घनश्याम पाटील यांना समाजभूषण पुरस्कार

पुणे - सडेतोड पत्रकारिता, वैचारिक लेखन आणि सर्जनशील साहित्यनिर्मितीद्वारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चपराक प्रकाशनचे संचालक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. बारामती येथील सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत उद्योजक राजेंद्र पवार, युवा नेते आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र टकले, बापूसाहेब लोखंडे, नवनाथ वळकुंदे, आर. आर. मारकड आदी उपस्थित होते.
यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, मोरोपंतांपासून बारामतीची साहित्य परंपरा मोठी आहे. ‘चपराक’ने अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकांची निर्मिती करून ती वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिभावंतांचा गौरव केल्यास त्यांचे मनोधैर्य उंचावते. त्यामुळे घनश्याम पाटील यांना हा पुरस्कार देताना बारामतीकर म्हणून मला अभिमान वाटतो. केवळ वाचनाच्या सवयीमुळेच माझे माझ्या आजोबांसोबत खास नाते जुळले. आमच्यासारख्या वाचकांसाठी उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करून घनश्याम पाटील यांनी आमची दर्जेदार वाचनाची भूक भागविली आहे.
रवींद्र टकले म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षात घनश्याम पाटील यांनी मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चपराकच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांवर निर्भिड भाष्य करत समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. प्रतिथयश लेखकांबरोबरच नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत अनेकांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. स्वतः निर्मितीक्षम लेखक असल्याने त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्याची विशेष दखल घेतली जाते. त्यामुळे आमच्या संस्थेतर्फे देण्यात येणारा पहिला समाजभूषण पुरस्कार त्यांना देताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो.
"अनेक वैचारिक मतभेद असूनही गुणवत्तेची दखल घेत पवार कुटुंबीयांनी माझा गौरव केला. यातून त्यांची गुणग्राहकता दिसून येते. साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात मी खारीचा वाटा उचललाय. सामाजिक विकास प्रतिष्ठान बारामती यांनी मोठ्या आस्थेने माझ्या या कार्याची दखल घेऊन मला प्रोत्साहन दिले आहे. महात्मा जोतीराव फुले यांचे दोनशेवे जयंती वर्ष सुरू असतानाच सावित्रीमाईंच्या नावाने पुस्तक जत्रेचे आयोजन करणे आणि आमच्यासारख्या लोकांची त्यात दखल घेणे हा आमचा मोठा सन्मान आहे. यासाठी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो."
-घनश्याम पाटील
Marathi Literary Awards
.jpg)



Comments