top of page

माझं महाबळेश्वर, नव्हे आपलं महाबळेश्वर

  • Jun 9
  • 2 min read

Updated: Jun 11

आज मी चक्क महाबळेश्वर या माझ्या अत्यंत आवडत्या थंड हवेच्या ठिकाणी फेरफटका मारून आलो. म्हणजे मी घरी पुण्यातच होतो पण महाबळेश्वरला जाऊन आलो, इतकी मज्जा केली म्हणून सांगू की काही विचारू नका. मंडळी तुम्ही विचारात पडला असाल ना? म्हणजे कामठेकाका नक्कीच डोक्यावर पडले असणार! कारण पुण्यात बसून त्यांनी महाबळेश्वरला कसा काय फेरफटका मारला असेल बरे?


सांगतो सांगतो, फार उत्कंठा नाही वाढवत. त्याचे असे झाले की, ‌‘चपराक प्रकाशन‌’ने सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, मालेगावच्या अनिल सोळुंके यांचे ‌‘माझं महाबळेश्वर‌’ हे प्रवासवर्णन पुस्तक प्रकाशित केले जे मी वाचत होतो आणि महाबळेश्वरमध्येच फिरत असल्याचा अनुभव घेत होतो. प्रवासाच्या तयारीपासून ते परतीच्या प्रवासापर्यंतचे त्यांचे अनुभव त्यांनी इतक्या सहजरित्या मांडले आहेत की, त्यांच्याबरोबर आपणही प्रवासात असल्याचा भास होतो, जो मला झाला आणि पुस्तक वाचून झाल्याबरोबर मी त्यांचे कौतुक करण्यासाठी माझे मनोगत लिहायला घेतले.


आजवर मी इतक्या वेळेला महाबळेश्वरला गेलो आहे की आता तो आकडाही नीट आठवत नाही.  म्हणजे पुण्यापासून जेमतेम 120 किलोमीटरवर असलेले हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे थंड हवेचे पर्यटनस्थळ जरी असले तरी आमच्यासाठी ते आपले आजोळच असल्यासारखे आहे.  बऱ्याचदा कोकणात दापोली, आंजर्लेला जाण्यासाठीचा एक आवडता मार्ग म्हणूनही जाणे होते.


त्यामुळेच की काय अनिल सोळुंके यांनी ‌‘माझं महाबळेश्वर‌’चे केलेले प्रवासवर्णन मनाला खूप म्हणजे खूपच भावले. लेखकाने पृथ्वीवरील स्वर्गच असलेल्या निसर्गरम्य महाबळेश्वरच्या एक अन्‌‍ एक पॉइंटची, पर्यटन स्थळांची खूप सविस्तर माहिती देऊन एक चांगला दस्तऐवज निर्माण केला आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.


ज्योती घनश्याम यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ तर अतिशय लक्षवेधी केले आहे आणि दत्तात्रय शेलके यांनी आतील चित्रेही प्रसंगानुरूप साकारल्यामुळे पुस्तक वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. उलट पुस्तक हातात घेतल्यावर ते पूर्ण वाचूनच खाली ठेवावेसे वाटते, इतके सुंदर आणि सहज असे प्रवासवर्णन लेखक अनिल सोळुंके करून वाचकाला त्यांच्याबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देहूपासून वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि छत्रपती शिवाजी महराजांनी बांधलेल्या प्रतापगडावर अगदी लीलया फिरवून आणतात.


पुण्यातील मुक्कामपासून ते क्षेत्र महाबळेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी, वाई येथील पर्यटनस्थळांचे केलेले वर्णन... ते ते ठिकाण एखाद्या चित्रफितीसारखे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. हीच सोळुंके यांच्या या प्रवासवर्णनाची खासियत आहे. देहू, वाई, पाचगणी, क्षेत्र महाबळेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगडविषयीची ऐतिहासिक आणि प्रासंगिक माहिती देताना सोळुंके वाचकाला मंत्रमुग्ध करतात हे मात्र नक्की.  


सोळुंके यांच्या प्रवासवर्णनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मालेगाव ते पुणे आणि पुणे ते महाबळेश्वर आणि परतीचा प्रवास त्यांनी लालपरीने म्हणजे एसटीने केला आहे आणि त्यात आलेले अनुभव त्यांनी फारच उत्स्फूर्ततेने करून वाचकांना लालपरीने प्रवास करण्यास उद्युक्त केले आहे.  पुण्यातील त्यांच्या मित्राचा भाऊ मोहनदादा यांच्याकडील आदरतिथ्य तसेच महाबळेश्वरमधील टॅक्सीचालक उर्फ वाटाड्या रोहित, प्रताप हेरिटेजचे मालक समीरदादा यांच्याबद्दल वाचताना अजूनही माणुसकी शिल्लक आहे हे जाणवते.  


तसेच सोळुंके सरांचे आदर्श कुटुंबही ह्या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांच्या कायम लक्षात राहील असेच आहे हे खास करून इथे नमूद करावेसे वाटते. ‌‘माझं महाबळेश्वर‌’ वाचताना ते ‌‘आपलं महाबळेश्वर‌’ वाटू लागते इतके अप्रतिम असे हे प्रवासवर्णन आहे असे मला वाटते. ‌‘चपराक प्रकाशन‌’चे घनश्याम पाटील आणि लेखक अनिल सोळुंके यांचे मनापासून अभिनंदन करून हे प्रवासवर्णन प्रत्येकाने वाचावे असा एक चांगला ऐवज वाचकांना भेट दिला आहे. तुम्ही हे पुस्तक ‌‘चपराक‌’च्या संकेतस्थळावरून घरपोहोच मागवू शकता.


- रवींद्र कामठे

94212 18528


माझं महाबळेश्वर| Majha Mahabaleshwar
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page