top of page

तीन हसणारे भिक्षू

  • 2 days ago
  • 4 min read

Updated: 2 days ago

माणसाला आयुष्यात सातत्याने आनंद हवा असतो. आनंद मिळाला की आपोआप हास्य निर्माण होते. माणसाच्या आयुष्यातील आनंद म्हणजे जीवन आहे पण हा आनंद आपल्याला खरंच मिळतो का? जेथे मिळतो आहे तो चिरकाल टिकतो का?  मुळात आनंद ही भावना आहे. आपल्याला ज्या गोष्टींनी आज आनंद दिला ती गोष्ट उद्या आनंद देईल असे घडणार नाही. आपल्या आनंदाच्या वाटा प्रत्येक वेळी भिन्न आहेत. आपल्या आनंदाचे क्षण हे भौतिक सुविधांवर अवलंबून आहेत. म्हणून तो आनंद निरपेक्ष आणि टिकणारा नाही. ज्या आनंदाच्या वाटा निरपेक्ष नसतात, त्या वाटा परमानंद स्वरूपातील असण्याची शक्यता नाही.


एखाद्या व्यक्तिला गोड आवडते. त्याला गोड खायला मिळाले की, आनंदाला पारावर राहत नाही मात्र काही दिवसांनी त्याला मधुमेह होतो. त्या मधुमेहामुळे त्याला आता गोड मिळाले तरी पूर्वीसारखा आनंद होत नाही. त्याचवेळी एखादा वारकरी असतो. तो पंढरपूर, आळंदीची वारी नित्याने करतो. त्या वारीत तो चालत जातो. चालता चालता कधी थकत नाही. थकला तरी त्याच्या चेहऱ्यावर तो भाव असत नाही. त्याला प्रत्येक पावलागणिक परमेश्वराच्या भेटीची ओढ असते. त्या भेटीतून भक्ताला मिळणारा आनंद क्षणिक नसतो. त्या आनंदाचे वर्णन करताना संत म्हणतात की, हा आंनद म्हणजे परमानंद स्वरूपाचा आहे. हा आनंद जीवनात काही मिळाले तरी इतर मार्गानी मिळू शकत नाही. असे आनंदाचे क्षण प्रापंचिक जीवनात मिळत नाहीत. आनंदासाठी व्यावहारिकता महत्त्वाची नाही. त्यासाठी समर्पण महत्त्वाचे असते... पण आज जीवनातील आनंद, हास्य हरवले आहे. त्यामुळे जीवनातील हास्य कायम टिकावे म्हणून वाटा शोधाव्या लागतील. खरं तर परमेश्वराची प्राप्ती म्हणजे आनंदाची वाट आहे. आपण किती आनंदी आहोत त्यावर परमेश्वर आपल्या किती जवळ आहे हे ठरवता येईल.


भगवान ओशो जीवनातील आनंद, हास्याचे मोल जाणून आहेत. हास्याचे मोल सांगताना ओशोंनी सांगितलेली गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. ते सांगतात की, चीनमध्ये तीन भिक्षू राहत होते. त्यांनी जीवनभर जगण्यासाठी काही तत्त्वे, नियम केली होती. त्यासाठी अधिक महत्त्वाचा एक नियम केलेला होता. कोठेही भ्रमंती करत असताना, रोजचा जीवनव्यवहार करत असताना, प्रसंग कोणताही असला तरी आणि अगदी ते कुठेही गेले तरी फक्त हसत राहायचे. त्यांना हास्याशिवाय दुसरे काहीच करता येत नसायचे. हास्य हाच त्यांचा उपदेश होता. ते भ्रमंती करत असताना कधीच कोणाला काहीच सांगत नसायचे. त्यांनी कधीच कोणाला कशासाठीच उपदेश केला नाही. एखादा भिक्षू असेल, संत असेल, प्रबोधनकार असेल तर लोकांना त्यांच्या मुखातून प्रवचन ऐकवण्याची सवय असते. त्याच प्रमाणे लोकांना देखील संत, भिक्षूंनी आपल्याला काही तरी सांगावे ही अपेक्षा असते मात्र या तिन्ही भिक्षूनी कधीच प्रवचन दिले नाही. त्यांनी लोकांना कधी ध्यान-धारणा देखील शिकवली नाही. त्यांना परमेश्वराची भक्ती, साधना, ईश्वरावरील प्रेम म्हणजे फक्त हास्य असेच वाटायचे. आपण जेव्हा हसत असतो तेव्हा परमेश्वराजवळ जाण्याची वाट असते. ही त्यांची धारणा होती. हसण्याशिवाय परमेश्वराची भक्ती असू शकत नाही. ही त्यांची धारणा दिवसेंदिवस पक्की होत चालली होती.


हे भिक्षू लोकांना भेटायचे मात्र भेटले तरी फक्त हसत राहायचे. त्यांना फक्त हसणेच ठाऊक होते. त्यांचे हे वागणे लोकांना सुरुवातीला अत्यंत विचित्र वाटायचे. लोक त्यांच्याकडे पाहून अधिक चिंताक्रात व्हायचे. का बरं हसत असतील? असं त्यांना वाटायचं. अनेकदा लोकांना हे का हसतात? या बद्दल त्यांना प्रश्न विचारावे असे मनात यायचे पण लोकांना भीती वाटायची. कोणी धाडस करत नसायचे. मग कोणी तरी धाडस करून विचारले की, “तुम्ही का हसता?”  ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि पुन्हा हसायचे मात्र त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत. त्यामुळे लोकांना काहीच कळत नव्हते... पण हे भिक्षू हसत आहेत, हे पाहिल्यावर लोकही त्यांच्यासोबत हसू लागले. भिक्षू तर फक्त हसत राहायचे. हळूहळू गावोगाव लोकांना जाणवले की, त्यांच्या हसण्याने आपल्या अवतीभोवतीचे वातावरण बदलते आहे. आपल्या आयुष्यातील दुःखाची लहरही कमी होते आहे. हे लोक जिथे जातात तिथे आनंद पसरायला सुरूवात होते. तेथील वातावरणात मोठा बदल होतो. लोक दुःखी असतील तर लोकांच्या दुःखातही हलकेपणा येऊ लागला. आता लोकांना देखील हास्यामुळे आनंद मिळू लागला होता. लोकांना अनेकदा प्रश्न पडू लागला की, या लोकांच्या आयुष्यात असा एकही क्षण नसेल का? हे लोक जीवनात दुःखी असतील... लोकांच्या मनातच प्रश्न निर्माण झाले की, ही लोक मृत्युच्या वेळी नेमके काय बरं करत असतील?  असा प्रश्न लोकांना पडायचा.


अखेर एक दिवस त्या तीन भिक्षूंपैकी एक भिक्षू मरण पावला. साधारण आपला नातेवाईक, आपला मित्र, स्नेही, आपल्या सहवासातील कोणी जरी मरण पावले तरी आपल्याला दुःख होते. आपल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, भाषेचा माणूस नसला आणि केवळ परिचय असला तरी त्यांच्या मृत्युने दुःख होते आणि हास्य मावळते. अगदी माणसं जेव्हा अंतिम निरोप द्यायला जातात तेव्हा देखील स्मशानभूमीत मनातील एखाद्या विचाराने हास्य आले तरी माणसं ते हास्य दाबून ठेवतात कारण ती हास्याची जागा नाही. येथे तर तीन भिक्षू जीवनभर सोबत राहत होते. फार थोडे क्षण ते एकमेकांपासून दूर राहिले असतील. त्यामुळे यांच्यापैकी आता एक जण मृत्यू पावला आहे म्हटल्यावर उरलेले दोघे रडतील, असे लोकांना वाटू लागले होते. येथे देखील लोकांच्या मनात जे होते, त्याच्या उलट झाले.


आता आपला एक सहकारी मृत्यू पावला आहे, तेव्हा ही माणसं आणखी जोराजोरात हसू लागली होती. त्यांचे हे उंचावलेले हास्य पाहिल्यावर लोकांनी विचारले : “तुमचा मित्र मरण पावला आहे आणि तरी तुम्ही हसता आहात?” लोकांचे हे प्रश्न ऐकल्यावर भिक्षूंनी लोकांना सांगितले : “आम्ही आयुष्यभर हसल आलो आहोत. कोणत्याही व्यक्तिच्या जीवनात मृत्यू हा शेवट नाही हे लक्षात घ्या. आणखी एक हास्याचा प्रसंग आहे तुमच्या आयुष्यात. खरे तर आज आमच्या मित्राचे निधन झाले आहे. तुमच्या दृष्टीने त्याचा मृत्यू झाला आहे पण आम्ही असे मानतो की, आमचा एक मित्र आता मुक्त झाला आहे. त्याच्या स्मरणार्थ आम्ही हसतो आहोत.”


प्रथमच ते भिक्षू म्हणाले होते, “लोकहो... हसू म्हणजे ध्यान! आनंद आणि हसू हेच खरे ध्यानाचे मार्ग आहेत. आपण ज्याला ध्याय म्हणतो, त्या मार्गाने सर्व साध्य होते का? त्याचे उत्तर ‌‘नाही‌’ असेच येते. हसत हसत जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर हे सक्रीय ध्यान जीवनाला आनंदाची वाट दाखवेल यात शंका नाही. मानवी जीवनातील अंतिम सत्य काय असेल तर तो आहे मृत्यू. आपण कितीही आणि वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केला तरी मृत्युला चुकवता येत नाही. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार केला की, मृत्युची भीती संपुष्टात येते. भीती संपली की दुःख आपोआप संपते. त्यामुळे स्वीकृती जीवनाचे आनंदाचे क्षण वाढवत राहते. प्रत्येक माणसाने मृत्युचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. माणसाचा मृत्यू म्हणजे दुःखाचा प्रसंग नाही तर तो मानवी जीवनातील मुक्तीचा क्षण आहे. जीवनातील सर्व दुःखहरण होण्याचा तो एकमेव राजमार्ग आहे. जीवनाचा आज असलेल्या उत्सवासारखाच मृत्युचा महोत्सव व्हायला  हवा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला हलकेपणाने आणि आनंदाने जगण्याची गरज आहे. आपण मात्र जीवनात आनंदाचे क्षण जरी आले, तरी त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा पुन्हा दुःख अनुभवत असतो. खरं तर असे आनंदाने जगणे हिच आध्यात्मिकता आहे.


ओशो म्हणतात की, ही कथा आपल्याला गंभीरतेतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. आपण जीवनाला फार गंभीरतेने घेतो पण हसू हेच खरे औषध आहे. ध्यान म्हणजे गंभीरतेने बसणे नाही; ते आनंदाने जगणे आहे. मृत्युला देखील आपण उत्सवात बदलू शकतो. त्यामुळे फक्त आपली दृष्टी आणि दृष्टिकोनात बदल होण्याची गरज आहे. जीवनभर निराशेच्या छायेत आणि दुःखात जगणे म्हणजे एक प्रकारचा मृत्युच आहे. त्यामुळे क्षणोक्षणी मृत्युला सामोरे जातच असतो... त्यातून मुक्ती हवी असेल तर आपण हसत हसत जीवनाला सामोरे जाण्याची गरज आहे.


-संदीप वाकचौरे

+91 9405404500

साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६


अनुभवाचे अंतरंग | Anubhavache Antarang
₹150.00₹112.50
Buy Now

bottom of page