांनी प्रयत्न करण्याची गरज असते.


आज समाजात विविध भाषा बोलल्या जात असल्या, तरी भाषांच्या माध्यमातून समाज जोडला जात असतो. भाषा या एकमेकींच्या सोबतीने समृद्धतेचा प्रवास करत असतात. बहुभाषिकत्व असलेल्या प्रांतात मोठ्या भाषांनी छोट्या समूहाची भाषा मारण्याऐवजी, एकमेकींच्या आधारे तिची वृद्धी कशी होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. असे प्रयत्न झाले, तर सर्वच भाषा समृद्ध होत जातील. अनेकदा काही मोठ्या भाषा या छोट्या भाषांना जाणीवपूर्वक मारण्याचे काम करतात. त्यामुळे जगभरातील अनेक छोट्या-छोट्या भाषा मृत पावत असल्याचे अभ्यासक सांगतात. इंग्रज वसाहती जिथे-जिथे स्थापन झाल्या, तेथील स्थानिक भाषा मारण्याचे काम त्यांनी केले, हा जगाचा इतिहास आहे. त्याचवेळी, या मृत पावणाऱ्या भाषा छोट्या समूहांच्या भाषा आहेत, त्यामुळे त्या लयास गेल्या तरी त्यांची चिंता नाही, असे म्हणून आपण पुढे चालत राहिलो, तर त्याचा परिणाम आपल्याही राजभाषेवर होतो, हेही लक्षात घ्यायला हवे. बोलीभाषा जिवंत राहणे, याचा अर्थ ती बोलणाऱ्या समूहाची संस्कृती जोपासणे होय. भाषा ही केवळ भाषा कधीच नसते; तिच्यात समाज आणि प्रांतांचे भावनिक नाते सामावलेले असते. तेथील मातीशी आणि संस्कृतीशी देखील तिचे एक नाते असते.

आपल्या भाषेचा इतिहास गौरवशाली आहे. वर्तमानात भाषिक अभिमान बाळगला जात आहे. त्याचवेळी भाषिक अस्मिता टोकदार होत आहेत. त्यातून राजकीय संघर्ष सुरू राहून माणसांमध्येही भेदाच्या भिंती उभ्या ठाकत आहेत. भाषा ही समाज जोडण्याचे काम करते. एकमेकांच्या भाषेतून जे-जे चांगले असेल, ते-ते घ्यावे. त्यातून देवाणघेवाण करीत समृद्धतेचा प्रवास सुरू राहण्याची गरज आहे. भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याऐवजी आणि तिच्यात काही भर टाकण्याऐवजी संघर्ष केल्याने भाषेच्या मूळ हेतूलाच बाधा पोहोचते. भाषा समृद्ध करणे, हे ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण भाषेमुळे एकसंघ आहोत. भाषेतून आपली संस्कृती अधोरेखित होत असते. त्यामुळे भाषेत आपण कोणकोणत्या प्रकारच्या साहित्याची भर टाकतो, हे महत्त्वाचे असते. वर्तमानात मराठी साहित्यात भर टाकणारे वाङ्मय काही प्रमाणात प्रकाशित होत असले, तरी त्यातही कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या दर्जाचे साहित्य प्रकाशित होते, हेही लक्षात घ्यायला हवे. अलीकडच्या काळात मराठी साहित्यात जगातील बदलांचा वेध घेणारी, समाजाला दिशा देणारी आणि चिंतन करण्यास भाग पाडणारी वैचारिक वाङ्मयीन पुस्तके फारशी प्रकाशित होत नाहीत. त्याची काही कारणे असली, तरी जी प्रकाशित होतात त्यांना किती प्रमाणात वाचक मिळतात, हाही एक प्रश्न आहे. अशा परिस्थितीत भाषा समृद्ध कशी होणार, हा खरा प्रश्न आहे. मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन वाढले, मराठी वर्तमानपत्रांचे वाचन झाले आणि मराठी माध्यमांच्या शाळा सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले गेले, तरच मराठी भाषा वाचणार आहे. ही माध्यमे लोकसंवादाची आहेत. त्यातून भाषेचे रूप प्रकट होत असते. प्रसारमाध्यमे भाषा जिवंत ठेवत असतात; त्यामुळे त्या माध्यमातून होणारी देवाणघेवाण महत्त्वाची ठरते. आपण जेव्हा इंग्रजी भाषेचा इतिहास जाणतो, तेव्हा त्या भाषेत मोठ्या प्रमाणावर असे छोटे-छोटे प्रयत्न होताना दिसतात. ते लोक भाषेबाबत जितके जागृत व संवेदनशील आहेत, तेवढीच संवेदनशीलता आपणही जोपासण्याची गरज आहे. मराठी भाषा ही आज लोकव्यवहाराची भाषा आहे. प्रशासकीयदृष्ट्या आजही मंत्रालयात मराठीचा किती उपयोग केला जातो, हा खरा प्रश्न आहे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे ती मंत्रालयाबाहेर भिकाऱ्यासारखी ताटकळत, प्रतीक्षा करीत उभी आहे. तिची ही अवस्था का निर्माण झाली?

वर्तमानात अद्यापही शंभर टक्के शासकीय पत्रव्यवहार मराठीतून होत नाही. राज्यातील न्यायालयांचा कारभार मराठीत होण्याची आजही गरज आहे. अनेक विद्यापीठांचा कारभारही इंग्रजीतूनच होत आहे. शासनाचा कारभार हा लोकांच्या भाषेत झाला, तर लोकांचे प्रश्न अधिक वेगाने सुटण्यास मदत होते. पण कारभाराची भाषा ही लोकभाषा न ठेवता ती इंग्रजी ठेवण्यात आणि लोक व प्रशासन यांच्यात जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यात तत्कालीन सरकारी व्यवस्थेचा स्वार्थ होता. आज राज्यकर्ते आणि लोक हे एकाच देशाचे नागरिक आहेत; त्यामुळे लोकभाषाच प्रशासनाची भाषा होण्याची गरज आहे. यावर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

आपल्या भाषेत समाजातील समूहांसोबत संवाद साधण्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. मात्र, येथे आपल्याच भाषेत संवाद साधताना आपल्याला लाज वाटते. बाहेरील प्रांतातील लोक येथे व्यवसाय करायला येतात आणि ते त्यांच्याच भाषेत व्यवहार करतात. त्यांना व्यवसायाची गरज असल्याने, त्यांनी येथील भाषा शिकणे महत्त्वाचे आहे. आपणच त्यांच्या भाषेत संवाद साधतो, त्यामुळे आपल्याच मायभूमीत आपली भाषा पोरकी होण्याचा धोका अधिक असतो. आपली भाषा कोणावर लादायची नाही हे जरी सत्य असले, तरी ती मरूही द्यायची नाही, याचा विचार आपण करायला हवा. आपले व्यवहार आणि शिक्षण आपल्याच भाषेत सुरू राहील, याची काळजी आपण घ्यायला हवी.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना, तिच्याशी नाते सांगणाऱ्या अनेक बोलीभाषा आहेत. त्या भाषादेखील जिवंत आणि समृद्ध करण्यासाठी मराठी भाषिकांनी आणि तिच्या उपासकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या बोलीभाषा हादेखील आपल्या भाषेसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांचे जतन करणे, याचा अर्थ मराठी समृद्ध करणे होय. मुळात मुख्य भाषेच्या विकासाचा विचार करता, बोलीभाषा आणि परिसर भाषादेखील जिवंत राहण्यासाठी मुख्य भाषेच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत. त्या भाषांमध्ये जितके साहित्य निर्माण होईल आणि संवाद साधला जाईल, तितक्या मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेचा विकास होण्याची शक्यता अधिक वाढेल.


संदीप वाकचौरे ८३२९३२८४७०

(लेखक शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page