चला शोधूया या आनंदाच्या वाटा
- May 17
- 2 min read
या जगातील प्रत्येक जीवजंतूचा मूलभूत उद्देश एकच आहे, आनंद मिळवणे. प्रत्येक प्राणी आपल्या कुवतीप्रमाणे, निसर्गाने दिलेल्या क्षमतेनुसार आनंद शोधत असतो. मानवाने तर आनंदप्राप्तीचे असंख्य मार्ग शोधून काढले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर मानव आनंदाकडे वळतो. कामात, क्रीडेत तो परम आनंद शोधतो. काही जण मद्याच्या प्रत्येक घोटात तर काही देहाच्या स्पर्शात आनंद पाहतात. त्याने मद्य आणि मदिनेत रममाण होणाऱ्यांचीही संख्या वाढते.
एकदा मित्राबरोबर चर्चा करताना तो म्हणाला, “अमुक-तमुक चोवीस तास झिंगलेलाच असतो.”
मी सहज उत्तर दिले, “तो त्याचा आनंद घेतोय.”
तुम्हीही नाही का महिन्यातून एकदा पर्यटनाला जाता, तोही तुमचा आनंदच! मात्र गंमतीचा भाग सोडला तर आनंद घेताना स्वतःला किंवा इतरांना इजा होणार नाही, याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. खरा आनंद देण्यात असतो. मग ती विद्या असो, अन्न असो, पैसा असो किंवा सहकार्य. आनंद ही अंतरिक संकल्पना आहे; मात्र आपण तो बाह्य, भौतिक गोष्टींत शोधण्याचा प्रयत्न करतो. जितका भौतिक गोष्टींचा हव्यास वाढतो, तितके आपण आनंदापासून दूर जातो. आनंदी राहायचे असेल तर ईर्षा, द्वेष आणि मत्सर यापासून दूर राहिले पाहिजे.
बुद्ध सभ्यक व्यवहाराचा संदेश देतो. गीता ‘निष्काम कर्मयोग’ सांगते. कुराण शेजाऱ्यावर प्रेम करण्याची शिकवण देते. येशू ख्रिस्त तर स्वतःला मारणाऱ्यालाही क्षमा करण्याचा संदेश देतो. सर्व धर्मांचा सार एकच, मानवतेतून आनंद. आनंद अशी गोष्ट आहे की ती सर्वांनाच हवी असते; पण तिचे ठरावीक सूत्र कोणाकडेच नसते. खरं तर आनंदाचे गणित प्रत्येकाचे वेगळे असते. लहान मुलाला नवे खेळणे मिळाले की तो जग जिंकल्यासारखा आनंदी होतो. नोकरदाराला महिन्याच्या शेवटी पगार जमा झाल्याचा संदेश आला की त्याचे मन थोडे हलके होते. सकाळच्या गरमागरम चहा आणि वर्तमानपत्रात बरेच आनंद घेतात. कुणाला क्रिकेटची मॅच पाहण्यात रममाण होण्यास आवडते. राजकारण्यांना निवडणुका जिंकण्यात भलता आनंद मिळतो. साध्या गृहिणीला रुचकर स्वयंपाक करण्यात तर खूप आनंद. अशा आनंदाच्या क्षणिक अनेक वाटा आहेत.
माणूस आयुष्यभर काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो; पण जे आहे त्यात आनंद घ्यायला मात्र विसरतो. सतत ‘आणखी थोडं’ या अपेक्षेने तो स्वतःलाच दमवतो. अपेक्षा वाढल्या की आनंद आपोआप कमी होतो हे साधे गणित आपणच विसरतो. खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो; तो लहानसहान क्षणांत दडलेला असतो. आवडीचे पुस्तक वाचणे, मित्राबरोबर गप्पा मारत फिरणे, एखाद्याचे मनापासून कौतुक करणे, कुणाला अडचणीत मदत करणे, आपल्या कृतीमुळे कुणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटणे या गोष्टी खोल समाधान देतात. काही आपल्या दैनंदिन कामात आनंद शोधतात ते तर फारच छान.
नेहमी कृतज्ञ राहावे. तुलना, ईर्षा आणि असमाधान थोडे बाजूला ठेवावे. त्यामुळे मन हलके होते; आणि मन हलके झाले की आनंद आपोआप जवळ येतो. मोठी स्वप्ने पाहण्याआधी छोटे क्षण जगायला शिका. आयुष्य म्हणजे मोठ्या यशांची माळ नाही तर लहान-लहान आनंदांची सुंदर गुंफण आहे. जपानी इकिगाई सांगते, तुमच्या जगण्याचा उद्देश शोधा व त्यासाठी निखळ साधे जागा. कष्टाने शारीरिक आरोग्य जपण्याचाही एक वेगळाच आनंद असतो. श्रमातून आलेले यश, नात्यांतील विश्वास आणि स्वतःशी प्रामाणिकपणा यांची किंमत वेळेसोबत वाढत जाते. म्हणूनच आनंदाचे गणित ‘मिळवण्याचे’ नाही तर ‘जपण्याचे’ आहे. रोजच्या छोट्या निर्णयांची बेरीज, चुकीतून घेतलेल्या शिकवणीची वजाबाकी आणि संयमाने केलेल्या भागाकारातूनच आनंदाचे गणित सुटते.
स्वतःशी शांत, इतरांशी सौम्य आणि आयुष्याशी कृतज्ञ राहिलो तर आनंद आपोआप संतुलित राहतो. हे सर्व करण्याची शक्ती निखळ, निरपेक्ष प्रेमभाव दयाभाव देतो. प्रेम, दया हेच या जगातील आनंदाचे शाश्वत मूल्य आहे.
चला तर मग, एकमेकांवर प्रेम करूया... थोडे दयाळू होऊ या... आनंदाच्या वाटा शोधूया... सुरुवात तर करून पाहू. बघू या, जमतंय की नाही!
- अशोक शेटे, संगमनेर
9921169286
.jpg)



Comments