वाणी नि लेखणी यांचा अपूर्व संगम : प्रा. राम शेवाळकर
खालील लेखाची विरामचिन्हे (स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह, डॅश, अवतरणचिन्हे इ.) आणि स्पष्ट लेखनदोष/टायपो (जसे की 'व्यक्तिंच्या' ऐवजी 'व्यक्तींच्या', 'मृत्युनंतर' ऐवजी 'मृत्यूनंतर', 'कुरुप' ऐवजी 'कुरूप', 'नियमाप्रमाण्ो' ऐवजी 'नियमाप्रमाणे', 'श्रीगण्ोशा' ऐवजी 'श्रीगणेशा', 'निमंत्रण्ो' ऐवजी 'निमंत्रणे', 'देण्ो' ऐवजी 'देणे', 'आत्महत्त्या' ऐवजी 'आत्महत्या', 'पुण्ो' ऐवजी 'पुणे', 'घराण्ो' ऐवजी 'घराणे', 'शांतपण्ो' ऐवजी 'शांतपणे', 'वाकलं' ऐवजी 'वाकले' इ.) दुरुस्त करून शुद्ध स्वरूप दिले आहे:
शिस्त, क्षमा, कर्तव्य या तीन शब्दांच्या आद्याक्षरापासून सुरू होणारा एक शब्द म्हणजे ‘शिक्षक’! सर्वव्यापी असा हा शब्द आहे; या शब्दामध्ये अवघे ब्रह्मांड सामावले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. आई ही प्रत्येकाची पहिली गुरू — अर्थात शिक्षिका — असते; नंतर शाळेत शिकविणारा शिक्षक हाही गुरू! वर्गाच्या चार भिंतींच्या आत शिक्षण देणारा शिक्षक हा केवळ शैक्षणिक शिक्षक नसतो, तर समाजात, सार्वजनिक ठिकाणी जो आपले ज्ञान समाजाच्या विकासासाठी अर्पण करतो तोही शिक्षक असतो. यादृष्टीने पाहिले तर लेखक, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार असे सारे शिक्षकच; कारण स्वतःच्या वाणीतून नि लेखणीच्या माध्यमातून हे सारे समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य करीत असतात.
आपण या लेखाच्या माध्यमातून अशाच एका शिक्षकाची, लेखकाची, व्याख्यात्याची, समाजसेवकाची ओळख करून घेणार आहोत, ते म्हणजे गुरुवर्य, प्रा. राम शेवाळकर! काही व्यक्तींच्या संदर्भात ‘बस्स! नाम ही काफी है!’ असे आदराने म्हणतात, तशीच ही व्यक्ती! आज पन्नाशी पार केलेली जी व्यक्ती शैक्षणिक, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय जीवनात कार्यरत आहे, त्या व्यक्तीला या व्यक्तिमत्त्वाचा नक्कीच परिचय असणार आहे. शेवाळा (ता. कळमनुरी, तत्कालीन परभणी जिल्हा) हे मूळ गाव असणाऱ्या एका धार्मिक घराण्यात प्रा. राम शेवाळकर यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव बाळकृष्णशास्त्री असले तरी ते सर्वत्र ‘भाऊसाहेब’ या नावाने ओळखले जात; आईचे नाव गोपिकाबाई! दुर्दैवाने राम लहान असताना गोपिकाबाईंचा मृत्यू झाला. आईचा विषय निघताच राम शेवाळकर यांचे डोळे भरून येत; ते म्हणत, “माझ्या मनात आईची (बाई) जी व्यक्तिरेखा कायम वसली, ती केवळ बाईच्या तसबिरीला होणाऱ्या दैनिक नमस्कारामुळे!” बाईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना सांभाळायला धावून आली ती बाईची आई! आजीला राम ‘आई’ म्हणत; आईने राम यांचा सांभाळ केला.
अचलपूर येथील रावसाहेब देशपांडे यांनी भाऊसाहेबांचे नांदेड मुक्कामी कीर्तन ऐकले. भाऊंच्या रसाळ वाणीने प्रभावित झालेल्या रावसाहेबांनी त्यांना अचलपूर येथे कीर्तन करण्यासाठी नेले. श्रोत्यांनी कीर्तनकारांचे नाव विचारताच रावसाहेब म्हणाले, “हे शेवाळकर महाराज...” तेव्हापासून धर्माधिकारी कुटुंबीय ‘शेवाळकर’ झाले. राम शेवाळकर यांचे शिक्षण अचलपूर, अमरावती येथे झाले. विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथून बी.ए. आणि नागपूर महाविद्यालयाची एम.ए. (संस्कृत) ही पदवी प्राप्त झाल्यानंतर शेवाळकरांची ज्ञानलालसा तृप्त झाली नाही; त्यांनी मराठी विषय घेऊन पुन्हा एम.ए. केले. विशेष म्हणजे, कुशाग्र बुद्धी असल्यामुळे ते या परीक्षेत ‘ना. के. बेहरे’ या सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
शाळेचा पहिला दिवस!
शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल जसे विद्यार्थ्यांना अप्रूप असते, तसेच शिक्षकांनाही शिक्षक म्हणून पहिल्या दिवशी शाळेत गेल्याची आठवण कायम असते; तशीच ती राम शेवाळकर यांना अखेरपर्यंत होती. एम.ए. उत्तीर्ण झाल्याबरोबर शेवाळकरांना वाशीम येथे शासकीय प्रशालेत नोकरी मिळाली. राम शेवाळकर मोठ्या आनंदाने वाशीमला पोहोचले; रात्र झाली असल्याने ते बाँबे लॉजवर थांबले. त्या रात्रीचा अनुभव सांगताना शेवाळकर म्हणत, “बाँबे लॉजमधील कुरूप खोलीमध्ये रात्रभर माझ्या सेवेसाठी डास आणि ढेकूण यांची खास नेमणूक केली होती; त्यांच्या कृपेने झालेल्या जागरणाचे पहिले पुष्प मी वाशीमच्या श्री बालाजीस अर्पण केले.”
नोकरीचा पहिला दिवस! शेवाळकर मोठ्या उत्साहाने शाळेतील शिक्षकांच्या दालनात गेले; तो दिवस शनिवार होता, त्यामुळे शाळा लवकर होती. दालनात शिरतात न शिरतात तो एका अजस्र नागाने त्यांचे स्वागत केले! सहा फूट लांबीचे ते भीतीदायक जनावर शेवटचा श्वास घेताना धडपडत असले तरीही शेवाळकरांच्या छातीत धडकी भरली. त्याच दिवशी एक शिक्षक रजेवर होते, म्हणून मुख्याध्यापकांनी शेवाळकरांना एका वर्गावर पाठवले. त्या काळातही टारगट विद्यार्थी होते; त्यांनी नव्याने वर्गावर आलेल्या शिक्षकाला — अर्थात शेवाळकरांना — प्रश्न विचारला, “सर, आम्हाला एक विचारायचे आहे; विजयालक्ष्मी पंडित यांच्या मिस्टरांचे नाव काय?”
प्रश्नाच्या रूपाने टाकलेली गुगली शेवाळकरांनी ओळखली; ते पटकन म्हणाले, “अरे, किती सोप्पं आहे ना, त्यांचे नाव मिस्टर पंडित!” राम शेवाळकर यांनी दिलेल्या उत्तरामुळे निरुत्तर झालेले विद्यार्थी पुढे त्यांचे प्रशंसक बनले. वाशीम येथील महाविद्यालयात दहा महिन्यांची नोकरी झाली; नियमाप्रमाणे शेवाळकरांची नोकरी गेली. त्याचवेळी यवतमाळ येथील महाविद्यालयात ‘मराठीचा प्राध्यापक पाहिजे’ अशी जाहिरात संस्थेचे अध्यक्ष दाते यांनी दिली होती. शेवाळकरांची विद्वत्ता पाहून दाते यांनी शेवाळकर यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली; परंतु शेवाळकरांचा स्वभाव चार भिंतींच्या आत शिक्षण देणारा नव्हता. त्यांनी सुट्टीच्या दिवशी आणि सवड असताना आसपासच्या परिसरात जाऊन व्याख्यान देण्याचा श्रीगणेशा केला. वाणीला कंठ फुटला, तर त्याचवेळी लेखणीही प्रसवू लागली; आशयगर्भ कवितांची निर्मिती सुरू झाली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काहीतरी जीवनोपयोगी ज्ञान द्यावे या हेतूने त्यांनी ‘शारदोत्सव’ तसेच ‘वसंतोत्सव’ हे दोन कार्यक्रम सुरू केले. या दोन्ही कार्यक्रमांना व्याख्याते, प्रमुख पाहुण्यांच्या विद्वत्तापूर्ण विचारांची मेजवानी शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर शिक्षणप्रेमी नागरिकांना मिळू लागली. यवतमाळ येथील महाविद्यालयात दोन वर्षांचा कालावधी उलटला; शेवाळकरांना एक सुवर्णसंधी चालून आली. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात मराठी प्राध्यापकाची नेमणूक करावयाची आहे ही बातमी समजल्यावर त्यांनी अर्ज पाठवून दिला; त्यांना मुलाखतीचे पत्र आले. ही बाब अध्यक्ष दाते यांना कशी सांगावी, हा प्रश्न शेवाळकरांना पडला. शेवटी त्यांनी दाते यांच्याशी चर्चा केली. शेवाळकर यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला निरोप देणे दाते यांना अवघड वाटत होते; परंतु शेवाळकर यांचा उज्ज्वल भविष्यकाळ लक्षात घेता त्यांनी शेवाळकरांना परवानगी दिली.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली ख्याती प्राप्त अशा पीपल्स महाविद्यालयात शेवाळकर मुलाखत देण्यासाठी पोहोचले; एकंदरीत सात उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांची मुलाखत तीन टप्प्यात झाली. दुसरा टप्पा इतर सहा उमेदवारांना अत्यंत कठीण असा गेला; कारण ती मुलाखत प्रख्यात साहित्यिक, विद्वान नरहर कुरुंदकर घेत होते. प्रश्नांचे उत्तर चुकले किंवा उत्तर देता आले नाही, तर कुरुंदकर मोठ्या आवाजात रागवायचे; त्यामुळे उमेदवार गर्भगळीत होऊन बाहेर पडायचे. शेवाळकर यांनी अत्यंत धिटाईने, कुरुंदकरांच्या डोळ्यांत डोळे घालून उत्तरे दिली. एक अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन शेवाळकर खुद्द स्वामी रामानंद यांच्यापुढे गेले; त्यांची पीपल्स महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
नांदेड येथील प्रा. राम शेवाळकर यांची कामगिरी अविस्मरणीय आणि चौफेर अशी होती. जुन्या-जाणत्या रसिकांच्या शब्दात तो नांदेडच्या साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. साहित्य कार्यक्रमात ‘शेवाळकर-कुरुंदकर’ हे वैचारिक द्वंद्व नांदेडकरांसाठी अलभ्य लाभ होता. एकमेकांचे मुद्दे तात्विक विवेचनातून साधार खोडून काढण्याची दोघांची विद्वत्ता आगळ्यावेगळ्या बुद्धिमत्तेचे तेज असे. शेवाळकर स्वतः या वास्तव्याला ‘सोनेरी दिवस’ असे संबोधत. त्यांचे मूळ गाव शेवाळा हे नांदेडपासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असल्याने ते त्या कालावधीला ‘माहेरचे दिवस’ असे म्हणत; नंतर त्यांनी नांदेड येथील आठवणी शब्दबद्ध केल्या आणि त्या संग्रहाला त्यांनी ‘माहेरचे दिवस’ हेच नाव दिले. यावरून नांदेडच्या साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, संगीत, सामाजिक इत्यादी अनेक क्षेत्रात ते किती समरस झाले होते हे समजून येते. शेवाळकर त्या भारावलेल्या दिवसांबद्दल म्हणत, “पीपल्सने मला सर्व काही भरभरून दिले; प्राध्यापक म्हणून प्रतिष्ठा दिली, वक्ता म्हणून नावलौकिक दिला; माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला. शिरवाडकर, गाडगीळ, कुरुंदकर, डोळे यांच्यासारख्या विद्वानांच्या सहवासातून निर्माण झालेली वैचारिक बैठक जोपासण्यासाठी बळ मिळाले. स्वामीजींच्या संपर्कातून जे संस्कार झाले, तीच खरी माझी शिदोरी आहे आणि या सर्व संचिताचा परिपाक म्हणून भविष्यात विनोबाजींच्या आचार्य कुलात प्रवेश मिळणे सोपे झाले.”
शेवाळकर यांची पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथील आठ-दहा वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी पाहून त्यांना वणी, देगलूर, छत्रपती संभाजीनगर, कारंजा तसेच पुसद येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून यावे अशी निमंत्रणे आली; परंतु शेवाळकरांनी ‘वणी’ या गावाला पसंती दिली. पुढे खरा प्रश्न होता, तो स्वामीजींना सांगावे कसे? खुद्द राम शेवाळकर यांच्याकडे ते साहस नव्हते. तेव्हा नरहर कुरुंदकर यांनी संस्थेचे चिटणीस भगवानराव गांजवे यांच्यामार्फत तो विषय स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापर्यंत पोहोचवला. ती बातमी ऐकून इतरांसह खुद्द स्वामीजीही खूप व्यथित झाले; अनिच्छेने परंतु आनंदाने त्यांनी शेवाळकर यांना वणी येथे जाण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर शेवाळकर यांच्या निरोप समारंभाचे कार्यक्रम सुरू झाले. शेवाळकर जात आहेत ही प्रत्येक कार्यक्रमाला दुःखाची किनार असली, तरीही शेवाळकर प्राचार्य म्हणून जात आहेत ही समाधानाची लकेरही होती.
जाण्याचा दिवस उजाडला; शेवाळकर कुटुंबीय बसस्थानकावर पोहोचले. बसस्थानकावर इतर प्रवाशांपेक्षा निरोप देणाऱ्या लोकांची गर्दी अधिक होती. आश्चर्य म्हणजे, कुणालाही बसस्थानकावर निरोप द्यायला न येणारे नरहर कुरुंदकर बसच्या दाराजवळ उभे होते! ती गर्दी पाहून वाहक घंटी वाजवायला नि चालक बस सुरू करायला जणू विसरले. साश्रूपूर्ण नयनांनी शेवाळकर कुरुंदकरांच्या पुढे उभे राहिले; कुरुंदकरांचेही डोळे भरलेले होते. पायाशी वाकणाऱ्या रामाला नरहरांनी छातीशी कवटाळले, तेव्हा तिथे असणाऱ्यापैकी कुणालाही स्वतःची आसवे आवरता आली नाहीत.
1965 यावर्षी गुरुवर्य राम शेवाळकर वणी येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून उपस्थित झाले. असंख्य अडचणी समोर उभ्या होत्या; परंतु ‘इच्छा तिथे मार्ग’ या न्यायाने प्रा. शेवाळकर प्रत्येक संकटावर मात करीत होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेले वाद, प्राचार्यांच्या खुर्चीवर बसण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा असलेले प्राध्यापक असे एक ना अनेक; परंतु शेवाळकरांनी सर्व काही कौशल्याने हाताळले नि विरोधक प्रचारक झाले. दरमहा एक तारखेला फार मोठा प्रश्न प्रा. शेवाळकर यांच्यापुढे उभा राही, तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार! प्राचार्य म्हणून शेवाळकर यांनी असा एक अलिखित नियम केला होता की, कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला पगार झालाच पाहिजे; परंतु अनेकदा महिन्याच्या शेवटच्या दिवशी शासकीय अनुदान जमा होत नसे, तेव्हा एक तारखेच्या भल्या पहाटे शेवाळकर पत्नी विजयाताई यांच्यापुढे उभे राहात. ते काही म्हणण्यापूर्वीच विजयाताई म्हणत, “अनुदान जमा झाले नाही ना? कर्मचाऱ्यांचा पगार व्हायलाच हवा; घ्या हे दागिने. आत्ताच काढून ठेवले आहेत; गहाण ठेवून लोकांच्या पगारी करा.” त्यावेळी शेवाळकरांच्या उजळलेल्या चेहऱ्याच्या एकमेव साक्षीदार म्हणजे... खुद्द विजयाताई!
महाविद्यालयाच्या पैशाचा गैरवापर किंवा उधळपट्टी करणे शेवाळकर यांच्या स्वभावातच नव्हते. व्याख्याते म्हणून त्यांना वारंवार पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर अशा शहरांमध्ये जावे लागे; त्यावेळी ते महाविद्यालयीन कामे करून घेत, त्यामुळे महाविद्यालयीन खर्चात सातत्याने बचतच होत असे. प्राचार्यपदी विराजमान असताना बहुतेक अधिकार एकवटलेले असताना ते कुणालाही विनाकारण त्रास देत नसत. सर्वांशी आदरयुक्त वागत असल्याने त्यांच्याबद्दल एकप्रकारचा आदर सर्वांनाच होता. त्यांच्या स्वभावाचे एक उदाहरण त्यांच्या मोठेपणाचे द्योतक ठरावे: महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नियोजनाच्या बैठकीत एका विद्यार्थी प्रतिनिधीने सूचना केली, “आपल्या विद्यालयाची वर्षानुवर्षे सेवा केलेला मारोती कुळमेथे हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे; त्याला स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करावे.”
इतर कुणी काही बोलण्यापूर्वीच प्रा. शेवाळकरांनी तो प्रस्ताव स्वीकारला! नुसताच स्वीकारला नाही, तर कार्यक्रमाच्या दिवशी कुळमेथे यांचे आगमन होताच स्वतः फाटकापर्यंत जाऊन त्याला सन्मानाने कार्यालयात घेऊन आले.
एकदा एक दुःखदायक घटना घडली. शंकर हिंगोले नावाच्या एका गरीब विद्यार्थ्याने थेट महामहीम राष्ट्रपती यांना पत्र लिहिले, “मी एक अत्यंत गरीब विद्यार्थी असून बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला आहे; प्रा. शेवाळकर सरांनी सर्व पुस्तके दिली आहेत, परंतु चाळीस रुपये परीक्षा फी भरू शकत नाही. आपण मदत करावी.”
ते पत्र वाचून शेवाळकरांनी त्याची फी भरली; परीक्षा झाली. शंकर पुन्हा शेवाळकरांना भेटला आणि पुढे शिकण्याची मनीषा सांगून कुठे तरी अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याची इच्छा व्यक्त केली. शेवाळकरांनी त्याला आश्वस्त केले. परीक्षेचा निकाल लागला; काही दिवसांनी प्राचार्यांना एक फोन आला, “तुमचा विद्यार्थी शंकर ह्याने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली आहे...” शेवाळकर पुढे ऐकू शकले नाहीत. भरलेल्या डोळ्यांनी, भरलेल्या आवाजात ते पुटपुटले, “शंकर, हा निर्णय घेण्यापूर्वी एक वेळ तू माझ्याशी चर्चा केली असती तर? या जगात ज्या व्यक्तींवर विश्वास टाकावा अशा लोकांच्या तुझ्या यादीत माझेही नाव नसावे? हा माझ्या अध्यापकीय आयुष्यातील सर्वात मोठा आणि अक्षम्य पराभव आहे.”
या वाक्यातून एका शिक्षकाला किती दुःख झाले असेल, हे लक्षात येते.
व्याख्याते म्हणून शेवाळकर अगदी परदेशातही जाऊन आले; त्यानिमित्ताने त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. एकदा एका गावात शेवाळकर यांचे ‘कालिदासाची नाटके’ या विषयावर व्याख्यान होते. शेवाळकर कार्यक्रमस्थळी पोहोचले; रसिकांची तुडुंब गर्दी होती, त्यात तरुणाई अधिक होती. रसिकांची गर्दी म्हणजे जणू व्याख्यात्यासाठी भरपूर बिदागी! अत्यंत उत्साहाने, जोशात प्रा. शेवाळकर यांनी बोलायला सुरुवात केली. काही क्षणातच तरुण बाहेर पडू लागले; तेव्हा शेवाळकरांच्या लक्षात आले की, ती गर्दी त्यांचे विचार ऐकण्यासाठी नव्हती, तर तरुणांचा असा समज झाला होता की, कालिदासाचे प्रत्यक्ष नाटक होणार आहे — त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
एकदा बुलडाणा येथे शेवाळकरांचे ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या विषयावर सुंदर व्याख्यान झाले. व्याख्यान संपताच रा. ल. गुप्ते नावाचे कवी त्यांच्याजवळ आले; भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी शेवाळकर यांच्या हातात एक पाकीट दिले, त्यात पाच रुपयांची नोट होती. ते पाच रुपये शेवाळकरांना पाच हजारांसम वाटले असतील! हैदराबाद येथील एक प्रसंगही असाच भावोत्कट! शेवाळकरांनी व्याख्यान पूर्ण करताच एका म्हाताऱ्या श्रोत्याने व्यासपीठावर येऊन शेवाळकरांना कडकडून मिठी मारली; म्हणाले, “माझे उरलेले आयुष्य तुम्ही घ्या.”
नाशिक येथील परिसंवाद संपवून शेवाळकर कारमध्ये बसत असताना एक रसिक कारजवळ येऊन हात पुढे करून म्हणाला, “मला तुमचा स्पर्श हवा आहे.” शेवाळकरांनी त्याची इच्छा पूर्ण केल्याबरोबर दुसऱ्या एका गृहस्थाने स्वतःच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून कुणास काही कळायच्या आधी ती अंगठी शेवाळकर यांच्या बोटात घातली! तो गृहस्थ होता... परभणीचे देवडे नावाचे पत्रकार!
वाचकमित्रहो, अमेरिकेतील बोस्टन येथे प्रा. राम शेवाळकर यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग मराठी माणसाची मान ताठ करणारा असाच. शेवाळकर यांचे बोस्टनच्या समारंभातील व्याख्यान संपते न संपते तोच उपस्थित चार-पाच हजार रसिकांचा समूह उभा राहिला; त्यांनी चार-पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. किती मोठा हा सन्मान! असे अनेक प्रसंग विदेशात शेवाळकर यांच्याबाबतीत घडले आहेत. एखाद्या प्रसंगी, एखाद्या वेळी मानवाला अशी एखादी भेट मिळते, ती तो आजीवन विसरू शकत नाही. अशी भेट कोणत्याही स्वरूपातील असू शकते; परंतु त्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो. गुरुवर्य प्रा. राम शेवाळकर यांच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला. प्राध्यापक राम शेवाळकर एकदा परीक्षा पर्यवेक्षकाचे काम करीत होते; वातावरण शांत होते, विद्यार्थी उत्तरे लिहिण्यात मग्न होते. पर्यवेक्षक शेवाळकर खुर्चीवर बसून वातावरणाचा आनंद घेत असताना, कदाचित पेपर चांगला गेला असल्याने कुणीतरी गुणगुणत होते, “घट डोईवर घट कमरेवर...” पर्यवेक्षक शेवाळकर यांनी आवाजाच्या दिशेने शोधक नजर टाकली. त्याचवेळी समोरूनही एक नजर शेवाळकरांवर रोखली गेली; त्या नजरेत संमिश्र भाव होते... लज्जा, भीती, आनंद आणि प्रेमही... नजरा जुळल्या! नकळत हृदयात तारा छेडल्या गेल्या... प्रेमाच्या! विजयाच्या!! कारण पुढे त्याच परीक्षार्थीने शेवाळकरांची पत्नी म्हणून घरात प्रवेश केला... सौ. विजया शेवाळकर!
प्रा. राम शेवाळकर यांनी असंख्य कुटुंबे आणि अगणित माणसे जोडली; त्यापैकी एक घराणे म्हणजे मंगेशकर! संबंध इतके घनिष्ठ आणि घरगुती झाले की, राम शेवाळकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरू केलेला ‘मोगरा फुलला’ आणि नंतर तोच कार्यक्रम ‘अमृताचा घनु’ या नावाने महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर गाजला. एकदा राम शेवाळकर यांच्या हस्ते नाशिक येथे लतादीदींचा सत्कार होता; त्यावेळी दीदी म्हणाल्या, “प्रकृती चांगली नसतानाही रामभाऊ नागपूरहून नाशिकला आले; कदाचित ते आलेच नसते, तर हा सत्कार मी स्वीकारलाच नसता.”
एका कार्यक्रमात प्रा. राम शेवाळकर आणि आशा भोसले हे दोघे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करताना शेवाळकरांनी मेणबत्ती आशाताईंना देण्याचा प्रयत्न केला; तेव्हा आशाताई म्हणाल्या, “नाही. रामभाऊ, तुम्ही ज्ञानी आहात, तेव्हा हा मान तुमचा.”
“ताई, माझ्या ज्ञानाचा तुमच्या स्वरांना साष्टांग नमस्कार आहे.” परस्परांबद्दल असलेल्या आदराचे कुठल्याही शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. गुरुवर्य राम शेवाळकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत; ‘पाणियावरी मकरी’ हे त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे. लेखनाचा एक वेगळा प्रवाह — अगदी प्रत्येक लेखाच्या शीर्षकासह वेगळा आहे. पणजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. राम शेवाळकर यांची बिनविरोध निवड झाली. नांदेड येथे झालेल्या सत्कार प्रसंगी शेवाळकर म्हणाले, “खरे तर या अध्यक्षपदावर माझ्याआधी नरहर कुरुंदकरांचा हक्क होता; परंतु दुर्दैवाने तो आज नाही. मला खात्री आहे, माझे कौतुक करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी तो इथेच कुठे तरी आहे. नरहरच्याच मांडीवर बसून त्याचाच प्रतिनिधी म्हणून मी हा सत्कार स्वीकारतो आहे... नरहर हा माझ्यासाठी राम आहे म्हणून मी आज भरतनिष्ठेने हा सत्कार स्वीकारतो आहे...”
अशा या मित्रप्रेमाला उपमा तरी कोणती द्यावी?
अखेर तो दिवस आला; सकाळी देवापुढे बसून जप करताना वाणी खुंटली, लेखणीतील शाई संपली, जिव्हेवरची सरस्वती मूक झाली... सारे संपले! अवघा महाराष्ट्र आक्रंदत होता. शांतपणे चिरविश्रांती घेणाऱ्या गुरुवर्य शेवाळकर यांच्याकडे पाहत खुद्द कवी ग्रेस ढसढसा रडत होते, जणू अवघा महाराष्ट्र रडत होता.
मी ज्यांना साहित्य क्षेत्रात गुरू मानून एकलव्यनिष्ठेने लेखन करीत आहे, त्या माझ्या गुरुघराण्यातील गुरूला सादर प्रणाम! वंदन!! त्यांच्या एका वाक्याने या लेखाची सांगता करतो:
“मातीने झेप घेतली, आकाशाला मिठी मारण्यासाठी
त्याचे रामायण झाले!
आकाश वाकले, मातीला मिठी मारण्यासाठी
त्याचे झाले महाभारत!!”
- नागेश शेवाळकर
निवृत्त मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा,
डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
.jpg)



Comments