top of page

सावध ऐका पुढल्या हाका

  • 3 days ago
  • 4 min read


सध्या जग एका यद्धाच्या खाईत लोटले गेले आहे. युद्ध तीन देशात होत असले तरी त्याचे परिणाम जगालाच भोगावे लागत आहेत. जगात कोणताही देश स्वावलंबी नाही हे पुन्हा समोर आले आहे. विज्ञान क्रांती झाल्यानंतर माणसांचे आणि देशाचे परावलंबित्व आणखी वाढत चालले आहे. युद्ध ज्या देशांमध्ये होते आहे, त्या देशाबरोबर इतर देशही अडचणीत सापडले आहेत. आज या युद्धात अमेरिकेसारखा देश सर्वात आघाडीवर आहे.


जगावर साम्राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून इतिहासात अनेक देशांनी प्रयत्न केले. वर्तमानातही तसेच प्रयत्न जगातील अनेक देश करत आहेत. अनेकदा युद्ध महासत्तेच्या स्वप्नासाठी, शस्त्रास्त्राचा व्यापार करणाऱ्या देशांचे उत्पादन विकण्यासाठी, आपले वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी केली जातात. युद्ध हे मानवी विकृतीचे प्रदर्शन आहे. माणसाला सुखी होण्यासाठी नाही तर माणसाच्या आयुष्यात दुःखाची वाट निर्माण करण्यासाठी युद्धं लढली जात आहेत. जग जवळ आले आहे, हे खरेच. त्यामुळे बरे-वाईट परिणाम देखील एकमेकांवर पटकन होत आहेत.

शोध शिक्षणाचा | Shodh Shikshanacha
₹250.00₹187.50
Buy Now

आईन्स्टाईन यांनी अणुबाँब निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे सूत्र शोधले होते. त्या सूत्रातून निर्माण होणाऱ्या शक्तिची जाणीव त्यांना देखील होती. शेवटी विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. आपण ते कसे वापरतो त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. चांगल्यासाठी वापरले जावे अशी अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही पण त्या वाटांचा  प्रवास खरंच तसा घडतो आहे का? याचा विचार केला तर विज्ञानाने जीवनात जितका आनंद निर्माण केला आहे, तितकीच भीती देखील निर्माण केली आहे. पदार्थाच्या अगदी छोट्यातील छोट्या कणात देखील प्रचंड शक्ती सामावलेली असते हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. त्याच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टिने जगभरातील वैज्ञानिकांनी प्रयत्न सुरू केले होते. ऑटोहान आणि स्ट्रॉसनम यांनी युरिनिअमच्या अणु केंद्रावर न्युट्रॉनचा मारा करून 1938 साली त्या शक्तिच्या मुळाशी जाण्यात या वैज्ञानिकांना यश मिळाले होते. या एका घटनेमुळे अणुबाँब निर्मितीची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत या शोधाचा वापर करून हिटलरने अणुबाँब बनवला तर जग वेगळ्याच संकटात सापडेल असे त्यावेळी वैज्ञानिकांना वाटले होते. म्हणून या संशोधनातून जर्मनीने अणुबाँब तयार करण्यापूर्वी अमेरिकेने तयार केला तर चांगले असे वैज्ञानिकांना वाटले कारण जर्मनीवर हिटलर राज्य करत होता. त्याच्या वृत्तीचा तोवर जगाला अंदाज आला होता. त्यामुळे आईन्स्टाईन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यासंदर्भात तात्काळ कळवले.


अमेरिकेच्या हाती या निमित्ताने मोठी शक्ती आली होती. मग या संशोधनाचा फायदा घेत अमेरिकेने अत्यंत गुप्तपणे अणुबाँब तयार केला. त्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला सुरूवातही झाली होती. जग त्या महायुद्धाने विभाजित झाले होते. अशावेळी जपानने आपल्यासमोर शरणांगती स्वीकारावी यासाठी प्रयत्न सुरू होते पण जपान नमत नाही हे पाहिल्यावर हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबाँबचा हल्ला करण्यात आला. त्यात ही शहरे बेचिराख झाली होती. या करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात आईन्स्टाईन यांना पूर्ण अंधारात ठेवण्यात आले होते. या घटनेचे वृत्त ऐकल्यावर आईन्स्टाईन यांना धक्का बसला होता. आपण नेमके कशासाठी अमेरिकेला अणुबाँब बनवण्यास सांगितले होते पण त्यांनी केलेला दुरुपयोग त्यांनाही चिंता करायला लावणारा होता.

शिक्षणावर बोलू काही | Shikshanavar Bolu Kahi
₹300.00₹225.00
Buy Now

 खरं तर जगातील कोणतेही युद्ध हे वाईटच असते. जगाच्या इतिहासात साधारणपणे चौदा हजार युद्धे झाली असे मानले जाते. त्यातील साडेबारा हजार युद्धं ही साधारण धर्मसंघर्षातून झाली आहेत; तर उर्वरित युद्धापैकी अनेक युद्धे ही साम्राज्यवादातून उभी ठाकली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा इतिहास पाहता अमेरिकेने साधारणपणे साम्राज्यवादी भूमिकेतून पाऊनशे युद्धं जगावर लादली आहेत. एकदा कोणी तरी आईन्स्टाईन यांना असेही विचारले होते की, “दुसरे महायुद्ध कसे खेळले जाते आहे, ते तुम्ही जाणता आहात मात्र तिसरे महायुद्ध नेमके कोणत्या शस्त्रांनी खेळले जाईल असे तुम्हाला वाटते?” तेव्हा ते म्हणाले होते की, “तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्राने खेळले जाईल हे मला माहीत नाही पण चौथे महायुद्ध मात्र दगडांनी खेळले जाईल.”


याचा नेमका अर्थ काय ? त्यांच्या बोलण्याचा हेतू, भाव लक्षात घेतला  तर तिसऱ्या महायुद्धानंतर विश्व खरंच अस्तित्त्वात राहील का याबद्दल शंका येते आहे. एका व्यक्तिने त्यांना तिसऱ्या महायुद्धाविषयी आणखी काही प्रश्न विचारले होते तेव्हा ते म्हणाले होते की, “मला तिसऱ्या महायुद्धाविषयी फार काही सांगता येणार नाही पण चौथ्या महायुद्धाविषयी मी अधिक काही सांगू शकेल...” तेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांनी अधिक औत्सुक्याने त्या विषयी “सांगा” असे म्हटले तेव्हा ते म्हणाले “तिसऱ्या महायुद्धात कोणी वाचले तरच चौथे महायुद्ध होऊ शकेल.”


विज्ञान-ज्ञानाच्या जोरावर आपण क्रांती केली असली तरी या संशोधनाने जगाच्या कल्याणाची वाट सापडायला हवी असताना आज आपण  विज्ञानाच्या सोबतीने विध्वसंकतेचा पाया घालत आहोत. त्याचा परिणाम माणसांवर होईलच पण निसर्गावर देखील अत्यंत विपरित परिणाम झालेला आपणास अनुभवास येईल. त्यामुळे या वाटेचा प्रवास किती धोकादायक आहे याचा विचार करायला हवा.

शिक्षणाचिये द्वारी | Shikshanachiye Dwari
₹300.00₹225.00
Buy Now

खरं तर कोणतेही युद्ध हे नेहमीच विध्वसंक असते. आता होणाऱ्या युद्धात ज्या पद्धतीने शस्त्रास्त्र वापरली जात आहेत, एकमेकांवर हल्ले होत असताना तेल विहिरींना आग लावली जात आहे त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होईल पण त्याचा पर्यावरणावर किती विपरित परिणाम होईल याचा अंदाज तरी केला गेला आहे का? त्याचवेळी निसर्गाची होणारी हानी पुन्हा वेगळी. आज युद्धात माणसं मारली जात आहेत, निसर्ग उद्ध्वस्त केला जात आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश केला जात आहे. अशावेळी जगातील विवेकवादी आणि शहाणपण असलेल्या कोणत्याही नागरिकाला हे घडू नये असेच वाटत असणार यात शंका नाही. आज जगातील काही राष्ट्रांकडे अण्वस्त्र आहेत, अणुबाँब आहेत. अशा परिस्थितीत युद्धात ते देश याचा वापर करणारच नाहीत असे हमखास कोणी सांगू शकणार नाही. त्याचा वापर केला तर ते देश उद्ध्वस्त होतील पण त्याचा परिणाम एकूणच जगाला भोगावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघे जगच आज अनामिक भीतीखाली जगते आहे. जगापुढे विवेकवादी नेतृत्त्वाची अधिक गरज अधोरेखित होऊ लागली आहे. समाज जेव्हा कोणाला निवडून सत्तेच्या स्थानी बसवत असतो तेव्हा तो केवळ एक प्रतिनिधी नसतो तर जगाच्या विनाशाची शक्ती देखील त्याच्या हाती प्रदान करत असतो. नेतृत्वाच्या हाती समाज व राष्ट्राचा उद्धार करण्याची शक्ती जशी आहे तशी विनाशाची देखील आहे. म्हणून जगानेच आता विचार करण्याची वेळ आली आहे. एक अविवेकी नेतृत्व जगाचा नाश करण्यास देखील पुरेसे ठरू शकते. जागतिकीकरणाच्या पाऊलवाटेवरील हे नेतृत्व कोणत्याही महासत्तेची स्वप्नं पाहणाऱ्या देशाचे असू शकते. म्हणूनच ‌‘सावध ऐका पुढल्या हाका‌’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.


- संदीप वाकचौरे

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६


Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page