top of page

अखेर धनवानही निर्धनच

  • May 17
  • 4 min read

माणसांचे जीवन जे आहे, ते नेमके कशासाठी आहे? प्रत्येकालाच जीवनात आनंद हवा आहे. तो मिळवण्याचा नेमका मार्ग कोणता आहे? माणूस जीवनभर धावपळ करत आहे. त्या धावपळीत काही मिळवण्यासाठी केवढा तरी अट्टहास करत आहे. त्या साऱ्या प्रवासात माणसाला खरंच समाधान, सुख, मिळते का? आपल्याला हवी असलेली संपत्ती आपल्याला खरंच आनंद देते का? जीवनात हवं असलेलं सारं मिळालं तरी जीवन सुखी होत नाही. पैसा, संपत्ती, धन, दौलत म्हणजे सुख नाही मात्र हे जेव्हा कळते तेव्हा आयुष्यातील बराच वेळ गेलेला असतो. जीवनभर धावपळ केल्यानंतरच संपत्ती मिळते आणि ती जेव्हा मिळते तेव्हा त्यात आनंद नाही हे लक्षात येते. आपण धनवान असूनही जीवनानंदाला पारखे झालेलो असतो तेव्हा एका अर्थाने आपण निर्धनच असतो. लोक ज्याला धनवान समजतात, ती माणसं प्रत्यक्षात मात्र निर्धनच असतात. खरं तर प्रत्येकाची श्रीमंतीची कल्पना भिन्न असते. त्या प्रवासात त्याने कितीतरी अट्टहास करून धन मिळवले तरी जीवनानंदाचा प्रवास सुरू होत नाही. भगवान ओशो यांनी त्या संदर्भाने एक गोष्ट सांगितली आहे.


ते सांगतात की, “एका कोट्यधीशाच्या घरी मी एकदा राहिलो होतो. कोट्यधीशच होता तो. त्यांच्याजवळ नाही असं काहीच नव्हतं परंतु त्याचे डोळे निर्धन होते. त्यांच्याकडे पाहून त्यांची दया येत होती. रात्रंदिवस तो धन-दौलत गोळा करीत असायचा. दिवसभर पैसे मोजणे, सांभाळणे आणि त्यांचे रक्षण करणे हाच त्याचा जीवनप्रवास ठरला होता. इतक्या पैशाचा मालक आहे असे त्याला वाटायचे पण तो काही धनी नव्हता, तो फक्त रखवालदार होता. दिवसभर तो फक्त धन साठवण्याचा विचार करायचा. त्यामुळे रक्षणाचा विचार मनात असायचा. तो रात्रीही रक्षण करण्याचा विचार करायचा. धनाचा राखणदार कधीच झोपू शकत नाही हे खरेच. स्वप्नशून्य निद्रा ही संपत्ती फक्त त्यांनाच लाभते, जे सर्व तऱ्हेच्या संपत्तीच्या विकृतीतून मुक्त होतात. धन, यश किंवा धर्म ज्या कशामागेही ज्याचे धावणे आहे, त्याचे दिवस-रात्र अशांत असतात. जेथे चित्त स्थिरावते, तिथेच शांती निर्माण होते.


त्या रात्री मी झोपण्यापूर्वी खऱ्या अर्थाने कफल्लक असलेल्या आणि बाह्यांगाने करोडपती असणाऱ्याचा मी निरोप घेऊ लागलो. तेव्हा तो करोडपती म्हणाला, “मलाही झोपण्याची फार इच्छा आहे परंतु निद्रादेवी माझ्याकडे येतच नाही. सारी रात्र या धनाची काळजी करण्यातच संपून जाते. कितीतरी भयंकर विचार डोक्यात थैमान घालत असतात. अनेक तऱ्हेची भीती भेडसावत असते. स्वस्थ आणि शांत झोप मला कशी मिळेल याचा एखादा मार्ग मला सांगा,” अशी त्यांनी विनंती केली. “मी काय करू? वेडं व्हायची वेळ आली आहे...”


त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडे तसे कोणतेचे उत्तर नव्हते. त्यांचा रोग मला माहिती आहे की, धन हाच त्यांचा रोग होता. रात्रं-दिवस ह्या धन रोगाने त्याला ग्रासले होते. स्वतःच्या बाहेर कोणत्याही सुरक्षिततेचा शोध हाच मूळ रोग असतो. या शोधामुळे सुरक्षितता तर प्राप्त होत नाहीच उलट रोग अधिकच बळावत जात असतो. सुरक्षिततेचे सारे उपाय सोडून जोपर्यंत व्यक्ती स्वतःपर्यंत परतत नाही, अंतर्मुख होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तिचे सबंध जीवन एक दीर्घ, दुःखमय स्वप्नच बनून राहत असते. खरं म्हणजे सुरक्षा स्वतःशिवाय दुसरी कोठेच नाही परंतु ती मिळविण्यासाठी सर्व प्रकारे असुरक्षित होण्याचे साहस पाहिजे. मी त्यांना एक गोष्ट सांगितली आणि म्हटले, “जा, झोपी जा!” आश्चर्य असे की मी म्हटल्यावर त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू उभे राहिले होते. त्याचा विचार करतो तेव्हा माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही. कदाचित मनाच्या एखाद्या विशेष अवस्थेत एखादी साधारण गोष्टही कधी असाधारण ठरते. कदाचित सहजपणे तीर अगदी योग्य ठिकाणी लागला होता. त्या रात्री ते झोपी गेले होते, हे झालंच. नंतर देखील त्यांच्या जीवनात आणखी फुलं फुलू लागली. अशी कोणती गोष्ट मी सांगितली होती बरं? साहजिकच ती जाणून घेण्याची जिज्ञासा तुमच्या डोळ्यात तीव्र झाली आहे.”


ओशो म्हणतात की, एक महानगर होते. या नगरात एका भिक्षुचे आगमन झाले. असे अनेक भिक्षू त्या नगरीत येत असत परंतु या भिक्षुच्या अंगी काही अद्भुत गुण होते. हजारो लोकांची रांग त्याच्या झोपडीकडे लागलेली होती. भिक्षुला भेटून येणारा माणूस पहाडातील निर्झराशी, अरण्यातील गहन शांततेत किवा आकाशातील ताऱ्याशी एकात्म झाल्यावर जो स्वर्गीय सुगंध आणि तेज पसरेले आहे असा अनुभव घेत असायचा. या भिक्षुचे नावही अजब होते - कोटिकर्ण श्रोण. संन्यास घेण्यापूर्वी तो मोठा धनिक माणूस होता. त्याच्याकडे एक कोटी किंमतीची कुंडलं तो कानात घालीत असे, म्हणून त्याचे नाव पडले होते कोटिकर्ण. त्याच्याजवळ अपार धनसंचय होता परंतु एवढ्या धनसंचयानंतर देखील स्वतःच्या अंतर्यामीची निर्धनता दूर होत नव्हती. मग त्याने धनाचा त्याग केला. एका अर्थाने तो निर्धनी बनला होता मात्र त्याचवेळी तो खरा धनी बनला होता. हीच घटना तो लोकांना सांगत असे. त्याच्या श्वासाश्वासातून गुंजणारं संगीत, त्याच्या नेत्रातून झरणारी शांती, त्याच्या शब्दातून आणि मौनातून प्रगट होणारा आनंद हे सारे त्याच्या जीवनानंदाचे पुरावेच होते. मन प्रौढ बनले की धनदौलत, यश, अधिकारपद, महत्त्वाकांक्षा या साऱ्यापासून सहजपणे मुक्ती होते. भिक्षू श्रोणला पाहण्यासाठी, त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी, गावाबाहेर हजारो लोकांचा समूदाय जमला होता. निर्वात ठिकाणी जळणाऱ्या दिव्याची ज्योत शांत, स्थिर असावी त्याप्रमाणे मिक्षू श्रोणचे भाषण ऐकणाऱ्या त्या समूदयाचे चित्त एकाग्र, शांत झालेले होते. या समूहात कातियानी नावाची एक श्राविकाही होती. संध्याकाळ झाली तशी कातियानी दासीला म्हणाली, “ तू जा आणि दिवा लावून ये. मी तर हा अमृतासारखा गोड उपदेश सोडून उठणार नाही.”


दासी घरी पोचली. पाहते तो घराला चोरांनी मोठं भगदाड पाडलेले होते. आत चोर सामानाची लुटालूट करीत होते. बाहेर चोरांचा सरदार पहारा करीत उभा होता. त्याच पावली दासी परतली. चोराच्या नेत्यानंही तिचा पाठलाग केला. दासी कातियानीपाशी जाऊन घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, “मालकीणबाई, घरात चोर शिरले आहेत...” परंतु कातियानीने तिकडे अजिबातच लक्ष दिले नाही. तिचे चित्त निराळ्याच विषयात गुंतलेले होते. ती तर जे ऐकत होती ते ऐकतच राहिली. जे पाहत होती ते पाहत राहिली. ती जेथे होती तेथेच बसून होती. ती कोण्या वेगळ्याच जगात होती. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. दासीने घाबरून तिला हलविले आणि सांगितले, “मां, चोरांनी घराला भगदाड पाडले आहे. सारे सोन्याचे दागदागिने ते नेत आहेत.”


कातियानीने डोळे उघडले आणि म्हटले, “वेडे! चिंता करू नकोस, त्यांना जे न्यायचे आहे ते नेऊ देत. ते सोन्याचे दागिने सर्व नकली आहेत. मी अज्ञानात होते म्हणून ते खरे होते. ज्या दिवशी चोरांचे डोळे उघडतील, तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल, की ती सुवर्णभूषणे नकली आहेत. खोटी आहेत. डोळे उघडल्यावर जे सुवर्णधन प्राप्त होते, ते कधी कुणाला चोरता येत नाही, की बळजबरीने हिसकावून घेता येत नाही. ते सुवर्ण मी आता प्रत्यक्ष पाहत आहे. ते सुवर्ण तर माझ्या अंतर्यामीच आहे.शश


मालकिणीच्या बोलण्याचा अर्थ दासीला समजला नाही. ती हतबल होत, अवाक झाली. तिला वाटले या मालकिणीला झालंय तरी काय? परंतु मालकिणीचं ते बोलणं ऐकून चोराच्या सरदाराच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या, झंकारल्या. जणू त्याच्या अंतःकरणातलं बंद दार उघडलं गेलं. आतापर्यंत अप्रकाशितच राहिलेली एक ज्योत त्याच्या आत्म्यात पेटली. तो परतला आणि आपल्या साथीदारांना म्हणाला, “मित्रांनो, गाठोडी इथंच सोडून द्या. हे सुवर्णालंकार सारे नकली आहेत. त्या ज्या स्वर्गीय संपदेमुळे मालकिणीला ही सुवर्ण भूषणंही खोटी वाटली, त्या संपदेचा आपणही शोध करू या. ती दिव्य स्वर्णराशी मला देखील दिसते आहे. ती काही दूर नाही. अगदी जवळच आहे. ती स्वतःतच आहे. आपल्याही जीवनाची हिच स्थिती आहे. आपण नेमके काय करतो आहोत याचा शोध जीवन प्रवासात घेतला तर जीवनाला आनंदाचे भरते आल्याशिवाय राहणार नाही.


- संदीप वाकचौरे

+91 94054 04500

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६





Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page