संस्थांच्या कार्यक्रमात सामान्यांचे हाल
- Mar 30
- 2 min read
पूर्व हवेली वृत्तांत
पूर्व हवेलीत अनेक छोट्या, मोठ्या संस्था असून त्यांचे कार्यक्रम नेहमी चालू असतात. कार्यक्रम असताना संस्था फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. वाहतूक कोंडीत अडकलेला सामान्य नागरिक त्यांना दिसत नाही. व्हीआयपींची सुरक्षा महत्त्वाची तर आहेच पण त्याचा फटका सामान्य माणसाला बसता कामा नये. महामार्ग निर्मनुष्य करताना संस्थांनी तितकीच काळजी घेऊन पोलीस प्रशासन व शासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. दर आठवड्याला पुणे-सोलापूर महामार्गावर कुठल्या न कुठल्या संस्था कार्यक्रम घेत असतात पण त्यात भरडला जातो सामान्य नागरिक. त्यामुळे यापुढे कार्यक्रम घेताना वाहतूक कोंडीचे व बसचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्याची चर्चा पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये चालू आहे.
नुकताच उरुळी कांचन येथे देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा दौरा आयोजित केला होता. निसर्गोपचार आश्रमात हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रविवारी उपराष्ट्रपतींचा दौरा तसेच लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजमध्ये पोलीस भरतीची परीक्षा असल्याने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गर्दी होती. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे हा रस्ता काही वेळासाठी बंद केला होता. तसेच उरुळीकांचन आणि लोणी काळभोर परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. या निर्णयाचा फटका मात्र थेट सर्वसामान्य नागरिक आणि हजारो विद्यार्थ्यांना बसला. या सर्व गोष्टी पाहता सामान्य नागरिकांना होणारा त्रास या संस्थांच्या का बरं लक्षात येत नाही? या सगळ्या प्रकारांमुळे नागरिकांत प्रचंड चीड आहे. तसेच संस्थांच्या कार्यक्रमात सामान्य नागरिकच भरडला जातो हेही वेळोवेळी दिसून येते.
उरुळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा स्थापना दिन सोहळा व ‘सिक्रेट्स ऑफ अवर हॅपिनेस’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आले होते. त्याचवेळी एमआयटी शैक्षणिक संकुलात पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी हजारो विद्यार्थी सुद्धा रविवारी आले होते. या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन एकाच दिवशी आल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे फज्जा उडाला. रविवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. उपराष्ट्रपती येताना व जाताना महामार्ग उरुळीकांचनपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणास्तव उरुळीकांचन परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ पोहोचण्यासही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेमधून परीक्षा संपल्यानंतर हजारो विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. महामार्ग बंद केल्याने पीएमपीएलच्या बसेस सुद्धा अडकून पडल्या. त्यामुळे बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. काही विद्यार्थी उन्हात पाच ते सहा किलोमीटर जालत जाऊन मिळेल ते वाहन पकडून जात होते. अनेक विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून बसच्या दरवाजाला लटकून प्रवास केला. मग प्रश्न उपस्थित होतो की ज्या संस्थेने या परीक्षांचे आयोजन केले होते त्यांनी हडपसर ते संस्थेपर्यंत पीएमपीएलच्या बसची सोय (फुकट नाही) करायला पाहिजे होती. विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील वेळी सुद्धा परीक्षा संपल्यावर हजारो विद्यार्थांना असा अडचणीचा सामना करावा लागला होता.
या संपूर्ण घटनेत पोलीस आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे. एका बाजूला व्हीआयपींच्या सुरक्षेला प्राधान्य देताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले. व्हीआयपीची सुरक्षा महत्त्वाची तर आहेच पण त्याचा सामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी संस्थांनी घेतली पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जगताप, सुभाष कड, अनिरुद्ध मराठे यांनी व्यक्त केले.
सचिन सुंबे, लोणी काळभोर
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६
.jpg)


Comments