top of page

पारपत्र कार्यालयातील सुखद अनुभव

  • 3 days ago
  • 4 min read

माझ्या पारपत्राची मुदत आता संपत आली होती म्हणून दिनांक 11 मार्च 2026 रोजी मला त्याच्या नुतनीकरणासाठी पारपत्र कार्यालयात जायचे होते. त्यासाठी मी जानेवारी 2026 लाच अर्ज भरला होता आणि मार्च महिन्याची तारीख मिळाली होती. दुपारी 12.30 ची वेळ दिलेली असल्याने मी जरा लवकरच म्हणजे 11.45 च्या दरम्यान तिथे पोहोचले. बाहेर असलेली तुडुंब गर्दी पाहून आधी जीवच दडपला. मार्च महिन्याच्या टळटळीत उन्हात अनेक लोक बाहेर बसले होते. एवढी गर्दी पाहून वाटले, आता आपला नंबर यायला 2-3 नक्कीच वाजणार! कदाचित 4-5 देखील वाजू शकतात! पण काय करणार? नुतनीकरण करणे तर गरजेचे होते.


धाडसाने गेटजवळ पोहोचले. पारपत्र कार्यालयाकडून मोबाईलवर आलेला संदेश तेथील दारवानाला दाखवला. त्याने आत जाण्यास परवानगी दिली, हा पहिला सुखद धक्का! मी माझ्याबरोबर माझ्या एका सहाय्यकाला घेऊन गेले होते. ती देखील माझ्याबरोबर आत येऊ लागली. तिला पाहून गेट किपरने मला प्रश्न विचारला, “मॅडम तुम्ही सिक्स्टी पार आहात का?” त्याला ‌‘हो‌’ असे उत्तर दिल्यावर त्याने माझ्या सहाय्यकाला माझ्याबरोबर आत जाऊ दिले.

समोरच काउंटर होते. तेथे महिलांची रांग होती. बऱ्याच वयस्क महिला यासाठीच (पासपोर्ट रिनीवलसाठी) आल्या होत्या. प्रत्येक जण आपापली कागदपत्रे दाखवून बसलेल्या कर्मचाऱ्याकडून टोकन नंबर घेत पुढे मार्गस्थ होत होते. काहींची कागदपत्रे अपुरी होती, काहींनी कागदपत्रांची झेरॉक्स आणली नव्हती. काहींची विहित नमुन्याची कागदपत्रे नव्हती. त्यांना तेथील कर्मचारी मार्गदर्शन करीत होते.

त्याच केबिनमध्ये समोरच झेरॉक्सची व्यवस्था होती. तेथे जाऊन ज्या पद्धतीची कागदपत्रे लागत होती त्या प्रकारच्या कागदपत्रांचे झेरॉक्स मिळण्याची सोय होती. हा दुसरा सुखद धक्का! कारण बऱ्याच सरकारी कार्यालयात एका झेरॉक्ससाठी गरजूंना वणवण भटकावे लागते आणि तोपर्यंत रांगेत लागलेला क्रमांक मागे पडतो. येथे तर त्याच केबिनमध्ये ह्या सर्व गोष्टींची पूर्तता होत होती. हे सर्व पाहून खरंच खूप आनंद झाला. आता आपल्याला कागदपत्रांमध्ये काही अपूर्णाता असली तर रांग सोडून बाहेर जावे लागणार नाही, याची खातरी पटली. अर्थात ह्याची कल्पना असल्यामुळेच मी माझ्या मदतनीसाला बरोबर घेऊन गेले होते. अशीच वेळ आल्यावर मला तिचे सहाय्य घेता येणार होते पण मी बरोबर आणलेली कागदपत्रे पूर्ण होती म्हणून मला लागलीच टोकन नंबर मिळाला.

घरपालवा | Gharpalva
₹300.00₹225.00
Buy Now

पुढे असलेल्या गेटमधून मी आत शिरले. तेथे देखील बरीच गर्दी होती. प्रत्येकाचे टोकन नंबर फलकावर दिसत होते आणि आपले टोकन नंबर झळकण्याची प्रत्येक जण वाट पाहत होते. तेथेच एक सहाय्यक बसला होता. त्याने मला ए विंगमध्ये जाण्यास सांगितले. तेथे ए - 21,22,23 असे कंपार्टमेंट होते. तेथे गेल्यावर 5 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर लागलीच बोलावणे आले. तिथे कागदपत्रांची स्क्रूटीनी झाली. थम्ब इम्प्रेशन घेतले गेले, फोटो काढला गेला. माझ्या वयाकडे पाहून त्या कर्मचाऱ्याने विचारले, “मॅडम, तत्कालमध्ये का अप्लाय केले नाही? तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागले नसते!”

आता मला माझी चूक लक्षात आली होती पण अनावधानाने ती चूक झाली होती. माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो कर्मचारी म्हणाला, “काही हरकत नाही, पुढील 10 मिनिटात तुमचे काम होऊन जाईल!” त्याचे दिलासादायक बोलणे ऐकून जीवात जीव आला. हाही एक सुखद धक्काच होता. नंतर बी विंगमध्ये पाठवणी करण्यात आली. तेथेही उपस्थित सर्व जण आपल्या टोकन नंबरची प्रतीक्षा करत होते. तेथील कर्मचाऱ्याला विचारले,  “हा टोकन नंबर केव्हा येईल? जास्त वेळ लागेल का? कारण आत्ता तर मागचेच नंबर फलकावर रिफ्लेक्ट होत आहेत. तोपर्यंत बाहेर प्रतीक्षालयात जाऊन बसू का?” तर तो म्हणाला, “नको मॅडम, जास्त वेळ लागणार नाही. लागलीच नंबर येईल” अन्‌‍ खरोखरीच दुसऱ्या मिनिटाला माझा टोकन नंबर फलकावर झळकला. तेथेही भर्रकन काम झाले.

ओव्हरटेक | Overtake
₹300.00₹225.00
Buy Now

आता तिसऱ्या सी विंगमध्ये जायचे होते. तेथेही केबीनच्या दरवाजाजवळ मार्गदर्शकाचे काम करणारा कर्मचारी बसला होता. त्याने अमक्या अमक्या टेबलवर जायला सांगितले आणि दोनच मिनिटात नोंद करून माझी कागदपत्रे त्या अधिकाऱ्याने मला परत केली. उठता उठता मी त्याला विचारले,  “संपले ना माझे काम? आता जाऊ का?” त्याने हसून म्हटले, “बिनधास्त जा. आता पोलीस व्हेरिफिकेशनला जावे लागेल. त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल!” आता मात्र मला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. कुठे ती गर्दी पाहून मी कल्पना केली होती की, मला दुपारचे 3-4 नक्कीच वाजतील पण 11.45 ला पासपोर्ट ऑफिसमध्ये प्रवेशलेली मी चक्क तेथून12.07 ला बाहेर पडत होते. केवळ 15 ते 17 मिनिटात माझी सुटका झाली होती. आधी प्रवेशद्वार, नंतर सुरक्षा तपासणी, मग कागदपत्रांची पडताळणी, नंतर ए, बी, सी, विंगमधील प्रोसेस आणि चक्क काम झाले! खरंच हा अनुभव विलक्षण होता आणि सुखद धक्का देणारा होता.

उठता उठता मी त्या अधिकाऱ्याला धन्यवाद देण्यास तर विसरले नाहीच पण येथे दिल्या गेलेल्या उत्तम सेवेचे देखील कौतुक केले कारण ते माझे नैतिक आणि सामाजिक कर्तव्य होते. अशाप्रकारे तात्काळ आणि चोख काम करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या आपल्या कर्मचारीवर्गाचे कौतुक करायलाच पाहिजे होते. ते खरं तर प्रत्येकानेच करायला पाहिजे.

पण सरकारी कार्यालयाचा आपला अनुभव नेहमीच तसा चांगला नसतो. एका एका लहानशा कामासाठी आपल्याला वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. गेल्यावर एकदाचे ही ही कागदपत्रं लागतील, असे त्या कार्यालयातून कधीच सांगण्यात येत नाही. आपली कामे सोडून असा पाठपुरावा करता- करता नाकीनऊ येते. फोनवर संपर्क साधून किंवा अनेकदा स्मरणपत्रे देऊन सुद्धा कामात दिरंगाई होत असते. आज एखादा कागद मागतील तर दुसऱ्यावेळी हा कागद दिला नाही, म्हणून काम खोळंबले आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे ‌‘शिंगरू मेले हेलपाट्याने‌’ अशी स्थिती होऊन जाते. अनेकदा काही जण तर हताश होऊन त्याचा नादच सोडून देतात. वयस्क लोकांची तर खूपच कुचंबना होते. एकाचवेळी गरजेच्या कागदपत्रांची यादी दिली तर येणारा गरजू त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच येईल.त्यामुळे त्याच्या वेळेचा अपव्यय देखील होणार नाही आणि त्याचे काम वेळेच्या आत पूर्ण करून दिल्याचे समाधान देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल पण आपल्याकडील व्यवस्थाच अशी आहे की, असे होताना दिसत नाही.

पाठलाग | Pathlag
₹250.00₹187.50
Buy Now

आता एखादे काम त्या विशिष्ट विभागाकडे आल्यावर ते काम पूर्ण करणे त्या विभागाची, तेथील कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मग त्यात चालढकल करून त्याचा आणि सरकारी कार्यालयाचा वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? ह्याचा विसर पडतो. अर्थात आजकाल पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण आहे, ही कारणे देऊन जनतेला तिष्ठत ठेवण्यात येते. इकडे देशातील असंख्य तरुण बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आणि इकडे पुरेसे कामगार नाहीत म्हणून ओरड केली जाते. किती विदारक चित्र आहे न आपल्या देशाचे? मग पारपत्र कार्यालयावरच का सरकार मेहेरबान आहे, की जेथे पुरेसे कर्मचारी कार्यरत आहेत? ह्याचा विचार मनात येतो. असो, त्या दुसऱ्या अनुभवांबद्दल पुढे कधीतरी!

सत्याभास | Satyabhas
₹300.00₹225.00
Buy Now

तूर्त मला पासपोर्ट ऑफिसमधील आलेला अनुभव मात्र सुखदायक होता. तेथे विनम्रतापूर्वक दिली गेलेली वर्तणूक, वेळोवेळी केले गेलेले सहाय्य, मार्गदर्शन, तेथील शिस्त आणि वेळकाढूपणा न करता केलेली कार्यतात्परता हे पाहून अचंबित व्हायला झाले. बहुतेक सरकारी कार्यालयातील हा माझा पहिला सुखद अनुभव होता. अशीच यंत्रणा जर प्रत्येक कार्यालयात राबविली गेली तर जनतेची होणारी पिळवणूक, ससेहोलपट थांबेल आणि देशाची जनता सुखी होईल, ह्यात शंका नाही पण तसे झाले पाहिजे.


- चंद्रलेखा बेलसरे-जगताप

9850895051

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६



Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page