top of page

निरोपाचे राजहंस...!

  • 2 days ago
  • 3 min read

“पोरांनी शाळेला खूप दिले आहे. आठवणीत राहावा असा निरोप त्यांना द्यायला हवा.” भामरे सर परिपाठाला पाचवीच्या विद्यार्थ्यांकडे पाहत बोलले.


सरांची मुलांशी झालेली गट्टी, जिव्हाळा सारे त्यांच्या डोळ्यात दिसत होते. तोच धागा पकडत आम्ही सर्वांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचं ठरवलं.


नियोजनानुसार निरोपाचा दिवस उगवला. नवे कपडे घालून आलेली लेकरं उत्साहात होती. मुलांचा गोंधळ, हास्य, खेळकर आवाज सगळं काही होतं; पण वातावरणात एक वेगळीच हुरहूर दडली होती. लेकरांचा शाळेतील शेवटचा दिवस होता. पोरं सामोरी येत होती पण नजर चोरत होती. काही तरी हरवणार याची भीती काहींच्या चेहऱ्यावर दिसत होती. मुलं आवर्जून बेंचवर एकमेकांना भेटत होती. कोण कुठे शिकणार, काय करणार याच्या गप्पा सुरू होत्या. लहान वर्गातील मुलं मोठ्यांशी खेळत होती. मुलं जे जे शक्य असेल ते सारं अंतःकरणात साठवताना दिसत होती. काही नेहमीप्रमाणे फुलझाडांना पाणी घालत होती. आमच्या जिल्हा परिषद शाळेत पाचवीपर्यंतच वर्ग असल्याने उद्यापासून ही चिमुकली पाखरे नव्या शाळेच्या दिशेने भरारी घेणार होती हे सातत्याने जाणवत होते. दरवर्षी दिला जाणारा निरोप आणि आजचा निरोप यात फरक होताच.


पहिलं पाऊल पहिलीच्या वर्गात भीतभीत ठेवणारी ही मुले आज पाचवी पूर्ण करून आत्मविश्वासाने पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाली होती. वर्गात अक्षरांची, वाचनाची ओळख करून घेताना हात धरून लिहायला शिकवलेली हीच मुले आज स्वतःची स्वप्ने शब्दांत मांडू लागली होती. त्यांच्या वाढीचा, यशाचा आणि निरागसतेचा प्रवास डोळ्यांसमोर तरळत होता.


 तीन वर्षांच्या या प्रवासात किती तरी आठवणी जमा झाल्या होत्या. कधी अभ्यासातील यश, कधी खोड्या, कधी भांडणे तर कधी घट्ट मैत्री. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचे बालपण रेंगाळलं होते. शिक्षक म्हणून आम्ही त्यांना पुस्तकांतील धडे शिकवले; पण त्यांनी आम्हाला निरागसतेचे, प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे धडे दिले. या तीन वर्षातील शाळेच्या प्रगतीचा मानबिंदू ही मुलं होती.


वर्गात निरोप समारंभ सुरू झाला. आम्रपाली, वैष्णव, यश यांच्या निरोपरूपी शब्दातून गहिवरून येत होतं. देवा, राजू दादा, भामरे सर यांच्या मार्गदर्शनरूपी निरोपातून लेकरांना दिशा मिळाली. चौथीतील ईश्वरी, प्रवीण यांच्या आपल्या मोठ्या भावंडांविषयीच्या भावना बोलल्यावर पाचवीतली दिव्या वर्गातच साधनाच्या गळ्यात हात टाकून रडू लागताच सारा वर्ग भावनामय झाला. सारे ढसाढसा रडत होते. सवंगड्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. पोरांना नेहमीच आवडणारे, जिंदगी से जंग, आनंद या जीवनाचा ही गाणी या निमित्ताने गाता आली आणि त्यांची फर्माइश पूर्ण करता आली. ‌‘पुन्हा भेटू या‌’, ‌‘आम्हाला विसरू नका‌’ अशा शब्दांत बालमनातील ओलावा व्यक्त होत होता. आम्ही त्यांना आशीर्वाद देताना एकच संदेश दिला ‌‘मोठे व्हा, चांगली माणसं व्हा आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा.‌’


 या सगळ्या भावुक वातावरणात मुलांची एक खास फर्माईश होती. “सर, आज आम्हाला मंचूरियन खायचं आहे!” मुलांच्या या साध्या पण मनापासूनच्या इच्छेने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मग निरोपाच्या गोड-तिखट आठवणींसोबत मंचूरियनची चवही त्या दिवसाचा अविभाज्य भाग बनली. ताई तात्यांना आम्ही मदत केली. लेकरांनीही आपले योगदान दिले. जेवणही सोबतीने बनवले गेले. पोरांची प्रत्येक घासासोबत हशा, आठवणी आणि उद्याच्या स्वप्नांची चर्चा रंगत होती हे पाहताना निरोप किती महत्त्वाचा असतो हे जाणवत होते.


मित्रहो, निरोप हा शेवट नसतो; तो नव्या प्रवासाची सुरुवात असतो. ही मुले आता नव्या शाळेत जातील, नवे मित्र मिळवतील, नवे शिक्षक भेटतील पण पहिली ते पाचवी या प्रवासात जुळलेले ऋणानुबंध कायम त्यांच्यासोबत राहतील. शाळेच्या अंगणात उमटलेल्या त्यांच्या पाऊलखुणा आणि त्यांच्या निरागस हास्याचे प्रतिध्वनी मात्र आमच्या स्मरणात सदैव जिवंत राहतील.


निरोपाच्या दिवशी शाळेतून बाहेर पडताना पाठमोरी पाठीवर दप्तर घेतलेली ही मुले आम्हाला एखाद्या राजहंसांच्या थव्याप्रमाणे वाटत होती. आपल्या छोट्याशा तळ्याचा निरोप घेऊन विस्तीर्ण आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालेले राजहंस! त्यांच्या पंखात स्वप्नांचे बळ होते आणि आमच्या शुभेच्छांची उब होती. त्यांच्या घराकडे पडणाऱ्या प्रत्येक पावलांनी आमचा जीव कासावीस होत होता आणि दुसरीकडे, “सर, आम्ही आहोत ना शाळेत” म्हणणारी ईश्वरी आपला हात आमच्या हातात विश्वासाने देत बोलत होती.


विद्यार्थी शाळा सोडून जातात पण त्यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध कधीच संपत नाहीत. ते आठवणींच्या रूपाने आयुष्यभर मनात घर करून राहतात. हे निरोपाचे राजहंस अनुभवण्याची संधी जीवनात एकदा यायलाच हवी, माणूस अंतर्मनातून बदलतो. तो प्रगल्भ होतो मिळालेल्या अनुभवांनी.


- भरत पाटील

9665911657

साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६


Recent Posts

See All
 ‌‘बोले तैसी चाले...‌’

‌‘बोले तैसा चाले‌’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते

 
 
 
bottom of page