दरोज मीच झाडती!
- Aug 4
- 3 min read
शालेय स्वच्छता करायला मुलांना नेहमीच आवडते. त्यात काही आवर्जून आपले ठरलेले काम पुढाकार घेऊन करतात, तर काहींना सवय व्हावी म्हणून नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून करवून घेतले जाते.
असेच एके दिवशी वर्ग झाडण्यासाठी समोर असलेल्या मुलीला सहज हटकले, तर तिने या आठवड्यात केलेल्या कामाची पावतीच भराभर समोर ठेवली. तिचे मनोमन पटलेही होते; पण आता पुन्हा तिलाच करावे लागणार म्हणून तिला समजावू लागलो आणि झाडू हातात घेत मीच वर्ग झाडू लागलो. तिला कसेकसे झाले. तिने हातातून झाडू घेत, “सर, दरोज मीच झाडती ना! त्या कोणीच लवकर येती नहीं.”

चौथीतील त्या मुलीने थोड्याशा नाराजीने हे वाक्य म्हटले आणि हातातल्या झाडूने वर्ग स्वच्छ करू लागली. वाकून काम करत असलेल्या चेहऱ्यावरचा राग, नाराजी आणि मनातील प्रश्न स्पष्ट दिसत होता. वर्गातील इतर मुले तिच्याकडे पाहत होती. काहींच्या चेहऱ्यावर हसू होते, तर काहींना तिचे म्हणणे योग्यही वाटत होते.
मी तिच्याजवळ गेलो आणि शांतपणे विचारले, “खरंच दररोज तूच झाडतेस का?”
ती म्हणाली, “नाही सर... पण माझीच नेहमी पाळी येते असं वाटतं. तुम्ही वाटे पाडले आहेत ना! बाकीच्या मुली लवकर येतीच नही.”
मी हसत म्हणालो, “अगं बाई, दररोज काम केल्याने कुठे काही बिघडते का? उलट चांगली सवय लागते. वर्ग आपलाच आहे ना? जसं घर आपलं असतं, तसंच शाळाही आपलीच असते.”
तिथे असलेल्या मुलांचे लक्ष आता आमच्या संवादाकडे लागले होते. ती ऐकत होती याची जाणीव झाली होती.
मी पुढे म्हणालो, “महात्मा गांधींनी बुनियादी शिक्षण सांगताना श्रमाला शिक्षणाइतकंच महत्त्व दिलं होतं. स्वतः काम करणं, परिसर स्वच्छ ठेवणं आणि श्रमाची प्रतिष्ठा जपणं हा त्यांच्या शिक्षणाचा पाया होता. साने गुरुजीही स्वतःची कामे स्वतः करत असत. त्यांनी कधीही श्रमाला कमीपणा मानला नाही.”
तिने काम थांबवले. ती आता शांतपणे ऐकत होती. मुलेही जवळ आली.
मी तिला विचारले, “तू घरी तुझं ताट स्वतः जागेवर ठेवतेस ना?”
“हो सर.”
“दप्तर स्वतः भरतेस?”
“हो.”
“मग वर्ग आपला आहे, त्याची स्वच्छता ठेवणं हीदेखील आपलीच जबाबदारी नाही का?”
तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. ती हसली. बाजूला असलेला एक मुलगा बोलला, “सर, मग आपण रोज सगळे मिळून दोन मिनिटे वर्ग स्वच्छ केला तर कोणालाच काही वाटणार नाही. समदे काम करतील नि स्वच्छताही लवकर होईल.”
“क्या बात है!” मी आनंदाने म्हणालो. त्यांना समजावत, “पोरांनो, स्वच्छता ही शिक्षा नसते, ती सगळ्यांची जबाबदारी असते.”
त्या दिवसापासून वर्गात एक छोटासा नियम झाला. घंटा वाजण्यापूर्वी दोन मिनिटे सर्व विद्यार्थी आपापली जागा स्वच्छ करायचे. कुणी कागद उचलायचा, कुणी बाक नीट लावायचा, कुणी फळा पुसायचा, तर कुणी खिडक्या बंद करायचा. आता झाडू हातात घेताना कुणालाही कमीपणा वाटत नव्हता. कोणी ठरल्याप्रमाणे कामे करत असताना दिसत होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, नेतृत्व, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा विकास शाळेतूनच व्हावा अशी त्यामागील भूमिका आहे. वर्ग स्वच्छ ठेवणे ही छोटी कृती वाटली, तरी त्यातून जबाबदारी, वेळेचे नियोजन, संघभावना आणि स्वअनुशासन यासारखी जीवनकौशल्ये सहज विकसित होतात.
राज्य शासनानेही शालेय स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले आहे. स्वच्छ वर्ग, स्वच्छ शौचालये, सुरक्षित पिण्याचे पाणी, हात धुण्याच्या सवयी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छ परिसर या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट जोडलेल्या आहेत. शाळेतील स्वच्छता ही विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांचा सहभाग असलेली सामूहिक चळवळ आहे.
काही दिवसांनी स्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करणारी ती मुलगी स्वतःच म्हणाली, “सर, आज माझी पाळी आहे. मी झाडते.”
मी तिच्याकडे पाहिले. काही दिवसांपूर्वी नाराजीने झाडू हातात घेणारी मुलगी आज आनंदाने काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. वर्गातील इतर मुलेही उत्साहाने तिच्या मदतीला धावली होती. सोबतीने सारे मुले काम करत होती.
शिक्षण म्हणजे केवळ धडा शिकवणे नाही; तर विचार बदलणे, सवयी घडवणे आणि मूल्यांची बीजे पेरणे होय. एका छोट्याशा संवादातून स्वच्छतेचा संस्कार रुजला आणि श्रमाची प्रतिष्ठा मुलांच्या मनात नकळत निर्माण झाली. स्वच्छ वर्ग म्हणजे फक्त स्वच्छ भिंती नव्हेत; तर स्वच्छ विचार, सामूहिक जबाबदारी आणि सुंदर भविष्याची सुरुवात असते.
-भरत पाटील
+91 96659 11657
.jpg)



Comments