top of page

एका निस्पृह कर्मयोग्याची संघर्षगाथा

3 hours ago
3 min read

अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्राला विविध क्षेत्रांत अनेक कर्तृत्ववान नेतृत्व दिले. सहकार, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि शिक्षक संघटनांच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर संघर्ष करणारे, शाळा-विद्यार्थी-समाजाशी नाळ जोडून ठेवणारे आणि सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणारे हे निस्पृह व्यक्तिमत्त्व आहे.

१ जून १९६१ रोजी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रखमाजी आणि गऊबाई या कष्टकरी दाम्पत्याचे ते पाचवे अपत्य. आई-वडिलांकडून मिळालेला कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकीचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. भाळवणी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून त्यांनी डी.एड. पूर्ण केले.



१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमीच्या कामावर केलेले श्रम आणि त्यानंतर हमाली, मजुरी, पाइपलाइन, ठेकेदारी, स्वस्त धान्य दुकान, दूध डेअरी, मस्टर क्लार्क अशा विविध व्यवसायांचा घेतलेला अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारा ठरला. समाजातील सामान्य माणसाचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले. सामाजिक कार्यकर्ते, विविध विचारांच्या नेत्यांचा सहवास आणि पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या साधेपणा व संघर्षशीलतेचा प्रभाव त्यांच्या विचारविश्वावर पडला.

जुलै १९८७ मध्ये कळंब, ता. अकोले येथे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी चिरीमिरी न देता स्वतःसह चाळीस सहकाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट मिळवून देण्यापासून त्यांच्या शिक्षकसेवेतील मूल्यांची सुरुवात झाली. ‘शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून समाजाला आणि विद्यार्थ्यांना मूल्ये देणारी सेवा आहे,’ हा विचार त्यांनी अखेरपर्यंत जपला. कळंबनंतर टाकळी ढोकेश्वर आणि पुढे समर्थनगर येथे त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली. ‘शाळा हे मंदिर, विद्यार्थी हा देव आणि काम ही पूजा’ या भावनेने त्यांनी अध्यापन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराश्रित व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत केली. संघटनात्मक कामासाठी शाळेचा वेळ कमी झाला, तर अतिरिक्त तास घेऊन त्याची भरपाई केली. त्यामुळे शिक्षक नेता असूनही त्यांची शाळा, विद्यार्थी आणि समाजाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही.

‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ’ आणि ‘सदिच्छा मंडळ’ या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. सामान्य कार्यकर्ता ते राज्यनेता हा त्यांचा प्रवास संघर्षाचा आणि प्रचंड परिश्रमाचा आहे. वाडी-वस्तीवर काम करणारा सामान्य शिक्षक हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. शिक्षकाचा प्रश्न सुटला की, त्याला अधिक चांगले अध्यापन करता येईल, हा त्यांच्या कामामागचा मूलभूत विचार होता.

प्रशासनाशी संघर्ष करताना अनेकदा कटु प्रसंग आले. टीका, गैरसमज आणि अपमानही सहन करावा लागला; परंतु त्यांनी वैयक्तिक कटुता मनात ठेवली नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं,’ हा विश्वास त्यांच्या संघर्षाची ऊर्जा राहिला. सर्वसामान्य शिक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्रवेश केला. तत्त्वांशी तडजोड करण्यापेक्षा संचालकपदाचा राजीनामा देण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. त्यानंतर जिल्हाभर दौरे करून शिक्षकांशी संवाद साधला आणि ‘गुरुमाउली’ मंडळाची उभारणी केली.

सन २०१६-१७ मध्ये गुरुमाउली मंडळाला शिक्षकांनी मोठा पाठिंबा दिला आणि रोहोकले गुरुजी बँकेचे चेअरमन झाले. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या कारभाराला पारदर्शकता आणि सभासदकेंद्री दृष्टिकोन मिळाला. ठेवींमध्ये वाढ, कर्जमर्यादेत वाढ, कन्यादान, कुटुंब आधार, वैद्यकीय मदत, शैक्षणिक कर्ज यांसारख्या योजना तसेच मोबाईल ॲप, एटीएम आणि वेबसाइट यांसारख्या आधुनिक सुविधा सुरू करण्यात आल्या. वार्षिक सर्वसाधारण सभांना शिस्त आणि संवादाची परंपरा निर्माण झाली. त्यांचा चेअरमनपदाचा काळ शिक्षक बँकेच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड ठरला.

शिक्षकी राजकारणातील बदलांमुळे जुने संबंध संपले, संघटना बदलण्याची वेळ आली; मात्र शिक्षकहिताचा विचार बदलला नाही. सहकाऱ्यांसह त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत प्रवेश केला. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांची धडपड सुरूच आहे. पहाटे पाच वाजता दिवस सुरू करून जिल्हाभर प्रवास करणे, शिक्षकांच्या अडचणी ऐकणे, अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आणि शक्य तिथे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, हा त्यांचा आजही दिनक्रम आहे. पद नाही, सत्ता नाही; पण शिक्षकांसाठी काम करण्याची ऊर्मी मात्र तितकीच आहे.

सन १९९४-९५ मध्ये मिळालेल्या पहिल्या पुरस्कारानंतर त्यांनी संघटनात्मक कार्यकर्त्याने वैयक्तिक पुरस्कार स्वीकारावेत का, याचा विचार केला आणि पुढे कोणतेही वैयक्तिक पुरस्कार स्वीकारायचे नाहीत, असा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक सन्मान चालून आले; पण त्यांनी नम्रपणे नकार दिला. ‘बोले तैसा चाले त्याची, वंदावी पावले,’ या उक्तिचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून येतो. त्यांच्या या प्रवासामागे पत्नी नीलम, कन्या सोनल आणि डॉ. दीप्ती यांचे मोलाचे पाठबळ आहे. सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी सतत घराबाहेर असतानाही कुटुंबाने त्यांच्या कार्याला खंबीर साथ दिली.

सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नव्या पर्वाची सुरुवात! जून २०१९ मध्ये रोहोकले गुरुजी शिक्षक सेवेतून निवृत्त झाले. भाळवणी येथे झालेल्या त्यांच्या भव्य सेवानिवृत्ती सोहळ्यास हजारो शिक्षक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा त्यांच्या प्रदीर्घ शिक्षकसेवेची जनतेने दिलेली पावती होती; मात्र त्यांच्या दृष्टीने सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हती. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे एक पर्व संपले आणि दुसरे पर्व सुरू झाले.

दुष्काळातील श्रम, आई-वडिलांचे संस्कार, सामाजिक कार्याचा अनुभव, शिक्षकसेवेतील मूल्यनिष्ठा, संघटनात्मक संघर्ष आणि सहकार क्षेत्रातील कार्य या सगळ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आहे. साधेपणा, निस्पृहता, प्रामाणिकपणा आणि माणसांशी जोडलेली नाळ ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे. त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वेळ, शक्ती, पैसा आणि आयुष्याची मोठी पुंजी खर्च केली. त्यांना मिळालेला खरा पुरस्कार म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आणि एखाद्या कुटुंबाच्या जीवनात आलेला आनंद.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोहोकले गुरुजींकडे केवळ शिक्षक नेता म्हणून नव्हे, तर शिक्षकसेवेचा आदर्श, सामाजिक बांधिलकीचा कर्मयोगी आणि मूल्यनिष्ठ नेतृत्व म्हणून पाहावेसे वाटते. माणूस मोठा होतो तो पदाने नव्हे, तर आपल्या कामाने! त्यांच्या कार्याला आणि विचारांना मनःपूर्वक सलाम!


- अशोक शेटे, संगमनेर

(लेखक व शिक्षक)


अनुभवाचे अंतरंग | Anubhavache Antarang
₹150.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page