top of page

वैचारिक ढोंगाचा थिएटर शो

  • 2 days ago
  • 5 min read

आजचा समाज कमालीचा अपडेटेड झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञानाच्या, प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या नवनवीन आवृत्त्या आपल्या हाताशी असतात. आपण सुशिक्षित झालो आहोत, जागतिक नागरिक झालो आहोत आणि मुख्य म्हणजे आपण प्रचंड संवेदनशील आणि विचारवंत झालो आहोत... असा एक गोड गैरसमज आपण सर्वांनी मिळून पाळला आहे पण या दिखावू झगमगाट असलेल्या आधुनिकतेचा आणि पुरोगामित्वाचा विळखा जसा जसा घट्ट होतोय, तसतशी आपल्यातील आंतरिक मानवी मूल्ये मात्र वेगाने ढासळत चालली आहेत.


आजचा काळ हा वैचारिक क्रांतिचा नाही तर वैचारिक ढोंगाचा सुवर्णकाळ आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही कारण आज समाजात मूल्यांची जपणूक करण्यापेक्षा, ‌‘मीच कसा श्रेष्ठ‌’, ‌‘माझ्याकडेच कशी उच्च मूल्ये आहेत‌’ याचे प्रदर्शन मांडण्याची चढाओढ लागली आहे. आपण सारेच जण समाजाच्या या एका मोठ्या थिएटरमध्ये आपापले सोयीस्कर मुखवटे चढवून वावरत आहोत. स्टेजवर टाळ्या मिळवणारा विचार आणि प्रत्यक्ष जगण्यातला आचार या दोन्हीमध्ये जे अथांग अंतर निर्माण झाले आहे, त्यालाच आज आपण स्मार्ट संस्कृती म्हणू लागलो आहोत. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधताना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ सोयीस्करपणे लपवण्याची ही कला म्हणजेच आजचे वैचारिक ढोंग आहे.


आजच्या वैचारिक ढोंगाचे सर्वात मोठे आणि हक्काचे व्यासपीठ कोणते असेल तर ते म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वर नजर टाकली तर समाज इतका सुधारलाय आणि संवेदनशील झालाय की जणू काही रामराज्य अवतरायला काही तासांचाच अवधी उरला आहे, असा भास होतो. स्त्री स्वातंत्र्य, पर्यावरण रक्षण, जातीअंताच्या गप्पा आणि गरिबांविषयीची कणव या विषयांवर इथे रोज वैचारिक उकळ्या फुटत असतात पण दुर्दैव असे की, ही तथाकथित क्रांती केवळ स्मार्टफोनच्या स्क्रीनपुरती आणि हॅशटॅगपुरतीच मर्यादित आहे.


सोशल मीडियावरील या संवेदनशीलतेच्या मागे लाईक्स आणि शेअर्सची एक क्रूर भूक दडलेली असते. रस्त्यावर अपघात होऊन एखादा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो तेव्हा त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यापेक्षा, त्याचा व्हिडिओ काढून ‌‘बदलते जग आणि हरवलेली माणुसकी‌’ या कॅप्शनसह रील बनवून सोशल मीडियावर टाकण्यात आजच्या पिढीला जास्त धन्यता वाटते. म्हणजेच, ज्या माणुसकीच्या नावाने आपण गळे काढतो, त्याच माणुसकीचा मरणपंथाला लागलेला खेळ आपल्यासाठी केवळ कॉन्टेंट ठरतो, यापेक्षा मोठे वैचारिक ढोंग ते कोणते?


दुसऱ्या बाजूला, स्त्री मुक्तीवर आणि समानतेवर फेसबुकवर पानापानांचे लेख लिहिणारे अनेक सुशिक्षित महाभाग, प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात किंवा स्वतःच्या घरात मात्र स्त्रीला दुय्यम स्थानच देत असतात. विचार मंचावर पुरोगामित्वाचा आव आणायचा आणि घरात मात्र जुनाट प्रतिगामी मानसिकतेचे चोचले पुरवायचे, हा दुटप्पीपणा आता आपल्या अंगवळणी पडला आहे. आपली सामाजिक मूल्ये आता विचारातून नाही तर व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरून ठरत आहेत. दिवसातून दहा वेळा स्टेटस बदलणारा माणूस स्वतःचे विचार बदलायला मात्र तयार नाही, हेच आजच्या काळाचे सर्वात विदारक सत्य आहे.


सामाजिक मूल्यांचा ढासळलेला बुरुज केवळ सार्वजनिक जीवनातच दिसतो असे नाही तर तो आपल्या उंबरठ्याच्या आत, म्हणजेच आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक नात्यांमध्येही स्पष्ट जाणवू लागला आहे. एकेकाळी नातेसंबंधांचा पाया हा त्याग, विश्वास आणि निखळ जिव्हाळा हा असायचा. आज मात्र नात्यांची जागा व्यावसायिक गणितांनी घेतली आहे. ‌‘या माणसाचा मला काही उपयोग वा फायदा आहे का?‌’ या एकाच प्रश्नाभोवती आजची बहुतांश नाती गुंफली जात आहेत. उपयोग संपला की नात्यांचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो.


या सगळ्यामध्ये सर्वात मोठे ढोंग उघडे पडते ते आपल्या सोयीच्या नैतिकतेमुळे. आज आपण नैतिकतेचे आणि मूल्यांचे नियम स्वतःसाठी वेगळे आणि जगासाठी वेगळे लावले आहेत. शेजाऱ्याच्या मुलाने प्रेमविवाह केला किंवा स्वतःच्या आवडीचे करिअर निवडले, की आपण समाज म्हणून त्यावर चर्वण करायला मोकळे होतो; पण तोच निर्णय जेव्हा आपल्या घरात घेतला जातो तेव्हा आपली पुरोगामित्वाची व्याख्या सोयीस्करपणे बदलते. भ्रष्टाचार वाईट आहे, असे आपण तावातावाने सांगतो; पण आपले एखादे सरकारी काम अडकले की, ते करून घेण्यासाठी लाच देणे आपल्याला गैर वाटत नाही.


नात्यांमधील हा दुटप्पीपणा आता वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येतून आणि तुटत चाललेल्या संसारांमधून समोर येत आहे. आई-वडिलांच्या संस्कारांवर सोशल मीडियात भाऊक पोस्ट टाकून हजारो लाईक्स मिळवणारी बरीचशी बोटे, प्रत्यक्षात घरातल्या वृद्ध आई-वडिलांशी चार शब्द प्रेमाने बोलायला मात्र कचरतात. आपण मूल्यांचा संकोच इतका केला आहे की, आता कर्तव्य आणि प्रेम या गोष्टीही आपण फक्त दाखवण्यापुरत्याच शिल्लक ठेवल्या आहेत. नात्यांमधला हा कृत्रिम सुसंवाद म्हणजेच आजच्या बदलत्या सामाजिक मूल्यांचे सर्वात मोठे अपयश आहे.


समाजातील अशिक्षित किंवा सामान्य माणसाकडून मूल्यांच्या रक्षणाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा, जो वर्ग स्वतःला सुशिक्षित, प्रगल्भ आणि विचारवंत मानतो, त्यांच्यातील ढोंगीपणा अधिक भयानक आहे. आज मोठ्या मोठ्या व्यासपीठांवरून, चर्चासत्रांमधून समता, बंधुभाव आणि जातीअंताच्या गप्पा मारणारा एक मोठा पांढरपेशी वर्ग समाजात वावरत असतो. त्यांचे बोलणे इतके प्रभावी असते की, ऐकणारा माणूस भारावून जातो परंतु याच आधुनिक विचारवंतांच्या घरात डोकावून पाहिले तर तिथे आजही लग्नाचा बायोडाटा बनवताना जातीचे रकाने आवर्जून तपासले जातात. घरकामवाल्या मावशींना चहा देण्यासाठी आजही वेगळा कप वापरला जातो.


हा वैचारिक दुटप्पीपणा केवळ जातीपुरता मर्यादित नाही तर तो आपल्या एकूणच भूमिकेमध्ये ठासून भरला आहे. आजचा सुशिक्षित माणूस स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अत्यंत सोयीस्करपणे मौन बाळगणे पसंत करतो. समाजात जेव्हा एखादी अन्यायकारक घटना घडते तेव्हा आपल्याला काय त्याचे? किंवा आपली नोकरी-व्यवसाय सांभाळा अशी सुरक्षित भूमिका घेतली जाते. अन्याय करणाऱ्यापेक्षा, अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहूनही आपल्या पांढरपेशी सुखात मश्गूल राहणारा हा वर्ग समाजाचा जास्त घात करत आहे.


व्यासपीठावर क्रांतिकारक विचार मांडायचे आणि प्रत्यक्ष व्यवहारात मात्र प्रस्थापित अनिष्ट रूढींचे चोचले पुरवायचे, हा एक प्रकारचा वैचारिक व्यभिचारच आहे. आपण सुशिक्षित झालो म्हणजे नक्की काय झालो? केवळ पदव्या मिळवल्या आणि आर्थिक स्थैर्य मिळवले म्हणजे मूल्ये आली का? जर आपले शिक्षण आपल्याला माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकवत नसेल तर त्या कागदी पदव्यांचा आणि वरवरच्या सुसंस्कृतपणाचा मुखवटा आता ओरबाडून काढण्याची वेळ आली आहे.


पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, समाज अचानक इतका ढोंगी आणि दुटप्पी का झाला? मानवी मूल्यांची ही घसरण केवळ काळाचा महिमा म्हणून सोडून देता येईल का? तर याचे उत्तर नाही असे आहे. याचे मूळ कारण माणसाच्या बदललेल्या मानसिकतेत आणि अति-आधुनिक होण्याच्या आंधळ्या शर्यतीत दडलेले आहे.


आज आपण अशा एका युगात जगत आहोत जिथे माणूस असण्यापेक्षा तो कसा दिसतोय याला जास्त महत्त्व आले आहे. इंग्रजीत ज्याला आपण  म्हणतो, म्हणजे इतरांकडून मिळणारी मान्यता किंवा कौतुक; त्या एका गोष्टीसाठी आजचा माणूस हपापला आहे. ‌‘मी आतून कसाही असलो तरी चालेल पण जगाच्या नजरेत मी कसा ग्रेट, संवेदनशील आणि प्रगतशील आहे‌’ हे दाखवण्याच्या नादात आजचा माणूस स्वतःचा खरा चेहरा विसरून गेला आहे. आपण स्वतःसाठी जगणे कधीच सोडले आहे, आपण जगतोय ते फक्त शेजाऱ्याला, नातलगांना किंवा सोशल मीडियावरील अनोळखी फॉलोअर्सना दाखवण्यासाठी!


जेव्हा समाज सत्यापेक्षा दिखाव्याला जास्त किंमत देऊ लागतो तेव्हा मूल्ये आपोआपच अडगळीत पडतात आणि ढोंगीपणाचे पीक जोमात येते. आज आपल्याला प्रामाणिक माणसापेक्षा, प्रामाणिकपणाचा अभिनय करणारा माणूस जास्त जवळचा वाटतो. हीच मानसिक गुलामी आणि सोयीची नैतिकता समाजव्यवस्थेला घातक ठरत आहे. जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक होत नाही, जोपर्यंत आपण जग काय म्हणेल? या चौकटीतून बाहेर पडून स्वतःच्या विवेकबुद्धिला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत मूल्यांचे हे प्रदर्शन असेच सुरू राहील. आपण केवळ मुखवट्यांची एक मोठी फॅक्टरी बनत चाललो आहोत, जिथे माणसाची किंमत त्याच्या विचारांवर नाही तर त्याने चढवलेल्या मुखवट्यावर ठरत आहे.


शेवटी प्रश्न असा उरतो की या वैचारिक ढोंगाच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? की आपण केवळ प्रेक्षक बनून हा थिएटर शो पाहत राहायचा? यावर उपाय कोणताही कायदा, सरकार किंवा शिक्षण व्यवस्था करू शकत नाही. याचे उत्तर प्रत्येकाला आपापल्या पातळीवर शोधावे लागेल. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओढून काढण्यापूर्वी, स्वतःचा मुखवटा उतरवून आरशासमोर उभे राहण्याचे धाडस दाखवत नाही, तोपर्यंत समाजात कोणतीही खरी क्रांती घडू शकत नाही. वैचारिक प्रामाणिकपणा हा भाषणात किंवा स्टेटसमध्ये दाखवण्याचा विषय नसून, तो आपल्या दैनंदिन आचरणात उतरवण्याचा विषय आहे. व्यासपीठावरून बदल घडवण्याच्या मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा, स्वतःच्या घरात आणि व्यक्तिगत आयुष्यात मूल्यांची छोटीशी का होईना प्रामाणिक जपणूक करणे, हे आजच्या काळातील सर्वात मोठे क्रांतिकारी पाऊल ठरेल.


केवळ पोकळ शब्दांचा आव आणून समाज बदलत नसतो तर तो कृतितून बदलतो. चपराक फक्त दुसऱ्याच्या ढोंगावर ओढायची नसते तर ती कधीकधी स्वतःच्याच आत लपलेल्या दुटप्पीपणालाही लगावायची असते. चला, या बदलत्या जगात जगाला दाखवण्यासाठी जगणे थांबवूया आणि स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून जगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया. कारण शेवटी, मुखवटे कितीही आकर्षक आणि महागडे असले तरी माणसाची खरी ओळख त्याच्या खऱ्या आणि प्रामाणिक चेहऱ्यानेच होते.

-दत्ता पवार  

मासिक साहित्य चपराक जुलै २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page