जाचक कायद्यांतून शेतकरी मुक्त करा : डॉ. राऊत
- Mar 8
- 3 min read
महाबळेश्वर जवळच्या दाभे मोहन येथे 14वे अ. भा. शेतकरी साहित्य संमेलन उत्साहात
महाबळेश्वर, (प्रतिनिधी) : “देशाचा कणा असलेला शेतकरी आज सरकारी धोरणांमुळे सर्वार्थाने उद्ध्वस्त झाला आहे. सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहणासारखे कायदे शेतकऱ्यांच्या पायातील साखळदंड आहेत. हे कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शेतीसाहित्य अभ्यासक व समीक्षक डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी केले.
व्योमव्यापी फाउंडेशन, पुणे आणि शेती अर्थ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर जवळच्या दाभे मोहन या गावी 14 वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन पार पडले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रगतशील शेतकरी किसनसेठ भिलारे हे या संमेलनाचे उद्घाटक होते. ‘साहित्य चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका, साहित्यिक आणि उद्योजिक सौ. चंद्रलेखा जगताप-बेलसरे ह्या स्वागताध्यक्ष होत्या. इंडियाना सुक्रो- टेक पुणे प्रा. लि.चे कार्यकारी संचालक प्रमोदकुमार बेलसरे संयोजक म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ सतीश बोरुलकर आयोजक होते.
“कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याची, शेतीमधील प्रत्यक्ष उद्यमशीलतेच्या वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव झाली पाहिजे. नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणीवा समृद्ध झाल्या पाहिजेत. मराठी साहित्य सारस्वतांची कृषी-उद्योग जगतासोबत सांगड घालणे, त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करणे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवणे, शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणणे यासाठी शक्तिशाली, सर्जनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी म्हणून हे संमेलन होत असते,” अशी भूमिका कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी मांडली.
कोयना नदीच्या पात्रातून नावेमधून एका अभिनव पद्धतीने ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मराठी गौरवगीत, दीप प्रज्वलन, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि शेतकरी नेते स्व. शरद जोशी याच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, शेतकरी नमनगीत म्हणून ह्या सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी निमंत्रीत शेतकरी साहित्यिक, कवी प्रचंड संख्येने उपस्थित होते. दाभेमोहन ह्या गावचे आणि परिसरातील अनेक गावांचे ग्रामस्थदेखील उपस्थित होते. त्यांचा सहभाग उत्साहवर्धक होता.
यावेळी रवींद्र दळवी यांच्या ‘दिवाबत्ती’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात तंत्रज्ञानाच्या कसोटीवर शेती उत्थानाची दिशा ह्या विषयावर परिसंवाद आयोजित केला गेला तर संध्याकाळच्या सत्रात शेतकरी कवी संमेलन आणि कथाकथन हे कार्यक्रम सादर केले गेले. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई ह्या कलाकारांनी ‘सह्याद्रीची शौर्यगाथा’ हा पारंपरिक जागरण आणि गोंधळाचा सांगीतिक कार्यक्रम सादर केला.
दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादात शेती आणि संत वांङ्मय ह्या विषयावर मान्यवरांनी सहभाग घेतला. अतिशय सुंदर असा शेतकरी गझल- मुशायरा या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आला. शेतकरी गर्जन गीताने ह्या संमेलनाचा समारोप संपन्न झाला. या दोन दिवसीय शेतकरी साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची उपस्थिती आणि महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे आकर्षणाचे केंद्र होते. यापूर्वी कोल्हापूर, मुंबई, नाशिक, यवतमाळ, वर्धा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या ह्या पवित्र भूमीत संपन्न झालेले हे संमेलन नेत्रदीपक आणि अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल. देशाचा कणा आणि समस्त मानवजातीचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे दुःख, त्यांचा संघर्ष, होणाऱ्या हालअपेष्ठा, आजच्या शेतीची अवस्था, बळीराजाची भूमिका, होणाऱ्या आत्महत्या, सरकारी धोरणे यावर या संमेलनातून प्रकाश टाकण्यात आला.
शेतीविषयक तज्ज्ञ आणि कवितेतून शेतकऱ्यांच्या भावना मांडणारे शेतकरी कवी, लेखक, साहित्यिक उपस्थित होते. त्यांच्या अभिव्यक्तीतून शेतीविषयक समग्र इतिहास, शेतीचे मानवी जीवनातील महत्त्व, शेतकऱ्यांची आजची स्थिती ह्या सर्व विषयावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश खांडेभराड यांनी केले तर प्रमोदकुमार बेलसरे यांनी आभार मानले.
पापी पेट का सवाल
14 व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात कथालेखक बाळासाहेब देशमुख यांनी ‘पापी पेट का सवाल’ या विषयावर कथाकथन केले. आवर्षणग्रस्त शेतकरी संकटात सापडतो, पोट भरण्यासाठी शहरात रसवंतीगृह चालवतो, संकटांची मालिका झेलत राहतो पण अंगी असलेला प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि माणुसकी सोडत नाही. जीवनाचा एक मूलमंत्र तो जगताला देतो, यावर भाष्य करणारी कथा देशमुख यांनी सादर केली.

जगात कोणताही उत्पादक त्याच्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवितो. त्या उत्पादनाला किती खर्च आला? याचा हिशोब करून त्यात आपला नफा मिळवून मगच आपल्या उत्पादनाची विक्रीची किंमत ठरवितो पण आपल्या शेतकरी बांधवाला आपल्या उत्पादनाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. त्याची काही सूत्रे आमच्या सरकारच्या हाती आहेत तर काही अधिकार व्यापाऱ्यांच्या हाती एकवटले आहेत. बराचसा शेतीमाल हा नाशवंत असल्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्याला आपले उत्पादन विकावे लागते. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च तर निघतच नाही पण वाहतूक खर्च देखील निघत नाही. म्हणूनच आजची युवा पिढी शहरात जाऊन नोकरी किंवा काही उद्योग करण्याकडे आकर्षित झालेली दिसते.
- सौ. चंद्रलेखा बेलसरे-जगताप, स्वागताध्यक्ष

खऱ्या अर्थाने कृषी, ग्रामीण, सहकार, साहित्य, शेतकऱ्यांच्या व्यथा- कथा, त्यांचा खरा संघर्ष, त्या प्रक्रियेमधून जात असताना त्यांच्या मनःस्थितीचे शब्द, काव्य, कथाकथन स्वरूपात मांडून एक बहुउद्देशिय चर्चा विभिन्न विषयावर घडवून आणली. अशाप्रकारे ग्रामीण, कृषी, समाज आणि सहकार या सर्व क्षेत्रांना साहित्याच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा निरंतर प्रयत्न शेतकरी साहित्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, यात कुठलीच शंका नाही.
- प्रमोदकुमार बेलसरे, संयोजक
महाबळेश्वरच्या पश्चिम भागात स्ट्रॉबेरीचे पीक अतिशय चांगले येत असून येथील शेतकरी सधन आहे. पूर्व भागात मात्र काही कारणांनी ते पीक चांगले येत नाही. म्हणून या भागातील रहिवाश्यांनी शेळीपालन, गोपालन, दुग्ध व्यवसाय, बांबू लागवड केल्यास बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊ शकते. शैक्षणिकरित्या इंजिनीअर असलेल्या मला ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीची चांगली संधी चालून आलेली असताना सुद्धा वडिलांच्या सांगण्यावरून शेती हा व्यवसाय सुरू केला आणि पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीचा व्यवसाय जवळजवळ 300 कोटीपर्यंत नेला.
- किसनशेठ भिलारे, संमेलनाचे उद्घाटक आणि प्रगतशील शेतकरी
प्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' ९ते १५ मार्च २०२६
.jpg)


Comments