top of page

फक्त पोरांवर लक्ष द्या!

  • Jun 22
  • 3 min read

शालेय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक यांची शाळेची भविष्यकालीन नियोजनाविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. उपस्थित सर्वांना मागील वर्षाचा आढावा देताना या शैक्षणिक वर्षात राबवायचे उपक्रम, शालेय अभ्यास, भौतिक बाबी यावर चर्चा करण्यात आली. सकारात्मक बाबी लक्षात घेत पालकांनीही शालेय प्रगतीविषयी सामूहिक कौतुक केले. आम्हाला सर्वांना भारी वाटले. करत असलेले काम योग्य दिशेने आहे हा आत्मविश्वास आमच्यात आला. उपस्थित पालकांनी आपल्या पाल्यांविषयी असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यास आम्ही आमच्या परीने उत्तरे दिली. आता अध्यक्ष या नात्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल ताडगे यांनीही आपला लेखाजोखा मांडताना आपल्या शाळेतर्फे अपेक्षा व्यक्त केल्या. त्यात हृदयाच्या कप्प्यात त्यांचं एक वाक्य खोलवर रुजलं, ते म्हणाले, “सर, आम्हाला काही विशेष नको. फक्त पोरांवर लक्ष द्या. त्यांना चांगलं शिकवा, चांगले संस्कार द्या आणि त्यांचं भविष्य घडवा.”


तरुण युवा असलेला धिप्पाड गडी अध्यक्ष या नात्याने त्यांनी व्यक्त केलेली ही भावना केवळ एका व्यक्तिची मागणी नव्हती ती आज ग्रामीण भागातील असंख्य पालकांच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाज घडविण्याचे केंद्र आहे, हे ते समजून होते. त्यामुळे शिक्षकांकडून समाजाच्या म्हणजे आमच्या अपेक्षा मोठ्या आहेत हे ते प्रातिनिधिक म्हणून बोलत होते. आम्ही आमचा प्रशासकीय कामांना पुढे करत विद्यार्थ्यांना देत असलेला वेळ याविषयी बोलू लागताच ते म्हणाले, “गुरू, तुम्हाला किती कामे करावी लागतात हे आम्ही कायम पाहतो. तुम्ही सारे खूप मेहनत घेता. आमचे त्याविषयी काही म्हणणे नाही. आमच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी शिक्षकांना किती विविध कामांमध्ये गुंतावे लागते, याचा विचार फारसा होत नाही पण आम्ही सारे जाणतो.”


ते बोलत होते. आम्ही सुजाण नागरिकाचे सकारात्मक विचार ऐकत तृप्त होत होतो. खरे पाहता आज शिक्षण विभागामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यासोबतच शासनाच्या अनेक योजना, सर्वेक्षणे, माहिती संकलन, ऑनलाइन नोंदी, विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे, प्रशिक्षण, अहवाल सादर करणे, बैठकांना उपस्थित राहणे, निवडणूक कामे, जनगणना, विविध मोहिमा अशा अनेक जबाबदाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षकांवर येतात. ते दिवसभरात लिलया पार पाडतात. ते करत असलेले प्रत्येक काम महत्त्वाचे असते; कारण ते शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असते मात्र या सर्व कामांमध्ये शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होतो, हे लक्षात येतच नाही. शिकवता शिकवता ते आलेलं काम पूर्ण करावे लागते. त्यात आज, आत्ता, ताबडतोब अशा शब्दांमुळे तर पुन्हा जेरीस येणं वेगळं.


त्यात पालकांची असलेली अपेक्षा अगदी स्पष्ट असते. त्यांच्या दृष्टीने शिक्षक म्हणजे त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी झटणारा मार्गदर्शक. मुलाने व्यवस्थित वाचन करावे, लेखन सुधारावे, गणित समजावे, आत्मविश्वास वाढावा आणि चांगला नागरिक बनावा, हीच त्यांची इच्छा असते. त्यामुळे जेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष ‌‘फक्त पोरांवर लक्ष द्या‌’ असे म्हणतो तेव्हा तो सर्व पालकांच्या मनातील भावना मांडत असतो, हे आम्ही जाणून होतो. खरे तर मुलांच्या विकासासाठी शिक्षक आणि पालक यांची भागीदारी अत्यंत आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षापासून राबवत असलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्ता यामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. काही पालक मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेतात. गृहपाठ तपासतात, शाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि शिक्षकांशी सतत संपर्क ठेवतात परंतु अनेक वेळा पालकांची जबाबदारी केवळ शाळेकडे सोपवली जाते. मुलांचा मोबाईल वापर, अभ्यासाची सवय, वाचनाची आवड, घरातील शैक्षणिक वातावरण याकडे दुर्लक्ष केले जाते. मुलांच्या यशासाठी पालकांनीही तितक्याच जबाबदारीने सहभागी होणे गरजेचे आहे असे वाटून जाते. गृहभेटी दरम्यान येत असलेला अनुभव हा उपयुक्त असतो.


आज शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचा वाढता भार ही एक गंभीर बाब लक्षात येत नाही असे नाही पण करणार काय? अशी अवस्था होऊन जाते. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सर्वच स्तरावर चिंता व्यक्त केली जाते. मग शिक्षकांना अधिकाधिक वेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. विविध अहवाल, माहिती संकलन आणि इतर अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध झाली तर शिक्षकांचा अधिक वेळ विद्यार्थ्यांसाठी खर्च होऊ असा विचार मनात येत असताना आता फक्त दर शनिवारी ऑनलाईन ऑफलाईन कामे, शालेय कामे पूर्ण करावीत, माहिती मागवावी हे परिपत्रक आशादायी वाटते.


 शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त कामांविषयी गावातील शाळा व्यवस्थापन समित्या ह्या याबाबत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शाळेच्या गरजा शासनापर्यंत पोहोचवणे, पालकांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. “फक्त पोरांवर लक्ष द्या” ही मागणी करताना अध्यक्ष शिक्षकांवर टीका करत नाहीत; उलट शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ मिळावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे हे ते बोलूनही दाखवतात. ते पुढे म्हणतात, “गुरू, तुमच्या डोळ्यासमोर फक्त विद्यार्थी पाहिजे. तुम्ही आम्ही फक्त शाळेत येणारा विद्यार्थी कसा भारताचा सुजाण नागरिक बनेल यावर लक्ष देऊ. शासनाच्या योजना, प्रशासकीय प्रक्रिया, पालकांचा सहभाग आणि तुमचे प्रयत्न या सर्वांचा अंतिम उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच असला पाहिजे. मुलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक वेळ, साधने आणि सहकार्य मिळणे ही काळाची गरज आहे. हे आम्ही जाणतो. दोन भौतिक गोष्टी नसल्या तर चालतील पण सर, फक्त पोरांवर लक्ष द्या. बाकी सारे नंतर बघू.”


मुलांचे शिक्षण, संस्कार आणि भविष्य यापेक्षा महत्त्वाचे दुसरे कोणतेही काम असू शकत नाही. अध्यक्ष या नात्याने त्यांची भूमिका, विश्वास, आर्त हाक, सुजाण पालक म्हणून त्यांनी घातलेली साद यास प्रतिसाद देण्याचा आमचा दृढ संकल्पही आम्ही केला.


- भरत पाटील

9665911657

साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६

फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page