top of page

तुटकी पेंसिल

9 hours ago
13 min read

गेल्या कित्येक वर्षांपासून दर दोन वर्षांनी माझी वैद्यकीय तपासणी होत आलेली आहे. दरवेळी डॉ. क्लार्कच्या क्लिनिकमधील भेटीच्या शेवटी “सर्व काही ठीक आहे, आजवर तुम्ही जे करीत आला आहात तेच करीत राहा” हे त्यांचे नेमके शब्द असत. माझे स्वयंपाकघर, माझे शैक्षणिक वर्ग आणि पेंसिल या त्रिकूटाच्या परिघात माझा दैनंदिन दिनक्रम जसाच्या तसा चालू असे.




आयुष्याचे सर्व टप्पे पार करीत मी अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे वयाचा पासष्टावा आकडा माझ्याकडे टकमक पाहत होता. डॉक्टर सावध झाले होते. आज माझ्या शरीराच्या अंग-प्रत्यंगाची सखोल तपासणी होणार होती. वजन, उंची, हृदयाचे ठोके, नाडी आणि रक्तदाब या सर्वांची मोजदाद अतिशय बारकाईने लक्षपूर्वक होणार होती. माझ्या दंडाभोवती रक्तदाब मोजणाऱ्या मशीनचा पट्टा घट्ट आवळला जात होता, हृदयाची धडधड अनियंत्रित होत होती, जलद होत होती आणि आता तर आणखीनच वाढली होती. आकड्यांचे गणित सोडवण्यात मग्न असलेले मशीनचे काटे सारखे वर-खाली गिरक्या घेत होते. त्या काट्यांसोबतच, डॉक्टरांच्या डोळ्यांची हालचाल देखील कधी खाली-वर होत होती तर कधी स्थिर होऊन आकड्यांवर नजर टाकीत होती. त्याच प्रक्रियेची अनेकवार पुनरावृत्ती झाल्यानंतर डॉक्टरांनी अंतिम निकाल जाहीर केला, “तुमचा रक्तदाब खूप वाढलेला आहे.”


मी म्हणाले, “अहो डॉक्टर, तुमच्या या दवाखान्याच्या परिसरात प्रवेश करताच माझा रक्तदाब आपोआपच वाढत असतो. तुम्ही हा पट्टा गुंडाळायला सुरुवात केली की तो अधिक वाढतो.”


उत्तरादाखल डॉक्टरांनी केलेलं स्मित आणि त्यामागे दडलेला गर्भितार्थ मला अजिबातच आवडला नाही. त्यातच माझा नवरा अंशू डोके हलवीत होता. त्याने तर माझी आतल्याआत चिडचिड व्हायला लागली. काहीही घडले तरी त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याची त्यांची सवय जुनीच आहे. ते असे काही डोके हलवीत होते, की जणू मी एखादा जघन्य अपराध केलाय. त्यांचे डोळे मला म्हणत होते, “ही तुझीच चूक आहे. तुला स्वतःची अजिबात काळजी घेता येत नाही.”


अंशूच्या अशा प्रतिक्रिया बघितल्या की माझा नेहमीच रागाने पारा चढतो! पण आज या पासष्टच्या आकड्याने मला माझा राग आटोक्यात ठेवावा लागत होता. डॉक्टरांनी पुनश्च एकवार माझ्या कुटुंबाची समग्र माहिती घेतली. मागील नोंदी परत वाचून दाखवल्या.


माझा भारतातला जन्म, पालकांच्या मृत्युच्या कारणांची खोल मीमांसा, मोठ्या बहीण-भावाच्या अकाली मृत्युचा उहापोह व यातच जोडली गेलेली नवी कोरी अद्ययावत पुस्ती चिंताजनक होती. ती म्हणजे माझ्या धाकट्या भावाचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या मृत्युची कारणे लक्षात घेत डॉक्टरांनी तो मजकूर अधोरेखित केला आणि मला म्हणाले - “श्रीमती रेमी, मी तुम्हाला वेगवेगळ्या आवश्यक चाचण्यांसाठी कागद लिहून देत आहे. या सर्व चाचण्या तुमच्या प्राधान्यक्रमात असायला हव्यात. सर्वप्रथम तुम्ही इकोकार्डियोग्राम (2डी इको चाचणी) करून घ्या. मला त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर हवा आहे.”


डॉक्टर याआधी इतक्या गंभीरपणे कधीच बोलले नव्हते. मी बळीच्या बकऱ्यासारखे डोके झुकवून निर्बुद्धासारखी होकारार्थी मान डोलावली आणि त्यांनी एकामागून एक दिलेले कागद घेत गेले. वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त चाचण्या! याशिवाय मल-मूत्र तपासणी, मॅमोग्राम (स्तनांची एक्स रे तंत्राने विशेष चाचणी), गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाकरिता तपासणी आणि खास करून इकोकार्डिओग्राफी हे सर्व करायचे होते.


मी माझ्या टेबलावरील कागदांवर पेंसिलने मोठं मोठे वर्तुळ काढत सुटले. मला माझ्या जीवनरेखेचे अंकगणित सोडवून बरेच काही-बाही लिहायचे होते. निराशेच्या भरात मी पेंसिल इतकी जोरात दाबली की तिचे तीक्ष्ण टोक क्षणार्धात तुटून खाली पडले. तिचा तो तुटलेला तुकडा मला वाकुल्या दाखवीत चिडवत होता. जणू मी स्वतःला देखील याच प्रकारे खंडप्राय केले होते. आतून मी अक्षरशः कोलमडले होते. माझ्या आयुष्याच्या घड्याळाचे शिस्तीत गोलाकार फिरणारे काटे जणू अकस्मात थांबल्यासारखे वाटत होते मला!


कडेवर आणि इतर कथा | Kadevar Aani Itar Katha
₹350.00
Buy Now

दररोज एका चाचणीची आठवण करून देत असताना अंशूच्या डोक्यात एकच विचार ठाण मांडून बसला होता. “यावेळी चाचण्यांतून तुझ्या निष्काळजीपणाचा परिणाम नक्कीच दिसेल, बघच तू!” माझे अहवाल येण्यापूर्वीच अंशूच्या अशा फटकारण्यामुळे माझा राग इतका अनावर होत होता की माझ्या देहातली असली-नसली पीडा डोळ्यांतल्या आसवांद्वारे बाहेर येण्याचा मार्ग शोधत होती. रडून स्वतःचे मन हलके करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय कुठे होता? एका पाठोपाठ एक अशा चाचण्यांच्या आक्रमणाला तोंड देणे अंशूच्या तिखट नजरेचा मारा झेलण्यापेक्षा अधिक वेदनादायक निश्चितच नव्हते.


चाचण्यांच्या अहवालाच्या भीतीची सावली माझ्यासोबतच घराच्या कानाकोपऱ्यात ऐसपैस पसरली होती. मी स्वतःला धीर देण्याचा भरपूर प्रयत्न करीत होते. ही सगळी फक्त वयोमानाप्रमाणे निभावण्यात येणारी एक औपचारिकता आहे. मी मस्त झोपते, माझे खाणे-पिणे यथास्थित सुरु आहे आणि मी खूप खूप काम देखील करते. मला काहीही होणे शक्य नाही!


असा विचार करताना डॉक्टर आणि अंशू, दोघांची नजर मला जणू आरपार छेदून जायची. जसा एखादा विजेता अहंकाराने दर्पोक्ती करतो, तद्वतच अंशूचे शब्द माझ्या कानांवर पडायचे, “एवढा हलगर्जीपणा चांगला नव्हे. एका विशिष्ट वयानंतर आपसूकच येणाऱ्या मर्यादांचे भान ठेवणे अतिशय गरजेचे आहे. ही साधी गोष्ट तुला कधी कळणार?”


मी आपली वरकरणी गप्पच बसायचे; मात्र मनातल्या मनात माझा जबाब असायचा, “मी औषधे घेतल्याने तुम्हाला एकदाची शांती मिळेल आणि या डॉक्टरांनाही!”  


असो! एकामागून एक चाचण्यांचे अहवाल येऊ लागले. त्या अहवालांसोबत क्लिनिकमध्ये जाण्यासाठी माझ्या भेटीची वेळ ठरवण्यात आली. याचा सरळ सुस्पष्ट अर्थ असा दिसून येत होता की काहीतरी गंभीर बिघाड असावा. अहवालांचे बरेचसे आकडे लक्षणीयरित्या खालीवर सरकले होते. या चढउतारांवर नजर टाकणारी अंशूची धारदार नजर जणू सांगत होती की माझा एखादा घोर अपराध सिद्ध झालाय. त्यांच्या आग ओकणाऱ्या नजरेची तीक्ष्णता चरम सीमेवर पोहोचली होती. आता खरं सांगायचं तर हेच अंशू गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतः प्रत्येक प्रकारची औषधे घेत आहेत. त्यांना या घटकेला हे विचारणे अगदीच व्यर्थ होते की त्यांनी त्यांच्या तब्येतीची नीट काळजी का घेतली नाही? या पंधरा वर्षांनंतर माझ्यासोबत असे घडणे म्हणजे गुन्हा कसा काय असू शकतो?


क्लिनिकमध्ये डॉ. क्लार्क माझ्यासमोर कागदपत्रे पसरून बसले होते आणि माझ्या चाचणी निकालांची आकडेमोड करीत होते. ते काहीतरी बोलतील या प्रतीक्षेत मी बसले होते. पुन्हा एकवार त्यांनी कुटुंबाच्या इतिहासाची माझ्याकडून पुष्टी करवून घेतली. असे करता करता दुसरीकडे त्यांची मोजणी चालूच होती. अव्याहतपणे त्यांचे गणित सुरुच होते. माझ्या शरीराचे गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार! हे आठवत असतानाच माझे हृदय धडधडू लागले. त्याचे ठोके माझ्या कानांपर्यंत ठक-ठक करीत आदळू लागले. अंकगणित, बीजगणित, भूमिती. त्रिकोण, चतुर्भुज, षटकोन अष्टकोन! ही अनाहूत पाहुण्यांसारखी आलेली मंडळी एका मोठ्या वर्तुळात सामावली होती व त्या वर्तुळाच्या घेराबंदीत आपसूकच अडकून पडली होती.  


“तुम्हाला बराच जास्त धोका आहे,” मला असे सांगितल्यावर डॉक्टर अंशूकडे वळून म्हणाले, “मिस्टर अंशू, मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. एक अपवाद वगळता इतर सर्व चाचण्यांचे निकाल सामान्य दिसत आहेत. तुमच्या पत्नीला सध्या उच्च प्रतीचा धोका आहे. आपल्याला लगेच हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. उद्या तुम्हाला क्लिनिकमधून फोन येईल.”


मी अवाक होऊन डॉक्टरांकडे पाहत राहिले. क्लिनिकमधून घरी येताना आम्ही दोघेही गप्पच बसलो होतो. कदाचित पुढील काळात काय होणार, याने भयग्रस्त झाल्यामुळे तसे असावे. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला फोन आला - “तुम्हाला एका आठवड्याच्या आत हृदयरोगतज्ज्ञांना भेटायचे आहे.”


“तुला याचा अर्थ कळतोय ना?” अंशूच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या या उल्कापाताचे उत्तर मी काय आणि कसे देणार होते? आमच्यातल्या अबोल्यामुळे मी तशीही दुःख सहन करीत होतेच. मी अंशूकडे केविलवाण्या नजरेने बघत राहिले. एक आठवडा गोंधळलेल्या द्विधा मनस्थितीत घालवल्यानंतर अखेरीस हृदयरोगतज्ज्ञांनी माझ्या हृदयाची सखोल तपासणी केली.


“इथं दुखतंय का? तिथं दुखतंय का?” त्यांच्या सर्व प्रश्नांना माझे नकारार्थी उत्तर ऐकून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले.


थोडा विचार केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “कुठलीच लक्षणे नसणे हे तर मला अजूनच चिंताजनक वाटते आहे. तुमची केस निश्चितच उच्च-जोखीम या श्रेणीत येते. म्हणूनच मी तुम्हाला शक्य तितक्या लवकर न्यूक्लियर स्ट्रेस टेस्टसाठी पाठवणार आहे.”


घरी परतताना अंशू माझ्यावर अपमानजनक शब्दांची बॉम्बफेक करायला जणू टपलेलेच होते. “तू जर थोडी काळजी घेतली असती तर ही परिस्थिती भोगावी लागली नसती. तुझ्या घरातल्या लोकांचे काय काय झाले हे तुला माहिती नव्हते का?”


आता मात्र माझ्या धैर्याची कमाल मर्यादा संपली होती. “जरा सांगता का मी कोणती काळजी घेतली नाही?”


“ठीक आहे! सगळ्यांची फोड करून सांगू का बाई? पाव-भाजी कोण चापून खातं? चांगलं वरून भरभरून लोणी घालून?”


“मी... पण...”


अंशूने मला पुढे बोलूच दिले नाही आणि मला थांबवत रागाने बोलताच राहिले, “आणि हो, रव्याचा शिरा, बदामाचा शिरा, झालंच तर मुगाचा शिरा घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? छोले भटूरे, बटाट्याची भाजी व पुऱ्या सारखं सारखं कोण बनवतं? आरोग्याला पोषक असलेल्या सॅलडला गवत-पालापाचोळा सारखी शेलकी नावे ठेवत कोण हात लावत नाही? दिवसातून चार वेळा चहा कोण पीत असतं? आणि ऐका बाईसाहेब! कोणाच्या ताटात सर्वात जास्त जिलेब्या आणि गुलाबजाम असतात?”


अंशूच्या रंगाचा पारा खरोखरच अस्मानाला भिडला होता.  


मी अगदी असहाय्यपणे रडायला लागले होते. जणू ते प्रत्येक क्षण भरल्यापोटी मलाच हिशेब मागत होते आणि माझे गणित अगदीच कच्चे असल्याने मी रडवेली होऊन त्या अंकांच्या जुलूमाचे ओझे सहन करीत आसवांच्या प्रत्येक थेंबात माझी असहाय्य स्थिती व्यक्त करत होते. ऐकिवात होते की बायकोचे अश्रू नवऱ्याच्या रागावर पाणी फेरतात. उलट इथे तर त्यांनी जणू आगीत तेल ओतले. त्यामुळे अंशूचा क्रोधाग्नी अजूनच भडकला. “आता असं रडून काय उपयोग आहे? निदान माझ्याबद्दल विचार करून तरी स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस ना! जसं काही तुला माहीत नाही की तू गेल्यानंतर माझे काय होईल! मी जिवंत असूनही मेल्यासारखाच असेन.”


कुणास ठाऊक की हे प्रेम होते, आरडाओरडा होता की राग! जे काय असेल ते! पण माझ्या भावनांचा बांध पार फुटून जाण्यासाठी पुरेसे होते. आतून माझी शकले होत असताना देखील माझे अंतरिम विचार-तर्क माझ्या बचावाची खिंड लढवीत प्रयत्नांची शिकस्त करीतच होते. “पण कुठे ना कुठे काही तरी दिसायला हवे होते. मला कुठेही ना वेदना होत आहेत ना कोणती लक्षणे आढळली आहेत!”


“लक्षणे गेली खड्ड्यात! कोविडच्या काळातही लोक लक्षणांशिवाय मरत होते ना? तुला माहिती नाही का?”


आता निराशेने आणि अगतिकतेने कळस गाठला होता. हृदयाच्या आत इतके दिवस साचलेले दुःख वितळून गेले होते व अश्रूंच्या रूपात डोळ्यांतून झरझर पाझरत होते. माझे सगळे आवडते पदार्थ माझ्याभोवती फेर धरून ता-थई-थईच्या तालावर नाचत होते. मरणासन्न मंद प्रकाशाने माझा चेहरा फिकुटला होता. मला कधीही अन्नाची हाव नव्हती पण या घडीला माझ्यावर लादलेला हा प्रचंड आरोप स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते.


“खाऊ शकते, म्हणून कधीतरी त्या गोष्टी खाते,” असे शब्द माझे शस्त्र असायचे.


घरी परतल्यावर अंशूने दोन्ही मुलांना अशा प्रकारे समजावून सांगितलं की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्यासोबत संपूर्ण वेळ राहण्याचा निर्णय घेतला. असे वाटत होते की जणू डॉक्टरांनी अंशूला माझ्याविषयी अशी काही माहिती दिली आहे, जी मला ठाऊक नव्हती आणि ती इतक्या टोकाची होती की मी आता या आजारातून वाचू शकणार नाही. माझ्या माघारी तिघेही गुपचूप हेच बोलत असावेत असे मला वाटायला लागले.  


मी काही गोष्टी ऐकल्या तर काही ऐकून न ऐकल्यासारख्या केल्या.


“पोरांनो! आईला सांगू नका बरं! त्या आपल्या घरासमोर राहणाऱ्या विसूकाकांची अगदी अशाच अवस्थेत चाचणी केली होती. बिचारे ट्रेडमिलवर जे बेशुद्ध पडले ते कधीच उठले नाहीत.”


“त्यांचं सोडा हो बाबा. इतकं देखील दूर जाण्याची गरज नाही. खुद्द आमच्या मामांना पण असंच झालं ना? आठवतंय? घरी जाताना रस्त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”


याचा एकंदरीत अर्थ असा होता की मी ट्रेडमिलवर पडणार हे निश्चित झाल्यासारखेच होते. जाण्यापूर्वी घर व्यवस्थितपणे लावून जाण्यासाठी माझ्याकडे अद्याप आठ दिवस उरले होते; मात्र सर्वप्रथम मी माझ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या अशा रीतीने पूर्ण केल्या की जेणेकरून मी गेल्यावर उर्वरित सत्रात माझ्या विभागाला आणि माझ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.


मी माझ्या दोन्ही मुलांजवळ माझ्या दागिन्यांच्या पेटीचे सविस्तर वर्णन केले : “सर्व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. माझ्या सवयीप्रमाणे मी घरातल्या कानाकोपऱ्यात लहान सहान दागिने लपवलेले आहेत. पोरी, तुला न बघता वस्तू फेकून देण्याची सवय आहे. तेव्हा आता तरी काहीही फेकण्यापूर्वी ते नीट तपासून पाहत जा. जितके आठवते आहे ते एका ठिकाणी ठेवते आहे. घर आणि गाडी यांच्याविषयी काही समस्या असेल तर तुमचे पप्पा बघून घेतील.”


या दिवसात गवत-पालापाचोळा (सॅलड) खाताना अगतिक अवस्थेत अधूनमधून आसवांचे थेंब टपकायचे! जणू डोळ्यांच्या कोपऱ्यात ते वाटच बघत असायचे की मी केव्हा थोडी तरी उदास होईन आणि त्यांना बाहेर वाहत येणाची संधी मिळेल. रागाच्या भरात मी माझा अतिप्रिय चहा पिणे देखील बंद केले. ही मी स्वतःला दिलेली खूप भयानक अशी अंतिम शिक्षा होती. त्याचा माझ्या मनावर आणि मेंदूवर विघातक परिणाम असा झाला की त्या ठणक्याने माझे डोके फुटायची वेळ आली होती.  


दवाखान्यातून सतत फोन येत होते : “ही पाच ते सात तासांची चाचणी आहे. त्याच्या चोवीस तास आधीपासून कॅफिन (चहा-कॉफी) घेणे बंद करा. बारा तास आधीपासून काहीही खायचे नाही. सकाळी उठल्यावर थोडेसे पाणी पिऊन या. सोबत काही नाश्ता नक्की घेऊन या.”


प्रत्येक सूचनेबरहुकूम परिस्थितीचे गांभीर्य वर्धमान होत होते. मी रोगग्रस्त असल्याची भावना माझ्या डोक्यात अधिकाधिक तीव्रतेने रुजत गेली.


आता शेवटचे कार्य उरले होते. ते म्हणजे माझी अमूल्य संपदा सोपवणे. “अंशू, हे सगळे माझ्या रचनांचे बाड आहे. त्यातील बहुतेक रचना प्रकाशित झाल्या आहेत पण काही प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत. कृपया मी गेल्यावर या कथांचा संग्रह प्रकाशित कराल?” हे सांगता सांगता माझा कंठ दाटून आला आणि त्यातून आवाज देखील फुटेना. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना सोडून जाताना त्यांच्या शेवटच्या स्पर्शाने कासावीस होऊन आतल्याआत घुसमटत धाय मोकलून रडत असते तसे माझे झाले होते.


परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत अंशूने मला आश्वासन दिले, “काळजी करू नकोस, मी तुझे पुस्तक छापून त्याचे प्रकाशन देखील करीन.”


त्या दिवसात अंशू क्षणभरही माझी साथ सोडत नव्हते. या वागण्याने माझे दिवस भरले आहेत या जाणीवेची पुष्टीच होत होती. मध्यरात्री मी जराशीही हालचाल केली तर ते लगेच विचारायचे, “काय झालं? काही होतंय का?”


कहर म्हणजे मधेच रात्री झोप उघडल्यावर मी उठून टॉयलेटकडे जायला निघाल्यावर त्यांचा विचित्र प्रश्न असायचा, “तू टॉयलेटला का जाते आहेस?”


“टॉयलेटला कोणी का जात असतं?” या असंबद्ध प्रश्नावर हसावं की रडावं हे कळेनासे होऊनही अंशूवर चिडायची सोय नव्हती. ही नाजूक वेळ वादविवाद करण्याची नव्हती. चाचणीच्या दोन दिवस आधीपासून माझी झोप, माझे जेवण इत्यादी नित्यक्रमांवर बारकाईने लक्ष दिले जात होते. त्या रात्री झोपणे खूपच अवघड झाले होते. मी कित्येक वेळा उठून बघत घड्याळाचे काटे पाहत होते की अजून त्याचा गजर का होत नाहीय?  


शेवटी एकदाची ती काळरात्र सरली आणि मी सर्व आवरत आंघोळ करून तयार झाले.


मी दवाखान्याच्या परिसरात गेल्यावर एका रुग्णाच्या भूमिकेत जात तेथील खुर्चीत स्वतःला अक्षरशः कोंबले. नर्सने माझ्या नावाचा पुकारा करताच अंशूने मला घट्ट आलिंगन दिले. जणू तो त्यांचा शेवटचा चैतन्याने भरलेला आणि भारलेला स्पर्श होता, ज्याला ते स्वतःच्या अंतरंगात आतवर त्याचा अनुभव समाहित करण्याचा प्रयत्न करीत होते. मला रुग्णांचा गणवेश असलेला एक गाऊन घालण्यास सांगितले गेले. माझ्या छातीवर तारांसह अनेक चिकट पॅचेस जोडले गेले. अंगात गणवेश आणि मास्कने नाकतोंड झाकून लगबगीने यंत्रमानवासारखे सर्वत्र संचार करणारे तेथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ इत्यादी व्यावसायिक तर मला मृत्युची प्रमाणपत्रे बनवणारे यमदूतच प्रतीत होत होते.


मला एका किओस्कमध्ये बसवण्यात आले आणि सांगण्यात आले, “प्रथम, तुम्हाला आयव्ही इंजेक्शनद्वारे शिरेत (व्हेन) किरणोत्सर्गी रसायनाचे इंजेक्शन टोचण्यात येईल. ठरावीक काळानंतर हे ट्रेसर (माग काढणारे रसायन) तुमच्या शरीरातील शिरांतून मधून कसा प्रवास करते त्याचे एका इमेजिंग मशीनद्वारे अनेक फोटो घेतले जातील. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाह मंद झालेल्या आणि हृदयाला इजा पोचलेल्या क्षेत्रांचा नेमका शोध घेण्यास मदत होईल.”


आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या नर्सला दहा मिनिटे उलटून गेल्यावर देखील आयव्हीसाठी माझ्या हाताची शीर सापडली नाही. यासाठी तिने माझ्या दोन्ही हातांमध्ये दोन-तीन वेळा जोरात सुई घुसवली. जर हे अन्य वेळी घडले असते तर मी तिला अशा भेदक नजरेने पाहिले असते की ती पुढील वेळेस रुग्णावर असे अत्याचार करण्यास धजावली नसती पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-शाप देणे योग्य नव्हते.


माझा रक्तदाब मोजला गेला तर तो 160 च्या वर होता. काल रात्रीपासूनच माझ्या हृदयाची धडधड मर्यादा ओलांडून सैरभैर झाली होती. घराचा विचार मनात येताच आधीच माझे काळीज दुःखातिरेकाने काळवंडले होते. अशातच त्यात माझ्या मनात असंबद्ध विचार डोकावू लागले, “माझ्या अंशूच्या आयुष्यात दुसरी कुणी आली तर? नाही... तो तर माझा एकाधिकार आहे.” जर एखाद्या मरणासन्न महिलेला दुसऱ्या स्त्रीचा असा जोरदार झटका लागला तर तिचा रक्तदाब कसा वाढणार नाही? एकामागून एक असे झटके बसत होते की काय सांगू अन्‌‍ कसं सांगू!


आराम-कक्षात थोडा वेळ राहिल्यानंतर आता माझ्या समोर एक नवीन चेहरा होता, त्यासोबतच एक नवीन खोली होती. मला एका विशालकाय इमेजिंग मशीनमध्ये झोपवण्यात आले होते. मशीन सुरु झाली, अधूनमधून कामाला लागत तिने नियत वेळी प्रत्येक कोनातून आतील शिरांच्या अगणित प्रतिमा घेतल्या. मी त्या मशीनच्या बोगद्यात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे होते. मशीन माझ्या अंगप्रत्यंगावरून फिरत राहिली. डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, सर्वत्र, फोटोच फोटो घेतले जात होते. प्रत्येक वेळी ते अजस्त्र यंत्र माझ्याजवळ येताच माझी भीतीने गाळण उडायची. असे वाटत होते की जणू बदामाचा शिरा, गुलाबजाम आणि जिलेबीसारख्या चविष्ट मिष्टान्नांचेच फोटो काढले जात आहेत.


इकडून तिकडून धावत आणि चालत हकनाक फेऱ्या मारल्यावर परतलेला एकच विचार माझ्या मनात येत होता, “कुठलेही लक्षण नसतानाही, मी इतकी आजारी कशी काय असू शकते?” आशंकेच्या निव्वळ कल्पनेनेच सशासारख्या बावरलेल्या मनाला अंशूचा अदृश्य आवाज ऐकू यायला लागला, “आता भोग आपल्या कर्माची फळे!”


ते अवाढव्य यंत्र आता वर्तुळाकार फिरत होते. माझ्या शरीरातील असल्या-नसल्या प्रत्येक लहान-मोठ्या आतड्याचा आणि रक्ताच्या एक-एक थेंबाचा हिशोब करत होते. मी त्याच्या कार्यशैलीने भलतीच प्रभावित झाले होते. कुणास ठाऊक कोण्या डोकेबाज माणसाने ती निर्माण केली होती. लोकांचा मेंदू किती कुशाग्रतेने चालतो! वैद्यकीय शास्त्रातील कित्येक चमत्कार मानवाच्या अनवट कल्पनाशक्तीतून अवतरले आहेत. शेवटी हा टप्पाही मी यशस्वीरित्या पूर्ण केला.  


काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर माझी बहुप्रतिक्षित ट्रेडमिलवर धावण्याची चाचणी झाली. घरी मला असंख्य वेळा समजावण्यात आले होते की जर मी धावू शकत नसेन तर तिथल्या लोकांना लगेच सांगावे. तिथे हजर असलेल्या तंत्रज्ञांनी त्याचीच पुनरावृत्ती केली, ती ही अनेक वेळा! माझा रक्तदाब मोजण्यात आला. आता तर तो 170 पर्यंत पोहोचला होता. माझ्या दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा आवळलेला होता. त्यात भर घालीत छातीवर तारांना जोडलेले अनेक चिकट पॅचेस लावले गेले.


धावण्याचे यंत्र सुरू झाले. ट्रेडमिलवर धावत असताना मी कधी शिकवता-शिकवता माझ्या वर्गात चकरा मारीत होते तर कधी युवी या माझ्या नातवासोबत विडिओ गेममधील माझ्या पात्राला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत होते. ट्रेड मिलच्या मार्गिकेवर चालताना या सर्व आनंददायक क्षणांची मी प्रत्यक्षात गळाभेट घेत होते. हे सर्व आनंदाचे क्षण माझ्या मार्गावर येत राहिले.


“तुम्ही बऱ्या आहात का?”


“हो.”


“मी वेग वाढवत आहे.”


“हो.”


“जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर मला लगेच कळवा.”


“हो.”


“जर तुम्हाला किंचितही छातीत दुखायला लागले तर मला लगेच सांगा.”


“हो, मी ठीक आहे.”


या वळणावर मी अगदी आरामात जणू गुलाबी झोपेच्या तंद्रीत असल्यागत माझ्या जीवनातील सुखद क्षणांच्या आठवणी जागवायला लागले. ते आनंदाचे क्षण स्मरले जेव्हा एका प्रतिष्ठित नियतकालिकाने माझी कथा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कथा म्हणून घोषित केली होती. वाचकांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरु होता. त्या अनावर आनंदाच्या प्रवाहात तेव्हाही माझा रक्तदाब नक्कीच वाढला असावा. आम्ही सर्व जण माझ्या यशाचा क्षण साजरा करण्यासाठी एका हॉटेलात गेलो होतो. त्या रात्रीचा पनीर कोफ्ता इतका चविष्ट होता की त्याच्या चवदार चवीने माझ्या जिभेचा लगेच ताबा घेतला. त्या भावुक क्षणांनी भारलेल्या स्मृतिंच्या धुक्यात ट्रेडमिलचा वाढता वेग, छातीचे दुखणे इत्यादी प्रश्न मागच्या मागे कुठे तरी हरवून गेले.


“मी तुम्हाला सर्वोच्च वेगवान बिंदूवर घेऊन जात आहे. कृपया मला सांगा की तुम्ही ठीक आहात की नाही?”


“हो, मी अगदी व्यवस्थित आहे.” ती देखील माझ्या चेहऱ्यावरील संपूर्ण समाधानाचे भाव पाहून आश्चर्यचकित झाली होती. त्या सुरेख क्षणी, हॉटेलमधील मिष्टान्न माझ्या डोळ्यांसमोर होते आणि मी अत्यानंदाने रबडीत न्हायलेल्या गुलाबजामचा आस्वाद घेत होते.


वेगाने, अति वेगाने... त्याच गतीच्या ओघात मला आणखी एक इंजेक्शन देण्यात आले. मी बेफिकीरपणे आपल्याच जगात हरवून गेले होते आणि त्याच वेगाने पुढे पुढे धावत राहिले. तेव्हा मी विचार करत होते, “मी आता पडेन, नंतर पडेन. पडण्याआधीच अंशू येऊन मला सावरतील!” त्यांच्या आश्वस्त करणाऱ्या हातांचा स्पर्श जाणवण्यापूर्वीच, अचानक मशीनची गती कमी झाली आणि त्यासोबत माझे विचारही मंदावले. माझ्या मेंदूत एक प्रश्न उगवला, “एवढ्या धिम्या गतीने चालणाऱ्या मशीनमधून मी कशी काय पडू शकेन?” हळूहळू मशीनचा वेग कमी होऊन ती पूर्णपणे थांबली.


“खाली उतरा! या.”


“का, काय झालंय?” मी हतप्रभ होऊन गोंधळलेल्या नजरेने विचारलं.


“आटपली चाचणी!”


मला वाटलं, कदाचित ते मला थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसवतील आणि नंतर पुन्हा धावायला लावतील. माझा रक्तदाब परत एकवार मोजण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो 155 पर्यंत घसरला होता. अरे देवा! इतक्या झटपट कसा काय कमी झाला? मी पहिल्यांदा मेले नाही मात्र दुसऱ्यांदा धावता-धावता मी नक्की मरणार! माझ्या समोरची तंत्रज्ञ आपले चार्ट भरत होती. मी धाडस करून विचारले, “किती वेळ विश्रांती घेतल्यावर मला पुन्हा धावायला लावणार आहात?”


“तुमची चाचणी संपली.”


“तुम्हाला काय म्हणायचंय?”


“म्हणजे तुमची परीक्षा चांगल्या तऱ्हेने पार पडली.”


“हो का?” मी स्तब्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होते.


तितक्यात मागून एक आवाज आला, “तुम्हाला रेडिओ ट्रेसरच्या फोटोजचा आणखी एक सेट द्यावा लागेल.”


त्या यंत्राने संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. तेच वीस मिनिटांचे चक्र फिरले मात्र या चक्रादरम्यान मला झोप येऊ लागली होती. कालची रात्र अस्वस्थ अवस्थेत अक्षरशः जागूनच काढली होती. म्हणून आता ही निद्रा! या अनिवार झोपेपायी “तुमच्या जीविताला खूपच धोका आहे,” या डॉक्टरांच्या शब्दांना जणू कुजबुजण्याची देखील परवानगी नव्हती.


घरी परतल्यानंतरही अंशू काळजीतच असलेले दिसले. येणाऱ्या चाचण्यांच्या रिपोर्टबद्दल त्यांची ही बेचैनी मला जाणवत होती. तीन दिवसातच फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले. आम्ही अर्धा तास लवकरच पोहोचलो. आता आम्ही तिघेही समोरासमोर होतो : मी, अंशू आणि डॉक्टर.


विखुरलेल्या कागदपत्रांकडे पाहून डॉक्टर स्मित करीत म्हणाले, “तुम्हाला + मिळाले आहे, श्रीमती रेमी.”


“डॉक्टर, मी समजले नाही!”


“तुमच्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत.”


मी क्षणभर सुन्नच झाले. पुढच्याच क्षणी मला सत्य उमगले - “पण डॉक्टरसाहेब, मला नेमकं काय झालं होतं? तुम्ही इतक्या चाचण्या केल्या माझ्या!”


डॉक्टर उद्गारले, “तुमच्या कुटुंबाचा इतिहास! तुमचे स्वतःचे टेस्ट रिपोर्ट सामान्य आहेत पण तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयरोगामुळे होत गेलेल्या मृत्युसह तुमचे हे अंक वाढतच राहिले आणि आता तर तुम्ही पासष्ट वर्षांच्या आहात, म्हणून तुम्ही आपसूकच अति धोका असलेल्या श्रेणीत येऊन पोचलात.


“म्हणजे हे जे सगळे रामायण घडले ते कुटुंबाच्या इतिहासामुळे?”


“होय!”


माझ्या कुटुंबातील सदस्य एक एक करून माझ्यासमोर हजर होऊ लागले. त्यांनी स्वतःहून सर्व काही सहन केले होते. त्याची धग त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती. समोर उभे असलेले अंशू माझ्यावर ओढवलेल्या या भीषण अनुभवाने खूपच हादरून गेले होते. आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडताच बराच वेळ माझा हात घट्ट पकडून ठेवीत ते माझ्या डोळ्यांत खोलवर पाहत राहिले. यावेळी त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांचे डोके पुन्हा हलले पण आता ते समाधानाने होते. माझ्या खांद्याला हळुवारपणे स्पर्शाने थोपटीत ते बोलले, “माफ कर मला, मी खूप काही बोललो तुला! आता पुरे झाले डाएट. चल, तुला जे हवे ते खाऊन घे बरं!”


माझ्या तोंडून निरागस शब्द बाहेर पडले, “मी नऊ दिवसांपासून चहा घेतलेला नाही!” आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते. कदाचित संभावित विरहवेदनेच्या निव्वळ कल्पनेपुढे आम्ही असहाय होत गुढघे टेकले होते.


घरी पोहोचताच मी सर्वात आधी काय केले असेल तर मला केविलवाण्या नजरेने बघणाऱ्या पेंसिलीचे टोक सुबकतेने तीक्ष्ण केले! लगोलग त्याच टोकदार पेंसिलीने दवाखान्यातून नुकत्याच आणलेल्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यावर लिहिले : “कौटुंबिक इतिहास!” या घाटदार अक्षरांचे सौंदर्य अतुलनीय होते कारण पेंसिलीला नवतीचे धारदार टोक प्राप्त झाले होते!    


**

मूळ लेखिका (हिंदी) - डॉ. हंसा दीप

भावानुवाद (मराठी) - डॉ. मीना श्रीवास्तव

पूर्वप्रसिद्धी

साहित्य चपराक मे-जून २०२६


कोवळी सकाळ | Kovali Sakal
₹175.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page