top of page

साठ वर्षांनंतरही आदर कायम!

14 hours ago
3 min read

माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती असलेला ५ सप्टेंबर हा दिवस देशात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने काही शिक्षकांची प्रकर्षाने आठवण येते. माझी शाळा 'भारत हायस्कूल' ही पुण्यातल्या पूर्व विभागातील म्हणजे बुधवार पेठेतील एक अतिशय चांगली शाळा होती. शाळेतले विद्यार्थी हे जवळपासच्याच पेठांतून आलेले असल्यामुळे मला सर्व जाती-धर्माचे मित्र मिळाले. त्यामुळे कुठल्याही संकुचित विचारांना मनात थारा मिळाला नाही.



अमचा शिक्षकवृंद सुद्धा अतिशय चांगला लाभला. त्याकाळी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. त्या वेळच्या गुरुजनांबद्दलचा असलेला आदर साठ वर्षांनंतर देखील तसाच टिकून आहे. शाळेतील सात वर्षांच्या विद्यार्थीदशेत सर्व शिक्षक अतिशय चांगले लाभले. सर्वांबद्दल नितांत आदर आहे, पण सर्वांचा उल्लेख इथे करणं शक्य नाही; म्हणून वानगीदाखल एक-दोन गुरुजनांचे स्मरण करावेसे वाटते.

यातील पहिले नाव म्हणजे शशिकांत ठाकूर सर. सरांनी आम्हाला मराठी जसे शिकवले, तसेच व्यापारशास्त्राचे धडेही दिले. सरांचा भर केवळ पुस्तकी ज्ञानावर नव्हता; त्या पलीकडे जाऊन आम्ही अवांतर वाचन करावे, हा आयुष्यभर पुरणारा मोलाचा संस्कार सरांनी आमच्यावर केला. आमच्या शाळेत अतिशय समृद्ध असं ग्रंथालय होतं. ग्रंथसंग्रहामध्ये ललित, ऐतिहासिक, विज्ञानविषयक इत्यादी सर्व प्रकारची पुस्तके होती. आम्ही काय वाचावं, याचे मोलाचे मार्गदर्शन सर करीत असत. त्यामुळे ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’पासून ‘राजा शिवछत्रपती’पर्यंत विलक्षण मोठी रेंज असणारी पुस्तके आठवी-नववीतच वाचून झाली.

एखाद्या विषयाची व्याप्ती केवळ पाठ्यपुस्तकातील मजकुरापुरती मर्यादित नसते, तर त्या पलीकडे जाऊन त्या विषयातील अन्य पुस्तकांचंही अध्ययन करावं, अशी त्यांची इच्छा असायची. परीक्षेमध्ये उत्तरे लिहिताना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील काही माहितीचा उल्लेख केला, तर ते अतिशय संतुष्ट व्हायचे. मराठीचे शिक्षक म्हणून ‘कवितेवरील प्रश्न जेव्हा परीक्षेत येतात, तेव्हा उत्तरामध्ये त्या-त्या संदर्भातील काव्यपंक्तींचा उल्लेख झालाच पाहिजे,’ हा त्यांचा दंडक पुढेही उपयोगी पडला.

त्याकाळी आमच्या शाळेत पुण्या-मुंबईची मराठी आणि इंग्रजी दैनिके येत असत. मधल्या सुट्टीत एकदा असेच ‘सकाळ’चे वाचन करीत असताना सरांनी पाहिले आणि जवळ येऊन, “तू आता इथे जी बातमी वाचतोस, ती कुठे टाइम्स किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये दिसते का पाहा. ती पण वाच. दोन्ही भाषेतील बातम्या वाचल्या की, आपोआप इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढेल,” असा मोलाचा सल्ला दिला.

त्याकाळी दसरा आणि मकर संक्रांत या दोन दिवशी सर्वच गुरुजनांकडे जाऊन सोने देणे आणि तिळगुळ घेणे हा प्रघात वर्षानुवर्ष चालू होता. ही प्रथा केव्हा लोप पावली, ते कळलेच नाही! ठाकूर सरांच्या घरी या दोन दिवशी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असायची. जणू एखादा दरबारच भरलेला असावा, असं दृश्य दिसायचं. या दोन्ही दिवशी सर्वाधिक गर्दी असायची ती ठाकूर सरांकडेच. सरांच्या विलक्षण विद्यार्थीप्रियतेचा तो एक निर्वाळाच होता.

अशीच आता आठवण येते ती आज वयाच्या ८६ व्या वर्षी उदंड उत्साहात आयुष्य जगणाऱ्या रमेश वैद्य सरांची. सर आमचे हिंदीचे शिक्षक. या भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहेच. मुन्शी प्रेमचंदसारख्या साहित्यिकांच्या लिखाणातील सौंदर्यस्थळे सर अतिशय छानपणे उलगडून दाखवत असतात. हिंदी भाषेतील वाक्प्रचार म्हणजे 'मुहावरे' हा सरांचा एक जिव्हाळ्याचा विषय. ‘प्रेमचंद म्हणजे मुहावऱ्यांचा पाऊस,’ हे सरांचे वाक्य ५० वर्षे होऊन गेली तरी स्मरणातून जात नाही. सरांच्या आणि आमच्या वयात जेमतेम १५ वर्षांचे अंतर असल्याने, ते आम्हा विद्यार्थ्यांना ज्येष्ठ मित्रासारखेच वाटायचे.

त्या वेळी शिक्षक असलेले वैद्य सर पुढे ‘भारत इंग्लिश स्कूल’चे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले, पण विद्यार्थ्यांप्रति असणारा त्यांचा जिव्हाळा जराही कमी झाला नाही. वयाच्या ७५ व्या वर्षी कर्करोगावरील दीर्घ शस्त्रक्रियेला सामोरे जाऊन त्या व्याधीवर यशस्वीपणे मात करणारे सर म्हणजे जबरदस्त इच्छाशक्तीचा मानदंड म्हणायला हरकत नाही. आज नव्वदीकडे वाटचाल करणारे सर उत्तम आरोग्य राखून आहेत. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात आजही त्यांची गाठभेट होत असते.

एक आठवण झाली म्हणून सांगतो. यावर्षी जानेवारी महिन्यात माझ्या वाढदिवसाला सकाळी-सकाळी शुभेच्छा देण्यासाठी वैद्य सरांचा फोन आला. ऑस्ट्रेलियात असणारी माझी मुलगी त्यावेळी पुण्यात आली होती. माझं फोनवरील बोलणं ऐकून ती म्हणाली, “एवढे अदबीने तुम्ही कोणाशी बोलत होतात, सर-सर म्हणून?” तिला सांगितलं, “हे माझे शाळेतील गुरुजी आहेत.” हे ऐकून लेक आणि जावई दोघांनाही धक्का बसला. “शाळा सोडून पंचावन्न वर्षे होऊन गेली तरी तुमचे सर आठवणीने तुम्हाला शुभेच्छा देतात, हे खरंच ग्रेट वाटलं!” त्यावर मीम्हटलं, “आमच्या पिढीत गुरु-शिष्यांचे संबंध हे इतके जिव्हाळ्याचे होते, त्याचाच हा प्रत्यय आहे.”

आचार्य अत्रे या अफाट व्यक्तिमत्त्वाविषयी वाटणारे प्रेम हा वैद्य सरांच्या आणि माझ्यामधला एक दुवा. अत्र्यांच्या निधनानंतर सर त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी थेट मुंबईला पोहोचले होते. परत आल्यावर अत्र्यांच्या स्मृती जागवणारा एक सुंदर लेख त्यांनी आमच्या शाळेच्या नियतकालिकात लिहिला होता.

आज या निमित्ताने अन्य काही शिक्षकांची पण आठवण येते. आमच्या शाळेला आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धेत सलग १७ वर्षे प्रथम क्रमांकाची ढाल मिळवून देणारे आणि ‘आरोग्य म्हणजे काय’ याचा आदर्श असलेले नरसिंह कोंढवेकर सर आठवतात. त्याकाळी शाळेला आंतरशालेय नाट्यस्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवून देणारे रंगकर्मी वासुदेव पाळंदे सर यांचेही आज स्मरण होतेय. पुढे पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू झालेले नवलगुंदकर सर हेही आमचे त्या काळातील शिक्षक होते. पुण्यातील बीएमसीसी या महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून निवृत्त झालेले अशोक पुराणिक सर हेही आमचे त्या वेळचे इंग्रजीचे शिक्षक होते. आणखी अनेक नावे डोळ्यापुढे येतात, पण सगळ्यांचा परामर्श घेता येत नाहीये.

या सर्व गुरुजनांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान नाही दिलं, तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांनी सर्वांगांनी समृद्ध केले. आज हे सर्व गुरुजन (ठाकूर सर आदी) काळाच्या पडद्यावर गेले असले, तरी त्यांच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत. त्या सर्वांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन!

वैद्य सरांचा आशीर्वादाचा हात मात्र आजही मस्तकी आहे. सरांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या मस्तकी दीर्घकाळ राहो, एवढीच प्रार्थना करून थांबतो.

- अरुण कमळापूरकर, पुणे


आजचे शिक्षणयात्री | Aajche Shikshanyatri
₹350.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page